तीन
महिन्यापूर्वी फणीश मूर्तीची मुलाखत टाईम्समध्ये प्रसिद्ध झाली होती. मदनाचे बाण
ज्याला एकदा, नव्हे दोनदा, नव्हे तीनदा [म्हणजे उपलब्ध पुराव्यानुसार] लागले असे
हे महाशय! फणीशने प्रथम त्याच्या इन्स्टीट्यूटमधील मुलीशी प्रेमविवाह केला. मग
इन्फोसिसमध्ये काम करीत असताना तो रेका मेक्झीमोविचच्या प्रेमात पडला. कित्येक
दिवस चाललेले हे प्रेम प्रकरण लाखो डालरची नुकसान भरपाई देऊन मिटवण्यात आले. मग तो
इन्फोसिस सोडून आयगेटमध्ये उच्चपदावर गेला. तिथे होती इन्व्हेस्टर रिलेशन्स प्रमुख
अर्सेली रौझ – तिच्या बरोबर पुन्हा एकदा त्याने संधान बांधले. अर्सेलीला दिवस
गेले, फणीशची उचलबांगडी झाली.
ऑफिस [मग ते
कुणाचेही असो] तिथे मदन आपले धनुष्यबाण घेऊन हजर असतो हे तर उघड गुपित आहे. ‘पती,
पत्नी और वो’ ज्यांनी पाहिलाय त्यांना फणीशच्या वर्तणुकीच आश्चर्य वाटणार नाही –
त्यांना ती वर्तणूक पटली नसली तरीही. अजून एका सिनेमात ऑफिसमधल्या प्रेमाची गोष्ट
हाताळली होती तो म्हणजे अमिताभ आणि माला सिन्हा यांचा ‘संजोग.’ एक्काहत्तर सालच्या
संजोगमध्ये अमिताभ आणि माला सिन्हा यांचा देवळात विवाह होतो, ते दुरावतात पण एके
दिवशी माला सिन्हा अमिताभची बॉस बनून त्याच्या ऑफिसात येते!
ऑफिसमध्ये
प्रेम करणाऱ्या ज्या अनेक ‘प्रेमळ’ व्यक्ती आहेत त्यात अमेरिकेचे दोन
राष्ट्राध्यक्ष आहेत. बराक ओबामा हे मिशेलच्या म्हणजे त्यांच्या भावी पत्नीच्या
ऑफिसमध्ये ‘समर इंटर्न’ म्हणून काम करीत होते. दुसऱ्या राष्ट्राध्यक्षाच्याबद्दल
फारसं न लिहीणंच मी पसंत करीन. ते म्हणजे बिल क्लिंटन. त्यांचे मोनिका बरोबर
झालेले प्रकरण फारच गाजलं होतं.
कंपनीच्या
बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्यक्ष ऑफिसमध्ये दोन व्यक्तींनी प्रेमात पडणं ही घटना
‘धोकादायक’ असते. त्या दोघांचं प्रेम जमलं व त्याचं रुपांतर विवाहात झालं तर चांगलंच,
पण ती आता त्याच्या टीममध्ये राहू शकत नाही. म्हणजे मी इथे तो तिचा वरिष्ठ आहे असं
गृहीत धरलंय. पण तसं नसलं तरी त्या दोघांना एकाच टीममध्ये ठेवलं जात नाही.
आता दुसरी
शक्यता बघा – तो व ती प्रेमात पडलेत पण नंतर त्यांचं फिस्कटलय! आता ते एकाच
टीममध्ये असले तर त्यांचे सहकारी पुरते चक्रावतात. त्यांना दोघांना सांभाळून
घेताना त्रासच होतो. मग त्यातल्या एकाला दुसऱ्या ठिकाणी बदली करण्याखेरीज गत्यंतर
उरत नाही. इथे कांही ‘मलाच का म्हणून?’ असेही विचारतात. शेवटी त्यापैकी एक किंवा
दोघेही इतर नोकरी बघतात. म्हणजे पर्यायानें कंपनीचे नुकसानच की!
प्रेमात पडून
ज्यांच फिस्कटलय असे ते दोघे म्हणजे बॉस व ती त्याची सहकारी असली तर समस्या अधिकच
बिकट होते. फणीशच्या बाबतीत हेच झालंय. कित्येकदा [बहुतांशी विदेशी] कंपन्यांच्या
धोरणानुसार अशा युगुलाने आपल्या कंपनीला ‘डेटीन्ग’ची कल्पना देणं आवश्यक असतं.फणीशवर
नेमका हाच आरोप होता की त्याने आयगेट कंपनीला त्याच्या प्रेमाप्रकरणाबद्दल कांहीच
कल्पना दिली नव्हती. परंतु तशी कल्पना देणं आवशयक असतं नाहीतर ‘प्रतिकूल’
परिस्थिती निर्माण केलेल्या कार्यालयात काम करायला भाग पाडलं म्हणून त्या
कंपनीविरुद्ध दावा लावण्यात येतो. असं म्हणतात की फणीश व रेकाचं प्रकरण जगजाहीर
होतं पण इन्फोसिसने तिकडे काणाडोळा केल्याने त्यांच्याविरुद्धही दावा लावण्यात
आला.
कित्येकदा
वात्रटपणा अंगाशी येतो. असे कर्मचारी कॉलेजचे दिवस विसरलेले नसतात. एका तरुण
मुलाने त्याला आवडणाऱ्या मुलीच्या ‘व्होईसमेलमध्ये’ चुंबनाचे आवाज काढले – ते
रेकोर्ड केले. ती रागावली, तिने तक्रार केली. व्होईसमेल ठेवणाऱ्याचे एक्स्टेन्शन रेकोर्ड
होते त्यामुळे तो पकडला गेला, व नोकरीवर गदा आली.
अशी
परिस्थिती हाताळताना अनेकदां तारेवरची कसरत करावी लागते. मुलींचा एक गट
त्याच्याविरुद्ध फिरतो व तो मुलगा अक्षरश: नोकरीवर ठेवण्यास पात्र रहात नाही. पण दुसरी
बाजू अशी की अनेकदां असे मुलगे वात्रट व पोरकट असतात. त्यांच्यात परिपक्वता नसते. त्यांच्यावर नोकरीतून काढले जाण्याचा
ठपका ठेवायचा म्हणजे त्याच्या करियरचे तीन तेरा वाजवण्यासाराखेच आहे. अशाच एका केसमध्ये
त्या मुलाच्या वडिलांना बोलावून चिरंजीवांच्या उद्योगांची कल्पना देण्यात आली –
त्यांनी मुलाला रजेवर जायला सांगितले व मागोमाग राजीनामा पाठवून दिला.
अशी अनेक
प्रकरणं होत असतात. पुरुषांची तक्रार अशी असते की मुली जरा फारच हळवेपणा दाखवतात –
साध्या मस्करीचेही विपरीत अर्थ काढतात. पण त्यात फारसं [किंवा जरासही] तथ्य नसतं.
मुलीला जर ती थट्टा वाटली नाही आणि लैंगिक छळ वाटला तर तिच्या भावनांना अधिक महत्व
दिलं जातं आणि तो लैंगिक छळ समजला जातो. थोडक्यात म्हणजे ‘ती’ त्या घटनेचा अर्थ
कसा लावते हा व्यक्तिनिष्ठ अनुभव ठरवतो की ती घटना लैंगिक छळ म्हणायची की नाही. परंतु
इथेही विपर्यास होण्याची शक्यता असते – म्हणून एक सारासार विचार करणारी व्यक्ती
त्या घटनेचा अर्थ कसा लावील त्याचाही विचार होतो.
आतां सारासार
विचार करणारी व्यक्ती पुरुष असावी की स्त्री? हे तुम्हीच ठरवा.
पुन्हा एकदा
आपण फणीशमूर्तीकडे वळू या. त्याच्या मुलाखतीत त्याला विचारलं गेलं की ‘तुझा पाय
दुसऱ्यादा कसा घसरला?’ तर तो म्हणतो की “मलादेखील कळत नाही की मी असा कशामुळे
वागलो.... मी कामानिमित्त वीस-बावीस दिवस प्रवास करीत असे... आता पुन्हा असा होणार
नाही यासाठी मी प्रयत्नशील आहे.”
गुडलक फणीश!
मला कुणाच तरी [बहुदा विजय तेंडुलकरांचे] वाक्य आठवतंय “प्रत्येक पुरुष हा
सावजाच्या शोधात असलेला, चोरपावलांनी फिरणारा वाघच असतो.”
तुम्हाला काय
वाटतं?
विवेक
Sir, mala asa vatata ki hyacha uttar case to case basis varach tharavtaa yeil. Policy nischith asaavi pan to say that one party is always right may not be fair. Ithe lie detector saarkhya device cha (despite some limitations of the device) vaapar karna mahatvaacha tharu shakta.
ReplyDeleteEkda case samjun ghetli doni perspectives ni (boy and girl) ki kaahi probing questions vichaaraave aani baghaava machine kaay mhanta. We may go closer to the truth...
Mala vatata mann khota bolu shakta...pan shareer jaasta khara bolat asaava.