Wednesday, September 5, 2018

ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करणाऱ्याचे घर


“लंडनमध्ये बराच काही बघण्यासारखं आहे, तिथल्या बिल्डिंग देखील शेकडो वर्षांचा इतिहास सांगतात. तुम्ही त्याच्याबद्दल माहिती काढा.” कवीअरसु हा माझा मित्र. आमच्यासाठी तो फक्त कवी. ह्याचे डोके म्हणजे भन्नाट कल्पनांचे भांडारच. “मी तीन महिने लंडनमध्ये, म्हणजे विम्बल्डनला राहणार आहे, इतके दिवस तिथे काय करू?” ह्या प्रश्नाचे उत्तर कवीकडून मिळाले ते असे.
अशी माहिती घेऊन पुढे काय करायचे ते ही आम्ही ठरवले. माझी ही चौथी खेप आहे. दर वर्षी मी इथे दोन महिने राहतो, ह्या वर्षी मुक्काम मोठा आहे. इथे नवीन काही दिसेल असे मला वाटले नव्हते. जुन्या बिल्डिंगा पहायच्या तर लंडनच्या मुख्य भागातच [गावठाणातच म्हणणार होतो!] घुसावे लागेल असं मी समजलो.
माझा कयास मी बोलून दाखवला. “डोळे उघडे ठेवून चला म्हणजे दिसेलच काहीतरी” असा प्रेमळ सल्ला सौ ने दिला. मी तो माझ्या डोक्यात फाईल केला. मी नेहमीप्रमाणे काहीच बोललो नाही, वाद कशाला घालायचा? तीन वर्ष एकही ऐतिहासिक इमारत दिसली नाही, आता कुठून दिसणार?
विम्बल्डन म्हणजे लंडनचे एक उपनगर. इथे काही जुन्या इमारती आहेतही, पण ऐतिहासिक अशा काही दिसणे कठीणच, अशी माझी समजूत! इथे जुनी पुराणी ऐतिहासिक अशी एकच वास्तू – ती म्हणजे टेनिस क्लब.
संध्याकाळी आम्ही दोघे फिरायला बाहेर निघालो. आमची दहा वर्षांची नात बरोबर होती. विम्बल्डन कॉमन – हे एक अतिशय मोठे मैदान आहे – जसे आम्ही त्याच्याजवळ आलो तशी उजव्या बाजूला एक पांढरी शुभ्र सुंदर बिल्डींग दिसली.
“इट युज्ड टू बी अ स्कूल, इट्स अ व्हेरी ओल्ड बिल्डींग.” आमच्या नातीने माहिती पुरवली. प्रवेश द्वारावर एक निळे प्लाक होते. जुन्या ऐतिहासिक घरांवर लंडनला प्लाक लावतात. [पुण्यातही काही ठिकाणी असे बघायला मिळते!].
प्लाकवरची व इतर माहिती थक्क करणारी:
ती इमारत बांधली रोबर्ट बेलने १६१३ साली, ईगल हाउस असे तिचे नाव. त्याचे वडील व आजोबा राहत होते तिथेच त्याने अधिक जागा खरेदी केली, आणि इमारत बांधली. रोबर्ट बेल कोण होता? हा एक व्यापारी होता आणि तो चक्क ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करणाऱ्यांपैकी एक होता! ती इमारत पुढे इतरांना विकली गेली.
पुढे १७८७ मध्ये तिथे शाळा उघडली गेली. प्रख्यात जर्मन तत्ववेत्ता शोपन्होवर त्याच शाळेत १८०३ साली विद्यार्थीदशेत शिकत होता.
कल्याणमध्ये देखील मी कित्येक वाडे असे पाहिले आहेत की जे तीनशे वर्ष जुने होते. ते सर्व आता इतिहासजमा झाले आहेत. मला वाटते सुभेदार वाडा सोडता एकही शिल्लक नसावा. जाऊ दे. इतिहासातून आपण काही शिकलो नसेल पण इंग्रजांकडून इतिहास कसा जपावा हे फारच शिकण्यासारखे आहे.

विवेक पटवर्धन 

Monday, September 3, 2018

जेव्हां बक्षीस उफराटे काम करते


अल्फी कॉन हा एक भन्नाट माणूस आहे. शिक्षणाच्या मानसशास्त्रावर त्याचं खूप संशोधन आहे. त्याचे निष्कर्ष उद्योगात लागू होतात तसेच पालकत्वातही. अशी माणसं अनेकदा वादाच्या भोवर्‍यात सापडतात, कारण ते बिनबुडाच्या पण जनमानसात खोलवर रुजलेल्या समजुतींवर घणाघाती आघात करतात.
अल्फी कॉनचे एक अप्रतिम पुस्तक आहे ‘Punished by Rewards.’ रिवार्ड म्हणजे बक्षिस. त्याचा परिणाम आनंददायी असायला हवा. पण काही वेळा तो उफराटा होतो!
अल्फीच्या Punished by Rewards पुस्तकातली गोष्ट: एका म्हाताऱ्याच्या लक्षात येते की तो बागेत बसला असताना रस्त्यावरून जाणारी शाळकरी मुलं त्याची टिंगल करतात. हा प्रकार काही दिवस चालल्यावर म्हातारबुवांना एक युक्ती सुचते. एके दिवशी ते मुलांना भेटून म्हणतात, “मला माहित आहे, तुम्ही माझी टिंगल करता, मस्करी करता. उद्यापासून अशी टिंगल आणि मस्करी करण्याचे मी तुम्हाला रोज एक डॉलर बक्षिस देईन.” मुलं अर्थातच खुश होतात, आपलं काम चालू ठेवतात. आठवड्याभराने भेटल्यावर म्हातारबुवा म्हणतात, “मी दरात बदल करतोय, उद्यापासून टिंगल-मस्करी करायचे मी रोज पन्नास सेंट बक्षिस देईन.” मुलांच्यात कुरबुर होते पण ते काम चालू ठेवतात. पुन्हा आठवड्याभराने भेटल्यावर म्हातारबुवा म्हणतात, “मी दरात बदल करतोय, उद्यापासून टिंगल-मस्करी करायचे मी दररोज एक सेंट बक्षिस देईन.” तो ऐकून मुलं म्हणतात “हॅ:, हे कोण करील?
थोडक्यात सांगायचं तर आपण जे काम करतो त्याबद्दल आपल्याला कुतूहल असतं. त्या कामात आपल्याला रस असतो, आपण त्या कामाचा विचार करत असतो. बक्षिस दाखवलं, प्रलोभन म्हणा हवं तर, की हा सांधा खिळखिळा होतो, माणसांना कामात रस किंवा त्याचे आकर्षण वाटत नाही.
हे आठवायचं कारण म्हणजे अल्फी कॉनला ओप्रा बाईंनी त्यांच्या टीव्हीवरच्या  कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. ओप्रा बाईंचा कार्यक्रम जगविख्यात आहे. त्या कार्यक्रमात त्यांनी एक प्रयोग केला व अल्फीच्या संशोधनाची चांचणी झाली.
त्यांनी वीस मुलांना प्रयोगासाठी बोलावले. प्रत्येक मुलगा वेगवेगळ्या वेळी बोलावला होता. प्रयोगाची रीत अशी: मुलगा प्रोड्यूसरला भेटत असे, पण प्रोड्युसर त्यास आपण एका खेळणी बनवणाऱ्या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवीत असे. मुलाला त्याचे काम समजावून देण्यात येई – ते म्हणजे त्याने त्याच्यासमोर ठेवलेल्या कोड्यांची पारख करणे, तपासणे.
दहा मुलांचा एक गट असा होता की प्रत्येकाला हे काम करण्यासाठी पाच डॉलर देऊ केले गेले होते. पाच डॉलरची नोट त्यांच्या टेबलावर ठेवण्यात देखील आली होती. इतर दहा मुलांना असं बक्षिस देऊ केलं गेलं नाही.
प्रत्येक मुलाने कोड्यांची पारख केली, तपासले, काम संपले की थोडा वेळ तिथे तो एकटाच असे. त्याला तसं थोडा वेळ ठेवण्यातच येत असे. प्रत्येक मुलाच्या कामाचं त्याच्या अपरोक्ष आणि लपून म्हणा हवं तर, व्हिडीओ रेकोर्डिंग करण्यात आलं.
काम झाल्यानंतर मुलगा काही वेळ खोलीत एकटाच असे. त्या व्हिडीओ रेकोर्डिंगमध्ये काय दिसलं?
ज्यांना पाच डॉलरची प्रलोभने दाखविली नव्हती ती सर्व दाही मुलं काम संपल्यावर मिळालेल्या फावल्या वेळातही कोड्यांशी खेळत राहिली – त्यावेळी तिथे कोणी नसताना देखील.
याउलट ज्यांना पाच डॉलरचे प्रलोभन दाखविले होते त्यातल्या दहापैकी नऊ जणांनी कोड्यांकडे ढुंकूनही पहिले नाही.
अक्षरश: शेकडो प्रयोगातून हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालंय की जेव्हा एखादं काम करण्यासाठी प्रलोभन दिलं जातं तेव्हां त्या कामात माणसाला रस वाटत नाही, त्यातला त्याचा इंटरेस्ट संपतो! पैसा आणि तशीच दिली जाणारी आमिषे, बक्षिस, रिवार्ड, कामातला राम संपवतात!!
तरीही उद्योगात व घराघरात काय बोलले जाते? कसली बक्षिसे दाखवली जातात काम करण्यासाठी? कुछ समझे?
विवेक पटवर्धन