Wednesday, October 11, 2017

घर घर की कहानी



वंशावळ हा माझ्या कुतूहलाचा विषय. ‘रुट्स’ पुस्तकामुळे तो अधिकच प्रकाशाझोतात आला. मी शाळेत असताना पटवर्धन कुलावृत्तान्ताबद्दल मोठ्या माणसांना बोलताना ऐकलं होतं. [त्यात आमच्या कुटुंबाबद्दल अगदी कमी माहिती आहे, त्याबद्दल काही पाऊले उचलण्याचा इरादा आहे]. 


विवाह झाल्यावर काही गोष्टी जाणवल्या. पहिली म्हणजे अरेंज्ड मॅरेज असल्यास [किंवा एकंदरीतच] दोन्ही कुटुंबांना एकमेकांबद्दल फारच कमी माहिती असते. दुसरी म्हणजे सर्वसाधारणपणे मुलांना त्यांच्या आईच्या घराची, माहेरची फारच कमी माहिती असते. मी माझ्या एका वयस्कर नातेवाईकाला त्यांच्या वडिलांबद्दल लिहायला सांगितले तेव्हा ते हौसेने चाळीस पानी वही घेऊन आले आणि ती बरीचशी लिखाणाने भरली देखिल. मग मी त्यांना त्यांच्या आईबद्दल लिहायाल सांगितले – एक शब्दही ते लिहू शकले नाहीत! 


हे माझे निष्कर्ष आहेत. त्याला अपवाद असतीलच, किंवा आपला तसाच अनुभव नसेलही. माझी आई बेळगावजवळच्या शहापूरमध्ये वाढली. मी धरून चाललो की तिचा जन्मही तिथलाच असावा. कधी त्याबाबतीत विचारलेच नाही. ती २००२ साली गेली. गेल्या वर्षी मला तिचा पासपोर्ट अचानक सापडला. त्यावर तिचे जन्मस्थान ‘मैंदर्गी’ लिहिले होते. मैंदर्गी? सुदैवाने माझ्या मामाकडून काही माहिती मिळाली. पण मी कितीतरी वेळ तो पासपोर्ट हातात धरून होतो. कित्येक संवाद झालेच नाहीत, होऊ शकणारही नाहीत, ही जाणीव फार अस्वस्थ करून जाते.


कधी ध्यानात येते की आपल्या मुलांना देखिल आपल्याबद्दल त्रोटकच माहिती आहे. जाऊ दे, जरा भरकटतो आहे - तर मी सांगत होतो माहितीबद्दल.

माझ्या मुलांच्या लग्नात मी तर एक छोटे पॉवर पोईन्ट प्रेझेन्टेशन बनवून एक फॅमिली ट्री दाखवला, त्यात माझ्या आजोबांपासून [जेवढी मला ठाऊक होती ती सर्व] माहिती होती. ही कल्पना मला सुचली कशी? तर मी गेलो होतो गणेश मंदिरात – अन्जुरच्या. हे ठिकाण ठाण्यापासून दहा बारा किलोमीटर अंतरावर आहे. नाईकांच्या वाड्यात ते मंदिर आहे. तिथेच भिंतीवर त्यांचा फॅमिली ट्री सुंदर तऱ्हेने दाखवला आहे, एका फोटोफ्रेममध्ये तो लावला आहे. मला वाटतं की तो सात पिढ्यांचा आहे – पण आता नक्की आठवत नाही. मी त्या मंदिरात पाच-सहा वेळा तरी गेलो आहे, पण मंदिरापेक्षा माझे लक्ष त्या फोटोफ्रेमकडेच अधिक असायचे.


रिटायर झाल्यावर मी आगरगुळ्याला जाऊन आलो. आमचे पूर्वज तिथून पेणला आले असे म्हणतात. पण काहीच माहिती उपलब्ध नाही. कोणीतरी म्हणाले की त्र्यम्बकेश्वरच्या पुरोहितांकडे बरीच माहिती असते – एकदा जाऊन येईन म्हणतो.

हे सगळे आठवायचे कारण म्हणजे मी नुकताच सुरतेला गेलो होतो – श्री रामकृष्ण एक्स्पोर्टचे मालक गोविन्द्काका ढोलकियांना भेटायला. तिथे मला हा फोटो दिसला. गोविंदभाइंच्या आजोबांपासून ते त्यांच्या नातवंडापर्यंत सर्वजण म्हणजे सुमारे पाचशेहून अधिक व्यक्ती त्यात आहेत. पाच पिढ्या! अर्थात आजोबा कोणी हयात नाहीत, त्यांची फक्त नावेच आहेत. 


गोविन्द्काकांच्या दारात एक रोल्स रोईस उभी असते. मला त्याचे अजिबात नवल वाटले नाही की आकर्षणही. पण त्यांना असा फॅमिली ट्री बनवता आला, फोटो काढता आला याचा हेवा जरूर वाटला. त्या फोटोचा मी फोटो काढला आहे. तोच इथे ठेवलाय.



विवेक

सुरतेचा हिरा



सुलभा आणि मी सुरतेला उतरलो. ड्रायव्हर गाडी घेऊन पुढे आला, “प्रथम आपण शाळा आणि हॉस्पिटल बघूया मग ऑफिसला जाऊ. नीरव साहेब तुमची तिथेच वाट पाहत आहेत.” नीरवशी माझी ओळख तशी नवीच. एका सेमिनारमध्ये आम्ही भेटलो, तेव्हा तो श्री रामकृष्ण एक्सपोर्टबद्दल जे काही बोलला त्याने माझे कुतूहल वाढले होते. त्याने भेटीचा आग्रह धरला होता.

“गोविन्द्काका दिवसाची सुरवात इथूनच करतात. रिलीफ सेंटरमध्ये ते लोकांना भेटतात, त्यांच्या समस्या सोडवतात आणि मगच ऑफिसला येतात. तुम्हालाही ते इथेच भेटणार आहेत. रिलीफ सेंटर, शाळा आणि डायग्नोस्टीक सेंटर सर्व एकाच इमारतीत आहे.” गोविन्द्काका म्हणजे श्री रामकृष्ण एक्सपोर्टचे चेयरमन. तेरा वर्षांचा गोविन्द सुरतेला सत्तरीच्या दशकात आला, लवकरच त्याने स्वत:चा व्यवसाय सुरु केला. सातवी पास गोविंदचा व्यवसाय बघता बघता शेकडो नव्हे हजारो कोटींच्या रुपयात फोफावला. हा एक विलक्षण माणूस आहे. आमचाही प्रवास प्रथम रिलीफ सेंटर, शाळा आणि डायग्नोस्तिक सेंटर, मग त्याचं ऑफिस, हिऱ्यांना पैलू पाडायचा कारखाना असाच ठरला.

फ्लायओव्हरवरून खाली उतरताना उजवीकडे शाळा दिसते. एक वळसा घालून आम्ही तिथे पोचलो. ही शाळा पाच मजली आहे. त्याच इमारतीच्या बेसमेंटमध्ये फिजिओथेरपी आणि डायग्नोस्टीक सेंटर आहे. “आम्ही इथे फिजीओथेरपी केवळ दहा रुपयात करतो.” नीरव म्हणाले, “इतर सर्व सुविधाही अत्यंत स्वत दरात उपलब्ध आहेत.” पाच सहा पेशंट फिजिओथेरपीचा उपचार घेत होते. त्यात एक वर्षाची चिमुरडी होती, तिलाही उपचार देण्यात येत होता. इतर पेशंट महिला होत्या, त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असावी असं वाटलं. “इथे चाळीस डॉक्टर त्यांची सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देतात, खूप लोकांना मदत मिळते, हे तक्ते बघा.” नीरवने भिंतीवरच्या तक्त्यांकडे माझे लक्ष्य वेधले. त्यावरील माहिती तुम्हाला स्तिमित करते. मी फोटो घेतले.

  
वरच्या मजल्यावर गेलो. तिथे एका बारा बाय बाराच्या खोलीत HIV पीडीतासाठी मदत होते. सुरत शहरात इतर राज्यातून मोठ्या संखेने कामगार कामासाठी येतात. कापड तसेच डायमंड व्यवसायात त्यांची मोठ्या संखेने भरती आहे. HIV चा प्रसार इथे भरपूर प्रमाणात होतो. स्थलांतरित कामगार त्याला कारणीभूत आहेत असे म्हणतात. सुरत म्हणजे गुजरातची ‘एड्स’ची राजधानी समजली जाते. इथे HIV पीडितांना मोफत दवापाणी केले जाते, होय मोफत.

  
आम्ही पहिल्या मजल्यावरच्या शाळेत गेलो. “आमची शाळा गुजराती व इंग्रजी माध्यमाची असली तरी आता आम्ही गुजराती शाळा बंद करायचा निर्णय घेतलाय.” मुंबईचा रोग इथेही पसरलाय हे लक्षात आलं! “आमच्या शाळेतील प्रत्येक वर्गात ‘स्मार्ट’ बोर्ड आहेत.” दिव्या, शाळेची मुख्याध्यापिका म्हणाल्या. मी डोकावून बघितले एका वर्गात. ‘स्मार्ट’ बोर्ड होता तिथे आणि त्यासमोर एक छताला टांगलेला एलसीडी प्रोजेक्टरदेखिल होता. “प्रत्येक वर्गात आहे म्हणता?” मी ‘प्रत्येक’वर जोर देत विचारले. “होय, प्रत्येक वर्गात आहे” मुख्याध्यापिका म्हणाल्या. “हे सर्व त्यांच्या चॅरीटेबल ट्रस्टमुळेच शक्य झाले. एका स्मार्ट बोर्डची किंमत पन्नास हजाराहून अधिक आहे. शाळेला हे परवडणे शक्यच नव्हते.” सातवी पास माणसाने एक अद्ययावत शाळा उभारली होती. “आमची लायब्ररी पहा. इथे प्रत्येक मुलगा काय वाचतो त्याकडे आमचे लक्ष असते. लवकरच ही ई-लायब्ररी बनवू.” 


आम्ही रेलीफ सेंटर मध्ये आलो. एका खोलीत स्कॉलरशिप देण्याचे कार्यालय होते. तिथे गीतेच्या अनेक छोट्या आवृत्त्या होत्या. “स्कॉलरशिप हवी असेल तर गीतेतील एक अध्याय मुखोद्गत केला पाहिजे. जर कुणी संपूर्ण गीताच पाठ केली तर त्याच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च, मग त्याने कितीही शिकावे, आम्ही उचलतो” नीरव म्हणाले. “जर कोणी मुस्लीम असेल किंवा ख्रिश्चन असेल तर त्यांनी कुराण किंवा बायबल मधील विशिष्ट भागांचे पाठांतर करून यायला हवे. ही आमची अट आहे.”


“किती स्कॉलरशिप दिल्यात?”


“वीस हजार. खरे तर ही स्कॉलरशिप नसून व्याज नसलेले लोन आहे. पण कोणी पैसा परत करत नाही. आत्तापर्यंत वीस हजार स्कॉलरशिपा दिल्या आहेत, पण पैसे पंधरा जणांनीच परत केले असतील. त्याचे आम्हाला दु:ख नाही. आमचे काम मदतीचे.”




लवकरच गोविन्द्काका आले. एक उंच माणूस, हिंदी आणि गुजराती बोलणारा. तुम्ही त्याच्याशी इंग्रजी बोललात तरी उत्तर हिंदीतच मिळणार. कमालीचा आत्मविश्वास पण कुठेही अहंपणाचा दर्प नाही. ह्या माणसाचे आत्मभान वरच्या दर्जाचे असल्याचा प्रत्यय लगेच येतो. नमस्कार झाल्यावर गोविन्द्काका सरळ कामाला लागले. एका खोलीत आठ दहा माणसे त्यांची प्रतीक्षा करीत होती. एका मागोमाग एक त्यांच्यासमोर आले. ऑफिसमधील लोकांनी प्रत्येकाची चौकशी केली होती व कागद तयार ठेवले होते. कुणाच्या घरी कॅन्सरचा पेशंट होता त्याला मदत हवी होती, तर कुणाला शस्त्रक्रियेसाठी. गोविन्द्काका प्रत्येकाशी बोलले. दर तीन मिनिटांनी एकाचा अर्ज मंजूर होत होता. गोविन्द्काका त्यांच्याशी सहृदयपणे बोलले, पण कुठेही ‘असं कर, तसं करायला हवे होते’ असे फुकटचे सल्ले नव्हते.


“गोविन्द्काका, ही गीतापठणाची अट कुठून आली?” मी.


“अहो, एक दिवशी एक मुलगा माझ्याकडे आला. तेव्हा हे रेलीफ सेंटर वगैरे काही नव्हते. मला त्याला मदत करावी असे वाटले, पण असाही विचार मनात आला की हे पैसे त्याने खरेच शिक्षणासाठी मागितले आहेत काय? माझे लक्ष समोर पडलेल्या गीतेच्या प्रतीकडे गेले. मला उत्तर सुचले: मी म्हणालो - जर तुला खरोखरच शिक्षणासाठी पैसे हवे असतील तर उद्या गीतेतील एक अध्याय पाठ करून म्हणून दाखव – तर मी तुला पैसे देईन. अहो, तो दुसऱ्या दिवशी आला आणि घडघड एक अध्याय त्याने म्हणून दाखवला. मी मग ठरवले की हीच अट. अध्याय म्हणा, तीच पात्रता. इतर धर्मियांनी त्यांच्या कुराण किंवा बायबल मधील पठण करावे. जर कोणी गीतेचे अठराही अध्याय म्हटले तर आम्ही त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च करतो, त्याने कितीही शिकावे, आम्हाला आनंदच आहे.”


 “आणि हा आजारपणाचा खर्च?”


“ती एक मोठी गोष्ट आहे. आत्ता इतकेच सांगतो की इथे आम्ही केवळ आजारी माणसांनाच मदत करतो असे नाही. लोकांच्या वैयक्तिक समस्याही सोडवतो! त्यात नातेवाईकांची भांडणे असतात, सुनेला त्रास देणारी माणसे असतात, अनेक समस्या आहेत. आम्ही त्यात पडतो जणू आमच्याच त्या समस्या आहेत. आमचे पैसे खर्च होतातही, पण आमची तक्रार नाही, उलट आमचे ते कार्यच आहे.”


“तुम्ही हे सर्व का करता? तुमचे व्यवस्थापक करु शकतील की. आणि अजून के प्रश्न – ही पाटी मला जिथे तिथे दिसतेय – I am nothing but I can do anything हे काय आहे?” सुलभाच्या त्या प्रश्नांचे उत्तर त्यांनी दिले पण ऑफिसमध्ये पुन्हा भेटल्यावर.


ते सर्व विस्ताराने मी नंतर सांगेनच. आत्ता एवढेच म्हणतो की हा माणूस केवळ हिऱ्यांना पैलू पाडत नाही तर माणसांनाही हिऱ्यासारखे अनमोल बनवतो – ते करीत असताना गोविन्द्काका स्वत:च एक अप्रतिम हिरा होत आहे. झालाच आहे म्हणाना!


उगाच नाही ‘त्याचा वेलू गगनावरी’ गेला.

विवेक पटवर्धन