Showing posts with label Aroehan. Show all posts
Showing posts with label Aroehan. Show all posts

Wednesday, March 4, 2020

आरोहन आणि आदिवासींच्या जटील समस्या


आरोहनच्या कामाची माहिती करून घेणे ओघानेच आले, कारण आरोहनने विश्वस्त म्हणून त्यांच्या समितीत मला सामावून घेतले. जव्हार-मोखाडा हे आरोहनचे कार्यक्षेत्र. जव्हारला जायचं म्हणजे मनोरपुढे उजवीकडे निघणारा विक्रमगडचा रस्ता धरायचा. तिथून पुढे जव्हार. अंतर तसं फार नाहीये, पण रस्ता इतका खड्डेवाला की आपला उत्साह निम्माशिम्मा व्हावा. किंवा आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय त्याची जाणीव करून देणारा. कारण खड्ड्यांनी बसणारे धक्के सौम्य म्हणावेत असे धक्के खेड्यातील परिस्थिती पाहता बसतात.

जव्हारला आरोहनचे कार्यालय आहे तिथलं काम उरकून धारेच्या पाड्याकडे निघालो. तुम्ही जर ‘धारेचा पाडा’ असा गुगलवर शोध घेतलात तर तुम्हाला काहीही माहिती मिळणार नाही. धारेचा पाडा साखरी ग्राम पंचायतीत मोडतो. इथली वस्ती तर आदिवासींचीच आणि ती ही अगदी थोडी. कोणी तरी म्हणाले की हजारहून अधिक नाहीये. मला तर वाटलं की तेव्हढीही नसावी.

“तिची स्कूटर दिसत्ये म्हणजे रेश्मा पोचली आहे; इथेच ‘माता-बैठक’ आहे.” माधुरी म्हणाली. गाडी थांबली. समोरच एक छोटं आणि बैठं घर होतं, आत गेल्यावर ध्यानात आलं की ते एक छोटं सभागृह होतं. म्हणजे एक खोलीच. केवळ ह्याच कारणासाठी बांधलेली! साधारण १८ बाय १८ ची. आत ‘माता-बैठक’ चालली होती. रेश्मा वीस-पंचवीस आदिवासी महिलांना माहिती देत होती. काही महिला त्यांची मुले घेऊन आल्या होत्या. मी, माधुरी व डॉ. शुभा त्यांच्यात सामील झालो. माधुरी विविध प्रोजेक्टवर देखरेख करते तर डॉ शुभा म्हणजे आरोहनच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर.

मोखाड्यात १६९ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यु झाल्याची बातमी २००६ साली आली तेव्हा अंजली कानिटकर व डॉ हेलन जोसेफ यांनी त्वरित ‘आरोहन’ची स्थापना केली ती जव्हार मोखाड्यात आदिवासींच्या पाड्यात जाऊन त्यांच्या स्वास्थ्यासाठी काम करायच्या उद्देशाने. (अनेक प्रश्नांचे पदर एकमेकात गुंतलेले असल्यामुळे केवळ ‘स्वास्थ्य’ किंवा ‘आरोग्य’ अश्या एकाच प्रश्नावर काम करून भागणार नव्हते, तर सर्वांगीण विकासावर लक्ष्य केंद्रित करावे लागणार होते, त्यामुळे कामाची दिशा नंतर बदलण्यात आली.)

“हे माता-बाल सुरक्षा कार्ड. नोंदणी झाल्यावर लगेच मिळते. ही तर गरोदरपणाची कुंडलीच आहे!” रेश्मा माता-बैठकीतल्या स्त्रियांना सांगत होती. “नोंदणीपासून डिलिवरी व लसीकरणापर्यंत सर्व माहिती त्यात असते.”



“हे तीन रंग बघा, हिरवा, पिवळा आणि लाल. काय वाटतं तुम्हाला? तुमचं बाळ ह्यापैकी कुठल्या रंगात असलं पाहिजे?

“हिरव्या”

“फार छान. आपलं बाळ हिरव्या रंगात येण्यासाठी काय करावं लागेल?” रेश्माने रोख आता आहाराकडे वळवला. सुदृढ बालकाला आहार ‘तिरंगा – लाल रंगाचे टोमाटो, गाजर, पांढऱ्या रंगाचे दुध, भात, अंडी व हिरव्या भाज्या – असा तिरंगा आहार कसा द्यावा ते रेश्मा सांगू लागली.तिरंगा आहार घ्यायला तुम्हाला लांब जायची जरूर नाही, हे सर्व घटक तुमच्या आजूबाजूला आहेतच.”

“इथे अजूनही अनेक बालकं अंडर-वेट असतात.” शुभा मला म्हणाली. “प्रश्न केवळ आहाराचाच नाही तर चुकीच्या समजुतींचा देखील आहे. आदिवासी समाजात अनेकदा गरोदर स्त्रिया पेज पिऊन राहतात. मग त्या ‘अॅनिमिक’ होतात. कसे आरोग्य राहिल त्यांचे; कशी वाढ होईल बाळाची?


तुम्ही इंटरनेटवर शोधलं तर टाटा सामाजिक संशोधन संस्थेतील दोघांचा एक अभ्यासपूर्ण लेख सापडेल. ‘२००५ मध्ये केवळ पालघर जिल्ह्यातच ७१८ बालकांचा मृत्यू कुपोषणामुळे झाला. २०१६ मध्ये ६०० पेक्षा अधिक मुले दगावली.’ त्या दोघा संशोधकांनी ३७५ मुलांचा अभ्यास केला. त्यात ५९% मुलांची वाढ खुंटली असल्याचे निष्कर्ष त्यांनी काढले.[1]

“इथे मुलींचे शिक्षण फार होत नाही. सातवीनंतर अनेकदा शिक्षण थांबतेच. मुलगी पंधरा सोळा वर्षांची झाली की तिचे लग्न होते. मग ती गरोदर राहते. हे सर्व मोठेच प्रश्न आहेत.”

“काल-परवांच पेपरात वाचलं की चौदा-पंधरा वर्षांची मुलगी आश्रम शाळेत गरोदर राहिली.”

“आश्रम-शाळेत मुले मुली एकत्र शिकतात, आणि तिथेच राहतात. तिथे मुलीने गरोदर होणे हे काही आश्चर्यकारक नाही. अनेकदा अश्या मुलींची लगेच लग्ने लावून दिली जातात. त्यांच्या समाजात तो फार मोठा विधी नसतो. मुलगी एक दिवशी मुलाच्या घरी जाते, बस्स!”

“इथे माता-बैठकीत ती मुलगी बघा. तिच्या हातात बाळ आहे. ती आई तर सोळा वर्षांची असेल-नसेल.”

“त्यांचंही कुपोषण होतं. अनेकदा अश्या मुली आपलं वय अठरा सांगतात. तरीही असं वाटतं की त्या लहान आहेत. लहान वयात माता होण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. केवळ सामाजिकच नव्हे तर शारीरिक देखील.”


रेश्मा महिलांशी त्यांच्या समस्यांबद्दल बोलू लागली. चतुराईने तिने चर्चा ग्रामसभेकडे वळवली आणि ‘महिला ग्रामसभेचे’ आयोजन करण्याचे महत्त्व पटवून दिले. पण मोठ्ठा अडसर तर महिलांनी आपल्या प्रश्नाबाबत बोलू लागण्याचा होता. रेश्मा महिलांचं मन वळविण्यात कांही प्रमाणात तरी यशस्वी ठरली, त्या बोलू लागल्या पाण्याच्या प्रश्नावर! “असे प्रश्न सोडवायलाच ग्रामसभा व पुढे ग्राम-पंचायत असते.”

महिलांनी सभेत बोलणे हा एक त्यांच्या मनातला मोठ्ठा अडसर आहे. तो पार करणे सोपे नक्कीच नाही.

आता रेश्माने चर्चेचा रोख स्थलांतराच्या समस्येकडे वळवला. आदिवासींच्या पाड्यात स्थलांतर ही एक प्रचंड मोठी समस्या आहे. केवळ शेतीवर जगता येत नाही, मग एक पीक काढले की शहराच्या दिशेने कूच!

“स्थलांतर अनेक रीतीने आयुष्य कुरतडते. कित्येक जण आपल्या वृद्ध माता-पित्यांना मागे सोडून जातात. मुलांच्या शिक्षणावर पाणी सोडावे लागते, आणि आरोग्याची आबाळ होते. संपूर्ण खेड्याच्या ‘इकोनोमीवरच अपरिमित दुष्परिणाम होतोय.”

“आरोहनने शेतकऱ्यांना दुसरे पीक कसे घेण्यासाठी मार्ग दाखवले आहेत, मदत केली आहे. आज कित्येक शेतकरी तसे दुसरे पीक काढत आहेत.”

“काही विशिष्ट भागातील स्थलांतर पन्नास टक्के कमी करण्याचा मनसुबा आरोहनने ठेवला आहे, आणि ते देखील एक आवाक्याबाहेरचं उद्दिष्ट वाटतंय, यावरूनच कल्पना करा.”

मला आठवलं, रोटरीतर्फे आम्ही भिवंडीजवळ एक बंधारा बांधत होतो. मी बांधकाम चालू असताना तिथे गेलो तेव्हा तीन फुटाच्या काठ्या उभ्या करून कित्येक मजुरांनी संसार मांडला होता. “ते शेतीची कामं संपली की इथे कामासाठी येतात. होळीला परत आपल्या गांवी जातात,” बांधकाम कंत्राटदार मला सांगत होता. परतीच्या वाटेवर मी एका झाडाखाली स्थलांतरित कुटुंबाने थाटलेला संसार बघितला.



मी चालत्या गाडीतूनच फोटो काढला. माझ्यासारख्या शहरी वास्तव्य करणाऱ्यांना स्थलांतराचा प्रश्न किती मोठ्ठा आहे हे समजायला प्रत्यक्ष भिवंडी, मोखाडा अश्या भागात फिरायला हवे, आकडेवारी प्रश्नांची माहिती देते, पण त्याबाबत जाणीवा वाढवत नाही.

अत्यंत अस्वस्थ करणारी आणि गुंतागुंतीची परिस्थिती मी पहिली, आणि ती  आपल्या समोर ठेवली आहे. कितीही काम केलं तरीही अपुरेच पडणार आहे. तरीही एकत्र येऊन ठोस पावलं उचलावीच लागतील. ते अपरिहार्यच आहे.

सरकार ही जगातली सर्वात अकार्यक्षम संस्था आहे यात वादच नाही. मग ते कोणत्याही पार्टीचे असो. अनेक कार्यक्रम पेपरवर आहेत, पण लाभार्थी त्यापासून वंचित आहेत हेच कटू सत्य आहे. आरोहनसारख्या संस्था कार्यरत आहेत हा दिलासा असला तरीही मुंबईपासून केवळ दीडशे किमीवर इतकी भयाण परिस्थिती असावी हा नेत्यांनी, व्यक्तींनी आणि समाजानेही कूपमंडूक वृत्ती ठेवल्याचा आणि आत्मकेंद्रित असल्याचा परिणाम आहे यात शंकाच नाही.

विवेक पटवर्धन



[1] https://journals.plos.org/plosone/article/file?id=10.1371/journal.pone.0212560&type=printable

Sunday, March 1, 2020

जीवन मरणाच्या कांट्यावर शेड्याचा पाडा


आरोहनसाठी काम करताना मी जे पाहतो ते मला अगदी हलवून टाकते. आरोहन (आरोहण नव्हे) ही एक जव्हार – मोखाडा भागात कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था आहे.

आरोहन स्थापन व्हायला एक दुर्घटना कारण झाली. पंधरा वर्षापूर्वी मोखाड्यात १६९ बालके कुपोषणाने मृत्यू पावल्याची बातमी आली तेव्हां तिथल्या समाजात जाऊन काम करायचे ठरले, आवश्यकच होते ते. आदिवासी गटांच्या समवेत काम करून परिवर्तनाची ठोस पावले उचलण्यासाठी आरोहन काम करीत आहे.

मी कुर्लोदला माधुरी, गणेश – ते दोघे आरोहनसाठी काम करतात – आणि सुलभा, माझ्या पत्नीसोबत, गेलो. जव्हारपासून मोखाड्याच्या रस्त्यावर जाताना एक उजवीकडे फाटा येतो, तिथे वळून बरेच अंतर डोंगर-दऱ्यातून गेल्यावर आपण कुर्लोद्ला येतो. नऊ पाड्यांचे कुर्लोद गाव आहे. हे पाडे म्हणजे दहा ते तीस-पस्तीस घरांची वस्ती आहे. आम्ही पेठेच्या पाड्याला उतरलो. गाडी तिथेच ठेवली. ‘पुढे पायी जायचे आहे’ माधुरी म्हणाली. आम्हाला शेड्याच्या पाड्याला जायचे होते. माधुरी आणि गणेशने आमच्यासाठी तिथल्या लोकांबरोबर भेटी ठरवल्या होत्या. (त्या भेटींबाबत मी नंतर लिहिणार आहेच).

शेड्याचा पाडा अदमासे दोन किमी दूर आहे, पण तिथे जायला ‘पिंजल’ नदी पार करावी लागते. नदीचं पात्र मोठं असलं तरी ती बारमाही नाही, आम्ही नदीच्या कांठी पोचलो तेव्हां नदीत फार पाणी नव्हतं.


परंतु नदी पार करायची तर पात्रातल्या खडकांवरून स्वत:ला सांभाळत जायची कसरत करावी लागते. नदी पार केली की एक अगदी लहानसा चढ लागतो, थोडं पुढे गेलो की आपण जांभूळवाडीला येतो. शेड्याचा पाडा त्यापुढे आहे, तिथे पोहोचायला अधिक थोडं चालायला हवं. पावसाळ्यात शेड्याचा पाडा आणि जांभूळवाडी एका बाजूला व पेठेचा पाडा दुसर्‍या बाजूला - मध्ये पिंगल नदी दुथडी वाहत असते, त्यामुळे त्यांचा संपर्क पेठेच्या पाड्याशी तुटतो. जगाशीच तुटतो म्हणाना. कारण शेड्याच्या पाड्यामागे मोठा डोंगर आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्यांच्या जिवाशीच खेळ असतो.

सरिता व मीनाक्षीने आमच्यासाठी भेटीसाठी सर्व तयारी केली होती. भेटी संपवून आम्ही परत निघालो. नदीवर पोहोचायच्या आधीच आम्हाला जांभूळवाडीपाशी दोघे जण भेटले. ते माधुरी व सरिताबरोबर कांही बोलले. ते चिंतेत दिसले. 




“एक माणूस बराच आजारी आहे, त्याला तात्काळ इस्पितळात न्यायला हवं. ते विचारत होते की आपली गाडी मिळू शकेल कां त्याला न्यायला?

“मग तू काय उत्तर दिलंस?

“मी हो म्हणाले. तो सिरीयस आहे, मग त्याला मदत करायलाच हवी.”

“आपली गाडी तर पेठेच्या पाड्यात आहे. ते नदी कशी ओलांडतील? पेशंट चालू शकेल का?

“ते त्याला झोळीत घालून आणतील. नेहमी तसेच करतात. दुसरा कांहीच मार्ग नाही.”

आम्ही निघालो. नदी पार करून चार पावले चाललो. माधुरीमागे वळून म्हणाली, “ते पहा ते त्याला घेऊन आलेच की आपल्या मागे.”




ते नदी झपाझप पार करत होते. मला नदी पार करताना दगडांवरून तोल सांभाळत जावे लागले होते, तर ते जणू हायवेवरून चालत होते. दोघांनी एक मोठी काठी खांद्यावर घेतली होती व त्यावर एक झोळी होती. त्यात त्यांचा रुग्ण होता. म्हणजे त्यांच्या खांद्यावर कमीतकमी पन्नास किलोचे ओझे होते, तरीही ते झपाझप पावले टाकीत निघाले होते. आणि ते देखील अनवाणी पायांनी.

मी खिशात हात घालुन मोबाईल काढला. त्यांचा व्हिडिओ काढला.



“कुठे जातील हे लोक?” मी माधुरीला विचारले.

“इथून वीस किलोमीटरवर इस्पितळ आहे. तिथे घेऊन जातील ते आपल्या गाडीतून. मग आपली गाडी आपल्याला न्यायला परत येईल.”

“पावसाळ्यात नदी ओलांडणं शक्य नाही, अशी वेळ आली तर ते काय करतात?

“काहीच करता येत नाही. रुग्णाने जगावं की मरावं हे तो ‘उपरवाला’ ठरवतो.” तिने आभाळाकडे बोट दाखवले.

“इथे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असावं अशी तजवीज आहे. २०१४ पासून ते मंजूर झाले आहे. पण अजून कांहीच झाले नाही.”

“येईलच ते, आपण आशा सोडू नये” कोणीतरी म्हणाले.

“तोपर्यंत जीवन मरणाचे प्रश्न ही नदीच सोडवेल”

आमची गाडी त्या रुग्णाला देतां आली, या जाणि‍वेनी मी सुटकेचा निश्वास टाकला. पण आमची गाडी उपलब्ध असणं हा तर केवळ योगायोग होता.

आम्ही पाड्याकडे निघालो. कोणी एक शब्दही बोलले नाही. हतबलतेने मन ग्रासून टाकले होते.

विवेक पटवर्धन

ता.क. ही सत्य घटना आहे, त्या रुग्णाला नंतर नाशिकच्या इस्पितळात हलवण्यात आले.  

Tuesday, May 28, 2019

कसं जमतं हे त्यांना?


मी तसा ‘आरोहन’ संस्थेसाठी नवाच. [शुद्धलेखनाचा आग्रह धरणाऱ्यांनी कृपया ध्यानात घ्यावे की आम्ही ‘ण’ आणि ‘न’ चा घोटाळा केला नाहीये. आरोहन हे नांव मूळ इंग्रजी नांवाची आद्याक्षरे घेऊन केलेले संक्षिप्त रूप आहे.] त्यामुळे आरोहनच्या विविध प्रकल्पांची ओळख करून घ्यायचे ठरविले, आणि अनिताला विनंती केली. अनिता प्रोजेक्ट मॅनेजर आहे, मी तिच्या जव्हारच्या कार्यालयात तिला भेटलो. चहापाण्यानंतर आम्ही, म्हणजे माधुरी, अनिता आणि मी निघालो. एक गाडी आम्हाला न्यायला तयार ठेवली होतीच.

“आपण करोळी गावाला जाऊया” अनिता म्हणाली. माझ्या ठाण्याच्या घरापासून जव्हारकडे जाताना  मनोरपर्यंत रस्ता, म्हणजे अहमदाबाद हायवे, प्रवास गडकरींना धन्यवाद देत केला. पण मनोर ते विक्रमगड रस्ता पार करताना आपल्याला गेल्या जन्मी केलेल्या पापांची कठोर शिक्षा मिळते आहे याची स्पष्ट जाणीव झाली. सीट बेल्टने मला सीटवर जखडून ठेवले नसते तर समोरच्या डॅशबोर्डावर किंवा बाजूच्या खिडकीवर माझा दहादा तरी कपाळमोक्ष झाला असता. जव्हारकडून मोखाड्याकडे जाणारा रस्ता चांगला आहे हा एक सुखद धक्काच होता.


“आपला हिम्बतपाड्याचा चेक डॅम” कोणीतरी म्हणाले. “बांधून दीड वर्ष झालं”. डाव्या बाजूला एक खोल दरी दिसली. तिथे एक मोठा चेक डॅम दिसला. मी गाडी थांबवली. चार फोटो काढले. डॅममध्ये पाणी नव्हते, मी महिन्यात सर्व ठिकाणी पाण्याचा दुष्काळ वाचत होतो. आता प्रत्यक्ष पुरावा समोर होता. पुन्हा गाडीत बसलो. तोपर्यंत अनिताला करवंद तोडायचा मोह आवरता आला नव्हता. पुन्हा प्रवास जारी.

“स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक मोखाड्याला वास्तव्य करुन होत्या. त्यांचा वाडा आता पडीक आहे.” अनिताने माहिती पुरवली. इतिहासाच्या संदर्भात नेहमीच्या जागाही वेगळ्याच दिसायला लागतात.

करोली गांवापर्यंत पोहोचायला दीड तास तरी लागणार होता. प्रदेश तसा रुक्ष होता. उन्हाळ्याने हिरवळ करपून टाकली होती. आरोहनच्या कार्यकर्त्यांना इथे गांवागावात बरेच फिरावे लागते. त्यांच्या ओळखी गांवकऱ्यांशी आहेत आणि ठिकठिकाणच्या झाडाझाडांवर आठवणी आहेत. आमच्या गाडीत आता तीन-चार जणी दाखल झाल्या होत्या. “हे बघा आरोहनचे आंब्याचे झाड”, माधुरी म्हणाली. रस्त्याच्या एका वळणावर आणि बाजूला एक सुंदर डेरेदार आम्रवृक्ष होता. “हे झाड आरोहनचे कसे?” “म्हणजे आम्ही काम केल्यावर अनेकदा ह्याच झाडाखाली बसून जेवतो.” 

गावात राहाणाऱ्यांचे हे एक वैशिष्ट्य म्हणायला हवे. माझ्या खोपोलीच्या घराभोवती अनेक मोठे वृक्ष होते. मी त्यांच्याशी बोलतही असे. मी कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्राचा अभ्यास केला होता. आमची अभ्यास सहल [excursion] निघत असे, आणि आम्ही वाटेवरच्या झाडांचा पानाफुलांचा, झाडाझुडपांचा अभ्यास करीत काही मैल चालत असू. इथे मला वनस्पतींची पारंपारिक नांवे तर कळलीच, पण कित्येक वनस्पतींचे अनेक उपयोग देखील. मोहाची दारू बनते हे मला माहित होतं, पण त्याच झाडाचे साल जखमेवर लावून त्याचा औषधी उपयोग करता येतो हे माहित नव्हतं. बहावा बहरला की पंचेचाळीस दिवसांनी पाऊस लागतो हे अनुभवाचे बोल त्यांच्यामुळेच समजले.


तसं ज्ञान हे दोन प्रकारचे असते. एक अनुभवातून आलेले, दुसरे अनुमानातून म्हणजे प्रयोगातून आलेले. निसर्गात एखादी घटना होते ती इतर घटनेची सूचक असते हे गावकरी जाणतात. पण केवळ पाश्चात्य आणि पुस्तकी माहितीवर विसंबून असणारे असे अनुभवाचे बोल ऐकताच नाहीत.

हेमंती आमच्या गाडीत होती आणि तिला विविध वनस्पतींची बरीच माहिती आहे हे लक्षात आलं. “आता त्याच विषयावर आपण एक पुस्तिकाच काढूया” अनिता म्हणाली. ते ज्ञान जतन करून ठेवायलाच हवे.”

आमची गाडी बरेच अंतर काटून पुढे गेली होती. प्रदेश रुक्ष होता. बाहेर रणरणते ऊन होते. उजव्या बाजूला एका रांगेत अनेक खड्डे खणलेले दिसले. अनिताने गाडी थांबवली. “सर, हे बघा सरकारने खणलेले खड्डे. इथे आदिवासी गेली सात पिढ्या शेती करतात. त्यांनी कुठे जायचे?” 


आम्ही करोळी गावांत पोचलो. एका मोठ्या घराजवळ ड्रायव्हरने गाडी उभी केली. चार जणी बाहेरच ओटीवर बसल्या होत्या. त्यातल्या एक नुकतीच लग्न होऊन सासरी आली होती. त्या मुलीच्या लग्नाची गोष्ट अनिताने सांगितली. मुलगी त्या खेड्यातली नव्हती, मोठ्या गावातली होती. पण आता लग्न होऊन दूरच्या खेड्यात आली होती. खेड म्हणणेदेखील योग्य नाही, हा तर एक पाडा होता, आठ-दहा घरांचा. कसं वाटत असेल अश्या नवऱ्या मुलीला पाड्यात लग्न होऊन येताना? “सर, त्यांच्या पाच-मुळं अशी प्रथा आहे. म्हणजे, लग्न होऊन येताना एक नवरीपेक्षा मोठी बाई आणि करवली [नवरीच्या वयोगटातली] अश्या दोघी तिच्याबरोबर येतात. मग नवरी पाच वेळा थोडे दिवस सासरी आणि काही दिवस माहेरी राहते असे पाच वेळा होते. त्यामुळे नव्या नवरीला तिच्या सासरी रुळायला मदत होते. तिच्याबरोबरच्या दोघी तिच्याशी बोलतात, त्यांचीही तिला मदत होते.” ही प्रथा मला वाटतं सर्वच ठिकाणी असावी जरी शहरात ती मागे पडली असेलही.

माझ्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्या मुलींनी कुडवा गावात जायचे ठरविले. आता रस्ता खराब होता. ऊन तर रणरणते होते. उजाड माळरान आणि कोरडी नद्यांची पात्रं बघवत नव्हती. माझ्यासाठी हे वास्तव्य भयंकर होते. वाटेत काही नद्यानाले पार केले, आणि ते सर्व रुक्ष कोरडे होते. एका बंधाऱ्याजवळ एक वासरू पाण्यासाठी फिरताना बघितले. आणि त्याच बंधार्‍यापासून पाचशे फुटावर एक विहीरही पाहिली जिला बाराही महिने पाणी असते. तिथून सोलार विजेने पंप चालवून टॅंकरने अनेक गावांना पाणी मिळण्याची सोय एका स्वयंसेवी संस्थेने केली आहे. 

आम्ही कुडवा गावात पोहोचलो. नारायणदादांचे घर सुंदर आहे. इथे दोनच ‘घराणी राहतात. मोवळे आणि कामाडी. कुडवा गावाचा चारी बाजूला डोंगर आहेत, म्हणजे गांवकऱ्यांनी डोंगर पार केल्याशिवाय त्यांना तालुक्याच्या किंवा कुठेही जाता येत नाही. अजूनही ‘लाल डबा’ म्हणजे एसटी इथे येत नाही. रस्ते आत्ता कुठे झाले आहेत, खडबडीत का होईना. मोखाडा इथून चोवीस किलोमीटर दूर. माध्यमिक शाळा अजूनही दूरच आहेत, जरी पूर्वीपेक्षा आता जरा जवळ आहेत म्हणायला हवे. त्यांच्या व्यवस्थेबद्दल न बोललेलेच बरे. आजारी माणसाला झोळीत घालून नेत असत. कित्येक पोहोचेपर्यंत दगावत असत. रस्ते झाल्यामुळे सोय झाली आहे. अजूनही इथे वीज नाही. एसटी नाही. एका स्वयंसेवी संस्थेने अनेक झोपड्यांना सोलार पॅनेल बसवून वीज दिली आहे.


नारायणदादांच्या घरी गेलो. [फोटो] मला मुलींनी माजघरात बोलावले. नारायणदादांच्या पत्नी स्वैंपाक चुलीवर करीत होत्या हे स्पष्ट होते. [इथे गॅस पोचला नव्हता. मूलभूत गरजा भागवण्याची मारामारी, तिथे गॅसची बात कशाला?]

चुलीवर छताला काही मक्याची कणसं बांधून ठेवली होती. चुलीच्या धुराची पुटं त्यावर बसली होती. “अशी कणसं ठेवली की त्यांना अजिबात कीड लागत नाही. कणसं बाहेरून धुराने माखलेली दिसली तरी आतले दाणे चांगले राहतात. मग त्यांचा उपयोग आम्ही शेतीसाठी करू शकतो.” नारायणदादा म्हणाले. नारायण दादा ही एक अजब व्यक्ती आहे. इथे पाच पिढ्या तरी त्यांचे घर आहे, पण तक्रार नाही. हसतमुख आहेत, शीघ्रकवीही आहेत!

मी स्वत:शीच हसलो. इथल्या गांवकऱ्यांची स्थिती त्या चुलीवर टांगलेल्या कणसांसारखीच आहे. प्रतिकूल परिस्थितीचे चटके बसताहेत, सोयी तर दूरच. तरीही माणूस आशावादी आहे, जसा बंदा रुपया आहे! कसं जमतं हे त्यांना?  

विवेक पटवर्धन

Thursday, May 16, 2019

आणि बुद्ध हसला.....


[जव्हार मोखाडा विभागात भरीव कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थात 'आरोहन' महत्वाची गणली जाते. त्यात कार्यरत असणाऱ्या अनिता पगारे यांचा हा लेख आरोहांच्या ठोस कार्याची तसेच गावकऱ्यांचे प्रश्न किती बिकट आहेत त्याची जाणीव करून देतो.]

मोखाडा तालुक्यामधील ४४ किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले ‘आमले हे गांव. गावाच्या सभोवताली नदी नाल्याने व निसर्गाने नटलेले ३२२ लोकसंख्या व ७२ कुटुंब संख्या असलेले हे गाव जिथे अनुसूचित जमाती पैकी, ठाकूर(म), वारली, कातकरी समाजातील लोक राहतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावामध्ये कुठल्याही प्रकारची सोई सुविधा व गाव विकासाची कामे झाली नव्हती. त्यामुळे संपूर्ण कुटुंब उदर निर्वाहासाठी बाहेरगावी मजुरी करण्यासाठी स्थलांतरित होत होते. आदिवासी हा ही माणूस आहे, त्यालाही माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे याची जाणीव नव्हती तेव्हाची ही सर्व परिस्थिती.

     सन २०१२ साली प्रथमतः ‘आरोहन सामाजिक संस्थेने या गावात पाऊल टाकले व गावातील समस्या व परिस्थितीची पडताळणी करुन या गावामध्ये गाव विकासासाठी शिक्षण, आरोग्य, उपजीविका व प्रशासन या विषयावर काम करण्यास सुरुवात केली. अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा आहेत त्या कशा तरी भागवल्या जात होत्या पण आमले गावामध्ये अंधार असल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. उदा. सर्पदंशामुळे मृत्यू, आरोग्याच्या मुलभूत सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे बालमृत्यू तसेच माता मृत्यू होत होते. या समस्या सोडवण्याच्या विचारात प्रथम या गावात ‘विद्युत पुरवठा आवश्यक आहे हे लक्षात आल्यानंतर ‘आरोहन आणि ‘सिमेन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आशा प्रकल्पांतर्गत आमले गावात १२ किलो वॅटची सोलर सिस्टीम बसवण्यात आली. यातून निर्माण होणाऱ्या विजे मुळे प्रत्येक घरात दोन बल्ब आणि गावातील रस्त्यांवर २० सोलार दिवे बसवण्यात आले. यातूनच विहिरीवरील मोटार चालविली गेली ज्यामुळे गावाबाहेरील पाणी गावात, घरांपासून अधिक जवळ आणू शकलो. यासोबतच या मोटारीमुळे शेती साठी ही पाणी उपलब्ध होऊ शकले ज्यातून शेती करणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढली, त्यांचे उत्पन्नही वाढले, याचा परिणाम स्थलांतर कमी करण्यात झाले.
[प्रातिनिधीक चित्र]
     मुलभूत गरजांची पुरेशी उपलब्धता, शिक्षणासाठी आवश्यक असणारी वीज आणि आदिवासी समूहालाही जगण्यासाठी लागणारे मनोरंजन आणि सर्वात मुख्य म्हणजे सन्मानपूर्वक जगण्याच्या शक्यता वाढण्यासाठी लागणारे उत्पन्न मिळवायला अधिक विजेची आवश्यकता जाणवू लागली. आमले गावात याची अनेक दिवस चर्चा सुरु होती आणि शेवटी या चर्चेचे रुपांतर २१ ऑगस्ट २०१८ रोजी ग्राम सभा घेण्यात झाले. गावाचे निर्णय गावातल्या लोकांनीच घ्यावे या तत्वप्रणाली नुसार ‘आरोहनने आतापर्यंत ‘पाडा समितीचे गठन केलेले होते, जिच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीतल्या चर्चेत ‘आरोहनच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती, पण चर्चा आणि निर्णय मात्र गाववालेच घेत होते. चर्चेत अशी माहिती समजली की, याधीही गावाने अपुऱ्या विजेच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर गावाने ‘महावितरण कडे आपली गरज नोंदवली होती आणि शासनाने त्याला मंजुरी दिली होती, त्यासाठी झालेल्या मोजमापा वरुन काही खांब येऊन पडलेही आणि एका रात्री ते खांब परतही गेले होते. एवढ सगळ झाले होते मग वीज का नाही? याचा शोध घेतांना लक्षात आले की याचे कागदोपत्री कुठलाही पुरावा गाव वाल्यांच्या हाती नव्हता. मग बैठकीत निर्णय घेतला गेला की पाडा समिती यापुढे याविषयाचा पाठपुरावा घेईल जोपर्यंत वीज घराघरात पोहोचत नाही तोपर्यंत. यासर्व प्रक्रियेत सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी ‘आरोहन असेलच याची ग्वाही प्रतिनिधींनी बैठकीत दिली होतीच.

     यानंतर सुरु झाल्या शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांच्या भेटी. या कार्यालयातून त्या कार्यालयात पाठवले जाऊनही न खचता सर्व कागदपत्र गोळा करण्याची स्पर्धा सुरु झाली. रोज वेगळा शोध लागायचा. महावितरण आधी वन विभागाचे ना हरकत पत्र आणा असे म्हणत होते तर त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर आधी महावितरण ने तुम्हांला वीज कनेक्शन मंजूर केले आहे असे पत्र द्या मग आम्ही तुम्हांला ना हरकत देतो असे ऐकावे लागले. आधी कोण? हा प्रश्न सोडवण्यातच बरेच दिवस गेले. कदाचित आपल्याला वीज मिळणारच नाही कारण कनेक्शन आणण्यासाठी ‘वाईल्ड लाईफ चे जंगल क्रॉस करावे लागणार होते. काहीही करुन वीज आणायचीच हे ध्येय एवढे स्पष्ट आणि निश्चित होते की त्यासाठी काहीही करण्याची पाडा समिती सदस्यांची आणि त्यांना पाठिंबा देण्याची गावाची तयारी होती. आधी ते की आधी हे ह्या शोधात हळूहळू गाववाले दोन्ही विभागांच्या वरिष्ठां पर्यंत पोहोचले. मग नवीनच शोध लागला की, ज्या गावांमध्ये सोलर आहे त्यांना वीज मिळत नाही. आता ह्या नवीन प्रश्नाला सामोरे कसे जायचे ह्यासाठी परत पूर्ण गावाची एक बैठक झाली आणि ठरले की, आमच्याकडे सोलर असल्यामुळे शासन आम्हांला वीज देवू इच्छित नाही असे संबंधित अधिकाऱ्याकडून लेखी मागायचे. परत पाडा समितीच्या टीमचा मोर्चा महावितरण मध्ये त्यांची ही मागणी घेऊन पोहोचला. गाववाले निवेदन घेऊन तर कार्यालयात पोहोचले पण अधिकारी अर्ज घ्यायला तयारच होईना. मग शेवटी अर्ज घेतल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही ह्या गाववाल्यांच्या निर्धारापुढे अधिकारी नमले आणि त्यांनी अर्ज तरी स्वीकारला.

     अर्ज त्यांच्या कार्यालयात नोंदला गेला आणि तिथून चक्र सुरु झाले. संबंधित दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र गावभेट घेतली, सर्वांची एकत्र छान बैठक झाली ज्यामुळे गावाचा विश्वास वाढला की वीज मिळू शकते. त्यानंतर वीज विभागाने या कामात ‘वाईल्ड लाइफ’ भागातील किती झाडे तुटतील याचे पत्र ‘वाईल्ड लाइफ’ सुरक्षा विभागाला दिले गेले. याकामासाठी लागणारी जमीन यासाठी गावाच्या सहमतीने ‘वन हक्कचा तीन दोन व तीन एक चा प्रस्ताव वन विभागाकडे दाखल करण्यात आला. संबंधित सर्व विभागाने एकमेकांशी बोलून देशाच्या नागरिकांना काय हवे आहे ते पुरवावे असे आपल्या घटनेत असले तरी आमच्या भागात हे सर्व ‘कम्युनिकेशन, मग ते पत्रव्यवहार असो की त्यांच्या एकत्र बैठका किंवा गावाचा अपेक्षित सर्वे असो आमचे पाडा समितीचे सदस्य घडवून आणत होते. पुढे मग कनेक्शन साठी लागणारे सर्व कामकाज सुरु झाले. त्यानंतर गावातील ज्या लोकांकडे कनेक्शन द्यायचे आहे त्यांची यादी करणे, त्याला मंजुरी घेणे, प्रत्यक्ष ट्रान्सफार्मर बसवणे, मीटर लावणे इ. कामे झाली आणि गावात लाईट पोहोचली.

     यानिमित्ताने बरेच कायदे, तरतुदी – तीन दोन, तीन एक दावा; गाव नकाशा, सामूहिक वन हक्क दावा इ. आम्ही, गाववाले शिकलो एवढच नाही तर आमच्या वाट्याला दोन्ही विभागाचे इतके नवखे कर्मचारी आले होते की त्यानाही आमच्या या कामामुळे अनेक गोष्टींचा अभ्यास झाला, तरतूद समजली. संबंधित कर्मचारी, अधिकारी जागेवर नाही यामुळे आमच्या गाववाल्यांच्या अनेक चकरा झाल्या, त्यात आम्हा सर्वांची छान दोस्ती झाली असे म्हणून आम्ही गेलेल्या पैशांचे दुःख कमी करुन घेतले. यासर्व कामासाठी साधारण ३५ झाडे कापावी लागली. किती झाडे तुटतील,कापावी लागतील याचे पत्र आधी देऊनही ज्या कंत्राटदाराला काम दिले होते त्याच्यावर दबाव आणून, गावावर दबाव आणून पैसे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण गाव फारच पक्के होते. आमच्या कडे पैसे नाही, पोरा-बाळांसह आम्हांला अटक करा अशी भूमिका घेऊन गाव रस्त्यावर आले त्याचा फायदा असा झाला की कोणावरही कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. काम पूर्ण झाले आता पुढच्या आठवड्यात सर्वांचे घरात लाईट लागतील तेव्हा आपण जाहीर एक कार्यक्रम करुयात, त्यासाठी तारीख काय असावी, प्रमुख पाहुणे कोण? निमंत्रण पत्रिका कशी असावी? कोण कोणाला पत्रिका पोहोचवणार? आलेल्या पाहुण्यांना जेवायला काय? ही सर्व चर्चा सुरुच होती तर गावासाठी बसवलेला डीपी जळाला आणि सर्व चर्चा जागच्या जागीच राहिल्या. परत सर्व पाठपुरवा आणि पळापळ सुरु झाली आणि अखेर गावात लाईट आली. आख्ख्या गावाच्या बरोबरीने सतत त्यांच्या बरोबर राहिले त्या सरिता आणि राजारामच्या कष्टाला फळ आले. राजाराम तर शेवटचे काही दिवस गावातच तळ ठोकून राहिला की काही कारणाने काम थांबायला नको किंवा बंद पडायला नको. माधुरी, गणेश आणि नितेश यांचा रोजचा पाठपुरावा तर होताच पण ज्या ज्या वेळी गरज पडली त्या त्या आणि तितक्या वेळेस गावाच्या बैठकांना, गाववाल्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी जात होते. यासर्व जणांच्या अथक प्रयत्नाने साडे आठ महिने युद्ध पातळीवर केलेल्या पाठपुराव्या नंतर अखेर लाईट आली

....आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते की, ‘आणि बुद्ध हसला.......’

-- अनिता पगारे

Sunday, March 10, 2019

आरोहनतर्फे आदिवासी समाजात जागतिक महिला दिन साजरा


     आदिवासी समूह मुळातच कमी बोलणारा पण आताच्या सतत स्वतःला सिद्ध करावं लागण्याच्या काळात आयुष्य समानतापूर्वक, आदरयुक्त हवे असेल तर तुम्हांला बोलावेच लागेल तरच विविध प्रकारचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल नाहीतर सतत विविध प्रकारच्या हिंसाचाराला, अन्यायाला सामोरे जावे लागेल असा सूर जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी ‘आरोहनने आयोजित केलेल्या सहा महिला आणि युवा सोबतच्या मेळाव्यात निघाला.


     आरोहन ही नोंदणीकृत सामाजिक संस्था गेली १३ वर्षे पालघर मधील मोखाडा, जव्हार, डहाणू आणि पालघर या तालुक्यांमध्ये ‘कुपोषण समूळ नष्ट व्हावे यासाठी आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती, पाणी आणि सुप्रशासन हे विषय मध्यवर्ती ठेवून काम करीत आहे. मोखाड्या तालुक्यातील सुर्यमाल- केवनाळे, कुर्लोद, पाथर्डी- बोटोशी, आणि आसे ग्राम पंचायत तर जव्हार मधील कडाची मेट गांव आणि आयटीआय जव्हार या ठिकाणी विशेष लक्ष देवून सध्या महिला, मुल आणि युवा वर्गा बरोबर काम सुरु आहे.


     ‘बॅलन्स फॉर बेटर अर्थात - समानता असणारा, आनंदी समाज निर्माण होण्यासाठी जात,धर्म,लिंग इ. सर्व प्रकारचे संतुलन आवश्यक आहे’ ह्या संकल्पनेवर आधारित यावर्षीचा ‘जागतिक महिला दिन’ सहा ठिकाणी साजरा करण्यात आला. बोटोशी येथील भोसपाडा, आसे येथील ब्राह्मण गांव, कुर्लोद, सूर्यमाळ, कडाची मेट आणि आयटीआय जव्हार येथे मोठ्या जल्लोषात महिला दिन साजरा करण्यात आलेल्या ह्या मेळाव्यात जव्हार आगारच्या व्यवस्थापिका सरिता बागल, माधुरी मुकणे, सरिता चौधरी, प्रतिभा भोये, अॅड कल्याणी मुकणे, मीनाक्षी खिरारी आणि लीला दळवी यांनी आजची स्त्रियांची सामाजिक-आर्थिक आणि राजकीय स्थिती मांडली आणि आपापल्या क्षेत्रात आदरपूर्वक स्वतःचे स्थान मिळवण्यासाठी प्रत्यक्ष त्या स्त्रीच्या तसेच समाजातील इतर घटकांच्याही मानसिकतेत बदल व्हायला हवा, हे बदल कसे घडवावेत हे दाखवण्यासाठी स्वतःच्या अनुभवांची मांडणी ह्या मेळाव्यातून करण्यात्त आली. सूर्यमाळ येथे ग्राम पंचायत आणि डॉन बॉस्को संस्थेबरोबर तर ब्राम्हण गांव येथे ‘साथी’ संस्थेबरोबर या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. 

यासर्व मेळाव्यामध्ये त्या त्या गावातील स्त्रिया, युवती, युवा मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. कडाची मेट येथील मेळाव्यात गावातील स्त्रियांनी रान भाज्यांपासून विविध प्रदार्थ बनवून प्रदर्शन केले. मासिक पाळी आणि त्यासंदर्भात असलेले गैरसमज समजावून घेण्यासाठी ‘पॅड मॅन’ सिनेमा एकत्रित बघितला. महिला दिन हा सर्वांच्या आनंदाचा दिवस असायला हवा आणि महिला सक्षमीकरणावर फक्त भाष्य न करता आपल्या कृतीत तो विचार उतरला पाहिजे अशी भूमिका सर्व वक्त्यांनी मांडली आणि शेवटी सर्व आदिवासी महिलांनी आणि युवानी आपला पारंपारिक ‘तारपा नृत्य सदर केले. 

अनिता पगारे 

Monday, April 16, 2018

खैरमाळचा कायापालट



“गाडी थांबवा” माधुरीने शरदला म्हणजे ड्रायव्हरला फर्मावले. माधुरी, प्रतिभा आणि मी आरोहनच्या जव्हार कार्यालयातून खैरमाळला जायला निघालो होतो. शरदने गाडी शंभर-दोनशे फूटही चालवली नसेल तेव्हां माधुरीचा प्रश्न आला.


“सर, तुम्ही टोपी आणली आहे ना?”


“नाही, काही तशी जरूर नाही.”


“ऊन फार कडक आहे, टोपी घेतलीच पाहिजे. गाडी थांबवा.”


गाडी हमरस्त्यावरच्या एका जनरल स्टोअर समोर उभी राहिली. मी टोपी विकत घेतली. पुन्हा गाडीत बसलो, आणि खैरमाळला निघालो.


माधुरी आणि प्रतिभा ‘आरोहन’ एनजीओमध्ये काम करतात. आरोहन हा शब्द म्हणजे इंग्रजी नावाचं संक्षिप्त स्वरूप आहे, म्हणून ते आरोहण नव्हे तर आरोहन. मला नुकतंच आरोहनने त्यांच्या विश्वस्त पदावर नेमलं आहे, त्यामुळे त्यांच्या कामाची ओळख करून घेणं ओघानेच आलं. मी सर्वप्रथम खैरमाळचा प्रकल्प बघावा असे ठरलं. 


शरदने गाडी हमरस्त्यावरून डावीकडे वळवली. “खैरमाळ उंच डोंगरावर वसलंय. फक्त दहा घरांचं गाव आहे.” प्रतिभा म्हणाली.


“किती दूर आहे?”


“पंधरा किलोमीटरच आहे जव्हारपासून. पण रस्ता डोंगरातून जातो, आणि रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. त्यामुळे वेळ लागतो.”


थोड्याच वेळात आम्ही “काम चालू - रस्ता बंद” च्या जागी पोचलो. रस्त्याच्या एका भागाचं डांबरीकरण चालू होतं. त्यांच्या सुपरवायझरने गाडी थांबवली. “तुला आता सोडतो, पण परतताना दुसऱ्या वाटेने जा” म्हणाला.


गाडी घाट उतरत होती. ऊन रणरणते होते. गुरंदेखिल झाडाखाली सावलीला उभी होती.

वळणावळणाच्या रस्त्याने आम्ही एक दोन पाडे मागे टाकत गेलो. नदीवर एक पूल लागला.


“हा पूल नुकताच बांधलाय. पावसाळ्यात ही नदी भरून वाहत असे तेव्हां खैरमाळचा जगाशी संपर्क तुटत असे.” माधुरी म्हणाली. “पूल बांधल्यामुळे मोठ्ठीच सोय झालीय.”


आमची गाडी गीटीपाडा गांवात आली. विटांची घरं, प्लास्टर न केलेली, दुतर्फा होती. गाडीतून उतरलो व चालू लागलो. एक छोटी तीन फुटी भिंत दिसली, त्यावर तीन नळ होते.


“हे आरोहननेच बांधले. बंधाऱ्यामुळे ह्या गांवापर्यंत नळ आणता आले.”

चार तरुण मुले जवळच होती. ती उठून उभी राहिली. मी नीट निरखून बघितलं. त्यांनी पिवळे हायलाईटकरून क्रिकेटरसारखे स्टाईलने कापले होते. अनेक आदिवासी घरांवर डिश आंटेना उभ्या होत्या.  


माधुरी आणि प्रतिभा झपझप चालू लागल्या. मी त्यांच्या मागे. माझ्या लक्षात आले की आम्ही एका टेकडीवर होतो, आणि आता दरीत उतरायचे होते. प्रतिभा पुढे गेली. वहिवाटीचा रस्ता सोडून पायवाटेने खाली गेली. माधुरी माझ्यापुढे पण माझ्यावर सतत लक्ष ठेवत, कधी उतारावर मला हात देत नीट पुढे नेत होती. ऊन खरंच भाजून काढत होतं, त्या दोघींनी डोक्यावरून पदर आणि ओढणी घेतली होती. त्यांनी मला टोपी का घ्यायला लावली ते समजलं. 
   

“आम्ही इथे बंधारा बांधलाय. खूप अडचणी आल्या, वेळ लागला, पण आम्ही काम पुरं केलं. वनखात्याच्या लोकांनीही आरोहनचं काम वाखाणलं.” प्रतिभा म्हणाली.


मी सांभाळूनच टेकडी उतरत होतो. जसे खाली आलो तसा दूरवर बंधारा दिसू लागला. नदीच्या पात्रात मोठ्ठे दगड होते. त्यातून वाट काढत पुढे बंधाऱ्याकडे निघालो. 



बंधारा आठ फूट उंच आहे आणि पाणी जायला व्हेंट आहे. बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस गोल झाकणे दिसत होती. तीच व्हेंट.


“पावसाळ्यात खूप पाणी येत. व्हेंट उघडली की बंधाऱ्यातला गाळ-कचरा बाहेर जातो. सप्टेंबरला व्हेंट बंद करतो, मग पाणी इथेच, बंधाऱ्यामागे, तलावासारखं थांबतं.”


नदी ओलांडून आम्ही बंधाऱ्याच्या डाव्या बाजूला गेलो. एक सुंदर डोह तयार झाला होता. बरंच खोल असावं. 


“पाणी फुटभर देखिल कमी झालं नाहीये.” माधुरी आनंदाने ओरडलीच. “एप्रिलचा महिना आहे. जूनपर्यंत पाणी टिकेल वाटतंय.”

“हा बंधारा नव्हता तेव्हा खैरमाळच्या लोकांना पाणी आणायला दोन तीन किलोमीटर चालावं लागत होतं. तुम्ही नदीवरच पूल बघितला ना? तिथपर्यंत दोन घडे घेऊन बायका पाण्याला जात होत्या.”


“सर, खैरमाळ ह्या डोंगरावर आहे.” प्रतिभाने मागच्या उंच टेकडीकडे बोट दाखवलं. म्हणजे आम्ही एक टेकडी उतरलो, नदीचं कोरडं पात्र पार केलं, आणि आता नदीच्या दुसऱ्याबाजूला असलेल्या उंच टेकडीवर खैरमाळला जायचं होतं. 


खैरमाळच्या बायका दोन घडे घेऊन खैरमाळची उंच टेकडी उतरून, मग दुसरी चढून पलीकडच्या नदीपर्यंत पाण्यासाठी जात असत, आणि परतत. हंड्यातलं किती पाणी सांडलं असेल आणि डोळ्यातलं किती सांडलं त्याची कल्पनाच केलेली बरी.


आम्ही तिथेच बंधाऱ्यावर उभे राहिलो. तलावातल्या वनस्पतीकडे माझे लक्ष गेले. हिरवळीचे चेंडू एकत्र करावेत तशी दिसत होती. 



“त्या वनस्पतीला ‘गोंडूळ’ म्हणतात. त्याने पाणी गार राहातं.” माधुरीने माहिती पुरवली. मला वाटतं की गोन्ड्यासारखी वाढ दिसते म्हणून गोंडूळ नांव पडलं असेल. 


आम्ही खैरमाळची टेकडी चढायला लागलो. माधुरी आणि प्रतिभाने कमीत कमी त्रासाची वाट कोणती ते नक्की केलं. टेकडी उंच तर आहेच, पण रुळलेल्या पायवाटा दिसत नव्हत्या.


“आम्ही प्रकल्पाच्या कामासाठी इथे अनेकदा आलो. इथे पावसाळ्यात खूप साप निघतात. फार भीती वाटायची. एक हातात काठी घेऊन पुढे आणि आम्ही सगळे तिच्या मागे रांगेने अशी वरात निघायची.” प्रतिभा म्हणाली. “आपण जाताना सोलार पॅनेल बघूया. आम्हीच बसवलेत ते. सोलारवर चालणारा पंप आम्ही बसवलाय. गावात पाच हजार लिटरची टाकी उंचावर उभारली आहे. पम्पामुळे खैरमाळला पाणी मिळते. आणि गीटीपाड्यालाही.”


“नळाने पाणी आलं तेव्हां खैरमाळमधल्या मुलांना फारच आप्रूप वाटलं. त्यांनी नळातून पाणी येताना कधी बघितलंच नव्हतं. ती सारखी नळावर जात, नळ उघडून बघत.” माधुरी सांगू लागली. “पाणी नव्हतं म्हणून मुलांना आंघोळही कधीमधीच. मग आरोग्याचे प्रश्न उभे! इथे मुलांच्यात खरुज असण्याचे प्रमाण खूपच होतं. आता दररोज आंघोळ करतात. आम्ही खरुजेवर लावायला औषधे आणली. खरुज गेली सगळ्यांची. 

अर्धी-पाऊण टेकडी चढून गेलो होतो. आरोहनची सोलार पॅनेल दिसत होती. पंतप्रधान मोदींनी सर्व खेड्यांना वीज देण्याची घोषणा केली होती. खैरमाळ हे एक वीज [आणि इतर अनेक] सुविधा नसलेलं वंचित खेडं होतं. वीज तिथे महिन्या दोन महिन्यापूर्वीच आली. पण महाराष्ट्रात अनेक खेड्यांना चोवीस तास वीज मिळत नाही. इथे ‘कनेक्टीव्हीटी’चा कायमचा अभाव. इथे अजूनही मोबाईल नेटवर्क नाही. पावसाळ्यात खैरमाळशी संबंध असा तुटत असे की जसं हे खेडं भारतात नाहीये.


सोलार पॅनेलपासून गावापर्यंत चढ असला तरी वाट बरी आहे. आम्ही पुढे गेलो.


“ती वीटभट्टी बघा.” प्रतिभाने दूरवरची भट्टी दाखवली. “इथल्या लोकांना विटा आणण्यापेक्षा इथेच बनवणं सोयीचं वाटतं.” विटा व्यवस्थित रचल्या होत्या, बाजूलाच लाकडं गोळा करून ठेवली होती. भट्टी लावायची तयारी झाली होती.


“इथले गांवकरी एकच पीक घेत होते. नाचणी किंवा वरीचं. आता पाणी मिळतंय बंधाऱ्याचं. ते दोन तीन पिकं घेतात.” माधुरी सांगत होती. “पूर्वी पावसाळ्यानंतर, म्हणजे पीक तयार झाल्यावर, दसऱ्याच्या सुमारास इथले शेतकरी कामाच्या शोधात इतर जागी जात. स्थलांतरित कामगार! पडेल ती कामं शहरात वा इतर ठिकाणी करायचे. आता स्थलांतर बंद! पाण्याच्या उपलब्धतेने किती चमत्कार घडवलाय. तीन पिकं घेणारे शहरात काम शोधायला कशाला जातील?”


आम्ही खैरमाळमध्ये दाखल झालो. पहिल्या घरापाशी मुले खेळत होती. फोटो काढतो म्हणालो तर त्यांची आई हसून काही बोलली. त्यांची वारली भाषा. मला काहीच कळलं नाही, माधुरीने खुलासा केला. ‘मुलं तयार होऊन, चांगले कपडे घालून येतील.’


खैरमाळमध्ये दहा-आकारच घरं असली तरी ती मोठी आहेत. एका घराजवळ आरोहनने पाण्याची टाकी बांधली आहे. खालीच तीन नळ बसवून मोरी केली आहे. दोन मुलं हात-पाय धूत होती. “ती बघा फोटोसाठी तयार होत आहेत.” माधुरी म्हणाली.



एका घरासमोर मोठं आंगण होतं, तिथे आम्ही जमलो. घराच्या तुळईवर ‘ग्रामसभा-खैरमाळ’ अशी पाटी होती. आरोहनने शासनाची आंगणवाडी योजना इथे आणली. ‘अमृताहार’ ग्रामस्थ स्त्रियांना मिळवून दिला. बाई गरोदर असली तर तिला तिसऱ्या महिन्यापासून अमृताहार देण्यात येतो. कुपोषणाची समस्या त्यामुळे दूर होते.


गांवातली बायका-मुलं आमच्या अवतीभवती गोळा झाली. मी त्यांना बंधाऱ्यामुळे काय फायदे झाले ते विचारले. त्या सगळ्याजणी भरभरून बोलल्या, काबाडकष्टाचे जीवन मागे पडले होतं. मी ते व्हिडीओवर टिपलं.


माझं लक्ष घराच्या प्रवेशद्वाराकडे गेलं. व्हरांड्यासारख्या जागेत चक्क इंग्रजी तक्ते होते. “इथला एक मुलगा डीएड झालाय. तोच शिकवतो.” प्रतिभा म्हणाली.


आत्ता कुठे वीज आलीय, पाणी मिळालंय, बायकांना दोन-चार किलोमीटर पाण्याचे हंडे घेऊन टेकडी चढाउतरायला लागत नाहीये, आंगणवाडी आली, गावात सुईण पोहोचू शकते, अमृताहार मिळतोय, कुपोषणाकडे ग्रामसभा लक्ष देतेय, आयुष्यात सुविधा आणि व्यवस्थितपणा आलाय. 

हे सर्व व्हायला स्वातंत्र्यानंतर सत्तराहून अधिक वर्षे लागली. त्याबद्दल सरकारी यंत्रणेला दोष द्यायचा, त्यांच्यावर ठपका ठेवायचा, की आरोहनसारख्या एन्जिओकडे आशेने बघायचं? 


तुम्हीच ठरवा.


विवेक पटवर्धन