Tuesday, December 30, 2014

विकासाचा प्रवास

टिम गॉल्वी हा एक नुसताच टेनिस शिकवणारा कोच नाही तर मॅनेजमेंट गुरु देखिल आहे. त्याने काही ‘भन्नाट’ प्रयोग केलेत, त्यातला एक माझा फार आवडता आहे. तो असा:
टिम एका सेल्स कॉन्फरन्सला गेला होता. तिथे त्याने एक टेनिसची टूर्नामेन्ट आयोजित केली. पण तिचे नियम नेहमीचे नसणार हे तुमच्या ध्यानात आलंच असेल. ते नियम उफराटे होते – म्हणजे ‘जो टेनिस गेममध्ये जिंकेल तो टूर्नामेन्टमधून बाद होईल, आणि जो हरेल तो पुढच्या फेरीत खेळेल!’ अजब प्रकार होता हा – हरणाऱ्याला बक्षीस होतं, शाब्बासकी होती तर जिंकणाऱ्याला डच्चू!!
त्या अजब खेळात सर्व खेळाडूंना एक प्रश्न भेडसावत राहिला, आणि त्यांना त्याच्या उत्तराचा शोध घ्यायलाच लागला – तो प्रश्न म्हणजे “मी हा खेळ कां खेळतोय?”
सेल्स विभागात सर्वांना सतत स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. “दुसऱ्याच्या पुढे कसं जाता येईल” असा सतत विचार करणारी माणसं – आणि त्यात सेल्स विभागातीलच कशाला, केजीतल्या मुलांच्या मातांपासून ते मोठया उद्योगपतीपर्यंत सर्वजण त्यात आहेत – ती “हरणारा पुढे जाईल तर जिंकणारा फेकला जाईल” अशा विचित्र नियमामुळे भांबावून गेली. मी कां खेळतोय? काय उत्तर देणार ह्या प्रश्नाचं?
टिम गॉल्वीच्या मते त्या प्रश्नाचं उत्तर चौकटीबाहेर आहे, ते म्हणजे - ‘मी हा खेळ खेळतोय ते तो खेळ शिकायला, माझ्या क्षमता वाढवायला.’ खेळाच्या विचित्र नियमांमुळे जिंकण्या-हरण्यावर लक्ष केंद्रित न करता खेळण्याच्याच अनुभवावर लक्ष केंद्रित करणे खेळाडूंना शक्य होतं. म्हणजेच बाह्य जगाने घालून दिलेल्या नियमांनुसार न जातां केवळ खेळाचाच आनंद लुटण्याच्या आंतरिक उर्मीनुसार तो खेळ खेळणे शक्य होतं, नव्हे तोच तर संदेश होता!
राळेगण-सिद्धीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे अण्णा हजारे, त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेले हिवरेबाजारचे पोपटराव पवार, संगीताच्या ध्यासाने घरातून निघून गेलेले भीमसेन जोशी ही सर्व मंडळी जगाने घालून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करूनच जगली. ही सगळी मोठी माणसं, त्यांच घवघवीत यश आपल्या समोर आहे. एकंदरीतच आंतरिक उर्मीनुसार जगायचं म्हणजे वैयक्तिक विकासाच्या दोन-चार पायऱ्या वर चढण्यासारखं आहे.
तुम्ही राजन शहाबद्दल ऐकले नसे, ते प्रकाशझोतात नसले तरी यशस्वी जरूर आहेत. नुसतेच यशस्वी नाहीत तर समाधानीही आहेत. मी त्यांना सहा महिन्यापूर्वी भेटलो होतो. कॉमर्स विषयात पदवी घेतल्यावर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला कारण इंजिनियर नसूनही त्यांना तेच करायचे होते. एक छोटा कारखाना काढला. बरीच धडपड केली, धंद्यात तग धरण्यासाठी अनेक उत्पादने केली आणि बदलली, अवकाशाने स्थिर झाले. मिळकत आणि खर्च यांचा ताळमेळ बसवताना कित्येक वर्षे तारेवरची कसरत करावी लागली. आज त्यांनी उभी केलेली कंपनी लौकिकार्थाने यशस्वी तर झाली आहेच, पण दृष्ट लागण्याइतकी घट्ट नातेसंबंधान्नी बांधली गेली आहे.
राजन शहांसारखी माणसं स्वत:च्या कामाने दुसऱ्याला प्रेरणा देतात. त्यांच्या कम्पनीत काम करणारे कितीतरी पुरुष व स्त्रिया मॅट्रिक देखिल पास नाहीत. पण ते ग्राहकांकडून लाखांच्या ऑर्डरी मिळवतात. हा चमत्कार नाहीये. मी एशियन पेन्टमध्ये काम करू लागलो तेंव्हा माझ्या दोन सहकाऱ्यांची वाटचाल प्यून ते सिनियर क्लार्क अशी झाली होती हे नजरेस आलं होतं. ते त्यांच्या कामात अत्यंत तरबेज होते. कम्पनीचा पर्चेस मॅनेजर पदवीधरदेखिल नव्हता.
इथे आपल्या ध्यानात दोन मुद्दे सहज येतात. पहिला मुद्दा असा: कांही माणसं आंतरिक उर्मीनुसार किंवा अंत:प्रज्ञेने जगतात. जग त्यांच यश मोजतं ते त्यांनी केलेल्या खडतर प्रवासाचे भान ठेऊनच. अशी माणसं पुढे येतात त्याचं दुसरं कारण म्हणजे ते त्यांच्या अनुभवाचं सार आत्मसात करतात. अनुभव घेणं व त्यातून बोध घेणं या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. पहिल्या म्हणजे अनुभवाच्या पायरीवर आपण सर्व असतो, पण बोध घ्यायच्या पायरीवर जाण्यासाठी अंतर्मुख होण्याची, आत्मचिंतनाची प्रक्रिया जाणीवेने करावी लागते. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या, रूढार्थाने असलेल्या शिक्षणाची गरज नसते. म्हणूनच 'निरक्षर' असलेली बहिणाबाईदेखिल अप्रतिम दाखले, दृष्टांत देऊ शकते.
आता दुसरा मुद्दा: अंत:प्रेरणेने जगणारी माणसे स्वत्:ला घडवताना इतरांनाही घडवतात. म्हणजे डेक्कन क्विनचे ईंजीन घाट वर चढत जाते तसे डबेही मागोमाग घाट चढतात. तसंच. फरक इतकाच की माणसांच्या बाबतीत ते ईंजीनची 'लेव्हल' गाठू शकतील याची खात्री नसते. परन्तु जोपर्यन्त डबे इन्जीनला जोडले गेले असतील तोपर्यन्त ते पुढे जातात – माणसांच्या बाबतीत हा दुवा भावनिक असतो. म्हणुन क़ोणी सातवी पास झालेल्या माणसांमधुन अप्रतिम सेल्स मॅनेजर बनवु शकतो, कोणी प्युनचे क्लार्क बनवु शकतो, पदवीधर नसतानाही कोट्यवधींची उलाढाल करणारा पर्चेस मॅनेजर बनवु शकतो.
थोडक्यात म्हणजे, स्वत:चा विकास घडवायचा असेल तर आपलं लक्ष अनुभवांवर, त्यातुन बोध घेण्यावर असायला हवं. आपल्याला अन्त:प्रेरणेने जगता आलं तर छानच, पण किमानपक्षी तसं जगणाऱ्या माणसांच्या कार्याला जोडुन घ्यावं.
काय वाटतं तुम्हाला?
-    --- विवेक पटवर्धन