Friday, December 14, 2018

सांगा, त्यांनी कसं जगायचं?

मी १६ वर्षे टेंपररी कामगार म्हणून काम केलंय,बॉश कंपनीचा युनियन लीडर मला सांगत होता. चाळीशी आल्यावर पर्मनंट झालो, पण आयुष्याची उमेदीची वर्ष ताणतणावात गेली. ब्रेक मिळायचा सहा-सात महिने काम केल्यावर. त्यावेळी डोक्यावर टेन्शन घेऊन फिरायचो, पुन्हा कंपनीने बोलावले नाही तर काय करायचे हा प्रश्न भेडसावत असे. त्या टेंपररी नोकरीतच माझे लग्न झाले, मुलं झाली, वाढली, आणि शाळेत शिकली. मला ब्रेक मिळाला की माझ्या पत्नीला अतिशय चिंता वाटायची. नोकरी नसली की नातेवाईकांसमोर जायची लाज वाटायची. तुम्हाला नोकरी नसली की तुम्हाला कोणी विचारत नाही.”
मी त्याला भेटलो सहा महिन्यापूर्वी, पण उद्योगात कामगार अनेक वर्षे टेंपररी नोकरीत असतात हे मला नवे नव्हते. माझ्या नोकरीची सुरुवात टाटा पॉवरमध्ये झाली, तिथेही अनेक कामगार असेच अनेक वर्षे टेंपररी नोकरीत असलेले बघितले होते. पण त्यावेळी मी विशीत नुकतेच पदार्पण केले होते त्यामुळे वर्षानुवर्षे टेम्पररी राहण्याचा अर्थ मला पुरेसा उमगला नव्हता.
तरीही या युनियन लीडरचे बोलणे लक्षात राहिले, मनात घुमत राहिले. अरविंद श्रोत्री हा माझा मित्र. चिंचवड-पुण्यातल्या अनेक कामगार संघटनांचा तो सल्लागार. मी अरविंद श्रोत्रीशी या विषयावर बोलल्यावर तो म्हणाला, हा प्रश्न खूप मोठा आहे. मी तुझी काही टेंपररी कामगारांबरोबर मीटिंग ठेवतो. मग लगेच तारीख ठरली. रविवारी भेटायचे ठरले कारण रविवारी सुट्टी असते, म्हणजे कामगारांना बिनपगारी सुट्टी घ्यायला नको.
         *          *          *
ठरल्या वेळेस सर्वजण हजर झाले. मी सर्वाना सांगितले की मी कुणाचेही खरे नांव लिहिणार नाही. सर्वाना हायसे वाटले. आपली ओळख पटली तर नोकरी जाईल असे प्रत्येकास वाटत होते, माझ्या बोलण्याने दिलासा मिळाला. पंधरा-वीस कामगार आले होते ते विविध कंपन्यांतून - त्यामध्ये ऑटोमोटिव्ह स्टॅपिंग व असेंब्लीज लिमिटेड, बॉश, हुन्डाई, बजाज ऑटो, सुल्झर, मास फ्लांज अशा अनेक कंपन्यांचे कामगार होते. जशी आमची चर्चा सुरु झाली तसे सर्व मोकळेपणे बोलू लागले.
मी हेल्पर म्हणून काम धरले xxx कंपनीत. प्रथम मी कॉन्ट्रॅक्टरकडे कामाला होतो, पण नंतर दोन वर्षांनी, मला कंपनीने टेंपररी कामगार म्हणून कामावर ठेवले. कॉन्ट्रॅक्टरला डच्चू का मिळाला ते माहीत नाही पण त्याने आमचे पैसे बुडवले. आमचा प्रॉव्हिडंट फंड कापला, पण ते पैसे आमच्या खात्यावर जमा केले नाहीत - थोडक्यात काय की त्यानेच ते खाल्ले.
होय, असंच झालं आमचं,” त्याचा साथीदार म्हणाला.
साहेब, सात महिने कंपनीत काम केले, त्यावेळी रु.७,५००/- पगार मिळत होता. म्हणजे २०१० साली. पण सात महिने संपल्यावर कंपनीने ट्रेनी म्हणून दोन वर्षे नोकरीवर ठेवले.
टेंपररी कामानंतर ट्रेनी म्हणून? सात महिने संपता? परमनंट करण्याची मागणी करता येऊ नये म्हणून अनेक कारखान्यात सात महिने कामावर ठेवतात, त्याला ते पिरीयड म्हणतात. मग ब्रेक देऊन अनेकदा पुन्हा कामावर घेतात, पण तसे पुन्हा कामावर घेतीलच अशी खात्री कोणालाच नसते.
होय तसंच. आणि पगार दिला रु.६,५००/-. आणि त्यावर भविष्य निर्वाह निधीची कपात नाहीत.”
अरे! असं कां? तुम्ही विचारलं नाही?
कुणाला विचारणार? विचारणाऱ्याची नोकरी जाते ते आम्ही बघत होतो. इतर कुठे कामही मिळत नाही. ट्रेनिंग संपल्यावर आम्हाला टेंपररी म्हणून कामावर ठेवले. तेव्हापासून आम्ही टेंपररीच आहोत.
म्हणजे २००७ पासून प्रथम कॉन्ट्रॅक्टरकडे काम, मग कंपनीत, त्यानंतर ट्रेनी, आणि पुन्हा कंपनीतच टेंपररी कामावर?
होय, सात महिन्याचं काम असतं . मग ब्रेक मिळतो. तो कधी दोन-चार दिवसांचा असतो, तर कधी दोन महिन्यांचा.
म्हणजे कंपनीत किती काम आहे त्यावर ठरतं.
ब्रेकमध्ये काय करतां?
रोजन्दारीची कामं. मी मजूरीसाठी पेंटिंग करणाऱ्या मजुरांबरोबर नाक्यावर उभा राहतो. कधी मिळतं काम, कधी नाही. मग घरी परत येतो. माझ्या बायकोला ते आवडत नाही. भांडणं होतात, मी देखील कावलेला असतो. नंतर वाईट वाटतं. सुपरवायझरच्या फोनची वाट बघतो.
अजूनही हेल्परचंच काम करतां?
नाही. मी वर्षभरात वेल्डिंग शिकलो. पण तुम्ही वेल्डर असा की हेल्पर - पगारात काही फरक नाही, सर्वांना सारखाच. नवीन घेतलेल्या कामगारांनाही माझ्याएवढाच पगार. मग सर्व्हिसचा काय फायदा?
ही माहिती अगदीच नवी होती असं नाही, पण तरीही मला ती पचवणं जड जात होतं.
ऍक्सिडेंट झाला तर? तुम्ही वेल्डिंगचे काम करता म्हणून विचारतो.
साहेब, कुठचीही कंपनी घ्या, ऍक्सिडेंटच्या दिवसाचा पगार मिळतो, पण त्यापुढे गैरहजर राहिला तर बिनपगारी! हां पण वेल्डरला एप्रन, शील्ड वगैरे सर्व देतात. तरीही अपघात होऊं शकतो.
बाजूला बसलेल्या एका कामगाराने माझ्या हातावर हात ठेवून माझं लक्ष वेचून घेतलं.

साहेब, आमच्या कारखान्यात काम करताना एकाचं बोट साफ कापलं गेलं. दोन तुकडे! पण पहिल्या दिवसाच्या पगाराखेरीज कांही दिलं नाही.
असं कसं? तुम्ही दाखवताय त्याप्रमाणे तर्जनीचं पुढचं पेर छाटलं गेलं त्याची नुकसान भरपाई कायद्याने बरीच आहे, ती द्यायला लागते.
काहीं मिळालं नाही. दुसऱ्या एका कामगाराने त्याला दुजोरा दिला.
एकविसाव्या शतकात असं घडू शकतं असं मला वाटलं नव्हतं.
लग्न झालंय? मी पहिल्याला प्रश्न केला.
हो साहेब, पाच वर्षापूर्वी. तेव्हां साडेसात हजार रुपये पगार होता. आता मला चार वर्षांचा मुलगा आहे. प्रॉव्हिडंट फंड, इ.एस.आय वगैरे वजा जात, हाती आठ हजार आठशे रुपये येतात.
कसं भागतं?
ते विचारू नका. घरभाडंच अडी हजार रुपये आहे. म्हणजे सहा हजारात तिघांनी महिनाभर कसं भागवायचं?
साहेब, त्याच्या कंपनीची बस आहे. कॅन्टीन आहे म्हणून जरा बरं आहे. इतरांची अवस्था त्याहून बिकट आहे.
खोलीचं भाडं दरवर्षी वाढतं, कारण अकरा महिन्यांनी मालक खोली सोडायला लावतो. पण मुलाच्या शाळेजवळच खोली घ्यायला लागते, नाहीतर खर्च अजून वाढतो.
अडी हजार रुपयात मिळते ती खोली पुरेशी देखील नाही. दहा बाय दहाच्या खोलीत आंम्ही तिघे राहतो. स्वैपाक तिथेच, झोपायचंही तिथेच.
मुलगा मोठा होईल लवकरच. अशा पगारात कुठे जायचं?
तुमच्या मिसेस नोकरी करतात का?
कशी करणार साहेब? चार वर्षाच्या मुलाला शाळेत नेण्यात-आणण्यात दिवस जातो तिचा.
कांही जणी करतातही नोकरी. त्यांना पाच-सहा हजार रुपये मिळतात.
आमच्या घरी या. आम्ही कसे जगतो ते एकदा पहा.
मी हे आमंत्रण लगेच स्वीकारले. गप्पा संपल्या की एकाच्या घरी जाण्याचे कबुल केले.
नुकतीच  दिवाळी झाली. बोनस मिळाला असेल.
अनेक ठिकाणी एक महिन्याचा पगार मिळतो.
आम्हाला कांही मिळत नाही. दिवाळी बोनस शून्य!
असं कसं होईल? तुम्ही तीस दिवस कंपनीमध्ये काम केलंत, टेंपररी म्हणूनही केलंत, तर तुम्हाला बोनस मिळणार - कायद्याने मिळणार.
“पण मिळत नाही त्यांना,” दुसरा म्हणाला.
तुमची युनियन काय करते? मी विचारले . ते तुमचे प्रश्न घेत नाहीत?
त्यांना ते जमत नाही. त्यांनी प्रश्न विचारला तर आमचा पिरियड (सात महिने) संपल्यावर आम्हाला कामावर पुन्हा बोलवत नाहीत. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हो?
कायद्याप्रमाणे किमान बोनस म्हणजे एक महिन्याचा पगार. तो साडे दहा हजार होतो. काही मालकांना तो भरमसाठ वाटतो, मग ते बोनस देताच नाहीत, किंवा काही रक्कम देतात.
आताशा कारखान्यात शंभरपेक्षा कमी परमनंट कामगार ठेवले जातात. कारण मग मालकांना कारखाना बंद करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत नाही.
साहेब तुम्ही त्याला लग्न झालंय का म्हणून विचारलं पण आज अशी परिस्थिती आहे की आमच्या कारखान्यात चार-पाच कामगार असे आहेत की त्यांची लग्न जमत नाहीत. म्हणजे त्यांना कोणी मुलगीच देत नाही. मुलाला व्यवस्थित नोकरी असेल तरच मुलगी लग्न करते. आताशा त्यादेखील दहावी-बारावी शिकतात. नोकरी नीट नसेल पण बऱ्यापैकी शेतीवाडी असली तर काहीं जणांचं लग्न जमतं-नाहीतर बॅचलर!
खरंच की काय? माझ्यासाठी हे अगदी नवं होतं. पण हे विदारक होतं.
मी एका कंपनीत कंत्राटी कामगारांचा करार केला. त्यांचा पगार साडेपाच हजाराने वाढला - म्हणजे काय की कंपनीनेच कंत्राटदाराला पगार वाढवून द्यायला सांगितलं. त्यानंतर मला डझनभर लग्नाच्या आमंत्रण पत्रिका आल्या. अरविंद श्रोत्री म्हणाले. सगळे हसले.
मी शांत बसून राहिलो. हे सर्व पचवायला जड जात होतं. मनातल्या मनात जे ऐकलं त्याची उजळणी केली आणि विचारलं, म्हणजे तुम्हाला साधारण दहा हजार पाचशे रुपये पगार मिळतो. आणि त्यातून कपाती जा करतां तुमच्या हाती आठ हजार आठशे येतात. बरोबर? पण कायम स्वरूपी कामगारांना किती पगार मिळतो?
मी समजावतो त्यातील एक म्हणाला. आमच्या बॉशच्या कारखान्यात परमनंट १८९ कामगार, ऑफिस स्टाफ ३५०, कंपनीचे ट्रेनी ८००, नीमचे ७५०, कंत्राटदाराचे ४०, यशस्वी इन्स्टिट्यूटचे ४०, यशस्वी स्किल डेव्हलपमेंटचे ४०, रिलाएबलचे ६०, हाऊसकिपिंगचे ४५, बागकामाचे १०, कॅन्टीन वाले ३५, सिक्युरिटीचे ६० आणि फिक्स्ड टाईम कॉन्ट्रॅक्टचे ४० काम करतात. म्हणजे ऑफिस स्टाफ वगळतां २१०९ कामगार आहेत. त्यातल्या अकुशल कामगारांना ७५०० रुपये दरमहा मिळतात, तर इतरांना रु.१०,५००. परमनंट कामगारांना पगार मिळतो तो र.५०,०००/-सीटीसीच्या आधारे - तसा 'ग्रॉस' त्यांना रु.४३,०००/- मिळतो. आता तुम्ही गणित मांडलं तर तुम्हाला दिसेल की सरासरी दरडोई पगार फक्त रु.१३१४२ /- आहे. इथे मी 'इतर' कामगारांचा पगार रु.१०,५००/- धरला आहे, तो कांही कामगारांना रु.७,५००/- मिळतो, म्हणजे सरासरी साडे तेरा हजाराहूनही कमीच आहे!
आता जर्मन कंपन्यांचं असं, तर इतरांचं काय?
लेबर कॉस्ट वाचवतात ती अशी. म्हणजे कमीत कमी परमनंट कामगार ठेवून अधिकाधिक नीम, ट्रेनी असे नेमायचे. अशा धोरणाने ज्या अनिश्चिततेच्या नोकरया दिल्या जातात तिथे कामगारांचे शोषण अपरिहार्य ठरते. असे धोरण उद्योगात इतके प्रचंड प्रमाणात राबवले गेले आहे की केवळ बॉश कंपनीचे नाव घेउन त्यांना वेगळे दाखवणे रास्त नाही, हजारो उद्योगात आज हे शोषणाचे धोरण चालत आहे.
ह्या धोरणाचा एक भयंकर परिणाम होतो आहे. असे बघा की मालक अशा कामगारांना नेहमीच किमान वेतन देत आले आहेत. किमान वेतन वर्षानुवर्षे दिल्याचा काय परिणाम होत आहे ते बघू.
आपण अगोदर एका कामगारबंधुने दिलेली माहिती घेऊया. त्याला २०१० साली ७५०० रु दरमहा मिळत होते. आज त्याला ८८०० रु दरमहा मिळतात - ते हातात येतात, म्हणजे त्याला १०५०० रु महिन्याचे मिळतात असे समजू. ह्या काळात कन्झुमर प्राईस इंडेक्स १७६ वरून ३२० ला पोचला. म्हणजेच इंडेक्स ८२% वाढला. पण त्याचा पगार फक्त ४०% वाढला. [((१०५००-७५००)*१००/७५००)]. जर त्याला वाढीव महागाई पूर्ण प्रमाणात दिली गेली [त्याला १००% neutralisation म्हणतात, आणि तसे कोर्टाचे निर्णय आहेत,] तर त्याचा पगार रु १३६५० असता. [७५००*१.८२= १३६५०]. म्हणजेच कामगारांचे निव्वळ वेतन [रियल वेजेस] २०१० सालापासून ५१% घटले आहे. त्यांची क्रयशक्ती तशी कमी झाली आहे.
फॉरीन कंपन्यांचं काय घेऊन बसलात? हा बघा XXX कंपनीत काम करतो. त्याच्या कामाची बोलीच बारा तासाची आहे. म्हणजे बारा तास काम केलं की त्याला पंधरा हजार रुपये मिळतात. कधी कधी ओव्हरटाईम म्हणजे चार तास अधिक, सोळा तास काम केल्यावर त्याला चार पाच हजार रुपये वरचे मिळतात. बरं, आठवड्याची सुट्टी नाही, त्यादिवशी इतर कुठे कामाला बोलवतात. पगाराची स्लिपदेखील मिळत नाही.
तुम्ही त्याबद्दल कॉन्ट्रॅक्टरकडे बोलला नाही?
पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. त्याचं कनेक्शन पार वरपर्यंत म्हणजे अजितदादा पवारांपर्यंत आहे. कोण जाईल त्यांच्या वाटेला?
पण मला पुन्हा तोच प्रश्न विचारायचा आहे - तुमच्या कारखान्यातल्या युनियन करतात तरी काय?
उपयोग नाही, साहेब. अजून एक कामगार समजावू लागला. आमच्या कारखान्यात करार झाला, त्यात कांही कामगारांना परमनंट नोकरीवर ठेवल्याचं ठरलं. सगळ्यांना घेतलं पण चार कामगारांना परमनंट नोकरीत घेतलं नाही.
कां असं?
मॅनेजमेंट म्हणते की दोन स्टाफचे कर्मचारी युनियनमध्ये आहेत, ते चालणार नाही, त्यांना अगोदर युनियनबाहेर करा, मग बोला.
आणि युनियनचे कांही चालत नाही, करार असला तरीही?
होय
म्हणजे युनियन असून नसल्यासारख्याच
काय करणार साहेब, आहे हे असं आहे! 

बरीच शांतता! मग एक बोलला.
“माझी बायको बारावी शिकली आहे. आम्ही दहा बाय दहाच्या खोलीत राहतो. दोन शाळेत जाणारी मुले आहेत. ती दर संध्याकाळी कावते. मग खडाजंगी होते. आता सहन होत नाहीये.”
“ही तर घर घर की कहाणी आहे.”
बॉश कंपनीच्या कमिटीमेंबरला सोळा वर्षांनी का होईना, कायम स्वरूपी नोकरी मिळाली होती. आता तो भाग्यवान वाटू लागला होता.
   *          *          *
माझी त्या पंधरा-वीस कामगारांबरोबर झालेली चर्चा संपली तेव्हां डोकं भणभणत होतं. मला तो कामगार एका कोपऱ्यात दिसला - त्याच्या घरी मी जायचं कबूल केलं होतं . मी त्याला खुणावलं व आम्ही दोघ बाहेर निघून गाडीत बसलो. तो रस्ता दाखवायला पुढे बसला. एका ठिकाणी त्याने थांबण्याची खुण केली. रस्ता क्रॉस करताना माझ्या वयाकडे बघून त्याने माझा हात धरला. रस्त्यावर ऑटो सुसाट जात होत्या, त्यातून वाट काढत आम्ही रस्ता क्रॉस केला. मुख्य रस्त्यावरून एक अरुंद रस्ता जातो. डावीकडे टपरी म्हणावी अशी छोटी दुकानं होती. एका बोळात वळलो. आणि धारावीसारखी झोपडपट्टी चहूंकडे होती. सर्व घरांपुढे पाण्यासाठी ठेवलेले निळे ड्रम दिसत होते. एक बाई आपल्या वर्षाहून लहान असलेल्या बाळाला घराबाहेर अंघोळ घालत होती. कांही इतरजणी तशाच दाराबाहेर कपडे धूत होत्या, भांडी घासत होत्या, भिंती सर्व रंग गेलेल्या, त्यांचा निळा रंग चढून कांही वर्ष झाली असावीत.
आम्ही त्याच्या घरासमोर आलो. घराचे दार म्हणावे तर एक माणूस वाकून आत जाऊं शकेल असे. बाहेर एक तीन-चार फुटी अर्धी भिंत - तिच्या आडोश्याने अंघोळ करत असावे. मी क्षणभर बाहेरच घोटाळलो; त्याला आत जाऊन पत्नीला कल्पना देतां यावी की पाहुणा घरी आला आहे. ती खोली दहा बाय दहाची सुध्दा नव्हती. एका भिंतीला लागून किचन प्लॅटफॉर्म असावा असे एक लाकडी फळकुटांचे टेबल, आणि त्यावर एक गॅसची शेगडी. त्याच्या समोरच्या भिंतीत कपडे ठेवायची जागा, बाजूच्या भिंतीत ऍल्युमिनियमचे डबे. त्या खोलीतून आत जाण्यासाठी एक दरवाजा होता. म्हणजे, ती लहान खोली देखील आत जाण्याच्या वाटेमुळे दुभागली गेली होती. 
'साहेब, इथे चार जण एकत्र खाली बसूं शकत नाहीत' तो म्हणाला.
ते सांगायची गरजच नव्हती, तसं दिसतच होतं. त्याची पत्नी उभी होती, तिला बसण्यासाठी तो अवघडून बसला.
"कधीपासून राहताय इथे?'
"माझे वडील बहात्तर सालच्या दुष्काळात इथे आले. ते परत गावाला कधीच गेले नाहीत.”
मी अनेकदा झोपड्यात [झोपडपट्टी म्हणा हवे तर] गेलो आहे, तरीही हा अनुभव नवीन आणि अस्वस्थ करणारा होता. कसे राहत असतील इथे चौघे जण? पाय लांब करायला जेमतेम जागा होती. मुले शाळेत जाणारी असली तरीही 'प्रायव्हसी' मिळणे अशक्यच होते.
"तुम्ही भावाबरोबर राहता, होय ना? काय करतात ते?"
"मला ठाऊक नाही" तो म्हणाला. त्याच्या हावभावाने लक्षात आले की दोघांचे पटत नाहीये. जेव्हा माणसांना पुरेशी जागा नसते, तेव्हा कुरबुर आणि भांडणे वाढतात. म्हणजे त्याची फक्त एकच खोली होती.
त्याची पत्नीनेही मन डोलावली. 'ते कधीही येतात आणि जातात.' ती त्याच्या भावाबद्दल बोलत होती. जागा कमी त्यात अशी समस्या. ती हसली.
हा माणूस गंभीर प्रकृतीचा होता पण त्याच्या पत्नीकडे एक सुंदर स्मितहास्य होते. कोणताही माणूस आणि त्याची पत्नी हे अगदी भिन्न प्रकृतीचेच असतात, तश्याच जोड्या 'तो' जमवतो. समान बाजू इतकीच की दोघेही अंगाने सडसडीत होते.
"मी बारावी शिकले आहे. जवळच्याच ऑफिसमध्ये मी काही काम करते, त्याचे सहा हजारापर्यंत मिळतात."
"ती जमाखर्च काटेकोरपणे पळते." तो म्हणाला.
"ते पगार आणतात तो पर्यंत माझी यादी तयार असते. कुणाला किती द्यायचे आहेत त्याची."
'पंधरा वर्षं सर्व्हिस झाली, माझ्या बरोबर काम करणार्याला कायम स्वरूपी नोकरी दिली, पण मी तसाच आहे, मी अजूनही टेम्पररी. आताशा कोणीच पर्मनंट करत नाहीत. काहीच आशा नाही."
“ब्रेकमध्ये काय करता?
"नाक्यावर जाऊन उभा राहतो. नशिबात असलं तर पेंटिंगचे काम मिळते. नाही मिळालं तर घरी परत येतो.”
मला काय बोलायचं तेच कळत नव्हतं. तेवढ्यात ऍल्युमिनियमच्या डब्यांजवळून खुडखूड आवाज आला.
'घरात गणपती आहे मग उंदीर येणारच' त्याने भिंतीवरच्या गणपतीकडे बोट दाखवले. तो त्याचा टेन्शन मिटवायचा प्रयत्न होता, आम्ही तिघेही हसलो.
राहणीमान सुधारलंच नाही, उलट अवघड होऊन बसलंय. मुलं मोठी होत आहेत. मोठा सातवीत तर धाकटा चौथीत आहे. मोठ्याची फी साडे तीन हजार आहे, इतर खर्च वेगळाच.'
कसे राहतो आम्ही या जागेत ते आमचं आम्हालाच माहीत.
महिना संपत आला की आमच्या दोघांची भांडणं सुरु होतात, काय करणार? गांजून गेलोय.
काल प्रोजेक्ट का कशाला पैसे हवे म्हणाला हा मुलगा. कुठून आणायचे? तो बोलू लागला. मी उठतच होतो तेवढ्यात ती दोन्ही मुले आत आली. मी काहीतरी विचारायचे म्हणून बोललो, कायरे, मोठा झाल्यावर कोण व्हायचंय?
'मला आर्मीत जायचंय' एक म्हणाला, 'मी इंजिनीयर' दुसरा म्हणाला.
मी आणि तो चालत माझ्या गाडीकडे निघालो. दोघेही निःशब्द. गाडीपाशी पोहोचताच तो म्हणाला, 'साहेब मला माझ्या मुलांना इथल्या मुलांची संगत लागायला नको आहे. पण ते कसे टाळायचे ते मला माहित नाही. त्यांना क्लासला घालायचे आहे. कसं काय जमवायचं कळत नाही.
आम्ही रस्ता ओलांडून माझ्या गाडीजवळ आलो होतो, आमच्या भेटीने त्याला भरून आले होते. आणि मलाही.
“त्यांची स्वप्नं आहेत. पण मी नोकरीत पन्धरा वर्ष काढली आहेत. अजून किती वर्षं काम करायला जमेल ते ठाऊक नाही. त्याला शाळा संपताच काम धरायला लागेल.”
आम्ही रस्ता ओलांडून माझ्या गाडीजवळ आलो होतो, "धीर धर, सगळं ठीक होईल." मी त्याचा हात धरून म्हणालो.
जे मलाच अजिबात पटलेलं नाही असं काही मी आयुष्यात प्रथमच बोलून गेलो होतो.
         *          *          *
अतीव अनिश्चितता आणि असुरक्षितता ह्या त्यांच्या पाचवीलाच पुजल्या आहेत. ट्रेड यूनियननी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळवलेले हक्क त्यांना दिले जात नाहीयेत. जागतिकीकरणाचा मलिदा इतर कोणी घेऊन गेले आहेत. इथे एक खदखदणारा अंगार आहे, त्या बरोबर हतबलताही आहे.
काळच सांगेल आपल्याला की त्यात क्रांतीची बीजे आहेत की नाहीत.
विवेक पटवर्धन

1 comment:

  1. It is difficult to comment. I do not have words.
    do you think it is due to our consumerism. we need everything cheaper. on top there is Globalization.
    we are not willing to pay the price and hence these poor people pay for our consumerism.

    ReplyDelete