Friday, December 14, 2018

सांगा, त्यांनी कसं जगायचं?

मी १६ वर्षे टेंपररी कामगार म्हणून काम केलंय,बॉश कंपनीचा युनियन लीडर मला सांगत होता. चाळीशी आल्यावर पर्मनंट झालो, पण आयुष्याची उमेदीची वर्ष ताणतणावात गेली. ब्रेक मिळायचा सहा-सात महिने काम केल्यावर. त्यावेळी डोक्यावर टेन्शन घेऊन फिरायचो, पुन्हा कंपनीने बोलावले नाही तर काय करायचे हा प्रश्न भेडसावत असे. त्या टेंपररी नोकरीतच माझे लग्न झाले, मुलं झाली, वाढली, आणि शाळेत शिकली. मला ब्रेक मिळाला की माझ्या पत्नीला अतिशय चिंता वाटायची. नोकरी नसली की नातेवाईकांसमोर जायची लाज वाटायची. तुम्हाला नोकरी नसली की तुम्हाला कोणी विचारत नाही.”
मी त्याला भेटलो सहा महिन्यापूर्वी, पण उद्योगात कामगार अनेक वर्षे टेंपररी नोकरीत असतात हे मला नवे नव्हते. माझ्या नोकरीची सुरुवात टाटा पॉवरमध्ये झाली, तिथेही अनेक कामगार असेच अनेक वर्षे टेंपररी नोकरीत असलेले बघितले होते. पण त्यावेळी मी विशीत नुकतेच पदार्पण केले होते त्यामुळे वर्षानुवर्षे टेम्पररी राहण्याचा अर्थ मला पुरेसा उमगला नव्हता.
तरीही या युनियन लीडरचे बोलणे लक्षात राहिले, मनात घुमत राहिले. अरविंद श्रोत्री हा माझा मित्र. चिंचवड-पुण्यातल्या अनेक कामगार संघटनांचा तो सल्लागार. मी अरविंद श्रोत्रीशी या विषयावर बोलल्यावर तो म्हणाला, हा प्रश्न खूप मोठा आहे. मी तुझी काही टेंपररी कामगारांबरोबर मीटिंग ठेवतो. मग लगेच तारीख ठरली. रविवारी भेटायचे ठरले कारण रविवारी सुट्टी असते, म्हणजे कामगारांना बिनपगारी सुट्टी घ्यायला नको.
         *          *          *
ठरल्या वेळेस सर्वजण हजर झाले. मी सर्वाना सांगितले की मी कुणाचेही खरे नांव लिहिणार नाही. सर्वाना हायसे वाटले. आपली ओळख पटली तर नोकरी जाईल असे प्रत्येकास वाटत होते, माझ्या बोलण्याने दिलासा मिळाला. पंधरा-वीस कामगार आले होते ते विविध कंपन्यांतून - त्यामध्ये ऑटोमोटिव्ह स्टॅपिंग व असेंब्लीज लिमिटेड, बॉश, हुन्डाई, बजाज ऑटो, सुल्झर, मास फ्लांज अशा अनेक कंपन्यांचे कामगार होते. जशी आमची चर्चा सुरु झाली तसे सर्व मोकळेपणे बोलू लागले.
मी हेल्पर म्हणून काम धरले xxx कंपनीत. प्रथम मी कॉन्ट्रॅक्टरकडे कामाला होतो, पण नंतर दोन वर्षांनी, मला कंपनीने टेंपररी कामगार म्हणून कामावर ठेवले. कॉन्ट्रॅक्टरला डच्चू का मिळाला ते माहीत नाही पण त्याने आमचे पैसे बुडवले. आमचा प्रॉव्हिडंट फंड कापला, पण ते पैसे आमच्या खात्यावर जमा केले नाहीत - थोडक्यात काय की त्यानेच ते खाल्ले.
होय, असंच झालं आमचं,” त्याचा साथीदार म्हणाला.
साहेब, सात महिने कंपनीत काम केले, त्यावेळी रु.७,५००/- पगार मिळत होता. म्हणजे २०१० साली. पण सात महिने संपल्यावर कंपनीने ट्रेनी म्हणून दोन वर्षे नोकरीवर ठेवले.
टेंपररी कामानंतर ट्रेनी म्हणून? सात महिने संपता? परमनंट करण्याची मागणी करता येऊ नये म्हणून अनेक कारखान्यात सात महिने कामावर ठेवतात, त्याला ते पिरीयड म्हणतात. मग ब्रेक देऊन अनेकदा पुन्हा कामावर घेतात, पण तसे पुन्हा कामावर घेतीलच अशी खात्री कोणालाच नसते.
होय तसंच. आणि पगार दिला रु.६,५००/-. आणि त्यावर भविष्य निर्वाह निधीची कपात नाहीत.”
अरे! असं कां? तुम्ही विचारलं नाही?
कुणाला विचारणार? विचारणाऱ्याची नोकरी जाते ते आम्ही बघत होतो. इतर कुठे कामही मिळत नाही. ट्रेनिंग संपल्यावर आम्हाला टेंपररी म्हणून कामावर ठेवले. तेव्हापासून आम्ही टेंपररीच आहोत.
म्हणजे २००७ पासून प्रथम कॉन्ट्रॅक्टरकडे काम, मग कंपनीत, त्यानंतर ट्रेनी, आणि पुन्हा कंपनीतच टेंपररी कामावर?
होय, सात महिन्याचं काम असतं . मग ब्रेक मिळतो. तो कधी दोन-चार दिवसांचा असतो, तर कधी दोन महिन्यांचा.
म्हणजे कंपनीत किती काम आहे त्यावर ठरतं.
ब्रेकमध्ये काय करतां?
रोजन्दारीची कामं. मी मजूरीसाठी पेंटिंग करणाऱ्या मजुरांबरोबर नाक्यावर उभा राहतो. कधी मिळतं काम, कधी नाही. मग घरी परत येतो. माझ्या बायकोला ते आवडत नाही. भांडणं होतात, मी देखील कावलेला असतो. नंतर वाईट वाटतं. सुपरवायझरच्या फोनची वाट बघतो.
अजूनही हेल्परचंच काम करतां?
नाही. मी वर्षभरात वेल्डिंग शिकलो. पण तुम्ही वेल्डर असा की हेल्पर - पगारात काही फरक नाही, सर्वांना सारखाच. नवीन घेतलेल्या कामगारांनाही माझ्याएवढाच पगार. मग सर्व्हिसचा काय फायदा?
ही माहिती अगदीच नवी होती असं नाही, पण तरीही मला ती पचवणं जड जात होतं.
ऍक्सिडेंट झाला तर? तुम्ही वेल्डिंगचे काम करता म्हणून विचारतो.
साहेब, कुठचीही कंपनी घ्या, ऍक्सिडेंटच्या दिवसाचा पगार मिळतो, पण त्यापुढे गैरहजर राहिला तर बिनपगारी! हां पण वेल्डरला एप्रन, शील्ड वगैरे सर्व देतात. तरीही अपघात होऊं शकतो.
बाजूला बसलेल्या एका कामगाराने माझ्या हातावर हात ठेवून माझं लक्ष वेचून घेतलं.

साहेब, आमच्या कारखान्यात काम करताना एकाचं बोट साफ कापलं गेलं. दोन तुकडे! पण पहिल्या दिवसाच्या पगाराखेरीज कांही दिलं नाही.
असं कसं? तुम्ही दाखवताय त्याप्रमाणे तर्जनीचं पुढचं पेर छाटलं गेलं त्याची नुकसान भरपाई कायद्याने बरीच आहे, ती द्यायला लागते.
काहीं मिळालं नाही. दुसऱ्या एका कामगाराने त्याला दुजोरा दिला.
एकविसाव्या शतकात असं घडू शकतं असं मला वाटलं नव्हतं.
लग्न झालंय? मी पहिल्याला प्रश्न केला.
हो साहेब, पाच वर्षापूर्वी. तेव्हां साडेसात हजार रुपये पगार होता. आता मला चार वर्षांचा मुलगा आहे. प्रॉव्हिडंट फंड, इ.एस.आय वगैरे वजा जात, हाती आठ हजार आठशे रुपये येतात.
कसं भागतं?
ते विचारू नका. घरभाडंच अडी हजार रुपये आहे. म्हणजे सहा हजारात तिघांनी महिनाभर कसं भागवायचं?
साहेब, त्याच्या कंपनीची बस आहे. कॅन्टीन आहे म्हणून जरा बरं आहे. इतरांची अवस्था त्याहून बिकट आहे.
खोलीचं भाडं दरवर्षी वाढतं, कारण अकरा महिन्यांनी मालक खोली सोडायला लावतो. पण मुलाच्या शाळेजवळच खोली घ्यायला लागते, नाहीतर खर्च अजून वाढतो.
अडी हजार रुपयात मिळते ती खोली पुरेशी देखील नाही. दहा बाय दहाच्या खोलीत आंम्ही तिघे राहतो. स्वैपाक तिथेच, झोपायचंही तिथेच.
मुलगा मोठा होईल लवकरच. अशा पगारात कुठे जायचं?
तुमच्या मिसेस नोकरी करतात का?
कशी करणार साहेब? चार वर्षाच्या मुलाला शाळेत नेण्यात-आणण्यात दिवस जातो तिचा.
कांही जणी करतातही नोकरी. त्यांना पाच-सहा हजार रुपये मिळतात.
आमच्या घरी या. आम्ही कसे जगतो ते एकदा पहा.
मी हे आमंत्रण लगेच स्वीकारले. गप्पा संपल्या की एकाच्या घरी जाण्याचे कबुल केले.
नुकतीच  दिवाळी झाली. बोनस मिळाला असेल.
अनेक ठिकाणी एक महिन्याचा पगार मिळतो.
आम्हाला कांही मिळत नाही. दिवाळी बोनस शून्य!
असं कसं होईल? तुम्ही तीस दिवस कंपनीमध्ये काम केलंत, टेंपररी म्हणूनही केलंत, तर तुम्हाला बोनस मिळणार - कायद्याने मिळणार.
“पण मिळत नाही त्यांना,” दुसरा म्हणाला.
तुमची युनियन काय करते? मी विचारले . ते तुमचे प्रश्न घेत नाहीत?
त्यांना ते जमत नाही. त्यांनी प्रश्न विचारला तर आमचा पिरियड (सात महिने) संपल्यावर आम्हाला कामावर पुन्हा बोलवत नाहीत. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हो?
कायद्याप्रमाणे किमान बोनस म्हणजे एक महिन्याचा पगार. तो साडे दहा हजार होतो. काही मालकांना तो भरमसाठ वाटतो, मग ते बोनस देताच नाहीत, किंवा काही रक्कम देतात.
आताशा कारखान्यात शंभरपेक्षा कमी परमनंट कामगार ठेवले जातात. कारण मग मालकांना कारखाना बंद करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत नाही.
साहेब तुम्ही त्याला लग्न झालंय का म्हणून विचारलं पण आज अशी परिस्थिती आहे की आमच्या कारखान्यात चार-पाच कामगार असे आहेत की त्यांची लग्न जमत नाहीत. म्हणजे त्यांना कोणी मुलगीच देत नाही. मुलाला व्यवस्थित नोकरी असेल तरच मुलगी लग्न करते. आताशा त्यादेखील दहावी-बारावी शिकतात. नोकरी नीट नसेल पण बऱ्यापैकी शेतीवाडी असली तर काहीं जणांचं लग्न जमतं-नाहीतर बॅचलर!
खरंच की काय? माझ्यासाठी हे अगदी नवं होतं. पण हे विदारक होतं.
मी एका कंपनीत कंत्राटी कामगारांचा करार केला. त्यांचा पगार साडेपाच हजाराने वाढला - म्हणजे काय की कंपनीनेच कंत्राटदाराला पगार वाढवून द्यायला सांगितलं. त्यानंतर मला डझनभर लग्नाच्या आमंत्रण पत्रिका आल्या. अरविंद श्रोत्री म्हणाले. सगळे हसले.
मी शांत बसून राहिलो. हे सर्व पचवायला जड जात होतं. मनातल्या मनात जे ऐकलं त्याची उजळणी केली आणि विचारलं, म्हणजे तुम्हाला साधारण दहा हजार पाचशे रुपये पगार मिळतो. आणि त्यातून कपाती जा करतां तुमच्या हाती आठ हजार आठशे येतात. बरोबर? पण कायम स्वरूपी कामगारांना किती पगार मिळतो?
मी समजावतो त्यातील एक म्हणाला. आमच्या बॉशच्या कारखान्यात परमनंट १८९ कामगार, ऑफिस स्टाफ ३५०, कंपनीचे ट्रेनी ८००, नीमचे ७५०, कंत्राटदाराचे ४०, यशस्वी इन्स्टिट्यूटचे ४०, यशस्वी स्किल डेव्हलपमेंटचे ४०, रिलाएबलचे ६०, हाऊसकिपिंगचे ४५, बागकामाचे १०, कॅन्टीन वाले ३५, सिक्युरिटीचे ६० आणि फिक्स्ड टाईम कॉन्ट्रॅक्टचे ४० काम करतात. म्हणजे ऑफिस स्टाफ वगळतां २१०९ कामगार आहेत. त्यातल्या अकुशल कामगारांना ७५०० रुपये दरमहा मिळतात, तर इतरांना रु.१०,५००. परमनंट कामगारांना पगार मिळतो तो र.५०,०००/-सीटीसीच्या आधारे - तसा 'ग्रॉस' त्यांना रु.४३,०००/- मिळतो. आता तुम्ही गणित मांडलं तर तुम्हाला दिसेल की सरासरी दरडोई पगार फक्त रु.१३१४२ /- आहे. इथे मी 'इतर' कामगारांचा पगार रु.१०,५००/- धरला आहे, तो कांही कामगारांना रु.७,५००/- मिळतो, म्हणजे सरासरी साडे तेरा हजाराहूनही कमीच आहे!
आता जर्मन कंपन्यांचं असं, तर इतरांचं काय?
लेबर कॉस्ट वाचवतात ती अशी. म्हणजे कमीत कमी परमनंट कामगार ठेवून अधिकाधिक नीम, ट्रेनी असे नेमायचे. अशा धोरणाने ज्या अनिश्चिततेच्या नोकरया दिल्या जातात तिथे कामगारांचे शोषण अपरिहार्य ठरते. असे धोरण उद्योगात इतके प्रचंड प्रमाणात राबवले गेले आहे की केवळ बॉश कंपनीचे नाव घेउन त्यांना वेगळे दाखवणे रास्त नाही, हजारो उद्योगात आज हे शोषणाचे धोरण चालत आहे.
ह्या धोरणाचा एक भयंकर परिणाम होतो आहे. असे बघा की मालक अशा कामगारांना नेहमीच किमान वेतन देत आले आहेत. किमान वेतन वर्षानुवर्षे दिल्याचा काय परिणाम होत आहे ते बघू.
आपण अगोदर एका कामगारबंधुने दिलेली माहिती घेऊया. त्याला २०१० साली ७५०० रु दरमहा मिळत होते. आज त्याला ८८०० रु दरमहा मिळतात - ते हातात येतात, म्हणजे त्याला १०५०० रु महिन्याचे मिळतात असे समजू. ह्या काळात कन्झुमर प्राईस इंडेक्स १७६ वरून ३२० ला पोचला. म्हणजेच इंडेक्स ८२% वाढला. पण त्याचा पगार फक्त ४०% वाढला. [((१०५००-७५००)*१००/७५००)]. जर त्याला वाढीव महागाई पूर्ण प्रमाणात दिली गेली [त्याला १००% neutralisation म्हणतात, आणि तसे कोर्टाचे निर्णय आहेत,] तर त्याचा पगार रु १३६५० असता. [७५००*१.८२= १३६५०]. म्हणजेच कामगारांचे निव्वळ वेतन [रियल वेजेस] २०१० सालापासून ५१% घटले आहे. त्यांची क्रयशक्ती तशी कमी झाली आहे.
फॉरीन कंपन्यांचं काय घेऊन बसलात? हा बघा XXX कंपनीत काम करतो. त्याच्या कामाची बोलीच बारा तासाची आहे. म्हणजे बारा तास काम केलं की त्याला पंधरा हजार रुपये मिळतात. कधी कधी ओव्हरटाईम म्हणजे चार तास अधिक, सोळा तास काम केल्यावर त्याला चार पाच हजार रुपये वरचे मिळतात. बरं, आठवड्याची सुट्टी नाही, त्यादिवशी इतर कुठे कामाला बोलवतात. पगाराची स्लिपदेखील मिळत नाही.
तुम्ही त्याबद्दल कॉन्ट्रॅक्टरकडे बोलला नाही?
पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. त्याचं कनेक्शन पार वरपर्यंत म्हणजे अजितदादा पवारांपर्यंत आहे. कोण जाईल त्यांच्या वाटेला?
पण मला पुन्हा तोच प्रश्न विचारायचा आहे - तुमच्या कारखान्यातल्या युनियन करतात तरी काय?
उपयोग नाही, साहेब. अजून एक कामगार समजावू लागला. आमच्या कारखान्यात करार झाला, त्यात कांही कामगारांना परमनंट नोकरीवर ठेवल्याचं ठरलं. सगळ्यांना घेतलं पण चार कामगारांना परमनंट नोकरीत घेतलं नाही.
कां असं?
मॅनेजमेंट म्हणते की दोन स्टाफचे कर्मचारी युनियनमध्ये आहेत, ते चालणार नाही, त्यांना अगोदर युनियनबाहेर करा, मग बोला.
आणि युनियनचे कांही चालत नाही, करार असला तरीही?
होय
म्हणजे युनियन असून नसल्यासारख्याच
काय करणार साहेब, आहे हे असं आहे! 

बरीच शांतता! मग एक बोलला.
“माझी बायको बारावी शिकली आहे. आम्ही दहा बाय दहाच्या खोलीत राहतो. दोन शाळेत जाणारी मुले आहेत. ती दर संध्याकाळी कावते. मग खडाजंगी होते. आता सहन होत नाहीये.”
“ही तर घर घर की कहाणी आहे.”
बॉश कंपनीच्या कमिटीमेंबरला सोळा वर्षांनी का होईना, कायम स्वरूपी नोकरी मिळाली होती. आता तो भाग्यवान वाटू लागला होता.
   *          *          *
माझी त्या पंधरा-वीस कामगारांबरोबर झालेली चर्चा संपली तेव्हां डोकं भणभणत होतं. मला तो कामगार एका कोपऱ्यात दिसला - त्याच्या घरी मी जायचं कबूल केलं होतं . मी त्याला खुणावलं व आम्ही दोघ बाहेर निघून गाडीत बसलो. तो रस्ता दाखवायला पुढे बसला. एका ठिकाणी त्याने थांबण्याची खुण केली. रस्ता क्रॉस करताना माझ्या वयाकडे बघून त्याने माझा हात धरला. रस्त्यावर ऑटो सुसाट जात होत्या, त्यातून वाट काढत आम्ही रस्ता क्रॉस केला. मुख्य रस्त्यावरून एक अरुंद रस्ता जातो. डावीकडे टपरी म्हणावी अशी छोटी दुकानं होती. एका बोळात वळलो. आणि धारावीसारखी झोपडपट्टी चहूंकडे होती. सर्व घरांपुढे पाण्यासाठी ठेवलेले निळे ड्रम दिसत होते. एक बाई आपल्या वर्षाहून लहान असलेल्या बाळाला घराबाहेर अंघोळ घालत होती. कांही इतरजणी तशाच दाराबाहेर कपडे धूत होत्या, भांडी घासत होत्या, भिंती सर्व रंग गेलेल्या, त्यांचा निळा रंग चढून कांही वर्ष झाली असावीत.
आम्ही त्याच्या घरासमोर आलो. घराचे दार म्हणावे तर एक माणूस वाकून आत जाऊं शकेल असे. बाहेर एक तीन-चार फुटी अर्धी भिंत - तिच्या आडोश्याने अंघोळ करत असावे. मी क्षणभर बाहेरच घोटाळलो; त्याला आत जाऊन पत्नीला कल्पना देतां यावी की पाहुणा घरी आला आहे. ती खोली दहा बाय दहाची सुध्दा नव्हती. एका भिंतीला लागून किचन प्लॅटफॉर्म असावा असे एक लाकडी फळकुटांचे टेबल, आणि त्यावर एक गॅसची शेगडी. त्याच्या समोरच्या भिंतीत कपडे ठेवायची जागा, बाजूच्या भिंतीत ऍल्युमिनियमचे डबे. त्या खोलीतून आत जाण्यासाठी एक दरवाजा होता. म्हणजे, ती लहान खोली देखील आत जाण्याच्या वाटेमुळे दुभागली गेली होती. 
'साहेब, इथे चार जण एकत्र खाली बसूं शकत नाहीत' तो म्हणाला.
ते सांगायची गरजच नव्हती, तसं दिसतच होतं. त्याची पत्नी उभी होती, तिला बसण्यासाठी तो अवघडून बसला.
"कधीपासून राहताय इथे?'
"माझे वडील बहात्तर सालच्या दुष्काळात इथे आले. ते परत गावाला कधीच गेले नाहीत.”
मी अनेकदा झोपड्यात [झोपडपट्टी म्हणा हवे तर] गेलो आहे, तरीही हा अनुभव नवीन आणि अस्वस्थ करणारा होता. कसे राहत असतील इथे चौघे जण? पाय लांब करायला जेमतेम जागा होती. मुले शाळेत जाणारी असली तरीही 'प्रायव्हसी' मिळणे अशक्यच होते.
"तुम्ही भावाबरोबर राहता, होय ना? काय करतात ते?"
"मला ठाऊक नाही" तो म्हणाला. त्याच्या हावभावाने लक्षात आले की दोघांचे पटत नाहीये. जेव्हा माणसांना पुरेशी जागा नसते, तेव्हा कुरबुर आणि भांडणे वाढतात. म्हणजे त्याची फक्त एकच खोली होती.
त्याची पत्नीनेही मन डोलावली. 'ते कधीही येतात आणि जातात.' ती त्याच्या भावाबद्दल बोलत होती. जागा कमी त्यात अशी समस्या. ती हसली.
हा माणूस गंभीर प्रकृतीचा होता पण त्याच्या पत्नीकडे एक सुंदर स्मितहास्य होते. कोणताही माणूस आणि त्याची पत्नी हे अगदी भिन्न प्रकृतीचेच असतात, तश्याच जोड्या 'तो' जमवतो. समान बाजू इतकीच की दोघेही अंगाने सडसडीत होते.
"मी बारावी शिकले आहे. जवळच्याच ऑफिसमध्ये मी काही काम करते, त्याचे सहा हजारापर्यंत मिळतात."
"ती जमाखर्च काटेकोरपणे पळते." तो म्हणाला.
"ते पगार आणतात तो पर्यंत माझी यादी तयार असते. कुणाला किती द्यायचे आहेत त्याची."
'पंधरा वर्षं सर्व्हिस झाली, माझ्या बरोबर काम करणार्याला कायम स्वरूपी नोकरी दिली, पण मी तसाच आहे, मी अजूनही टेम्पररी. आताशा कोणीच पर्मनंट करत नाहीत. काहीच आशा नाही."
“ब्रेकमध्ये काय करता?
"नाक्यावर जाऊन उभा राहतो. नशिबात असलं तर पेंटिंगचे काम मिळते. नाही मिळालं तर घरी परत येतो.”
मला काय बोलायचं तेच कळत नव्हतं. तेवढ्यात ऍल्युमिनियमच्या डब्यांजवळून खुडखूड आवाज आला.
'घरात गणपती आहे मग उंदीर येणारच' त्याने भिंतीवरच्या गणपतीकडे बोट दाखवले. तो त्याचा टेन्शन मिटवायचा प्रयत्न होता, आम्ही तिघेही हसलो.
राहणीमान सुधारलंच नाही, उलट अवघड होऊन बसलंय. मुलं मोठी होत आहेत. मोठा सातवीत तर धाकटा चौथीत आहे. मोठ्याची फी साडे तीन हजार आहे, इतर खर्च वेगळाच.'
कसे राहतो आम्ही या जागेत ते आमचं आम्हालाच माहीत.
महिना संपत आला की आमच्या दोघांची भांडणं सुरु होतात, काय करणार? गांजून गेलोय.
काल प्रोजेक्ट का कशाला पैसे हवे म्हणाला हा मुलगा. कुठून आणायचे? तो बोलू लागला. मी उठतच होतो तेवढ्यात ती दोन्ही मुले आत आली. मी काहीतरी विचारायचे म्हणून बोललो, कायरे, मोठा झाल्यावर कोण व्हायचंय?
'मला आर्मीत जायचंय' एक म्हणाला, 'मी इंजिनीयर' दुसरा म्हणाला.
मी आणि तो चालत माझ्या गाडीकडे निघालो. दोघेही निःशब्द. गाडीपाशी पोहोचताच तो म्हणाला, 'साहेब मला माझ्या मुलांना इथल्या मुलांची संगत लागायला नको आहे. पण ते कसे टाळायचे ते मला माहित नाही. त्यांना क्लासला घालायचे आहे. कसं काय जमवायचं कळत नाही.
आम्ही रस्ता ओलांडून माझ्या गाडीजवळ आलो होतो, आमच्या भेटीने त्याला भरून आले होते. आणि मलाही.
“त्यांची स्वप्नं आहेत. पण मी नोकरीत पन्धरा वर्ष काढली आहेत. अजून किती वर्षं काम करायला जमेल ते ठाऊक नाही. त्याला शाळा संपताच काम धरायला लागेल.”
आम्ही रस्ता ओलांडून माझ्या गाडीजवळ आलो होतो, "धीर धर, सगळं ठीक होईल." मी त्याचा हात धरून म्हणालो.
जे मलाच अजिबात पटलेलं नाही असं काही मी आयुष्यात प्रथमच बोलून गेलो होतो.
         *          *          *
अतीव अनिश्चितता आणि असुरक्षितता ह्या त्यांच्या पाचवीलाच पुजल्या आहेत. ट्रेड यूनियननी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळवलेले हक्क त्यांना दिले जात नाहीयेत. जागतिकीकरणाचा मलिदा इतर कोणी घेऊन गेले आहेत. इथे एक खदखदणारा अंगार आहे, त्या बरोबर हतबलताही आहे.
काळच सांगेल आपल्याला की त्यात क्रांतीची बीजे आहेत की नाहीत.
विवेक पटवर्धन

Wednesday, September 5, 2018

ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करणाऱ्याचे घर


“लंडनमध्ये बराच काही बघण्यासारखं आहे, तिथल्या बिल्डिंग देखील शेकडो वर्षांचा इतिहास सांगतात. तुम्ही त्याच्याबद्दल माहिती काढा.” कवीअरसु हा माझा मित्र. आमच्यासाठी तो फक्त कवी. ह्याचे डोके म्हणजे भन्नाट कल्पनांचे भांडारच. “मी तीन महिने लंडनमध्ये, म्हणजे विम्बल्डनला राहणार आहे, इतके दिवस तिथे काय करू?” ह्या प्रश्नाचे उत्तर कवीकडून मिळाले ते असे.
अशी माहिती घेऊन पुढे काय करायचे ते ही आम्ही ठरवले. माझी ही चौथी खेप आहे. दर वर्षी मी इथे दोन महिने राहतो, ह्या वर्षी मुक्काम मोठा आहे. इथे नवीन काही दिसेल असे मला वाटले नव्हते. जुन्या बिल्डिंगा पहायच्या तर लंडनच्या मुख्य भागातच [गावठाणातच म्हणणार होतो!] घुसावे लागेल असं मी समजलो.
माझा कयास मी बोलून दाखवला. “डोळे उघडे ठेवून चला म्हणजे दिसेलच काहीतरी” असा प्रेमळ सल्ला सौ ने दिला. मी तो माझ्या डोक्यात फाईल केला. मी नेहमीप्रमाणे काहीच बोललो नाही, वाद कशाला घालायचा? तीन वर्ष एकही ऐतिहासिक इमारत दिसली नाही, आता कुठून दिसणार?
विम्बल्डन म्हणजे लंडनचे एक उपनगर. इथे काही जुन्या इमारती आहेतही, पण ऐतिहासिक अशा काही दिसणे कठीणच, अशी माझी समजूत! इथे जुनी पुराणी ऐतिहासिक अशी एकच वास्तू – ती म्हणजे टेनिस क्लब.
संध्याकाळी आम्ही दोघे फिरायला बाहेर निघालो. आमची दहा वर्षांची नात बरोबर होती. विम्बल्डन कॉमन – हे एक अतिशय मोठे मैदान आहे – जसे आम्ही त्याच्याजवळ आलो तशी उजव्या बाजूला एक पांढरी शुभ्र सुंदर बिल्डींग दिसली.
“इट युज्ड टू बी अ स्कूल, इट्स अ व्हेरी ओल्ड बिल्डींग.” आमच्या नातीने माहिती पुरवली. प्रवेश द्वारावर एक निळे प्लाक होते. जुन्या ऐतिहासिक घरांवर लंडनला प्लाक लावतात. [पुण्यातही काही ठिकाणी असे बघायला मिळते!].
प्लाकवरची व इतर माहिती थक्क करणारी:
ती इमारत बांधली रोबर्ट बेलने १६१३ साली, ईगल हाउस असे तिचे नाव. त्याचे वडील व आजोबा राहत होते तिथेच त्याने अधिक जागा खरेदी केली, आणि इमारत बांधली. रोबर्ट बेल कोण होता? हा एक व्यापारी होता आणि तो चक्क ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करणाऱ्यांपैकी एक होता! ती इमारत पुढे इतरांना विकली गेली.
पुढे १७८७ मध्ये तिथे शाळा उघडली गेली. प्रख्यात जर्मन तत्ववेत्ता शोपन्होवर त्याच शाळेत १८०३ साली विद्यार्थीदशेत शिकत होता.
कल्याणमध्ये देखील मी कित्येक वाडे असे पाहिले आहेत की जे तीनशे वर्ष जुने होते. ते सर्व आता इतिहासजमा झाले आहेत. मला वाटते सुभेदार वाडा सोडता एकही शिल्लक नसावा. जाऊ दे. इतिहासातून आपण काही शिकलो नसेल पण इंग्रजांकडून इतिहास कसा जपावा हे फारच शिकण्यासारखे आहे.

विवेक पटवर्धन 

Monday, September 3, 2018

जेव्हां बक्षीस उफराटे काम करते


अल्फी कॉन हा एक भन्नाट माणूस आहे. शिक्षणाच्या मानसशास्त्रावर त्याचं खूप संशोधन आहे. त्याचे निष्कर्ष उद्योगात लागू होतात तसेच पालकत्वातही. अशी माणसं अनेकदा वादाच्या भोवर्‍यात सापडतात, कारण ते बिनबुडाच्या पण जनमानसात खोलवर रुजलेल्या समजुतींवर घणाघाती आघात करतात.
अल्फी कॉनचे एक अप्रतिम पुस्तक आहे ‘Punished by Rewards.’ रिवार्ड म्हणजे बक्षिस. त्याचा परिणाम आनंददायी असायला हवा. पण काही वेळा तो उफराटा होतो!
अल्फीच्या Punished by Rewards पुस्तकातली गोष्ट: एका म्हाताऱ्याच्या लक्षात येते की तो बागेत बसला असताना रस्त्यावरून जाणारी शाळकरी मुलं त्याची टिंगल करतात. हा प्रकार काही दिवस चालल्यावर म्हातारबुवांना एक युक्ती सुचते. एके दिवशी ते मुलांना भेटून म्हणतात, “मला माहित आहे, तुम्ही माझी टिंगल करता, मस्करी करता. उद्यापासून अशी टिंगल आणि मस्करी करण्याचे मी तुम्हाला रोज एक डॉलर बक्षिस देईन.” मुलं अर्थातच खुश होतात, आपलं काम चालू ठेवतात. आठवड्याभराने भेटल्यावर म्हातारबुवा म्हणतात, “मी दरात बदल करतोय, उद्यापासून टिंगल-मस्करी करायचे मी रोज पन्नास सेंट बक्षिस देईन.” मुलांच्यात कुरबुर होते पण ते काम चालू ठेवतात. पुन्हा आठवड्याभराने भेटल्यावर म्हातारबुवा म्हणतात, “मी दरात बदल करतोय, उद्यापासून टिंगल-मस्करी करायचे मी दररोज एक सेंट बक्षिस देईन.” तो ऐकून मुलं म्हणतात “हॅ:, हे कोण करील?
थोडक्यात सांगायचं तर आपण जे काम करतो त्याबद्दल आपल्याला कुतूहल असतं. त्या कामात आपल्याला रस असतो, आपण त्या कामाचा विचार करत असतो. बक्षिस दाखवलं, प्रलोभन म्हणा हवं तर, की हा सांधा खिळखिळा होतो, माणसांना कामात रस किंवा त्याचे आकर्षण वाटत नाही.
हे आठवायचं कारण म्हणजे अल्फी कॉनला ओप्रा बाईंनी त्यांच्या टीव्हीवरच्या  कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. ओप्रा बाईंचा कार्यक्रम जगविख्यात आहे. त्या कार्यक्रमात त्यांनी एक प्रयोग केला व अल्फीच्या संशोधनाची चांचणी झाली.
त्यांनी वीस मुलांना प्रयोगासाठी बोलावले. प्रत्येक मुलगा वेगवेगळ्या वेळी बोलावला होता. प्रयोगाची रीत अशी: मुलगा प्रोड्यूसरला भेटत असे, पण प्रोड्युसर त्यास आपण एका खेळणी बनवणाऱ्या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवीत असे. मुलाला त्याचे काम समजावून देण्यात येई – ते म्हणजे त्याने त्याच्यासमोर ठेवलेल्या कोड्यांची पारख करणे, तपासणे.
दहा मुलांचा एक गट असा होता की प्रत्येकाला हे काम करण्यासाठी पाच डॉलर देऊ केले गेले होते. पाच डॉलरची नोट त्यांच्या टेबलावर ठेवण्यात देखील आली होती. इतर दहा मुलांना असं बक्षिस देऊ केलं गेलं नाही.
प्रत्येक मुलाने कोड्यांची पारख केली, तपासले, काम संपले की थोडा वेळ तिथे तो एकटाच असे. त्याला तसं थोडा वेळ ठेवण्यातच येत असे. प्रत्येक मुलाच्या कामाचं त्याच्या अपरोक्ष आणि लपून म्हणा हवं तर, व्हिडीओ रेकोर्डिंग करण्यात आलं.
काम झाल्यानंतर मुलगा काही वेळ खोलीत एकटाच असे. त्या व्हिडीओ रेकोर्डिंगमध्ये काय दिसलं?
ज्यांना पाच डॉलरची प्रलोभने दाखविली नव्हती ती सर्व दाही मुलं काम संपल्यावर मिळालेल्या फावल्या वेळातही कोड्यांशी खेळत राहिली – त्यावेळी तिथे कोणी नसताना देखील.
याउलट ज्यांना पाच डॉलरचे प्रलोभन दाखविले होते त्यातल्या दहापैकी नऊ जणांनी कोड्यांकडे ढुंकूनही पहिले नाही.
अक्षरश: शेकडो प्रयोगातून हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालंय की जेव्हा एखादं काम करण्यासाठी प्रलोभन दिलं जातं तेव्हां त्या कामात माणसाला रस वाटत नाही, त्यातला त्याचा इंटरेस्ट संपतो! पैसा आणि तशीच दिली जाणारी आमिषे, बक्षिस, रिवार्ड, कामातला राम संपवतात!!
तरीही उद्योगात व घराघरात काय बोलले जाते? कसली बक्षिसे दाखवली जातात काम करण्यासाठी? कुछ समझे?
विवेक पटवर्धन

Tuesday, August 21, 2018

कामगार संघटनांचे नेतृत्व आणि आव्हाने


श्रमिक एकता-महासंघाच्या कार्यशाळेतील माझे भाषण  दि. ७ ऑगष्ट २०१८

मित्रहो,

सर्वप्रथम तुमचे आभार! आभार केवळ आजच्या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलावल्याबद्दलच नाही, तर तुम्ही मला आपला मित्र आणि हितचिंतक मानला आहे त्याबद्दल देखील. अरविंद श्रौतीमुळे आपली ओळख झाली व स्नेह वाढला म्हणून त्यांचे देखिल आभार मानतो.

'कामगार संघटनांचे नेतृत्व आणि त्यापुढील आव्हाने' असा विषय मला सुचवला आहे. मी जरी कामगार संघटनांचा कार्यकर्ता नसलो तरी मी त्यांचे काम जवळून पाहिलं आहे. तुम्ही सर्वजण अनेक वर्षं कामगार संघटनांचे पदाधिकारी आहात, त्यामुळे तुमची कामगार संघटनांचे नेतृत्व व आव्हाने या विषयावर ठाम मते असणार. पण माझा व तुमचा या विषयाकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असणारच. दोन वेगळ्या दृष्टिकोनातून आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो तेव्हां त्यातली खोली कळते. असं म्हणतात की देवाने आपल्याला दोन डोळे दिले आहेत आणि त्यात अंतर ठेवलंय त्याचं कारणही हेच आहे की आपण प्रत्येक चीज दोन दृष्टिकोनातून पहावी. एक डोळा मिटून तुम्हाला खोली कळते का पहा, म्हणजे दोन दृष्टिकोनांचे महत्व कळेल.

मला आज जे सांगायचे आहे ते थोडक्यात असे : माहितीयुगातली संघटना (कल्चर) बांधणे, स्वतःची नकारात्मक प्रतिमा झटकून सकारात्मक करणे, कामगाराभिमुख कार्यक्रम बनवणे तसेच औद्योगिक संबंधांना सहकार्याची व सहभागाची दिशा देणे हीच सर्वात मोठी आव्हाने आहेत.

     मी १९७३ साली नोकरी धरली. त्यावेळेचे औद्योगिक संबंध अतिशय ताणतणावाचे होते. महागाई तर दरवर्षी बारा-पंधरा टक्क्याने वाढत होती, महागाई ह्या शब्दाबरोबर भस्मासूर हा शब्द जोडणे. म्हणजे महागाईचा भस्मासूर म्हणणे नेहमीचेच होते. संप होण्यात नाविन्य काहीच नव्हतं, परंतु संपही दीर्घकाळ चालत होते. हिंसाचार बोकाळला होता. मॅनेजमेंट व कामगार संघटनांनी परस्परसहाय्य केल्याच्या घटना तुरळकच होत्या, अपवादात्मकच होत्या. औद्योगिक न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशासमोर दररोज शंभरावर केसेस सुनावणीसाठी असत.

     आज पंचेचाळीस वर्षांनी परिस्थिती अगदी उलट झाली आहे. महागाईचा दर सहा टक्क्यावर आला आहे, महागाई शब्दाबरोबर भस्मासूर हा शब्द फारसा जोडला जाताना दिसत नाही, संप दीर्घकाळ चालत नाहीत, हिंसाचार तुरळक होत आहे, औद्योगिक न्यायालयातील केसेस इतक्या घटल्या आहेत की कित्येक वकिलांना केवळ कामगारांचे किंवा मॅनेजमेंटचे काम घेऊन उदरनिर्वाह करतां येईल कां असा प्रश्न पडावा. परंतु कांही फरकही आहेत. त्यावेळी औद्योगिक संबंध ताणतणावाचे होते, कामगार संघटना तुल्यबळ होत्या, मॅनेजमेंटला टक्कर देऊ शकत होत्या, आता मूड हताशपणाचा दिसतो आहे. मॅनेजमेंट व कामगार संघटनानी परस्पर सहाय्य्य करण्याचा प्रश्नच उदभवत नाही, अनेक ठिकाणी मी म्हणेन ती पूर्व अशी भूमिका आहे. तुम्हाला कांही अपवाद आढळतीलही, परंतु सर्वसाधारणपणे परिस्थिती ही अशी आहे, असं माझं आकलन आहे.

     असे आमूलाग्र बदल घडवून आणण्यात जी कारणे आहेत त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण. त्याचे परिणाम सर्वश्रुत आहेत, तरीही दोन परिणाम आजच्या चर्चेला नमूद करायला हवेत. पहिला म्हणजे व्यवस्थापन व कामगार संघटनांना जाणीव झाली आहे की त्यांचा खरा शत्रु कामगार संघटना किंवा व्यवस्थापन नसून आंतर्देशीय स्पर्धा आहे. आता वॉलमार्टने इथे तंबू टाकायचं ठरवल्यावर वर्तमानपत्रातली उलटसुलट चर्चा वाचली तर हे स्पष्ट होतं. दुसरा परिणाम म्हणजे औद्योगिक कंपन्यांच्या स्वरूपातील बदल. हे मी उदाहरणाने स्पष्ट करतो - पूर्वीच्या औद्योगिक कंपन्या बिल्डींगसारख्या होत्या, म्हणजे पैसे जमले की एक मजला चढवता येत होता - त्यात जुने तर होतेच पण नव्याची भर होती. आता नव्या जमान्यातल्या औद्योगिक कंपन्या नारळाच्या झाडासारख्या आहेत - ज्या झावळ्या आज दिसतात त्या उद्या पडतात व तरीही झाड वरवर वाढते आहे. इथे जे निरुपयोगी आहे कालबाह्य झाले आहे ते दूर सारले जाते. कित्येक जॉब व कारखाने बंद झाले ते यामुळेच. आता हा नियम तुम्हाला आवडो वा न आवडो - पण परिणाम टाळता येणार नाही.

एक नजर राष्ट्रीय स्तरावर

भारत सरकारने 'मेक इन इंडिया' योजना जाहीर केली, त्याबद्दल तुम्हांला माहिती आहेच. परंतु उद्देश काय? तर माझ्या मते तो असा की मेक इन इंडियामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारले पाहिजे, नागरीकांना त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली पाहिजे. जर तसं झालं नाही तर 'मेक इन इंडिया' सपशेल फसला असेच म्हणावे लागेल.

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रोजगार प्रचंड प्रमाणात वाढला पाहिजे. रोजगार वाढीला भांडवल लागतं, त्याच्यासाठी परकीय गुंतवणूक पाहिजे. परंतु परदेशीय गुंतवणूक कां होते? कारण इथे भारतात मनुष्यबळ मुबलक आणि म्हणूनच स्वस्तात उपलब्ध आहे. म्हणजे जोपर्यंत मनुष्यबळ मुबलक व स्वस्त दरात उपलब्ध असेल तोपर्यंत परकीय भांडवल आपल्या देशात येईल. तेव्हां मनुष्यबळ स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार अनेक उपाय योजले. आता तुमच्या सहज ध्यानात येईल की नीम, यशस्वी सारखे अर्न व लर्न अशा योजनांना राजमान्यता कशी मिळते ते. तेव्हां मनुष्यबळ स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार अनेक उपाय योजते. आता तुमच्या सहज ध्यानात येईल की नीम, यशस्वी सारखे अर्न व लर्न अशा योजनांना राजमान्यता कशी मिळते ते. सरकारसाठी ही तारेवरची कसरत आहे. मी जागतिकीकरणाबद्दल बोललो होतो सुरुवातीस - आता वेगळं दृश्य दिसत आहे. ट्रम्पसाहेबांची धोरणं, ब्रेक्झिट वगैरे उलटे प्रवाह वाहू लागले आहेत, म्हणजे डी-ग्लोबलाझेशन होऊं लागलंय. त्याचे परिणाम म्हणजे वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेची खुंटलेली वाढ.

हा मुद्दा आपण ध्यानात घेऊन पुन्हा आपल्या अर्थव्यवस्थेकडे येऊं या. २०१६ च्या नोव्हेंबर महिन्यात एक बातमी आली - लार्सेन ऍण्ड टुब्रो कंपनीने वर्षभरात १४,००० माणसं कमी केली होती. त्याहून मोठा धक्का लार्सेन ऍण्ड टुब्रो कंपनीच्या चीफ फायनान्शियल ऑफिसरच्या व्यक्तत्वाचा होता. ते म्हणाले, 'आम्ही आमच्या स्पर्धेमध्ये अग्रेसर राहण्यासाठी डिजिटायझेशनचा अवलंब केला आहे, जिथे एखाद्या कामासाठी दहाजण लागत असले तर तेच काम पाच माणसांकडून करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत.' तसंच रेमंड कंपनीच्या चीफ एक्झिक्युटिव्ह संजय बहल यांचं व्यक्तत्व आहे की तीन वर्षात रोबो व आधुनिक तंत्रज्ञान वापरून दहा हजार पदं कमी होतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा औद्योगिक क्षेत्रावर कोणता परिणाम होणार या प्रश्नावर बरीच उलटसुलट चर्चा सुरु आहे. माणसांचं काम यंत्रं करू लागली की एक परिणाम अटळ आहे - तो म्हणजे वेतनाची पातळी खालावणार. तिथे माणसांची कामासाठी गरजच कमी होईल, तिथे वेतन घटणारच - एक कयास असा आहे की वेतनाची पातळी अगदी उदरनिर्वाहाला लागणाऱ्या वेतनापेक्षा कमी होईल!

वेतनाच्या पातळीबद्दल बोलताना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात, त्यांची नोंद घेतलीच पाहिजे - प्रथम म्हणजे कर्मचाऱ्यांची उत्पादकता ५ टक्के वाढली, परंतु त्यांचे 'रियल वेज' एक टक्काच वाढलं. ही आठ वर्षांच्या १९९९ ते २००७ च्या कालावधीची कथा आहे. नंतरच्या कालावधीमध्ये वेगळं कांही सांगण्यासारखं असेल असं वाटत नाहीये. म्हणजे अर्थव्यवस्थेत प्रचंड वाढ झाली पण कामगारांच्या हाती काहींच लागलं नाही ये स्पष्ट झालयं. इकॉनॉमिक ग्रोथ व इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास ह्या दोन भिन्न संकल्पना आहेत. जीडीपी वाढला तर आर्थिक वाढ झाली म्हणायचे आणि ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढला तर आर्थिक विकास झाला आहे असे मानायचे.जीडीपी वाढतोय, पण ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये आपण घसरतोय (२०१७ चा रिपोर्ट), याचा अर्थ काय झाला? ते शाळकरी पोरांना देखील सहज समजेल.

वेतन पातळीबद्दल दुसरी गोष्ट म्हणजे वाढती तफावत. सर्वाधिक पगार तर चीफ एक्झिक्युटिव्हला मिळतो, तर सर्वात कमी पगार अकुशल कामगाराला मिळतो. मागील वीस-पंचवीस वर्षात सर्वाधिक व सर्वात न्यून वेतनाच्या पातळीतली दरी रुंदावली. आता सीईओला अकुशल कामगाराच्या पाचशेपट वेतन मिळतं. ते किती अधिक मिळायला हवं याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. पीटर ड्रकर हे मॅनेजमेंट गुरु, ते म्हणतात सीईओला वीसपट अधिक वेतन मिळायला हवं. स्वित्झर्लंड देशात तर सीईओचं वेतन अकुशल कामगाराच्या वेतनातून १२ पटीपेक्षा अधिक असतां कामा नये असा कायदा करण्याचा असफल प्रयत्न झाला. आपल्या देशात भूतलिंगम कमिटीने हा आकडा १६ पट ठरवला तो कुणीही मानला नाही. सध्या सीईओला ५०० पट अधिक वेतन मिळतंय. त्याला मिळूं दे, पण सर्वसाधारण कामगारांचं वेतन जर जैसे थे आहे तर त्याचा अर्थ आर्थिक विकास, जीडीपी वाढ वगैरेचा मलीदा एका विशिष्ट गटाने गट्टम केला आहे.

मला ठाऊक आहे की एका नावाजलेल्या उद्योजकाने जेव्हा सत्तरीच्या दशकात नवा कारखाना उभारला तेव्हा त्याच्या व्यवस्थापकाने कामगारांचे सुरवातीचे पगार किती असावेत त्याचा प्रस्ताव मांडला. तो उद्योजक म्हणाला, “इतका कमी पगार लोक देत असतीलही पण माझ्या कामगारांना मानाने जगता येईल इतका तरी पगार द्यायला हवा”. आजचे उद्योजक असा विचार करतात असे दिसत नाही. ते एक समजू शकतो, ते एका व्यवस्थेचे गुलाम आहेत, पण तुम्ही कामगार नेते तरी असा विचार करता का, हा खरा प्रश्न आहे!

आपण युनियनच्या नेतृत्वाबद्दल चर्चा करतो आहोत म्हणून ही पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक झालंय.

आता आपण कामगार कायद्यांकडे वळू या. सर्वत्र हाकाटी अशी आहे की कामगार कायदे कालबाह्य झाले आहेत - आणि हे खरेही आहे. परंतु त्यापेक्षाही महत्वाची बाब ही आहे की व्यापार सहज करतां येत नाही. आज आपल्याच देशातले उद्योजक म्हणतात की भारतात व्यवसाय उभा करण्यापेक्षा जगात इतरत्र करणे कितीतरी सोपं आहे. ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी घालून दिलेल्या लालफितीतून व्यवसायासाठी परवाने मिळवणे दुरापास्त गोष्ट आहे. अरुण मायरा हे नावाजलेले विचारवंत व व्यपस्थापन सल्लागार आहेत, त्यांनी स्पष्टच लिहिलंय की (लेबर लॉ) कामगार कायदे हे पहिल्या तीन अडथळ्यांपैकी नाहीयेत ही गोष्ट वारंवार सिद्ध झाली आहे - इंडस्ट्री असोसिएशनच्या, कन्सल्टिंग कंपन्यांच्या आणि सरकारी कमिशनच्या पाहणीतून पुन्हा पुन्हा सिद्ध झाली आहे. मूळ समस्या आहे ती 'इझ ऑफ डुईंग बिझनेसची.'

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी

कामगार संघटनांच्या पुढे अनेक आव्हाने आहेत. त्यातले पहिले आव्हान आहे ते जनमानसातील त्यांच्या प्रतिमेचे. वास्तविक सहजीवन, सहकार्य ही आपल्या समाजाची ओळख. पण राजकीय नेत्यांनी कामगार संघटनांचे नेतृत्व बळकावल्यावर कामगार अक्षरशः वापरले गेले. आज कुठे आहेत ते नेते? परंतु त्यांनी कामगार संघटनांची प्रतिमा मलीन केली यात दुमत असूच शकत नाही. अगदी नांवाजलेली मजूर महाजन घ्या. मजूर महाजन ही एक आदर्श युनियन वाटावी असे तिचे कामकाज होते. आम्ही कॉलेजात असताना मजूर महाजनच्या कार्यालयात दिवसभराची भेट देणे हा आमच्या शिक्षणाचा भाग होता. त्याच मजूर महाजनबद्दल आता उलटसुलट छापून येतंय. मुंबईतल्या दोन-चार संघटना सोडल्या तर इतर युनियनची दुकाने बनली. मुख्य म्हणजे कामगारही दर तीन वर्षांनी नव्या युनियनचे सभासदत्व पत्करू लागले. अशा एकखांबी तंबूकडे कामगारांसाठी ठोस कार्यक्रम नव्हता आणि संघटना म्हणावे अशी त्यांच्या संस्थेची रचनाही नव्हती. अशा एकखांबी कामगार संघटनांनी तात्कालिक कांही मिळवले असेलही, पण दूरगामी काय व किती मिळवले? माझ्या मते काहीच नाही. त्याचे कारण - जसं राजकीय नेता होण्यासाठी दंडुकेशाही करण्याखेरीज इतर कोणत्याही पात्रतेची जरूर भासत नाही, तसंच कामगार नेता होण्यासाठी पात्रतेची जरूर भासत नव्हती - कारण इथे राम और श्याम दोघेही एकच होते, जुळेही नव्हते. अशा कामगार नेत्यांनी कामगार चळवळीचे नुकसानच केले आहे.

महाराष्ट्रात शून्यातून विश्व् निर्माण करण्याची परंपरा आहे. डॉ. बाबा आमटे, दत्ता इस्वलकर अशी कितीतरी नांवे घेता येतील. माझ्या मते इस्वलकरांनी जे कार्य करून दाखवलंय त्याला तोड नाही. एक गिरणी कामगार गिरण्या बंद झाल्यावर वीस हजार कामगारांना घरं कशी मिळवून देऊ शकतो ही इस्वलकरांची कामगिरी अशी आहे की जिचा अभ्यास प्रत्येक कामगार नेत्याने केला पाहिजे. संघटना कशी बांधावी, एक ठोस कार्यक्रम कसा द्यावा व अंमलात आणावा ह्याचे इतके उत्तम उदाहरण इतरत्र सापडणार नाही. राजकीय नेते, धनाढ्य बिल्डर्स आणि गडगंज संपत्ती घेऊन बसलेले गिरणीमालक ह्यांच्या विरोधात इस्वलकर उभे राहिले. वीस हजार कामगारांना घरं मिळाली आणि एकूण दीड लाख गिरणी कामगारांना घरं त्यांच्यामुळे मिळतील.

असाच एक माणूस आपल्यातही आहे – अरविंद श्रौती. पण रूढार्थाने त्यांना कामगार नेता म्हणतां येणार नाही कारण ते सल्लागार आहेत - पण अरविंदचं कामही तसंच पायाभूत आहे - दुर्दैवाने अरविंदच्या भरघोस कार्याची जेवढी दखल घ्यायला हवी तेवढी घेतली गेली नाहीये, नाहीतर मॅगसेसे सारखे पारितोषिक त्याच्या हातात आत्तापर्यंत पडायला हवे होते.

नेतृत्वाची सुरवात कुठून होते?

दत्ता इस्वलकर, डॉ. बाबा आमटे, डॉ. बंग, डॉ. बावस्कर वगैरे मंडळींच्या हातून इतकं भरीव कार्य कसं झालं? कामगार नेत्यांना काही भरीव कार्य करून दाखवायचं असाल तर त्यांनी त्यावर विचार करायला हवा. भरीव कार्य अनेक कारणांमुळे झाले असले, तरी त्यातले माझ्या मते अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे त्यांना एखाद्या विषयाबद्दल वाटणारी कळकळ.
कांहीतरी पटत नाही आणि स्वस्थ बसवत नाही तेव्हा वाटते ती ळ. कांहीतरी नाही आणि स्वस्थ बसवत नाही तेव्हा वाटते ती मळमळ!   

     मला असं वाटतं की कशाबद्दलतरी कळकळ वाटण्यापासून नेतृत्वाची सुरवात होते. कांहीतरी करून दाखवलं पाहिजे! तेव्हां माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की तुम्हाला करून दाखवायचंय - कामगार क्षेत्रातल्या अशा कोणत्या समस्या आहेत ज्या तुम्हाला सर्वप्रथम सोडवायच्या आहेत? आणि तुमचा हा मनसुबा तुम्ही जाहीर करायला तयार आहात काय? तसं करणार नसाल तर तुमच्या मागे कोणते कामगार उभे राहणार आहेत?


कंपन्यांतले नेतृत्व व कामगार संघटनांच नेतृत्व हे भिन्न प्रकार आहेत

     मला वाटतं की कामगार संघटनांचं नेतृत्व करणं ही एक अवघड जोखीम आहे. कंपन्यांत लीडरशीप म्हणजे नेतृत्वाबद्दल प्रशिक्षण दिलं जातं. परंतु कंपन्यांतले नेतृत्व व कामगार संघटनांच नेतृत्व हे भिन्न प्रकार आहेत. कंपन्यांत आदेश न मानणे शक्यच नसते, हायरार्कीची शिस्तच तशी असते की वरिष्ठाने एकदा निर्णय घेतला की त्यावर अपील नाही. पण युनियनमध्ये तसे होत नाही. नेत्याची कामगिरी पटली नाही तर कामगार इतर युनियनकडे जायला मोकळे असतात. म्हणजेच युनियनच्या नेत्याकडे सभासदांना प्रभावित करून, वश करून आपल्याकडे ठेवावे लागते, त्यासाठी त्याला अधिकाराचा वापर करतां येणं शक्यच नसतं.

कोण आहेत तुमचे सभासद? काय हवे त्यांना? माहिती घेऊन बोला….

म्हणूनच कामगार नेत्याने आपली उद्दिष्ट, त्याला व्हिजन म्हणा हवं तर, लोकांपर्यंत पोचवणं आवश्यक आहे. तुमच्या सारख्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना हे आजच्या युगात शक्य आहे - जरी सतरा हजार सभासद असले तरीही. इ-मेल व व्हाट्सऍप तुमचा मेसेज क्षणार्धात लोकांपर्यंत पोचवतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वांच्या संपर्कात राहणे सहज शक्य आहे. परंतु नव्या युगाची संघटना बांधायची तर जुन्या युगाची तंत्र चालतील काय? आजच्या जगात प्रत्येक ठिकाणी पुराव्यासहित बोलावं लागतं - माहिती/डेटा उपलब्ध असतो. मी एका ऑफिसमध्ये गेलो होतो तिथे बोर्ड होता - We believe in God, all others must come with data. म्हणजे "आमचा देवाचा शब्द प्रमाण मानतो, इतर सर्वांनी आपली मतं योग्य माहितीसकट मांडावीत." तुमच्या फेडरेशनकडे सभासदांचा किती डेटा आहे त्याची मला कल्पना नाही - पण पुरेसा डेटा नसला तर आजच्या जगात तुमचा प्रभाव कमी होईल ह्याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे. अरविंद श्रौती अनेकदा 'युनियन इन्फर्मेशन सिस्टीम' तयार करण्याबद्दल बोलतात ते यासाठीच. सर्वसाधारण कामगाराचा पगार किती, शिक्षण किती, तो कंत्राटी पद्धतीत काम करतो की कायम स्वरूपी नोकरीत, त्याचे वय किती, त्याच्यापुढच्या समस्या कोणत्या ही सर्व माहिती उपलब्ध असायला हवी, आणि संघटनेचे कार्यक्रम सभासदांच्या समस्या सोडवणारे असायला हवेत. आजच्या तंत्रयुगात माहितीचा वापर महत्वाचा आहे.

सरकार दरबारी कोण विचारतं तुम्हाला?

     मी अगोदर म्हटल्याप्रमाणे कामगार नेत्यांचा दबाव व दबदबा आता पूर्वीसारखा राहिला नाही. पूर्वी राजकीय नेते कामगार पुढारी होत होते, आता कामगार पुढाऱ्यांनी विधानसभेत किंवा लोकसभेत पोचणं महत्वाचं आहे. मला वाटतं की कामगारांची बाजू आज ठोसपणे मांडलीच जात नाहीये.

दुसर्‍या बाजूस हजारो कामगार भरडले जात आहेत. नीम, अर्न अँड लर्न, कंत्राटी पद्धतीत. हे सर्व माहीत असूनही कोणतंच पाऊल कां उचललं जात नाहीये? मी एका बहुराष्ट्रीय (MNC) कंपनीतल्या कामगार नेत्याला भेटलो. तो मला म्हणाला की तब्बल सोळा वर्षांनी त्याला कायम स्वरूपी नोकरी मिळाली. अशा हजारो केसेस आहेत, त्यावर तोडगा काढायला सध्याची व्यवस्था, कायदे बदलणं आवश्यक आहे. जगात कायम स्वरूपी काहीच नाही, मग जॉब तरी कायम स्वरूपी कसे असतील? आंधळा विरोध काय कामाचा?

सहकार्याची मानसिकता हवी, संघर्षाची नको

     नव्या युगातल्या उद्योगांचे प्रश्न वेगळे आहेत. अर्थव्यवस्थेच्या बदलांनुसार उद्योगांत त्वरित बदल होणे आवश्यक असते. त्यासाठी एका बाजूस योग्य तो बदल कामगार कायद्यात हवा, तसाच कामगार नेत्यांच्या विचारसरणीतही. नवीन ओद्योगिक संबंध प्रस्थापित करायचे असतील तर सहकार्याची मानसिकता हवी, संघर्षाची नको. त्याची अप्रतिम सुरवात पुण्याच्या परिसरात झाली आहे, 'असाल' कंपनीमध्ये झालेला करार अभूतपूर्व आहे, त्याचा पाया सहकार्यात आहे, संघर्षात नाही. एका उद्योगात सतत पाच सात वर्ष तोटा होत असतानाही असा भरघोस वाढ देणारा करार अभूतपूर्व आहे.

     मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की माहितीयुगातली संघटना (कल्चर) बांधणे, स्वतःची नकारात्मक प्रतिमा झटकून सकारात्मक करणे, कामगाराभिमुख कार्यक्रम बनवणे तसेच औद्योगिक संबंधांना सहकार्याची व सहभागाची दिशा देणे हीच सर्वात मोठी आव्हाने आहेत.

     आज कामगार संघटना कालबाह्य झाल्या आहेत. व्यवस्थापनांना त्या नकोशा आहेतच, पण कामगार तरी किती त्यांच्या बाजूने आहेत? मी पुण्याबद्दल बोलत नाही, तर देशाबद्दल बोलतोय. रेमंड बंद पडली, जीएसके बंद झाली, ठाणे-बेलापूर रोड म्हणजे सर्व मोठ्या कंपन्यांची रांगच - पण आज तिथला एकतरी कारखाना चालतोय काय? आणि हे सर्व बिनबोभाट प्रतिकाराशिवाय होतंय त्याचं कारण म्हणजे कामगार संघटनांची हतबलता तसंच कालबाह्यता.

फिनिक्स पक्षासारख्या कामगार संघटना पुन्हा वर येतील का हा यक्षप्रश्न आहे. त्याचे उत्तर सोपे नाही हे खरेच, पण ते शोधायलाच हवे. कामगार संघटनांना आणि त्यांच्या नेतृत्वाला ते शोधण्याशिवाय गत्यंतर नाही.

विवेक पटवर्धन