Thursday, May 3, 2018

माणसांना माणुसकीने वागवायचं ‘कंत्राट’ घेणारे गोविन्द्काका ढोलकिया


कधीकधी आशेचा एक किरण अचानक दिसतो. त्यावेळी असं वाटतं की इतके दिवस आपण भलतीकडेच शोध घेत होतो. थोडक्यात सांगायचे तर कंत्राटी कामगारांच्या हाल-अपेष्टा पाहून मी इतका निराश झालो होतो की त्यांना सन्मानाने वागवणारा ‘मालक’ सापडायची मी आशाच गमावून बसलो होतो. हिमांशु भट म्हणाले की श्रीरामकृष्ण एक्स्पोर्ट [SRK] कंपनी जगावेगळी आहे आणि तिथे सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाते. हिमान्शुभाइंनी माझी गाठ घालून दिली ती त्या कंपनीच्या एच आर प्रमुख डॉ. नीरवबरोबर. मला SRK कंपनीच्या कारखान्याला आणि कार्यालयाला भेट देण्याचं आमंत्रण मिळालं, पण अधिक आकर्षण होतं ते म्हणजे कंपनीचे मालक गोविन्द्काका ढोलकिया यांना भेटण्याचं. केवळ सातवी पास असलेल्या गोविन्द्काकांनी सात हजार कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी उभी केली आहे.
‘तुम्ही कुणालाही भेटू शकता, कुणाचीही मुलाखत घेऊ शकता, कोणताही निर्बंध नाही, कारखान्यात कुठेही जा’ डॉ नीरव म्हणाले. मला कामगारांची मुलाखत तर घ्यायची होतीच, आणि खुद्द गोविन्द्काकांचीही मुलाखत हवी होती. मला तर संपूर्ण मोकळीक मिळाली होती. हे असं सहसा घडत नाही. हिऱ्यांना पैलू पडण्याचा, पॉलिश करण्याचा व्यवसाय सगळा गूढच असतो. तिथे सगळेच गुप्ततेत, मोकळेपणाचा संपूर्ण अभावच. SRK वेगळे असल्याचा पहिला प्रत्यय आला तो असा.

मी तीन कामगारांची मुलाखत घेतली. आज SRK मध्ये ४५०० कामगार काम करतात. ते अद्ययावत यंत्रे चालवतात, कित्येक तर संगणकाच्या आदेशाने चालवतात.
‘कुठे शिकलात हे तंत्र?’
SRKमध्ये’.
ही कंपनी अकुशल कामगारांना तांत्रिक कौशल्य शिकविते, आणि जर तुम्ही ते आत्मसात केलंत तर कामावर ठेवते.
‘पगार किती मिळतो?’
‘तीस-पस्तीस हजारापासून ते एक लाख रुपयांपर्यंत, इन्सेनटीव धरून’
‘महिन्याचा सांगताय की वर्षाचा?’
‘महिन्याचा!’
‘एक लाखापर्यंत?’
‘होय!’
कामगारांना कामावर ठेवण्याचा एकाच निकष – तुम्हाला कामाचे तंत्र अवगत असले पाहिजे – त्यासाठी शैक्षणिक पात्रतेची अट नाही.
मी त्या तीन कामगारांची बराच वेळ मुलाखत घेतली. दहा वर्षांपूर्वी हिरे उद्योगास मंदीचा झटका बसला होता. पण गोविन्द्काकांनी एकालाही नोकरीवरून काढले नाही. अनेक कामगार कामाशिवाय बसून होते, पण पगार मिळत होता, नोकरी शाबूत होती. शंभर-सव्वाशे कामगारांनी गोविन्द्काकांचे आभार मानले, कृतज्ञता व्यक्त केली. जितका संवेदनशील मालक, तितकेच संवेदनशील कामगार! कामगारांच्या पत्राचा सूर असा ‘तुमचा हा माणुसकीचा निर्णय आम्ही विसरणार नाही. आम्हीही वेळ येताच या ना त्या मार्गाने हे ऋण फेडू.’ मी चटकन खिशातून फोन काढला आणि फोटो घेतला त्या पत्रांचा.

इथे चक्रावणारी गोष्ट म्हणजे इथे फक्त शंभर कामगार कायम स्वरूपी कामावर आहेत. बाकी सर्व कंत्राटी. पण विलक्षण बाब अशी की त्यांचा पगार सारखाच – त्यात काही तफावत नाही – इतर उद्योगात कायम स्वरूपी कामगारांना कंत्राटी कामगारांपेक्षा दुप्पट ते पाचपट अधिक पगार मिळतो – पण इथे मात्र समानता! जे पगाराचे तेच इतर लाभांचे. जे कामगार विमा योजनेखाली येत नाहीत त्यांना मेडिक्लेम पॉलिसी – ती देखिल एक ते पाच लाखापर्यंत. आणि सर्व भत्ते, इंसेनटीव सर्व अगदी एकसारखेच.
मग असे कंत्राटी पद्धतीवर का बरे कामगार ठेवलेत? मला वाटतं की हा प्रश्न निव्वळ कुतूहलाचा आहे. अप्रस्तुत आहे. कठीण परिस्थितीतही गोविन्द्काका त्यांना कामावरून काढत नाहीत. पगार सोयी-सुविधा सर्व सारख्या, एक लाखापर्यंत पगार मिळतो, म्हणजे भेदभाव कुठेही नाहीये.

हे कसं शक्य आहे? खात्री नसेल तर सुरतेला जा आणि बघा की, शहानिशा करून घ्या!
एक मालक – गोविन्द्काका ढोलकिया – केवळ सातवी शिकलेला, त्याने माणसांना माणुसकीने वागवायचं कंत्राट घेतलंय आणि एक अजब दुनिया उभी केली आहे! प्रणाम गोविन्द्काका!!
विवेक पटवर्धन

Tuesday, May 1, 2018

गोविन्द्काका: एक विलक्षण माणूस


सुलभा आणि मी सुरतेला उतरलो. ड्रायव्हर गाडी घेऊन पुढे आला, “प्रथम आपण शाळा आणि हॉस्पिटल बघूया मग ऑफिसला जाऊ. नीरव साहेब तुमची तिथेच वाट पाहत आहेत.” नीरवशी माझी ओळख तशी नवीच. एका सेमिनारमध्ये आम्ही भेटलो, तेव्हा तो श्री रामकृष्ण एक्सपोर्टबद्दल जे काही बोलला त्याने माझे कुतूहल वाढले होते. त्याने भेटीचा आग्रह धरला होता.
गोविन्द्काका दिवसाची सुरवात इथूनच करतात. रिलीफ सेंटरमध्ये ते लोकांना भेटतात, त्यांच्या समस्या सोडवतात आणि मगच ऑफिसला येतात. तुम्हालाही ते इथेच भेटणार आहेत. रिलीफ सेंटर, शाळा आणि डायग्नोस्टीक सेंटर सर्व एकाच इमारतीत आहे.” गोविन्द्काका म्हणजे श्री रामकृष्ण एक्सपोर्टचे चेयरमन. तेरा वर्षांचा गोविन्द सुरतेला सत्तरीच्या दशकात आला, लवकरच त्याने स्वत:चा व्यवसाय सुरु केला. सातवी पास गोविंदचा व्यवसाय बघता बघता शेकडो नव्हे हजारो कोटींच्या रुपयात फोफावला. हा एक विलक्षण माणूस आहे. आमचाही प्रवास प्रथम रिलीफ सेंटर, शाळा आणि डायग्नोस्तिक सेंटर, मग त्याचं ऑफिस, हिऱ्यांना पैलू पाडायचा कारखाना असाच ठरला.
फ्लायओव्हरवरून खाली उतरताना उजवीकडे शाळा दिसते. एक वळसा घालून आम्ही तिथे पोचलो. ही शाळा पाच मजली आहे. त्याच इमारतीच्या बेसमेंटमध्ये फिजिओथेरपी आणि डायग्नोस्टीक सेंटर आहे.
“आम्ही इथे फिजीओथेरपी केवळ दहा रुपयात करतो.” नीरव म्हणाले, “इतर सर्व सुविधाही अत्यंत स्वत दरात उपलब्ध आहेत.” पाच सहा पेशंट फिजिओथेरपीचा उपचार घेत होते. त्यात एक वर्षाची चिमुरडी होती, तिलाही उपचार देण्यात येत होता. इतर पेशंट महिला होत्या, त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असावी असं वाटलं.इथे चाळीस डॉक्टर त्यांची सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देतात, खूप लोकांना मदत मिळते, हे तक्ते बघा.” नीरवने भिंतीवरच्या तक्त्यांकडे माझे लक्ष्य वेधले. त्यावरील माहिती तुम्हाला स्तिमित करते. मी फोटो घेतले.
मी वरच्या मजल्यावर गेलो. तिथे एका बारा बाय बाराच्या खोलीत HIV पीडीतासाठी मदत होते. सुरत शहरात इतर राज्यातून मोठ्या संखेने कामगार कामासाठी येतात. कापड तसेच डायमंड व्यवसायात त्यांची मोठ्या संखेने भरती आहे. HIV चा प्रसार इथे भरपूर प्रमाणात होतो. स्थलांतरित कामगार त्याला कारणीभूत आहेत असे म्हणतात. सुरत म्हणजे गुजरातची ‘एड्स’ची राजधानी समजली जाते. इथे HIV पीडितांना मोफत दवापाणी केले जाते, होय मोफत.
आम्ही पहिल्या मजल्यावरच्या शाळेत गेलो. “आमची शाळा गुजराती व इंग्रजी माध्यमाची असली तरी आता आम्ही गुजराती शाळा बंद करायचा निर्णय घेतलाय.” मुंबईचा रोग इथेही पसरलाय हे लक्षात आलं! “आमच्या शाळेतील प्रत्येक वर्गात ‘स्मार्ट’ बोर्ड आहेत.” दिव्या, शाळेची मुख्याध्यापिका
म्हणाल्या. मी डोकावून बघितले एका वर्गात. ‘स्मार्ट’ बोर्ड होता तिथे आणि त्यासमोर एक छताला टांगलेला एलसीडी प्रोजेक्टरदेखिल होता. “प्रत्येक वर्गात आहे म्हणता?” मी ‘प्रत्येक’वर जोर देत विचारले. “होय, प्रत्येक वर्गात आहे” मुख्याध्यापिका म्हणाल्या. “हे सर्व त्यांच्या चॅरीटेबल ट्रस्टमुळेच शक्य झाले. एका स्मार्ट बोर्डची किंमत पन्नास हजाराहून अधिक आहे. शाळेला हे परवडणे शक्यच नव्हते.” सातवी पास माणसाने एक अद्ययावत शाळा उभारली होती. “आमची लायब्ररी पहा. इथे प्रत्येक मुलगा काय वाचतो त्याकडे आमचे लक्ष असते. लवकरच ही ई-लायब्ररी बनवू.”
आम्ही रेलीफ सेंटर मध्ये आलो. एका खोलीत स्कॉलरशिप देण्याचे कार्यालय होते. तिथे गीतेच्या अनेक छोट्या आवृत्त्या होत्या. “स्कॉलरशिप हवी असेल तर गीतेतील एक अध्याय मुखोद्गत केला पाहिजे. जर कुणी संपूर्ण गीताच पाठ केली तर त्याच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च, मग त्याने कितीही शिकावे, आम्ही उचलतो” नीरव म्हणाले. “जर कोणी मुस्लीम असेल किंवा ख्रिश्चन असेल तर त्यांनी कुराण किंवा बायबल मधील विशिष्ट भागांचे पाठांतर करून यायला हवे. ही आमची अट आहे.”
किती स्कॉलरशिप दिल्यात?”
वीस हजार. खरे तर ही स्कॉलरशिप नसून व्याज नसलेले लोन आहे. पण कोणी पैसा परत करत नाही. आत्तापर्यंत वीस हजार स्कॉलरशिपा दिल्या आहेत, पण पैसे पंधरा जणांनीच परत केले असतील. त्याचे आम्हाला दु:ख नाही. आमचे काम मदतीचे.”
लवकरच गोविन्द्काका आले. एक उंच माणूस, हिंदी आणि गुजराती बोलणारा. तुम्ही त्याच्याशी इंग्रजी बोललात तरी उत्तर हिंदीतच मिळणार. कमालीचा आत्मविश्वास पण कुठेही अहंपणाचा दर्प नाही. ह्या माणसाचे आत्मभान वरच्या दर्जाचे असल्याचा प्रत्यय लगेच येतो. नमस्कार झाल्यावर गोविन्द्काका सरळ कामाला लागले. एका खोलीत आठ दहा माणसे त्यांची प्रतीक्षा करीत होती. एका मागोमाग एक त्यांच्यासमोर आले. ऑफिसमधील लोकांनी प्रत्येकाची चौकशी केली होती व कागद तयार ठेवले होते. कुणाच्या घरी कॅन्सरचा पेशंट होता त्याला मदत हवी होती, तर कुणाला शस्त्रक्रियेसाठी. गोविन्द्काका प्रत्येकाशी बोलले. दर तीन मिनिटांनी एकाचा अर्ज मंजूर होत होता. गोविन्द्काका त्यांच्याशी सहृदयपणे बोलले, पण कुठेही ‘असं कर, तसं करायला हवे होते’ असे फुकटचे सल्ले नव्हते.
गोविन्द्काका, ही गीतापठणाची अट कुठून आली?” मी.
अहो, एक दिवशी एक मुलगा माझ्याकडे आला. तेव्हा हे रेलीफ सेंटर वगैरे काही नव्हते. मला त्याला मदत करावी असे वाटले, पण असाही विचार मनात आला की हे पैसे त्याने खरेच शिक्षणासाठी मागितले आहेत काय? माझे लक्ष समोर पडलेल्या गीतेच्या प्रतीकडे गेले. मला उत्तर सुचले: मी म्हणालो - जर तुला खरोखरच शिक्षणासाठी पैसे हवे असतील तर उद्या गीतेतील एक अध्याय पाठ करून म्हणून दाखव – तर मी तुला पैसे देईन. अहो, तो दुसऱ्या दिवशी आला आणि घडघड एक अध्याय त्याने म्हणून दाखवला. मी मग ठरवले की हीच अट. अध्याय म्हणा, तीच पात्रता. इतर धर्मियांनी त्यांच्या कुराण किंवा बायबल मधील पठण करावे. जर कोणी गीतेचे अठराही अध्याय म्हटले तर आम्ही त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च करतो, त्याने कितीही शिकावे, आम्हाला आनंदच आहे.”
आणि हा आजारपणाचा खर्च?”
ती एक मोठी गोष्ट आहे. आत्ता इतकेच सांगतो की इथे आम्ही केवळ आजारी माणसांनाच मदत करतो असे नाही. लोकांच्या वैयक्तिक समस्याही सोडवतो! त्यात नातेवाईकांची भांडणे असतात, सुनेला त्रास देणारी माणसे असतात, अनेक समस्या आहेत. आम्ही त्यात पडतो जणू आमच्याच त्या समस्या आहेत. आमचे पैसे खर्च होतातही, पण आमची तक्रार नाही, उलट आमचे ते कार्यच आहे.”
तुम्ही हे सर्व का करता? तुमचे व्यवस्थापक करु शकतील की. आणि अजून के प्रश्न – ही पाटी मला जिथे तिथे दिसतेय – I am nothing but I can do anything हे काय आहे?” सुलभाच्या त्या प्रश्नांचे उत्तर त्यांनी दिले पण ऑफिसमध्ये पुन्हा भेटल्यावर.
ते सर्व विस्ताराने मी नंतर सांगेनच. आत्ता एवढेच म्हणतो की हा माणूस केवळ हिऱ्यांना पैलू पाडत नाही तर माणसांनाही हिऱ्यासारखे अनमोल बनवतो – ते करीत असताना गोविन्द्काका स्वत:च एक अप्रतिम हिरा होत आहे. झालाच आहे म्हणाना!
उगाच नाही ‘त्याचा वेलू गगनावरी’ गेला.
विवेक