Tuesday, April 16, 2019

माझी दुसरी ब्लाइंड डेट


माझ्या दुसर्‍या ब्लाइंड डेटबद्दल बोलतोय. माझ्या पहिल्या ब्लाइंड डेटबद्दल मी अगोदर लिहिलं आहे. [इथे वाचा]. ती भेट मला पार हलवून गेली होती, दुसरी भेटही तशीच!.

मोहम्मद असिफने मला फोन केला तेव्हा दुपार होती, मला आठवतंय. मी रिटायर होऊन सहा-आठ महिने झाले असावेत. मी जेवण करून लोळत पडलो होतो. मी फोन घेतला. तो म्हणाला तुम्हाला भेटायचंय. कशासाठी? मी विचारलं. तो कलकत्त्याहून आला होता. माझे नांव त्याला भेटण्यासाठी कोणी तरी सुचवले होते. बहुतेक त्याचे गुरु डॉ पिल्ले यांनी माझे नांव सुचवले असावे, माझेही ते मित्र होते. ‘मला माझ्या करियरबद्दल तुमचं मार्गदर्शन हवंय, आज भेटता आलं तर बरं होईल कारण मी उद्या सकाळच्या फ्लाईटने परतणार आहे.’ तो म्हणाला. मला फारसा उत्साह नव्हता. ‘ठीक आहे, ठाण्याला राहतो मी, ये घरीच.’

‘सर, मी आत्ता दक्षिण मुंबईत आहे, ट्राफिक हैराण करेल, चेंबुरला भेटता आले तर बरं होईल, आपल्याला बोलायला अधिक वेळ मिळेल.’ मी थोडासा चिडलोच. पण मी काही बोलायच्या अगोदरच तो म्हणाला, ‘सर मी विज्युअली चायलेन्ज्ड आहे. म्हणून मला तुमच्या सल्ल्याची अधिक गरज आहे, नाही म्हणू नका प्लीज.’ मी अवाक् झालो. मी हो म्हटलं. आम्ही चेंबूरच्या शॉपर्स स्टॉपवर भेटायचं ठरवलं.

मी तिथे वेळेवर पोचलो. दुसर्‍या मजल्यावरच्या कॉफी शॉपमध्ये बसतोय तोच तळमजल्यावर कोणीतरी मोठ्ठ्याने बोललं. “मी जाईन तिथे, तुमची लिफ्ट कुठे आहे?’ शॉपर्स स्टॉपच्या कॉफी शॉपमधून खाली डोकावलं की तळमजल्यावरचं दिसतं. तो आला होता. एक दोघे त्याच्या हातातली पांढरी काठी बघून त्याला मदत करायला धावले होते, लिफ्टकडे घेऊन गेले. मी लिफ्टजवळ गेलो. ‘अरे सर, तुम्ही कशाला लिफ्टपर्यंत आलात?’ त्याने तोपर्यंत त्याची पांढरी काठी फोल्ड करून ठेवली होती. मी नीट निरखून बघितलं. त्याला काहीच दिसत नसावं. आम्ही कॉफी शॉपमध्ये बसलो.

असिफ तरुण होता. त्याने एमबीए केलं होतं. हा मुलगा फाकडू इंग्लीश बोलत होता. थोड्या गप्पा झाल्यावर तो म्हणाला, “सर, मी बिहारचा. भागलपूरचा. जन्मजात अधू दृष्टी घेऊन आलो. माझी आजी म्हणायची, “मेलास का नाही?” तिला माझं आंधळेपणानं जगण पाहवत नसे. अधू दृष्टी देखील गेली आणि पंधराव्या वर्षापासून मी पूर्ण अंध झालो. पण त्यापूर्वी माझा दूरचा एक काका मला अमेरिकेला घेऊन गेला. तो तिथेच स्थाईक झाला होता आणि त्याने एका अमेरिकन मुलीशी विवाह केला होता.”

आत्तापर्यंत मला एका विलक्षण तरुणाला मी भेटतोय ही जाणीव झाली होती. त्याच्या बोलण्यात कुठे नकारात्मक सूर नव्हता, न्यूनगंड नव्हता, उलट आत्मविश्वासच दिसत होता.

“सर, मला तिथे अमेरिकन आई मिळाली म्हणाना.” आम्ही दोघेही हसलो. “मी आज जो काही आहे तो तिच्याचमुळे, तिचे ऋण मी कधीच विसरणार नाही.”

“म्हणजे तिने असे काय केले?

“एक तर नवा देश, नवी भाषा आणि नवी शाळा. माझे प्रगतीपुस्तक बघून कोणीही म्हणाला असता की ह्याच्याकडून काहीही अपेक्षा न ठेवणेच बरे. पहिल्यावर्षी मी सगळ्या विषयात फेल झालो होतो. पण माझ्या अमेरिकन आईचा प्रभाव असा, तिच्यामुळे माझा साफ गेलेला आत्मविश्वास पुन्हा सापडला. मी तिच्यामुळे मी पुढे फार चांगले मार्क मिळवले, सगळ्या विषयात A ग्रेड मिळवली.”

पुढे तो भारतात परतला. तो कलकत्त्याच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पास होणारा पहिला अंध विद्यार्थी ठरला. त्याला आयआयएमची प्रवेश परीक्षा देता आली नाही कारण अंध विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची सोय नव्हती. त्याने डीसेबिलीटी कमिशनरकडे तक्रार केली तर तेव्हापासून डिसेबल विद्यार्थ्यांसाठी आयआयएममध्ये काही जागा राहून ठेवण्याचा आदेश निघाला. असिफने सिंबायोसिसच्या एका इन्स्टिट्यूटमधून [डॉ पिल्ले तिथे डायरेक्टर् होते] एमबीए केलं. असिफचे प्रेझेनटेशन बघितल्यावर एक सरकारी उच्चपदस्थ अधिकारी इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यावेळचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याकडे त्याची शिफारस केली. असिफ राष्ट्रपतीना भेटून आला होता!

मी शांतपणे हे सर्व ऐकत होतो. असिफ एक विलक्षण तरुण होता हे तर स्पष्टच होते, आणि तो महत्वाकांक्षीदेखील होता हे जाणवले. त्याच्या आयुष्यात देवाने एका पारड्यात अंधत्व टाकले होते, तर दुसर्‍या पारड्यात त्याचे व्यक्तिमत्व फुलवणारी डॉ पिल्ले, अमेरिकन आईसारखी माणसे ठेवली होती. आता मी काय करणार होतो ह्याच्यासाठी?

“बाबा रे, मी काय करू तुझ्यासाठी?

“सर मी तुमचं नांव ऐकलंय पिल्ले सरांकडून. मला तुमच्यासारखं एचआरचं व्हाईस प्रेसिडेंट व्हायचंय. ती माझी आकांक्षा आहे. मला तुमचं मार्गदर्शन हवंय. मी काय करायला हवं?

मी काहीसा वैतागलोच, मी त्याला काय सांगणार होतो? असिफने आयआयएमसारख्या संस्थेला हलवले होते. राष्ट्रपती त्याला भेटले होते. अंध असूनही अनेक ‘प्रथम त्याला त्याच्या सीवीवर लिहिण्याजोगे होते. मी अंध नसूनही नगण्य होतो, ‘ह्याचे पुढे काय होणार’ अशी चिंता मी त्याच्या वयाचा असताना माझ्या आईवडिलांना सदैव होती. त्याची आत्मकथा ऐकून मलाच न्यूनगंड आला होता.

मी कॉफी पीत बसलो. माझ्या जे लक्षात आलं ते नक्कीच त्याला कडवट वाटणार होतं. अंध माणसांना आपला चेहरा दिसत नाही हे किती बरं असतं.

“सर तुम्ही काहीच बोलत नाही?

“मफीन खा.” मी ब्लुबेरी मफीन त्याच्या हातात ठेवला. हा थोडावेळ तरी गप्प राहील, मला वाटले. मी शब्दांची जुळवाजुळव करीत होतो.

“बोला ना.”

“हे बघ, आपण चुकीचा प्रश्न विचारला की उत्तर चुकीचं येतं.”

“म्हणजे?

“मी काही स्वत:ला व्हीपी बनवलं नाही. कोणीतरी तो हुद्दा मला दिला. ज्यांनी मला तो हुद्दा दिला ते मला मॅनेजरच्या हुद्द्यावरही अडवून धरू शकले असते. आपल्याला जे काही बनायचं आहे त्याच्यासाठी हुद्द्याच परिमाण ठेवणं शुद्ध मूर्खपणा आहे – निदान मी तरी असं मानतो.”

“मग मी काय करावं?

“मी गंमतीने लोकांना सांगतो की मला कंपनीने व्हीपी नाही बनविलं, मी तर जन्मजातच व्हीपी आहे – विवेक पटवर्धन! आपल्याला जे काही बनायचं आहे ते होणं आपल्या हातात असायला पाहिजे. हुद्दे इतर लोक देतात. मोठ्या हुद्द्यावरची माणसं ‘मोठी’च असतात हा समज फार चुकीचा आणि फसवा आहे. म्हणून हुद्दा प्रकरण डोक्यातून पहिल्यांदा काढून टाक. खऱ्या मोठ्या माणसांना हुद्द्याच्या शिड्यांची जरूर लागत नाही.”

“ठीक आहे, पण सर मला एचआर डिपार्टमेंटचे प्रमुख व्हायचंय.”

“ध्येय म्हणून हे ठीक आहे. पण माझ्या मते ते फारसं व्यावहारिक नाहीये.”

“आत्ता तुम्हाला काय म्हणायचं आहे?”

“हे बघ. विज्युअली चायलेन्ज्ड व्यक्तींना कोणतही काम करता येईल वगैरे ठीक आहे पण त्यांना इतक्या उच्चपदावर कॉर्पोरेट जगतात कोणी नेमल्याचे मला माहित नाही, आणि असलेच कोणी तर तो एक अपवादच. एचआर डिपार्टमेंटचे प्रमुख होणं कदाचित असाध्य नसेल, पण अत्यंत दुरापास्त तर नक्कीच आहे. लाखोमें एक! म्हणून माझ्या मते ते ध्येय ठेवणं फारसं व्यावहारिक नाहीये.”

“असं का?

“हे बघ, एचआर डिपार्टमेंटचे प्रमुख होण्यासाठी तुझी शर्यत ज्यांना दृष्टी आहे त्यांच्या बरोबर असेल. निवड करणारे ‘सेफ खेळतील. हे असं असावे की नाही ही दुसरा विषय आहे. ह्या शर्यतीत त्यांची बाजू नेहमीच उजवी असेल हे ध्यानात घे. मोठ्या कंपनीचे एचआर डिपार्टमेंटचे प्रमुख होणं कठीणच.” हे बोलत असताना मलाच वाईट वाटत होतं.

“पण माझ्याकडे पात्रता नाहीये का?

“पात्रतेचा प्रश्न नाही. एचआर डिपार्टमेंटच्या प्रमुखाची नेमणूक तू ठरवणार नाहीयेस. दुसरा कोणीतरी ठरवणार आहे. मी त्याच्या मानसिकतेबद्दल बोलतोय.”

त्याला पटलं नाहीये हे त्याच्या देहबोलीवरून स्पष्ट होत होतं. मलाही स्पष्ट आणि तिखट बोलल्याबद्दल वाईट वाटत होतं. पण मला जे वाटलं तेच मी बोलत होतो. बराच वेळ शांतता राहिली.

“ह्या मफिनच्या आत ब्लुबेरी असते ती मला अजिबात आवडत नसे, पण बरेच मफिन खाऊन आता ठीक वाटते.” त्याला शांतता असह्य झाली असावी म्हणून बोलला असेल.

“माझं बोलणं त्या ब्लुबेरीसारखं आहे असं समज.” आम्ही दोघेही हसत सुटलो. “तुला पटायला वेळ लागेल पण मला वाटतं की कालांतराने पटेलच.”

“डोन्ट एम्बरास मी, सर” तो म्हणाला, “मी काय करावं तेच कळत नाहीये. माझ्याकडे सर्व काही असताना मला जे हवंय ते का मिळू नये?

“माझ्याकडे अशा प्रश्नांचे उत्तर नाहीये, असिफ. मराठीतल्या प्रसिद्ध लेखकाने, पु ल देशपांडे यांनी लिहिलंय की समुद्रातल्या कोळ्याकडे जाळं असतं, पण समुद्रातलं पाणी कधी त्याच्याकडे मासे आणतं, तर कधी ते त्याच्यापासून मासे दूर घेऊन जातं, हे जीवन असं आहे. खरं आहे ना? अरे, आपण कां उगाचच फिलॉसॉफी बोलतोय?”

“मग मी काय करावं?

“सर्वप्रथम तू इतरांशी स्पर्धा करणं मनातून काढून टाक. तू जेव्हां स्वत:साठी लढलास तेव्हां यशस्वी झालास. तू अंध आहेस असे म्हणण्यापेक्षा तुझ्याकडे असे काही अनुभव आहेत की जे डोळस माणसांकडे नाहीत, त्या अर्थाने तू सर्वसाधारण माणसांपेक्षा वेगळाच आहेस. तो वेगळेपणा तुला आयुष्यात काहीतरी बनवू शकतो.”

“म्हणजे नक्की काय करायचं सर?

“खरंतर मला देखील सांगता येत नाहीये. पण एवढं कळतंय मला की तुझा जगाचा अनुभव वेगळा आहे. त्यावरच काहीतरी रचलं पाहिजे. ते केवळ तुझंच आणि आमच्या अनुभवापेक्षा खूपच वेगळं असेल. तू सध्या काय करतोस?

“मी ‘प्राईस-वॉटरहाउस-कूपर’ मध्ये कन्सल्टन्ट म्हणून काम करतोय.”

“नोकरी तर चांगलीच आहे. तू अनेक ठिकाणी वक्ता म्हणून जातोस ते चालूच ठेव. कदाचित ब्लॉग लिहिल्याने तुला तुझे अनुभव लोकांपर्यंत पोचवता येतील.”

तो गप्प बसून ऐकत होता. “कॉर्पोरेट जगतात एक असा समज आहे की सगळं कसं व्यवस्थित आखलं पाहिजे, प्लान केलं पाहिजे. ते काही खोटं नाही, पण संपूर्ण खरं देखील नाही. आयुष्यात इन्क्रिमेंटॅलिझमलाही स्थान आहे.”

“म्हणजे?

“सोप्या भाषेत सांगायचे तर पाच पावले चालावीत तर पाच फुट पुढचे दिसते म्हणतो ना, तसे. अनेक संधी तुझ्या पुढे येतील. त्या तुला बरंच काही देऊन जातील. विचार कर, जर तू चांगले काम करीत राहिलास तर तुझे आयुष्यच एक स्फूर्तीदायी कथा होऊ शकते. कल्पना कर की तू पन्नासाव्या वर्षी आत्मचरित्र लिहिलेस तर? तो एक विलक्षण वृत्तांत होईल.”

असिफला माझे म्हणणे काही पटले नसावे असंच वाटलं. मी देखील त्याचा विचार करायचं सोडून दिलं. पण दोन-तीन महिन्यांनी असिफची मेल आली. ‘तुम्ही जे बोललात त्याचा मला खरं तर रागच आला होता. पण तुमचे विचार घर करून राहिले आणि जसा वेळ गेला तसा मला तुमचा सल्ला पटला’ अश्या अर्थाचे काहीतरी त्याने लिहिले होते.



असिफ पुढे माझ्या सम्पर्कात राहिला. मी त्याच्या कलकत्त्याच्या घरीही गेलो. त्याने लग्न केलंय, पत्नीही अधू दृष्टीचीच आहे. एक मुलगीही आहे. मुलगी [तिला कुठलेही व्यंग नाही] बापाची काळजी घेताना बघून आम्हा दोघांना आश्चर्य आणि गम्मत वाटली. तीन वर्षांच्या मुलीलाही किती समज असते!

असिफचे स्वत:ला पुढे रेटणे चालूच आहे. लहानपणी तो मित्रांबरोबर फुटबॉल खेळू शकला नव्हता कारण त्याला तो बॉल दिसताच नसे. पण आता अंध मुलांसाठी फुटबॉल लोकप्रिय करण्यात त्याचा पुढाकार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अशी एक टूर्नामेंट झाली. जगातील साठ देशांतील अंध खेळाडूंच्या फुटबॉलमध्ये भारताचा नंबर २९वा आहे!

असिफ नुकताच दहा किलोमीटर कुणाचाही हात न धरता धावून आला आहे. ते त्याने ८९ मिनिटांत पार केलं. पूर्वी “माझं टार्गेट एक तास तीस मिनिटांचे होते आणि मी एक तास छत्तीस मिनिटांत दहा किलोमीटर पार केलं,” असं म्हणून हळहळला होता! इथे लक्षात घ्यायला हवं की इतर अंध मुलं कुणाबरोबरतरी हॅंडबॅंड लावून धावतात. त्यांना पडण्याची भीती असते. असिफला कोच मिळालाय. पण तो मदतीशिवाय धावला. आत्तापर्यंत तो चार मॅरेथॉन धावलाय, एकूण ४५० किमी. धावलाय! छत्तीसगढ पोलीसांच्याबरोबर ‘डिजिटल इन्क्लुजन प्रोजेक्ट’ करून आलाय, आणि इतरही बरीच कामं अनेक राज्य सरकारांच्या समवेत करून आलाय.



हे सर्व माझ्यामुळे झालं असा माझा दावा मुळीच नाही. ते सर्व मुळातच होतं हे निर्विवाद आहे. ‘हे सर्व कुठून येतं’ असा [तेंडुलकरांचा] प्रश्न मलाही पडतो. त्याच्या बरोबर झालेला संवाद मलाच काही शिकवून गेला. तो सर्व संवाद अत्यंत कठीण होता. एकीकडे मला जे योग्य वाटते ते बोलायचं, तर दुसरीकडे त्याला न दुखवायची खबरदारी घेणं ही तर तारेवरची कसरत होती. कित्येक वेळा आपण दुसऱ्यांशी बोलतो तेव्हा स्वत:शीच काही बोलत असतो. ते आत्मनिवेदनच असतं. असिफला समजावताना असं वाटत होतं की हे मलाही अगोदर समजलं असतं तर? पण ज्यांना डोळे असतात ते बहुधा अंतर्मुख होत नसावेत – निदान माझ्याबाबतीत तरी हे खरं आहेच.

एक गोष्ट आठवतेय. एकदा यम एका वृद्धास न्यायला आला. ‘चल माझ्याबरोबर, तुझी वेळ संपली’ म्हणाला. तो यमाला म्हणाला, “थांब जरासा. आत्ता कुठे मला कळलंय जगायचं कसं ते.”

मला कां बरं वाटतं की ही माझीच गोष्ट आहे?

विवेक पटवर्धन
[पहिल्या ब्लाइंड डेटप्रमाणे ही देखील सत्य घटना आहे.]

Saturday, April 13, 2019

माझी ब्लाइंड डेट


ब्लाइंड डेट म्हटलं की लोकं डोळे मोठ्ठे करून बघतात. कारण ब्लाइंड डेट म्हणजे दोन अनोळख्या व्यक्तींची रोमॅंटिक भेट. पण माझी भेट रोमॅंटिक वगैरे अजिबात नव्हती.

मला अनुभूतीचा फोन आला. मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये अनेक वर्षे एक कोर्स शिकवत होतो. अनुभूती जरी माझी विद्यार्थिनी नव्हती तरीही ती अनेकदा अभ्यासातील मदतीसाठी माझ्याशी बोलत असे, भेटत असे.  

“सर एक महत्वाचे काम आहे’ अनुभूती म्हणाली. ‘प्लेसमेंट चालू झाल्या आहेत. अजून गोमाला जॉब मिळाला नाहीये. ती अतिशय तणावाखाली आहे. तिला जॉब मिळावा अशी आमच्या सगळ्या वर्गाची इच्छा आहे, पण तिच्याकडे अनेक रिक्रूटर बघायलाही तयार नाहीत. जे तिचा इंटरव्ह्यू घेतात ते तिला सिलेक्ट करीत नाहीत.”

काही कारणाने मी अनुभूतीच्या बॅचला शिकवत नव्हतो. त्या बॅचमध्ये गोमा रायदेखील होती. जरी मी त्या बॅचला शिकवत नव्हतो तरीही गोमा रायला मी ओळखत होतो, पण पाहूनच, कधी बोललो नव्हतो. नेपाळमधून आलेली गोमा एक अंध विद्यार्थिनी होती.

“मग मी काय करावं म्हणतेस? काय काम आहे?

“सर तुम्ही तिच्याशी बोला. तिचा आत्मविश्वास डळमळू लागलाय. मला आणि माझ्या वर्गातल्या अनेकजणांना वाटतंय की तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवाल. तिलादेखील वाटतंय तुम्हाला भेटावं. नाही म्हणू नका.”

मी नाखुषीनेच भेटायला तयार झालो. काही विद्यार्थ्यांनी माझ्यावर भिस्त टाकली आहे हे जाणवलं, पण माझ्याकडे त्यांच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं. असा माझा अनेकदा गाईडमधला देवानंद होतो. तुरुंगातून सुटून आलेला देवानंद एका देवळाच्या पायरीवर झोपतो, पहाटे एक साधू त्याच्या अंगावर आपली ‘श्रीराम जयराम’ लिहिलेली शाल घालून निघून जातो, आणि गावकऱ्याना वाटतं की तो देखील एक साधुच आहे. त्यांचे प्रश्न तो सोडवील असे त्यांना वाटते. लोक असेच त्यांच्या अपेक्षा माझ्यावर लादतात आणि मी त्यांच्या अपेक्षा पुऱ्या करायला मुकाटपणे झटतो असं अनेकदा झालंय. भिडस्तपणाने ‘नाही’ न म्हणता आल्यामुळे मी अनेकदा नको ती कामे अंगावर घेतली आहेत. हे त्यातलेच एक. त्यातही भर म्हणजे मी गोमाला भेटायला इन्स्टिट्यूटमध्ये जायला निघालो तेव्हा पत्नी म्हणाली, ‘तुम्ही काहीतरी कराच तिच्यासाठी’.

गोमा आली तेव्हा पोटात गोळाच आला. आम्ही दोघे एका प्रोफेसरच्या केबिनमधे बसलो. गोमा बोलायला लागली. जॉब मिळणे कठीण आहे हे तिनेही जाणलं होतं. पण तिचा इंटरव्ह्यूचा अनुभव चांगला नव्हता. तिचा इंटरव्ह्यू घेणारे एक औपचारिकपणा करतात, त्यांना तिला जॉब द्यायचा नसतो, हे तिच्या ध्यानात आलं होतं. काही कंपन्यात विशेषत: पब्लिक सेक्टरमधल्या कंपन्यात डिसेबल्ड व्यक्तींना नोकरी देण्याचे धोरण असते, तिथल्या एच आर मॅनेजरना तशा व्यक्तींचे इंटरव्ह्यू घेणे भागच असते. पण त्यांना निवडण्याचे स्वातंत्र्य असावे.

काही इंटरव्ह्यूमध्ये तर ती दुखावली गेली होती. ते सर्व सांगताना गोमा अचानक रडायला लागली. तिला रडताना पाहून मला काय करायचे ते सुचेना. मी आयुष्यात कधीही इतका हतबल झालो नव्हतो. एकच बरं होतं की मी तिच्या डोळ्यातील अश्रू बघू शकत होतो, पण तिला मात्र माझे अश्रू दिसत नव्हते.

थोड्या वेळाने दोघेही सावरलो. “सॉरी सर,” गोमा म्हणाली, “फार इमोशनल झाले. एका भिंतीवर डोकं आपटावं असा अनुभव आहे हा.”

मी इतर काही बोलत वेळ काढला, कॉफी मागवली आणि अवांतर गप्पा मारत दोघेही कॉफी प्यायलो. गोमाचा प्रश्न सोडवायला नेहमीची विचारसरणी नाही कामाची हे कळून चुकलं होतं. एक दीर्घ श्वास घेतला. इमोशनल मनाला पुन्हा रॅशनल बनवायचे असेल तर दीर्घ श्वास घ्या आणि काही वेळ धरून ठेवा, असं कोणीतरी सांगितलं होतं.

“इंटरव्ह्यू सुरु कसा होतो?” मी विचारलं. “सर, ते माझ्या कुटुंबाबद्दल, शिक्षणाबद्दल वगैरे माहिती विचारतात. पण ज्या रीतीने हे होतं त्यामुळे त्यांना माझ्या इंटरव्ह्यूमध्ये इंटरेस्ट नाही हे तेव्हाच कळतं.” गोमा म्हणाली.

माझ्या करियरमध्ये मी शेकडो इंटरव्ह्यू घेतले आहेत, त्यामुळे इंटरव्ह्यू घेणार्‍याला काय वाटत असावे ते मी ताडले.

“गोमा नीट ध्यानात घे – इंटरव्ह्यू घेणार्‍याला वाटत असावं की ही डोळस माणसांसारखी काम करू शकेल काय? तू ट्रेनी मॅनेजर म्हणून नोकरी बघतेस हे ध्यानात घे.”

“सर मी एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट सर्व सोफ्टवेयर सहज वापरू शकते. जॉज नावाचे सोफ्टवेयर आहे, कानाला हेडफोन लावला की स्क्रीनवरचे सर्व ऐकायला येतं – दिसलं नाही तरीही.”

“तू डेमो देऊ शकशील?

“त्यात काय, मी तर लॅपटॉपवर कितीतरी काम करते. सहज दाखवीन.”

“इंटरव्ह्यू घेणार्‍याला वाटत असावं की ही मुलगी एकटी कशी ऑफिसला येईल? मग काय म्हणायचं?

“सर, अहो मी फील्डवर्कला माझी मीच, एकटीच, जाते सगळीकडे.”

मग थोडा वेळ आम्ही दोघेही स्तब्ध होतो. मी तिला म्हटले, “मी सांगतो त्याप्रमाणे करशील?

“नक्की”

“जशी तू इंटरव्ह्यू घेणार्‍याला भेटशील आणि इंटरव्ह्यूला सुरवात होईल तशी तू इंटरव्ह्यू घेणार्‍याला थांबव. त्याला सांग – तुम्ही इंटरव्ह्यू सुरवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही सांगायचंय. त्याला सांग की मला तीन गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली म्हणजे मी जॉज सोफ्टवेयरमुळे एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट सर्व सोफ्टवेयर सहज वापरू शकते. असं म्हणून तू एक छोटा डेमो दे. दुसरं म्हणजे मी कुठेही एकटी जाऊ शकते, मी फील्डवर्कला एकटीच गेले, पाहिजे तर आमच्या प्रोफेसरांना विचार. मी ऑफिसलाही एकटीच येईन कुणावरही मी अवलंबून असणार नाही. आणि तिसरे म्हणजे मी एकटी राहूही शकते. खरी परिस्थिती अशी आहे की लोकं आमची काळजी घेतात, तुमच्यापेक्षा आम्ही जास्त सुरक्षित असतो. एवढे ठणकावून बोल. जमेल?

“जमेल.” मग पुन्हा शांतता. “ह्यापेक्षा जास्त काही करणं आत्ता तरी सुचत नाहीये.”

गोमा आणि मी बाहेर आलो तेव्हा अनुभूती भेटली. “गोमाच्या इंटरव्ह्यूमध्ये तुला एक ऑबझरवर म्हणून बसता आलं तर बघ, आपल्याला माहिती मिळेल.” मी म्हणालो.

दोन दिवसांनी अनुभूतीचा फोन आला. “सर गोमाने तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं, ती इतकी आत्मविश्वासाने बोलली! मी हजर होते. मला तिथे बसायची परवानगी दिली होती इंटरव्ह्यू घेणार्‍याने.”

गोमाला कॅम्पस इंटरव्ह्यूमुळे नोकरी मिळाली. पण तिचा प्रश्न सोडवायचे मला कसे जमले त्याचे उत्तर मी शोधतो आहे. गोमाचा प्रश्न सोपा नव्हता. त्याचे उत्तर सुचले ते मला वाटलेल्या तिच्याबद्दलच्या कळकळीमुळे, की विद्यार्थ्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे? का इतर काही? काही गोष्टींचा शोध घ्यावासा वाटतो पण तो लागत नाही. पण ते तसेच राहू दे.

माझी ब्लाइंड डेट तर एका अवघड परिस्थितीशी होती. मागे वळून पाहताना ती रोमॅंटिक वाटते!
विवेक पटवर्धन
[ही एक सत्य घटना आहे.]