Wednesday, October 11, 2017

घर घर की कहानी



वंशावळ हा माझ्या कुतूहलाचा विषय. ‘रुट्स’ पुस्तकामुळे तो अधिकच प्रकाशाझोतात आला. मी शाळेत असताना पटवर्धन कुलावृत्तान्ताबद्दल मोठ्या माणसांना बोलताना ऐकलं होतं. [त्यात आमच्या कुटुंबाबद्दल अगदी कमी माहिती आहे, त्याबद्दल काही पाऊले उचलण्याचा इरादा आहे]. 


विवाह झाल्यावर काही गोष्टी जाणवल्या. पहिली म्हणजे अरेंज्ड मॅरेज असल्यास [किंवा एकंदरीतच] दोन्ही कुटुंबांना एकमेकांबद्दल फारच कमी माहिती असते. दुसरी म्हणजे सर्वसाधारणपणे मुलांना त्यांच्या आईच्या घराची, माहेरची फारच कमी माहिती असते. मी माझ्या एका वयस्कर नातेवाईकाला त्यांच्या वडिलांबद्दल लिहायला सांगितले तेव्हा ते हौसेने चाळीस पानी वही घेऊन आले आणि ती बरीचशी लिखाणाने भरली देखिल. मग मी त्यांना त्यांच्या आईबद्दल लिहायाल सांगितले – एक शब्दही ते लिहू शकले नाहीत! 


हे माझे निष्कर्ष आहेत. त्याला अपवाद असतीलच, किंवा आपला तसाच अनुभव नसेलही. माझी आई बेळगावजवळच्या शहापूरमध्ये वाढली. मी धरून चाललो की तिचा जन्मही तिथलाच असावा. कधी त्याबाबतीत विचारलेच नाही. ती २००२ साली गेली. गेल्या वर्षी मला तिचा पासपोर्ट अचानक सापडला. त्यावर तिचे जन्मस्थान ‘मैंदर्गी’ लिहिले होते. मैंदर्गी? सुदैवाने माझ्या मामाकडून काही माहिती मिळाली. पण मी कितीतरी वेळ तो पासपोर्ट हातात धरून होतो. कित्येक संवाद झालेच नाहीत, होऊ शकणारही नाहीत, ही जाणीव फार अस्वस्थ करून जाते.


कधी ध्यानात येते की आपल्या मुलांना देखिल आपल्याबद्दल त्रोटकच माहिती आहे. जाऊ दे, जरा भरकटतो आहे - तर मी सांगत होतो माहितीबद्दल.

माझ्या मुलांच्या लग्नात मी तर एक छोटे पॉवर पोईन्ट प्रेझेन्टेशन बनवून एक फॅमिली ट्री दाखवला, त्यात माझ्या आजोबांपासून [जेवढी मला ठाऊक होती ती सर्व] माहिती होती. ही कल्पना मला सुचली कशी? तर मी गेलो होतो गणेश मंदिरात – अन्जुरच्या. हे ठिकाण ठाण्यापासून दहा बारा किलोमीटर अंतरावर आहे. नाईकांच्या वाड्यात ते मंदिर आहे. तिथेच भिंतीवर त्यांचा फॅमिली ट्री सुंदर तऱ्हेने दाखवला आहे, एका फोटोफ्रेममध्ये तो लावला आहे. मला वाटतं की तो सात पिढ्यांचा आहे – पण आता नक्की आठवत नाही. मी त्या मंदिरात पाच-सहा वेळा तरी गेलो आहे, पण मंदिरापेक्षा माझे लक्ष त्या फोटोफ्रेमकडेच अधिक असायचे.


रिटायर झाल्यावर मी आगरगुळ्याला जाऊन आलो. आमचे पूर्वज तिथून पेणला आले असे म्हणतात. पण काहीच माहिती उपलब्ध नाही. कोणीतरी म्हणाले की त्र्यम्बकेश्वरच्या पुरोहितांकडे बरीच माहिती असते – एकदा जाऊन येईन म्हणतो.

हे सगळे आठवायचे कारण म्हणजे मी नुकताच सुरतेला गेलो होतो – श्री रामकृष्ण एक्स्पोर्टचे मालक गोविन्द्काका ढोलकियांना भेटायला. तिथे मला हा फोटो दिसला. गोविंदभाइंच्या आजोबांपासून ते त्यांच्या नातवंडापर्यंत सर्वजण म्हणजे सुमारे पाचशेहून अधिक व्यक्ती त्यात आहेत. पाच पिढ्या! अर्थात आजोबा कोणी हयात नाहीत, त्यांची फक्त नावेच आहेत. 


गोविन्द्काकांच्या दारात एक रोल्स रोईस उभी असते. मला त्याचे अजिबात नवल वाटले नाही की आकर्षणही. पण त्यांना असा फॅमिली ट्री बनवता आला, फोटो काढता आला याचा हेवा जरूर वाटला. त्या फोटोचा मी फोटो काढला आहे. तोच इथे ठेवलाय.



विवेक

1 comment: