Tuesday, December 30, 2014

विकासाचा प्रवास

टिम गॉल्वी हा एक नुसताच टेनिस शिकवणारा कोच नाही तर मॅनेजमेंट गुरु देखिल आहे. त्याने काही ‘भन्नाट’ प्रयोग केलेत, त्यातला एक माझा फार आवडता आहे. तो असा:
टिम एका सेल्स कॉन्फरन्सला गेला होता. तिथे त्याने एक टेनिसची टूर्नामेन्ट आयोजित केली. पण तिचे नियम नेहमीचे नसणार हे तुमच्या ध्यानात आलंच असेल. ते नियम उफराटे होते – म्हणजे ‘जो टेनिस गेममध्ये जिंकेल तो टूर्नामेन्टमधून बाद होईल, आणि जो हरेल तो पुढच्या फेरीत खेळेल!’ अजब प्रकार होता हा – हरणाऱ्याला बक्षीस होतं, शाब्बासकी होती तर जिंकणाऱ्याला डच्चू!!
त्या अजब खेळात सर्व खेळाडूंना एक प्रश्न भेडसावत राहिला, आणि त्यांना त्याच्या उत्तराचा शोध घ्यायलाच लागला – तो प्रश्न म्हणजे “मी हा खेळ कां खेळतोय?”
सेल्स विभागात सर्वांना सतत स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. “दुसऱ्याच्या पुढे कसं जाता येईल” असा सतत विचार करणारी माणसं – आणि त्यात सेल्स विभागातीलच कशाला, केजीतल्या मुलांच्या मातांपासून ते मोठया उद्योगपतीपर्यंत सर्वजण त्यात आहेत – ती “हरणारा पुढे जाईल तर जिंकणारा फेकला जाईल” अशा विचित्र नियमामुळे भांबावून गेली. मी कां खेळतोय? काय उत्तर देणार ह्या प्रश्नाचं?
टिम गॉल्वीच्या मते त्या प्रश्नाचं उत्तर चौकटीबाहेर आहे, ते म्हणजे - ‘मी हा खेळ खेळतोय ते तो खेळ शिकायला, माझ्या क्षमता वाढवायला.’ खेळाच्या विचित्र नियमांमुळे जिंकण्या-हरण्यावर लक्ष केंद्रित न करता खेळण्याच्याच अनुभवावर लक्ष केंद्रित करणे खेळाडूंना शक्य होतं. म्हणजेच बाह्य जगाने घालून दिलेल्या नियमांनुसार न जातां केवळ खेळाचाच आनंद लुटण्याच्या आंतरिक उर्मीनुसार तो खेळ खेळणे शक्य होतं, नव्हे तोच तर संदेश होता!
राळेगण-सिद्धीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे अण्णा हजारे, त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेले हिवरेबाजारचे पोपटराव पवार, संगीताच्या ध्यासाने घरातून निघून गेलेले भीमसेन जोशी ही सर्व मंडळी जगाने घालून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करूनच जगली. ही सगळी मोठी माणसं, त्यांच घवघवीत यश आपल्या समोर आहे. एकंदरीतच आंतरिक उर्मीनुसार जगायचं म्हणजे वैयक्तिक विकासाच्या दोन-चार पायऱ्या वर चढण्यासारखं आहे.
तुम्ही राजन शहाबद्दल ऐकले नसे, ते प्रकाशझोतात नसले तरी यशस्वी जरूर आहेत. नुसतेच यशस्वी नाहीत तर समाधानीही आहेत. मी त्यांना सहा महिन्यापूर्वी भेटलो होतो. कॉमर्स विषयात पदवी घेतल्यावर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला कारण इंजिनियर नसूनही त्यांना तेच करायचे होते. एक छोटा कारखाना काढला. बरीच धडपड केली, धंद्यात तग धरण्यासाठी अनेक उत्पादने केली आणि बदलली, अवकाशाने स्थिर झाले. मिळकत आणि खर्च यांचा ताळमेळ बसवताना कित्येक वर्षे तारेवरची कसरत करावी लागली. आज त्यांनी उभी केलेली कंपनी लौकिकार्थाने यशस्वी तर झाली आहेच, पण दृष्ट लागण्याइतकी घट्ट नातेसंबंधान्नी बांधली गेली आहे.
राजन शहांसारखी माणसं स्वत:च्या कामाने दुसऱ्याला प्रेरणा देतात. त्यांच्या कम्पनीत काम करणारे कितीतरी पुरुष व स्त्रिया मॅट्रिक देखिल पास नाहीत. पण ते ग्राहकांकडून लाखांच्या ऑर्डरी मिळवतात. हा चमत्कार नाहीये. मी एशियन पेन्टमध्ये काम करू लागलो तेंव्हा माझ्या दोन सहकाऱ्यांची वाटचाल प्यून ते सिनियर क्लार्क अशी झाली होती हे नजरेस आलं होतं. ते त्यांच्या कामात अत्यंत तरबेज होते. कम्पनीचा पर्चेस मॅनेजर पदवीधरदेखिल नव्हता.
इथे आपल्या ध्यानात दोन मुद्दे सहज येतात. पहिला मुद्दा असा: कांही माणसं आंतरिक उर्मीनुसार किंवा अंत:प्रज्ञेने जगतात. जग त्यांच यश मोजतं ते त्यांनी केलेल्या खडतर प्रवासाचे भान ठेऊनच. अशी माणसं पुढे येतात त्याचं दुसरं कारण म्हणजे ते त्यांच्या अनुभवाचं सार आत्मसात करतात. अनुभव घेणं व त्यातून बोध घेणं या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. पहिल्या म्हणजे अनुभवाच्या पायरीवर आपण सर्व असतो, पण बोध घ्यायच्या पायरीवर जाण्यासाठी अंतर्मुख होण्याची, आत्मचिंतनाची प्रक्रिया जाणीवेने करावी लागते. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या, रूढार्थाने असलेल्या शिक्षणाची गरज नसते. म्हणूनच 'निरक्षर' असलेली बहिणाबाईदेखिल अप्रतिम दाखले, दृष्टांत देऊ शकते.
आता दुसरा मुद्दा: अंत:प्रेरणेने जगणारी माणसे स्वत्:ला घडवताना इतरांनाही घडवतात. म्हणजे डेक्कन क्विनचे ईंजीन घाट वर चढत जाते तसे डबेही मागोमाग घाट चढतात. तसंच. फरक इतकाच की माणसांच्या बाबतीत ते ईंजीनची 'लेव्हल' गाठू शकतील याची खात्री नसते. परन्तु जोपर्यन्त डबे इन्जीनला जोडले गेले असतील तोपर्यन्त ते पुढे जातात – माणसांच्या बाबतीत हा दुवा भावनिक असतो. म्हणुन क़ोणी सातवी पास झालेल्या माणसांमधुन अप्रतिम सेल्स मॅनेजर बनवु शकतो, कोणी प्युनचे क्लार्क बनवु शकतो, पदवीधर नसतानाही कोट्यवधींची उलाढाल करणारा पर्चेस मॅनेजर बनवु शकतो.
थोडक्यात म्हणजे, स्वत:चा विकास घडवायचा असेल तर आपलं लक्ष अनुभवांवर, त्यातुन बोध घेण्यावर असायला हवं. आपल्याला अन्त:प्रेरणेने जगता आलं तर छानच, पण किमानपक्षी तसं जगणाऱ्या माणसांच्या कार्याला जोडुन घ्यावं.
काय वाटतं तुम्हाला?
-    --- विवेक पटवर्धन

Wednesday, April 2, 2014

ऑफिसमध्ये प्रेमाची भरती येते तेव्हां ....

तीन महिन्यापूर्वी फणीश मूर्तीची मुलाखत टाईम्समध्ये प्रसिद्ध झाली होती. मदनाचे बाण ज्याला एकदा, नव्हे दोनदा, नव्हे तीनदा [म्हणजे उपलब्ध पुराव्यानुसार] लागले असे हे महाशय! फणीशने प्रथम त्याच्या इन्स्टीट्यूटमधील मुलीशी प्रेमविवाह केला. मग इन्फोसिसमध्ये काम करीत असताना तो रेका मेक्झीमोविचच्या प्रेमात पडला. कित्येक दिवस चाललेले हे प्रेम प्रकरण लाखो डालरची नुकसान भरपाई देऊन मिटवण्यात आले. मग तो इन्फोसिस सोडून आयगेटमध्ये उच्चपदावर गेला. तिथे होती इन्व्हेस्टर रिलेशन्स प्रमुख अर्सेली रौझ – तिच्या बरोबर पुन्हा एकदा त्याने संधान बांधले. अर्सेलीला दिवस गेले, फणीशची उचलबांगडी झाली.

ऑफिस [मग ते कुणाचेही असो] तिथे मदन आपले धनुष्यबाण घेऊन हजर असतो हे तर उघड गुपित आहे. ‘पती, पत्नी और वो’ ज्यांनी पाहिलाय त्यांना फणीशच्या वर्तणुकीच आश्चर्य वाटणार नाही – त्यांना ती वर्तणूक पटली नसली तरीही. अजून एका सिनेमात ऑफिसमधल्या प्रेमाची गोष्ट हाताळली होती तो म्हणजे अमिताभ आणि माला सिन्हा यांचा ‘संजोग.’ एक्काहत्तर सालच्या संजोगमध्ये अमिताभ आणि माला सिन्हा यांचा देवळात विवाह होतो, ते दुरावतात पण एके दिवशी माला सिन्हा अमिताभची बॉस बनून त्याच्या ऑफिसात येते!

ऑफिसमध्ये प्रेम करणाऱ्या ज्या अनेक ‘प्रेमळ’ व्यक्ती आहेत त्यात अमेरिकेचे दोन राष्ट्राध्यक्ष आहेत. बराक ओबामा हे मिशेलच्या म्हणजे त्यांच्या भावी पत्नीच्या ऑफिसमध्ये ‘समर इंटर्न’ म्हणून काम करीत होते. दुसऱ्या राष्ट्राध्यक्षाच्याबद्दल फारसं न लिहीणंच मी पसंत करीन. ते म्हणजे बिल क्लिंटन. त्यांचे मोनिका बरोबर झालेले प्रकरण फारच गाजलं होतं.

कंपनीच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्यक्ष ऑफिसमध्ये दोन व्यक्तींनी प्रेमात पडणं ही घटना ‘धोकादायक’ असते. त्या दोघांचं प्रेम जमलं व त्याचं रुपांतर विवाहात झालं तर चांगलंच, पण ती आता त्याच्या टीममध्ये राहू शकत नाही. म्हणजे मी इथे तो तिचा वरिष्ठ आहे असं गृहीत धरलंय. पण तसं नसलं तरी त्या दोघांना एकाच टीममध्ये ठेवलं जात नाही.

आता दुसरी शक्यता बघा – तो व ती प्रेमात पडलेत पण नंतर त्यांचं फिस्कटलय! आता ते एकाच टीममध्ये असले तर त्यांचे सहकारी पुरते चक्रावतात. त्यांना दोघांना सांभाळून घेताना त्रासच होतो. मग त्यातल्या एकाला दुसऱ्या ठिकाणी बदली करण्याखेरीज गत्यंतर उरत नाही. इथे कांही ‘मलाच का म्हणून?’ असेही विचारतात. शेवटी त्यापैकी एक किंवा दोघेही इतर नोकरी बघतात. म्हणजे पर्यायानें कंपनीचे नुकसानच की!

प्रेमात पडून ज्यांच फिस्कटलय असे ते दोघे म्हणजे बॉस व ती त्याची सहकारी असली तर समस्या अधिकच बिकट होते. फणीशच्या बाबतीत हेच झालंय. कित्येकदा [बहुतांशी विदेशी] कंपन्यांच्या धोरणानुसार अशा युगुलाने आपल्या कंपनीला ‘डेटीन्ग’ची कल्पना देणं आवश्यक असतं.फणीशवर नेमका हाच आरोप होता की त्याने आयगेट कंपनीला त्याच्या प्रेमाप्रकरणाबद्दल कांहीच कल्पना दिली नव्हती. परंतु तशी कल्पना देणं आवशयक असतं नाहीतर ‘प्रतिकूल’ परिस्थिती निर्माण केलेल्या कार्यालयात काम करायला भाग पाडलं म्हणून त्या कंपनीविरुद्ध दावा लावण्यात येतो. असं म्हणतात की फणीश व रेकाचं प्रकरण जगजाहीर होतं पण इन्फोसिसने तिकडे काणाडोळा केल्याने त्यांच्याविरुद्धही दावा लावण्यात आला.

कित्येकदा वात्रटपणा अंगाशी येतो. असे कर्मचारी कॉलेजचे दिवस विसरलेले नसतात. एका तरुण मुलाने त्याला आवडणाऱ्या मुलीच्या ‘व्होईसमेलमध्ये’ चुंबनाचे आवाज काढले – ते रेकोर्ड केले. ती रागावली, तिने तक्रार केली. व्होईसमेल ठेवणाऱ्याचे एक्स्टेन्शन रेकोर्ड होते त्यामुळे तो पकडला गेला, व नोकरीवर गदा आली.

अशी परिस्थिती हाताळताना अनेकदां तारेवरची कसरत करावी लागते. मुलींचा एक गट त्याच्याविरुद्ध फिरतो व तो मुलगा अक्षरश: नोकरीवर ठेवण्यास पात्र रहात नाही. पण दुसरी बाजू अशी की अनेकदां असे मुलगे वात्रट व पोरकट असतात. त्यांच्यात  परिपक्वता नसते. त्यांच्यावर नोकरीतून काढले जाण्याचा ठपका ठेवायचा म्हणजे त्याच्या करियरचे तीन तेरा वाजवण्यासाराखेच आहे. अशाच एका केसमध्ये त्या मुलाच्या वडिलांना बोलावून चिरंजीवांच्या उद्योगांची कल्पना देण्यात आली – त्यांनी मुलाला रजेवर जायला सांगितले व मागोमाग राजीनामा पाठवून दिला.

अशी अनेक प्रकरणं होत असतात. पुरुषांची तक्रार अशी असते की मुली जरा फारच हळवेपणा दाखवतात – साध्या मस्करीचेही विपरीत अर्थ काढतात. पण त्यात फारसं [किंवा जरासही] तथ्य नसतं. मुलीला जर ती थट्टा वाटली नाही आणि लैंगिक छळ वाटला तर तिच्या भावनांना अधिक महत्व दिलं जातं आणि तो लैंगिक छळ समजला जातो. थोडक्यात म्हणजे ‘ती’ त्या घटनेचा अर्थ कसा लावते हा व्यक्तिनिष्ठ अनुभव ठरवतो की ती घटना लैंगिक छळ म्हणायची की नाही. परंतु इथेही विपर्यास होण्याची शक्यता असते – म्हणून एक सारासार विचार करणारी व्यक्ती त्या घटनेचा अर्थ कसा लावील त्याचाही विचार होतो.

आतां सारासार विचार करणारी व्यक्ती पुरुष असावी की स्त्री? हे तुम्हीच ठरवा.

पुन्हा एकदा आपण फणीशमूर्तीकडे वळू या. त्याच्या मुलाखतीत त्याला विचारलं गेलं की ‘तुझा पाय दुसऱ्यादा कसा घसरला?’ तर तो म्हणतो की “मलादेखील कळत नाही की मी असा कशामुळे वागलो.... मी कामानिमित्त वीस-बावीस दिवस प्रवास करीत असे... आता पुन्हा असा होणार नाही यासाठी मी प्रयत्नशील आहे.”
  
गुडलक फणीश! मला कुणाच तरी [बहुदा विजय तेंडुलकरांचे] वाक्य आठवतंय “प्रत्येक पुरुष हा सावजाच्या शोधात असलेला, चोरपावलांनी फिरणारा वाघच असतो.”

तुम्हाला काय वाटतं?

विवेक   

Tuesday, March 25, 2014

कंत्राटी न्याय

संध्याकाळ झाली होती, आम्ही तिघेजण एका कंपनीच्या सुसज्ज गेस्ट-हाउसमध्ये दाखल झालो. थोड्या वेळाने जेवायला मेसमध्ये गेलो तेव्हा गप्पा चालू झाल्या. आम्हा तिघांनाही जाणवलं की पंधरा- वीस वर्षे रोज लोकलने अप-डाऊन करणारे आम्ही तिघे, पण गेली कित्येक वर्षे आम्ही लोकलने प्रवास केलाच नव्हता. समाजाच्या एका घटकाचा आम्ही अविभाज्य भाग होतो कित्येक वर्षे, पण आता दूर गेलो होतो, त्यांच्या सुखदु:खाची, वास्तवाची जाणीव आपल्याला नाहीये याची खंत वाटली.

दुसऱ्या दिवशी पंचवीस व्यवस्थापकाचे ट्रेनिंग करायचे होते. प्रशिक्षणाचा विषय होता ‘कंत्राटी कामगार.’ आम्ही कंत्राटी कामगार कायद्यावर केलेल्या पंचवीस-तीस स्लाईडस घेऊन आलो होतो, पण ऐनवेळी मी त्या बाजूला ठेवल्या. मी त्या व्यवस्थापकाना काही प्रश्न विचारायचे ठरवले.

“थोडा वेळ समजून चाला की तुम्ही सर्व कंत्राटी कामगार आहात, आणि मी कांही प्रश्न विचारतो त्यांची उत्तरं द्या. माझा पहिला प्रश्न – ‘तुम्ही कंत्राटी कामगार का झालात?’”

कांही क्षणांची स्तब्धता. मग एक बोलला, “कारण आमच्याकडे शिक्षण नाही, कौशल्य नाही.” “कायम स्वरूपी नोकरी कोणी देतच नाही, मग कौशल्य असले तरी तडजोड करावी लागते.” “कायम स्वरूपी नोकरी होती पण व्हीआरेस घ्यावी लागली. म्हातारपणासाठी चार पैसे ठेवून द्यायचे असले तर मिळेल ती नोकरी करणं भाग पडलं.”

आता ट्रेनिंग रूम मधला मूड बदलला होता. मी विचारलं, “तुम्ही काम करता त्या कारखान्यातल्या कायम स्वरूपी कामगारांच्या युनियनबद्दल तुम्हाला काय वाटतं?”

“आप्पलपोटे आहेत सगळे! स्वत:पुरते बघतात, त्यांचे पगार वाढतात – आम्हाला सदैव किमान वेतन.” “त्यातले कित्येक आराम करतात – त्यांची कामं आम्हीच करतो, पण पगार ते घेतात. या सर्वात युनियनचे पदाधिकारीच पुढे असतात.”

“आता तिसरा प्रश्न, कंपनीच्या मेनेजमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं?”
बराच वेळ स्तब्धता. मग एक जण बोलला, “त्यांच्या तर आम्ही खिजगणतीतही नसतो. किती माणसं आमच्या कंत्राटदाराने आणली एवढाच त्यांचा प्रश्न.”

“म्हणजे तुम्ही असून नसल्यासारखेच?”
“तसंच”
“तुम्ही कामावर येता तेव्हां गेटावर कशी वागणूक मिळते?” माझा पुढचा प्रश्न.
“कांही ठिकाणी वेगळं गेट असतं आम्हा कंत्राटी कामगारांना. नाही तर सर्वप्रथम कायमस्वरूपी कामगार प्रथम कामावर जातात. मग आमची वर्णी.”
“झडती होते – कसून झडती होते परत जाताना. कित्येक वेळेला बायकांची पंचाईत – चांगली वागणूक मिळाली नाही तरी बोलतां येत नाही.”
“आणि केन्टीनमध्ये? तिथे काय होतं?”
“अनेकदा कंत्राटी कामगारांची केन्टीन वेगळी असतात. तिथे जे काही असतं त्याला सुविधा म्हणणं कठीण आहे.”
“कंत्राटी कामगारांची जेवायची वेळही वेगळी असते. कंपनीच्या कामगारांच्या नंतर ते जेवतात.”
“हे फार वाईट आहे कारण परमनंट कामागारांपेक्षा अधिक जोखमीच काम तेच करतात. कित्येक कारखान्यात पहिल्या पाळीत परमनंट कामगार तर दुसऱ्या पाळीत - त्याला सोडवणारा – कंत्राटी कामगार असतो. अशा ठिकाणी मुख्य भेदभाव पगारातच असतो.”
“मी तिकडेच वळणार होतो” मी म्हणालो. “एकाच प्रकारच्या कामाला कायम स्वरूपी कामगार तसेच कंत्राटी कामगार लावतात. काय म्हणायचंय तुम्हाला?”
“हे काय दिसत नाही का इथल्या व्यवस्थापकांना? कोणीच कसं कांही करीत नाही?”

पुन्हा एकदा अस्वस्थ स्तब्धता.
“ही चर्चा भलतीच अस्वस्थ करणारी झाली नाही का? चला, आपण हे विचार जरा ‘पार्क’ करुंया मला असं विचारायचं आहे की तुम्ही कल्पना करा – एक गरीब अकुशल कामगार आहे. त्याला पत्नी आहे. दोन शाळेत जाणारी मुलं आहेत. ती मुनिसिपाल्तीच्या शाळेत जातात.त्याला मानाने जगण्यासाठी – म्हणजे दोन खोल्यांचे घर, दोन वेळ जेवण, मुलांना पुरेसे कपडे – चपला, तसंच पत्नीलाही, पुस्तकांचा शिक्षणाचा खर्च – असं जगण्यासाठी त्याची मासिक आमदनी किती असली पाहिजे?”
“बारा हजार”, “दहा हजार”, “पंधरा हजार”
“युनियनवाले किमान वेतन दहा हजार तरी असलंच पाहिजे म्हणतात – आज समजलं तसं का म्हणतात ते.”
“खरं तर मी कधी असा विचारच केला नव्हता. कायद्यानुसार किमान वेतन साडे-सहा हजार आहे ते दिले पाहिजे यापलीकडे मी कधी गेलोच नव्हतो.”

“आता शेवटचा प्रश्न: मी वाक्य सांगतो – अर्ध वाक्य – तुम्ही उरलेलं अर्ध पूर्ण करायचं. रेडी?”
“रेडी!”
“कंत्राटी कामगार असणं म्हणजे ..........”
“गुलामगिरी – स्लेव्हरी!!!”

हा प्रयोग मी आत्तापर्यंत दहा वेळा केलाय.  आणि हे शपथेवर सांगतो – प्रत्येक वेळी हे अस्संच घडतं.
कारण? कारण ते तस्संच आहे!!!

------- विवेक  

Wednesday, March 19, 2014

त्याचं गाणं आणि तिचं मौन!

तो निळा ड्रेस ज्युडिथ मेसनने बनवलाय - ती एक सुप्रसिद्ध चित्रकार आहे. त्या ड्रेसची कथा तिच्याच शब्दात - पण मी मराठीत अनुवाद केलेली.]
===================================================

वर्णद्वेषाविरुद्ध दिलेल्या लढ्यात फिला एंडवेंडवे आणि हेराल्ड सेफोला यांच्या मृत्युची हकिकत ट्रुथ ऎण्ड रिकन्सिलिएशन कमिशनसमोर त्यांच्या मारेकर्यांनी सांगितली. पुस्तकावरील चित्र फिला आणि हेराल्डच्या धैर्याचं आदर आणि स्मरण करणारं आहे.

फिला एंडवेंडवेला अनेक आठवडे विवस्त्रावस्थेत करावासात ठेवण्यात आलं. तिनं आपल्या सहकार्यांची माहिती द्यावी म्हणून; आणि मग गोळ्या घालुन ठार मारण्यात आलं. तिनं एका निळ्या प्लास्टिक पिशवीची चड्डी बनवुन आपली लाज राखली. थडग्यातुन तिचं प्रेत बाहेर काढलं तेव्हां तिच्या खालच्या अंगावर ती प्लास्टिक पिशवीची चड्डी होती. ती एक अक्षरही बोलली नाही अजिबात, तिला ठार करणारा एक पोलिस म्हणाला, देवा! काय धीट बाई होती ती!


हेराल्ड सेफोलाला त्याच्या दोन सहकर्यांसोबत विटबंकजवळच्या एक माळरानात विजेचा धक्का देऊन मारण्यात आलं. मृत्युला कवटाळण्यापूर्वी त्एन्कोसि सियेलेल आफ़्रिका [हे आता राष्ट्रगीत आहे, तेव्हा ते वर्णद्वेषाविरुद्धच्या चळवळीचं गीत होतं] म्हणण्याची त्याची अंतिम इच्छा होती. त्याला मारणारा म्हणाला तो एक शूर माणूस होता आणि वर्णद्वेषविरोधी चळवळीवर त्याचा ठाम विश्वास होता.

मी फिलाच्या हत्येची गोष्ट ऐकुन रडले. मी स्वत:शीच बोलले, तुझ्यासाठी एक ड्रेस करावासा वाटतोय. असा बालिश प्रतिसाद देत मी निळ्या प्लास्टिक पिशव्या जमवल्या आणि त्यांचा एक ड्रेस बनवला. त्यावर मी हे पत्र रंगवलंय....ताई, प्लास्टिक पिशव्या म्हणजे कांही देवांनी दिलेलं चिलखत नाहीये; पण तू उघड्या शरीराने अनेक शक्तींशी, अन्धेरनगरीच्या राजांशी, अधर्माच्या दुष्प्रवृत्तींशी नरकप्राय जागी सामना करीत होतीस. तुझी हत्यारं कोणती? तर तुझं मौन! आणि कचर्यातल्या प्लास्टिक पिशवीचा एक तुकडा!! पिशवी शोधणं आणि थडग्यातुन बाहेर निघेपर्यन्त ती अंगावर ठेवणं ही इतकी साधी, सामान्य आणि अगदी गृहिणीला साजेशी गोष्ट आहे ....एका पातळीवर तू तुला कैदेत टाकणार्यांना असं शरमिंदा केलस की तुला पुन्हा विवस्त्र करुन, तुझा अपमान करुन आपल्या अपराधात ते अधिक भर टाकु शकले नाहीत. तरीही त्यांनी तुला ठार केलं. आम्हाला तुझी कहाणी कळली कारण एका खडूस माणसाला तुझं शौर्य आठवलं. तुझ्या धैर्याची स्मरकं सर्वत्र आहेत -रस्त्यांवर ती विखुरली आहेत, लाटांवर ती भरकटताहेत आणि झाडाझुडुपांवर ती लोंबताहेत. हा ड्रेस त्यापैकीच कांही तुकडे वेचुन बनवलाय.

हंगरवर टांगलेला, वार्यावर हेलकावे घेणारा ड्रेस मला व्हिक्टरी ऒफ सामोथ्रेस ह्या लुव्रमधल्या शिल्पाच्या पेहरावाची आठवण करुन देत होता. मग मी चित्रात तुरुंगाच्या जाळीतुन येणारी व्हिक्टरीसारखी आकृती काढली आणि त्यामागे एक हिंस्र तरस जो दुसर्यांचे भक्ष्य ओरबाडुन खातो.

न्यायाधीश अल्बी साक्सने हे चित्र पाहिले. तसेच सेफोला आणि त्याच्या मित्रांच्या आठवणीसाठी काढलेलं तीन धगधगत्या शेगड्यांचे चित्रही. फिलाचा ड्रेस आणि शेगड्यांचे चित्र एकत्र करुन मी एक स्मरणोत्सव म्हणुन चित्र करावं असं त्यांनी सुचवलं. नंतर तो ड्रेस, ड्रेसचं चित्र आणि दुसरा मोठा केनव्हास असं सर्व एकत्र साउथ आफ्रिकन कोन्स्टिट्युशनल कोर्टात एकत्र ठेवले गेले.

गाणं गाणारा तो आणि मौन पाळणारी ती यांचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला, परन्तु माझ्या मनात शरमेची भावना घर करुन राहिल्येय.

ज्युडिथ मेसन