Tuesday, April 16, 2019

माझी दुसरी ब्लाइंड डेट


माझ्या दुसर्‍या ब्लाइंड डेटबद्दल बोलतोय. माझ्या पहिल्या ब्लाइंड डेटबद्दल मी अगोदर लिहिलं आहे. [इथे वाचा]. ती भेट मला पार हलवून गेली होती, दुसरी भेटही तशीच!.

मोहम्मद असिफने मला फोन केला तेव्हा दुपार होती, मला आठवतंय. मी रिटायर होऊन सहा-आठ महिने झाले असावेत. मी जेवण करून लोळत पडलो होतो. मी फोन घेतला. तो म्हणाला तुम्हाला भेटायचंय. कशासाठी? मी विचारलं. तो कलकत्त्याहून आला होता. माझे नांव त्याला भेटण्यासाठी कोणी तरी सुचवले होते. बहुतेक त्याचे गुरु डॉ पिल्ले यांनी माझे नांव सुचवले असावे, माझेही ते मित्र होते. ‘मला माझ्या करियरबद्दल तुमचं मार्गदर्शन हवंय, आज भेटता आलं तर बरं होईल कारण मी उद्या सकाळच्या फ्लाईटने परतणार आहे.’ तो म्हणाला. मला फारसा उत्साह नव्हता. ‘ठीक आहे, ठाण्याला राहतो मी, ये घरीच.’

‘सर, मी आत्ता दक्षिण मुंबईत आहे, ट्राफिक हैराण करेल, चेंबुरला भेटता आले तर बरं होईल, आपल्याला बोलायला अधिक वेळ मिळेल.’ मी थोडासा चिडलोच. पण मी काही बोलायच्या अगोदरच तो म्हणाला, ‘सर मी विज्युअली चायलेन्ज्ड आहे. म्हणून मला तुमच्या सल्ल्याची अधिक गरज आहे, नाही म्हणू नका प्लीज.’ मी अवाक् झालो. मी हो म्हटलं. आम्ही चेंबूरच्या शॉपर्स स्टॉपवर भेटायचं ठरवलं.

मी तिथे वेळेवर पोचलो. दुसर्‍या मजल्यावरच्या कॉफी शॉपमध्ये बसतोय तोच तळमजल्यावर कोणीतरी मोठ्ठ्याने बोललं. “मी जाईन तिथे, तुमची लिफ्ट कुठे आहे?’ शॉपर्स स्टॉपच्या कॉफी शॉपमधून खाली डोकावलं की तळमजल्यावरचं दिसतं. तो आला होता. एक दोघे त्याच्या हातातली पांढरी काठी बघून त्याला मदत करायला धावले होते, लिफ्टकडे घेऊन गेले. मी लिफ्टजवळ गेलो. ‘अरे सर, तुम्ही कशाला लिफ्टपर्यंत आलात?’ त्याने तोपर्यंत त्याची पांढरी काठी फोल्ड करून ठेवली होती. मी नीट निरखून बघितलं. त्याला काहीच दिसत नसावं. आम्ही कॉफी शॉपमध्ये बसलो.

असिफ तरुण होता. त्याने एमबीए केलं होतं. हा मुलगा फाकडू इंग्लीश बोलत होता. थोड्या गप्पा झाल्यावर तो म्हणाला, “सर, मी बिहारचा. भागलपूरचा. जन्मजात अधू दृष्टी घेऊन आलो. माझी आजी म्हणायची, “मेलास का नाही?” तिला माझं आंधळेपणानं जगण पाहवत नसे. अधू दृष्टी देखील गेली आणि पंधराव्या वर्षापासून मी पूर्ण अंध झालो. पण त्यापूर्वी माझा दूरचा एक काका मला अमेरिकेला घेऊन गेला. तो तिथेच स्थाईक झाला होता आणि त्याने एका अमेरिकन मुलीशी विवाह केला होता.”

आत्तापर्यंत मला एका विलक्षण तरुणाला मी भेटतोय ही जाणीव झाली होती. त्याच्या बोलण्यात कुठे नकारात्मक सूर नव्हता, न्यूनगंड नव्हता, उलट आत्मविश्वासच दिसत होता.

“सर, मला तिथे अमेरिकन आई मिळाली म्हणाना.” आम्ही दोघेही हसलो. “मी आज जो काही आहे तो तिच्याचमुळे, तिचे ऋण मी कधीच विसरणार नाही.”

“म्हणजे तिने असे काय केले?”

“एक तर नवा देश, नवी भाषा आणि नवी शाळा. माझे प्रगतीपुस्तक बघून कोणीही म्हणाला असता की ह्याच्याकडून काहीही अपेक्षा न ठेवणेच बरे. पहिल्यावर्षी मी सगळ्या विषयात फेल झालो होतो. पण माझ्या अमेरिकन आईचा प्रभाव असा, तिच्यामुळे माझा साफ गेलेला आत्मविश्वास पुन्हा सापडला. मी तिच्यामुळे मी पुढे फार चांगले मार्क मिळवले, सगळ्या विषयात A ग्रेड मिळवली.”

पुढे तो भारतात परतला. तो कलकत्त्याच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पास होणारा पहिला अंध विद्यार्थी ठरला. त्याला आयआयएमची प्रवेश परीक्षा देता आली नाही कारण अंध विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची सोय नव्हती. त्याने डीसेबिलीटी कमिशनरकडे तक्रार केली तर तेव्हापासून डिसेबल विद्यार्थ्यांसाठी आयआयएममध्ये काही जागा राहून ठेवण्याचा आदेश निघाला. असिफने सिंबायोसिसच्या एका इन्स्टिट्यूटमधून [डॉ पिल्ले तिथे डायरेक्टर् होते] एमबीए केलं. असिफचे प्रेझेनटेशन बघितल्यावर एक सरकारी उच्चपदस्थ अधिकारी इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यावेळचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याकडे त्याची शिफारस केली. असिफ राष्ट्रपतीना भेटून आला होता!

मी शांतपणे हे सर्व ऐकत होतो. असिफ एक विलक्षण तरुण होता हे तर स्पष्टच होते, आणि तो महत्वाकांक्षीदेखील होता हे जाणवले. त्याच्या आयुष्यात देवाने एका पारड्यात अंधत्व टाकले होते, तर दुसर्‍या पारड्यात त्याचे व्यक्तिमत्व फुलवणारी डॉ पिल्ले, अमेरिकन आईसारखी माणसे ठेवली होती. आता मी काय करणार होतो ह्याच्यासाठी?

“बाबा रे, मी काय करू तुझ्यासाठी?”

“सर मी तुमचं नांव ऐकलंय पिल्ले सरांकडून. मला तुमच्यासारखं एचआरचं व्हाईस प्रेसिडेंट व्हायचंय. ती माझी आकांक्षा आहे. मला तुमचं मार्गदर्शन हवंय. मी काय करायला हवं?”

मी काहीसा वैतागलोच, मी त्याला काय सांगणार होतो? असिफने आयआयएमसारख्या संस्थेला हलवले होते. राष्ट्रपती त्याला भेटले होते. अंध असूनही अनेक ‘प्रथम’ त्याला त्याच्या सीवीवर लिहिण्याजोगे होते. मी अंध नसूनही नगण्य होतो, ‘ह्याचे पुढे काय होणार’ अशी चिंता मी त्याच्या वयाचा असताना माझ्या आईवडिलांना सदैव होती. त्याची आत्मकथा ऐकून मलाच न्यूनगंड आला होता.

मी कॉफी पीत बसलो. माझ्या जे लक्षात आलं ते नक्कीच त्याला कडवट वाटणार होतं. अंध माणसांना आपला चेहरा दिसत नाही हे किती बरं असतं.

“सर तुम्ही काहीच बोलत नाही?”

“मफीन खा.” मी ब्लुबेरी मफीन त्याच्या हातात ठेवला. हा थोडावेळ तरी गप्प राहील, मला वाटले. मी शब्दांची जुळवाजुळव करीत होतो.

“बोला ना.”

“हे बघ, आपण चुकीचा प्रश्न विचारला की उत्तर चुकीचं येतं.”

“म्हणजे?”

“मी काही स्वत:ला व्हीपी बनवलं नाही. कोणीतरी तो हुद्दा मला दिला. ज्यांनी मला तो हुद्दा दिला ते मला मॅनेजरच्या हुद्द्यावरही अडवून धरू शकले असते. आपल्याला जे काही बनायचं आहे त्याच्यासाठी हुद्द्याच परिमाण ठेवणं शुद्ध मूर्खपणा आहे – निदान मी तरी असं मानतो.”

“मग मी काय करावं?”

“मी गंमतीने लोकांना सांगतो की मला कंपनीने व्हीपी नाही बनविलं, मी तर जन्मजातच व्हीपी आहे – विवेक पटवर्धन! आपल्याला जे काही बनायचं आहे ते होणं आपल्या हातात असायला पाहिजे. हुद्दे इतर लोक देतात. मोठ्या हुद्द्यावरची माणसं ‘मोठी’च असतात हा समज फार चुकीचा आणि फसवा आहे. म्हणून हुद्दा प्रकरण डोक्यातून पहिल्यांदा काढून टाक. खऱ्या मोठ्या माणसांना हुद्द्याच्या शिड्यांची जरूर लागत नाही.”

“ठीक आहे, पण सर मला एचआर डिपार्टमेंटचे प्रमुख व्हायचंय.”

“ध्येय म्हणून हे ठीक आहे. पण माझ्या मते ते फारसं व्यावहारिक नाहीये.”

“आत्ता तुम्हाला काय म्हणायचं आहे?”

“हे बघ. विज्युअली चायलेन्ज्ड व्यक्तींना कोणतही काम करता येईल वगैरे ठीक आहे पण त्यांना इतक्या उच्चपदावर कॉर्पोरेट जगतात कोणी नेमल्याचे मला माहित नाही, आणि असलेच कोणी तर तो एक अपवादच. एचआर डिपार्टमेंटचे प्रमुख होणं कदाचित असाध्य नसेल, पण अत्यंत दुरापास्त तर नक्कीच आहे. लाखोमें एक! म्हणून माझ्या मते ते ध्येय ठेवणं फारसं व्यावहारिक नाहीये.”

“असं का?”

“हे बघ, एचआर डिपार्टमेंटचे प्रमुख होण्यासाठी तुझी शर्यत ज्यांना दृष्टी आहे त्यांच्या बरोबर असेल. निवड करणारे ‘सेफ’ खेळतील. हे असं असावे की नाही ही दुसरा विषय आहे. ह्या शर्यतीत त्यांची बाजू नेहमीच उजवी असेल हे ध्यानात घे. मोठ्या कंपनीचे एचआर डिपार्टमेंटचे प्रमुख होणं कठीणच.” हे बोलत असताना मलाच वाईट वाटत होतं.

“पण माझ्याकडे पात्रता नाहीये का?”

“पात्रतेचा प्रश्न नाही. एचआर डिपार्टमेंटच्या प्रमुखाची नेमणूक तू ठरवणार नाहीयेस. दुसरा कोणीतरी ठरवणार आहे. मी त्याच्या मानसिकतेबद्दल बोलतोय.”

त्याला पटलं नाहीये हे त्याच्या देहबोलीवरून स्पष्ट होत होतं. मलाही स्पष्ट आणि तिखट बोलल्याबद्दल वाईट वाटत होतं. पण मला जे वाटलं तेच मी बोलत होतो. बराच वेळ शांतता राहिली.

“ह्या मफिनच्या आत ब्लुबेरी असते ती मला अजिबात आवडत नसे, पण बरेच मफिन खाऊन आता ठीक वाटते.” त्याला शांतता असह्य झाली असावी म्हणून बोलला असेल.

“माझं बोलणं त्या ब्लुबेरीसारखं आहे असं समज.” आम्ही दोघेही हसत सुटलो. “तुला पटायला वेळ लागेल पण मला वाटतं की कालांतराने पटेलच.”

“डोन्ट एम्बरास मी, सर” तो म्हणाला, “मी काय करावं तेच कळत नाहीये. माझ्याकडे सर्व काही असताना मला जे हवंय ते का मिळू नये?”

“माझ्याकडे अशा प्रश्नांचे उत्तर नाहीये, असिफ. मराठीतल्या प्रसिद्ध लेखकाने, पु ल देशपांडे यांनी लिहिलंय की समुद्रातल्या कोळ्याकडे जाळं असतं, पण समुद्रातलं पाणी कधी त्याच्याकडे मासे आणतं, तर कधी ते त्याच्यापासून मासे दूर घेऊन जातं, हे जीवन असं आहे. खरं आहे ना? अरे, आपण कां उगाचच फिलॉसॉफी बोलतोय?”

“मग मी काय करावं?”

“सर्वप्रथम तू इतरांशी स्पर्धा करणं मनातून काढून टाक. तू जेव्हां स्वत:साठी लढलास तेव्हां यशस्वी झालास. तू अंध आहेस असे म्हणण्यापेक्षा तुझ्याकडे असे काही अनुभव आहेत की जे डोळस माणसांकडे नाहीत, त्या अर्थाने तू सर्वसाधारण माणसांपेक्षा वेगळाच आहेस. तो वेगळेपणा तुला आयुष्यात काहीतरी बनवू शकतो.”

“म्हणजे नक्की काय करायचं सर?”

“खरंतर मला देखील सांगता येत नाहीये. पण एवढं कळतंय मला की तुझा जगाचा अनुभव वेगळा आहे. त्यावरच काहीतरी रचलं पाहिजे. ते केवळ तुझंच आणि आमच्या अनुभवापेक्षा खूपच वेगळं असेल. तू सध्या काय करतोस?”

“मी ‘प्राईस-वॉटरहाउस-कूपर’ मध्ये कन्सल्टन्ट म्हणून काम करतोय.”

“नोकरी तर चांगलीच आहे. तू अनेक ठिकाणी वक्ता म्हणून जातोस ते चालूच ठेव. कदाचित ब्लॉग लिहिल्याने तुला तुझे अनुभव लोकांपर्यंत पोचवता येतील.”

तो गप्प बसून ऐकत होता. “कॉर्पोरेट जगतात एक असा समज आहे की सगळं कसं व्यवस्थित आखलं पाहिजे, प्लान केलं पाहिजे. ते काही खोटं नाही, पण संपूर्ण खरं देखील नाही. आयुष्यात इन्क्रिमेंटॅलिझमलाही स्थान आहे.”

“म्हणजे?”

“सोप्या भाषेत सांगायचे तर पाच पावले चालावीत तर पाच फुट पुढचे दिसते म्हणतो ना, तसे. अनेक संधी तुझ्या पुढे येतील. त्या तुला बरंच काही देऊन जातील. विचार कर, जर तू चांगले काम करीत राहिलास तर तुझे आयुष्यच एक स्फूर्तीदायी कथा होऊ शकते. कल्पना कर की तू पन्नासाव्या वर्षी आत्मचरित्र लिहिलेस तर? तो एक विलक्षण वृत्तांत होईल.”

असिफला माझे म्हणणे काही पटले नसावे असंच वाटलं. मी देखील त्याचा विचार करायचं सोडून दिलं. पण दोन-तीन महिन्यांनी असिफची मेल आली. ‘तुम्ही जे बोललात त्याचा मला खरं तर रागच आला होता. पण तुमचे विचार घर करून राहिले आणि जसा वेळ गेला तसा मला तुमचा सल्ला पटला’ अश्या अर्थाचे काहीतरी त्याने लिहिले होते.



असिफ पुढे माझ्या सम्पर्कात राहिला. मी त्याच्या कलकत्त्याच्या घरीही गेलो. त्याने लग्न केलंय, पत्नीही अधू दृष्टीचीच आहे. एक मुलगीही आहे. मुलगी [तिला कुठलेही व्यंग नाही] बापाची काळजी घेताना बघून आम्हा दोघांना आश्चर्य आणि गम्मत वाटली. तीन वर्षांच्या मुलीलाही किती समज असते!

असिफचे स्वत:ला पुढे रेटणे चालूच आहे. लहानपणी तो मित्रांबरोबर फुटबॉल खेळू शकला नव्हता कारण त्याला तो बॉल दिसताच नसे. पण आता अंध मुलांसाठी फुटबॉल लोकप्रिय करण्यात त्याचा पुढाकार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अशी एक टूर्नामेंट झाली. जगातील साठ देशांतील अंध खेळाडूंच्या फुटबॉलमध्ये भारताचा नंबर २९वा आहे!

असिफ नुकताच दहा किलोमीटर कुणाचाही हात न धरता धावून आला आहे. ते त्याने ८९ मिनिटांत पार केलं. पूर्वी “माझं टार्गेट एक तास तीस मिनिटांचे होते आणि मी एक तास छत्तीस मिनिटांत दहा किलोमीटर पार केलं,” असं म्हणून हळहळला होता! इथे लक्षात घ्यायला हवं की इतर अंध मुलं कुणाबरोबरतरी हॅंडबॅंड लावून धावतात. त्यांना पडण्याची भीती असते. असिफला कोच मिळालाय. पण तो मदतीशिवाय धावला. आत्तापर्यंत तो चार मॅरेथॉन धावलाय, एकूण ४५० किमी. धावलाय! छत्तीसगढ पोलीसांच्याबरोबर ‘डिजिटल इन्क्लुजन प्रोजेक्ट’ करून आलाय, आणि इतरही बरीच कामं अनेक राज्य सरकारांच्या समवेत करून आलाय.



हे सर्व माझ्यामुळे झालं असा माझा दावा मुळीच नाही. ते सर्व मुळातच होतं हे निर्विवाद आहे. ‘हे सर्व कुठून येतं’ असा [तेंडुलकरांचा] प्रश्न मलाही पडतो. त्याच्या बरोबर झालेला संवाद मलाच काही शिकवून गेला. तो सर्व संवाद अत्यंत कठीण होता. एकीकडे मला जे योग्य वाटते ते बोलायचं, तर दुसरीकडे त्याला न दुखवायची खबरदारी घेणं ही तर तारेवरची कसरत होती. कित्येक वेळा आपण दुसऱ्यांशी बोलतो तेव्हा स्वत:शीच काही बोलत असतो. ते आत्मनिवेदनच असतं. असिफला समजावताना असं वाटत होतं की हे मलाही अगोदर समजलं असतं तर? पण ज्यांना डोळे असतात ते बहुधा अंतर्मुख होत नसावेत – निदान माझ्याबाबतीत तरी हे खरं आहेच.

एक गोष्ट आठवतेय. एकदा यम एका वृद्धास न्यायला आला. ‘चल माझ्याबरोबर, तुझी वेळ संपली’ म्हणाला. तो यमाला म्हणाला, “थांब जरासा. आत्ता कुठे मला कळलंय जगायचं कसं ते.”

मला कां बरं वाटतं की ही माझीच गोष्ट आहे?

विवेक पटवर्धन
[पहिल्या ब्लाइंड डेटप्रमाणे ही देखील सत्य घटना आहे.]

Saturday, April 13, 2019

माझी ब्लाइंड डेट


ब्लाइंड डेट म्हटलं की लोकं डोळे मोठ्ठे करून बघतात. कारण ब्लाइंड डेट म्हणजे दोन अनोळख्या व्यक्तींची रोमॅंटिक भेट. पण माझी भेट रोमॅंटिक वगैरे अजिबात नव्हती.

मला अनुभूतीचा फोन आला. मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये अनेक वर्षे एक कोर्स शिकवत होतो. अनुभूती जरी माझी विद्यार्थिनी नव्हती तरीही ती अनेकदा अभ्यासातील मदतीसाठी माझ्याशी बोलत असे, भेटत असे.  

“सर एक महत्वाचे काम आहे’ अनुभूती म्हणाली. ‘प्लेसमेंट चालू झाल्या आहेत. अजून गोमाला जॉब मिळाला नाहीये. ती अतिशय तणावाखाली आहे. तिला जॉब मिळावा अशी आमच्या सगळ्या वर्गाची इच्छा आहे, पण तिच्याकडे अनेक रिक्रूटर बघायलाही तयार नाहीत. जे तिचा इंटरव्ह्यू घेतात ते तिला सिलेक्ट करीत नाहीत.”

काही कारणाने मी अनुभूतीच्या बॅचला शिकवत नव्हतो. त्या बॅचमध्ये गोमा रायदेखील होती. जरी मी त्या बॅचला शिकवत नव्हतो तरीही गोमा रायला मी ओळखत होतो, पण पाहूनच, कधी बोललो नव्हतो. नेपाळमधून आलेली गोमा एक अंध विद्यार्थिनी होती.

“मग मी काय करावं म्हणतेस? काय काम आहे?”

“सर तुम्ही तिच्याशी बोला. तिचा आत्मविश्वास डळमळू लागलाय. मला आणि माझ्या वर्गातल्या अनेकजणांना वाटतंय की तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवाल. तिलादेखील वाटतंय तुम्हाला भेटावं. नाही म्हणू नका.”

मी नाखुषीनेच भेटायला तयार झालो. काही विद्यार्थ्यांनी माझ्यावर भिस्त टाकली आहे हे जाणवलं, पण माझ्याकडे त्यांच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं. असा माझा अनेकदा गाईडमधला देवानंद होतो. तुरुंगातून सुटून आलेला देवानंद एका देवळाच्या पायरीवर झोपतो, पहाटे एक साधू त्याच्या अंगावर आपली ‘श्रीराम जयराम’ लिहिलेली शाल घालून निघून जातो, आणि गावकऱ्याना वाटतं की तो देखील एक साधुच आहे. त्यांचे प्रश्न तो सोडवील असे त्यांना वाटते. लोक असेच त्यांच्या अपेक्षा माझ्यावर लादतात आणि मी त्यांच्या अपेक्षा पुऱ्या करायला मुकाटपणे झटतो असं अनेकदा झालंय. भिडस्तपणाने ‘नाही’ न म्हणता आल्यामुळे मी अनेकदा नको ती कामे अंगावर घेतली आहेत. हे त्यातलेच एक. त्यातही भर म्हणजे मी गोमाला भेटायला इन्स्टिट्यूटमध्ये जायला निघालो तेव्हा पत्नी म्हणाली, ‘तुम्ही काहीतरी कराच तिच्यासाठी’.

गोमा आली तेव्हा पोटात गोळाच आला. आम्ही दोघे एका प्रोफेसरच्या केबिनमधे बसलो. गोमा बोलायला लागली. जॉब मिळणे कठीण आहे हे तिनेही जाणलं होतं. पण तिचा इंटरव्ह्यूचा अनुभव चांगला नव्हता. तिचा इंटरव्ह्यू घेणारे एक औपचारिकपणा करतात, त्यांना तिला जॉब द्यायचा नसतो, हे तिच्या ध्यानात आलं होतं. काही कंपन्यात विशेषत: पब्लिक सेक्टरमधल्या कंपन्यात डिसेबल्ड व्यक्तींना नोकरी देण्याचे धोरण असते, तिथल्या एच आर मॅनेजरना तशा व्यक्तींचे इंटरव्ह्यू घेणे भागच असते. पण त्यांना निवडण्याचे स्वातंत्र्य असावे.

काही इंटरव्ह्यूमध्ये तर ती दुखावली गेली होती. ते सर्व सांगताना गोमा अचानक रडायला लागली. तिला रडताना पाहून मला काय करायचे ते सुचेना. मी आयुष्यात कधीही इतका हतबल झालो नव्हतो. एकच बरं होतं की मी तिच्या डोळ्यातील अश्रू बघू शकत होतो, पण तिला मात्र माझे अश्रू दिसत नव्हते.

थोड्या वेळाने दोघेही सावरलो. “सॉरी सर,” गोमा म्हणाली, “फार इमोशनल झाले. एका भिंतीवर डोकं आपटावं असा अनुभव आहे हा.”

मी इतर काही बोलत वेळ काढला, कॉफी मागवली आणि अवांतर गप्पा मारत दोघेही कॉफी प्यायलो. गोमाचा प्रश्न सोडवायला नेहमीची विचारसरणी नाही कामाची हे कळून चुकलं होतं. एक दीर्घ श्वास घेतला. इमोशनल मनाला पुन्हा रॅशनल बनवायचे असेल तर दीर्घ श्वास घ्या आणि काही वेळ धरून ठेवा, असं कोणीतरी सांगितलं होतं.

“इंटरव्ह्यू सुरु कसा होतो?” मी विचारलं. “सर, ते माझ्या कुटुंबाबद्दल, शिक्षणाबद्दल वगैरे माहिती विचारतात. पण ज्या रीतीने हे होतं त्यामुळे त्यांना माझ्या इंटरव्ह्यूमध्ये इंटरेस्ट नाही हे तेव्हाच कळतं.” गोमा म्हणाली.

माझ्या करियरमध्ये मी शेकडो इंटरव्ह्यू घेतले आहेत, त्यामुळे इंटरव्ह्यू घेणार्‍याला काय वाटत असावे ते मी ताडले.

“गोमा नीट ध्यानात घे – इंटरव्ह्यू घेणार्‍याला वाटत असावं की ही डोळस माणसांसारखी काम करू शकेल काय? तू ट्रेनी मॅनेजर म्हणून नोकरी बघतेस हे ध्यानात घे.”

“सर मी एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट सर्व सोफ्टवेयर सहज वापरू शकते. जॉज नावाचे सोफ्टवेयर आहे, कानाला हेडफोन लावला की स्क्रीनवरचे सर्व ऐकायला येतं – दिसलं नाही तरीही.”

“तू डेमो देऊ शकशील?”

“त्यात काय, मी तर लॅपटॉपवर कितीतरी काम करते. सहज दाखवीन.”

“इंटरव्ह्यू घेणार्‍याला वाटत असावं की ही मुलगी एकटी कशी ऑफिसला येईल? मग काय म्हणायचं?”

“सर, अहो मी फील्डवर्कला माझी मीच, एकटीच, जाते सगळीकडे.”

मग थोडा वेळ आम्ही दोघेही स्तब्ध होतो. मी तिला म्हटले, “मी सांगतो त्याप्रमाणे करशील?”

“नक्की”

“जशी तू इंटरव्ह्यू घेणार्‍याला भेटशील आणि इंटरव्ह्यूला सुरवात होईल तशी तू इंटरव्ह्यू घेणार्‍याला थांबव. त्याला सांग – तुम्ही इंटरव्ह्यू सुरवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही सांगायचंय. त्याला सांग की मला तीन गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली म्हणजे मी जॉज सोफ्टवेयरमुळे एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट सर्व सोफ्टवेयर सहज वापरू शकते. असं म्हणून तू एक छोटा डेमो दे. दुसरं म्हणजे मी कुठेही एकटी जाऊ शकते, मी फील्डवर्कला एकटीच गेले, पाहिजे तर आमच्या प्रोफेसरांना विचार. मी ऑफिसलाही एकटीच येईन कुणावरही मी अवलंबून असणार नाही. आणि तिसरे म्हणजे मी एकटी राहूही शकते. खरी परिस्थिती अशी आहे की लोकं आमची काळजी घेतात, तुमच्यापेक्षा आम्ही जास्त सुरक्षित असतो. एवढे ठणकावून बोल. जमेल?”

“जमेल.” मग पुन्हा शांतता. “ह्यापेक्षा जास्त काही करणं आत्ता तरी सुचत नाहीये.”

गोमा आणि मी बाहेर आलो तेव्हा अनुभूती भेटली. “गोमाच्या इंटरव्ह्यूमध्ये तुला एक ऑबझरवर म्हणून बसता आलं तर बघ, आपल्याला माहिती मिळेल.” मी म्हणालो.

दोन दिवसांनी अनुभूतीचा फोन आला. “सर गोमाने तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं, ती इतकी आत्मविश्वासाने बोलली! मी हजर होते. मला तिथे बसायची परवानगी दिली होती इंटरव्ह्यू घेणार्‍याने.”

गोमाला कॅम्पस इंटरव्ह्यूमुळे नोकरी मिळाली. पण तिचा प्रश्न सोडवायचे मला कसे जमले त्याचे उत्तर मी शोधतो आहे. गोमाचा प्रश्न सोपा नव्हता. त्याचे उत्तर सुचले ते मला वाटलेल्या तिच्याबद्दलच्या कळकळीमुळे, की विद्यार्थ्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे? का इतर काही? काही गोष्टींचा शोध घ्यावासा वाटतो पण तो लागत नाही. पण ते तसेच राहू दे.

माझी ब्लाइंड डेट तर एका अवघड परिस्थितीशी होती. मागे वळून पाहताना ती रोमॅंटिक वाटते!
विवेक पटवर्धन
[ही एक सत्य घटना आहे.]

Sunday, March 10, 2019

आरोहनतर्फे आदिवासी समाजात जागतिक महिला दिन साजरा


     आदिवासी समूह मुळातच कमी बोलणारा पण आताच्या सतत स्वतःला सिद्ध करावं लागण्याच्या काळात आयुष्य समानतापूर्वक, आदरयुक्त हवे असेल तर तुम्हांला बोलावेच लागेल तरच विविध प्रकारचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल नाहीतर सतत विविध प्रकारच्या हिंसाचाराला, अन्यायाला सामोरे जावे लागेल असा सूर जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी ‘आरोहन’ने आयोजित केलेल्या सहा महिला आणि युवा सोबतच्या मेळाव्यात निघाला.


     आरोहन ही नोंदणीकृत सामाजिक संस्था गेली १३ वर्षे पालघर मधील मोखाडा, जव्हार, डहाणू आणि पालघर या तालुक्यांमध्ये ‘कुपोषण समूळ नष्ट व्हावे’ यासाठी आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती, पाणी आणि सुप्रशासन हे विषय मध्यवर्ती ठेवून काम करीत आहे. मोखाड्या तालुक्यातील सुर्यमाल- केवनाळे, कुर्लोद, पाथर्डी- बोटोशी, आणि आसे ग्राम पंचायत तर जव्हार मधील कडाची मेट गांव आणि आयटीआय जव्हार या ठिकाणी विशेष लक्ष देवून सध्या महिला, मुल आणि युवा वर्गा बरोबर काम सुरु आहे.


     ‘बॅलन्स फॉर बेटर अर्थात - समानता असणारा, आनंदी समाज निर्माण होण्यासाठी जात,धर्म,लिंग इ. सर्व प्रकारचे संतुलन आवश्यक आहे’ ह्या संकल्पनेवर आधारित यावर्षीचा ‘जागतिक महिला दिन’ सहा ठिकाणी साजरा करण्यात आला. बोटोशी येथील भोसपाडा, आसे येथील ब्राह्मण गांव, कुर्लोद, सूर्यमाळ, कडाची मेट आणि आयटीआय जव्हार येथे मोठ्या जल्लोषात महिला दिन साजरा करण्यात आलेल्या ह्या मेळाव्यात जव्हार आगारच्या व्यवस्थापिका सरिता बागल, माधुरी मुकणे, सरिता चौधरी, प्रतिभा भोये, अॅड कल्याणी मुकणे, मीनाक्षी खिरारी आणि लीला दळवी यांनी आजची स्त्रियांची सामाजिक-आर्थिक आणि राजकीय स्थिती मांडली आणि आपापल्या क्षेत्रात आदरपूर्वक स्वतःचे स्थान मिळवण्यासाठी प्रत्यक्ष त्या स्त्रीच्या तसेच समाजातील इतर घटकांच्याही मानसिकतेत बदल व्हायला हवा, हे बदल कसे घडवावेत हे दाखवण्यासाठी स्वतःच्या अनुभवांची मांडणी ह्या मेळाव्यातून करण्यात्त आली. सूर्यमाळ येथे ग्राम पंचायत आणि डॉन बॉस्को संस्थेबरोबर तर ब्राम्हण गांव येथे ‘साथी’ संस्थेबरोबर या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. 

यासर्व मेळाव्यामध्ये त्या त्या गावातील स्त्रिया, युवती, युवा मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. कडाची मेट येथील मेळाव्यात गावातील स्त्रियांनी रान भाज्यांपासून विविध प्रदार्थ बनवून प्रदर्शन केले. मासिक पाळी आणि त्यासंदर्भात असलेले गैरसमज समजावून घेण्यासाठी ‘पॅड मॅन’ सिनेमा एकत्रित बघितला. महिला दिन हा सर्वांच्या आनंदाचा दिवस असायला हवा आणि महिला सक्षमीकरणावर फक्त भाष्य न करता आपल्या कृतीत तो विचार उतरला पाहिजे अशी भूमिका सर्व वक्त्यांनी मांडली आणि शेवटी सर्व आदिवासी महिलांनी आणि युवानी आपला पारंपारिक ‘तारपा नृत्य’ सदर केले. 

अनिता पगारे 

एका लग्नाच्या वाढदिवसाची गोष्ट


“एवढा कसला विचार करता आहात?” प्रश्न होता लुलूचा, माझ्या पोपटाचा. मी बागेत मॉर्निंग वॉक घेत होतो तेव्हा हा प्रश्न आला. “जेव्हां तुम्ही चालता तेव्हां तुमचे डोके चालते. जसे काही कोणीतरी डोक्यातले स्विच ऑन केले असे वाटावे.”

“अगदी खरंय.” मी म्हटले. मी एका पिवळ्या फुलांनी भरलेल्या झाडाखाली थांबलो. लुलू, माझा पोपट, त्या झाडाच्या एका फांदीवर बसला होता, तिथून झेप घेऊन तो माझ्या खांद्यावर अलगद उतरला. “माझ्या बाबतीत तरी ते अगदी खरे आहे.”

“सांग ना, कसला गंभीर विचार करतो आहेस?”

“गंभीर वगैरे काही नाही. लग्नाचा बेचाळीसाव्वा वाढदिवस येतोय, तिच्यासाठी प्रेझेंट कोणते घ्यावे हा विचार चालला होता.”

“खरंच की काय? व्वा! लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला कोणतं प्रेझेंट घेतलं होतं?”

“सोन्याच्या इयर रिंग. आमच्या बजेटमध्ये तेवढंच जेमतेम बसलं.”

“आणि बत्तिसाव्या वाढदिवसाला?”

“अं………… छ्या:, नाही आठवत”

“ठीक आहे, बरं, एकोणतिसाव्या वाढदिवसाला? तीन वर्षापूर्वी?”

“अं…. काय बरं, अं……. नाही आठवत!”

“गंमत आहे ना? बेचाळीस वर्षापूर्वी दिलेली भेटवस्तू आठवते, पण तीन वर्षांपूर्वीची नाही आठवत!”

“हे खरं तर आहे, पण अवघडून टाकणारं आहे. हे असं का असेल?”

“कदाचित एखाद्या घटनेबरोबर जोडल्या गेलेल्या उत्कट भावनांमुळे असेल. अशी घटना नेहमीच येत राहिली की तोच-तोचपणा येतो आणि त्यातली उत्कटता संपवतो – असेही असू शकते. बेच्याळीसाव्या वर्षापर्यंत लग्नाचे १५,३३० दिवस, किंवा ३,६७,९२० तास, म्हणजेच २,२०,७५,२२० मिनिटे, अर्थात १३२.४ कोटी सेकंद तुम्ही दोघे एकत्र असता, म्हणजे असे होणारच.”

“हा, हा, हा! कदाचित तसे होतही असेल.”

“मग, साहेबजी, ह्या वर्षी कोणतं प्रेझेंट घेणार?”

“मला सांग, प्रेझेंट देऊनच प्रेम व्यक्त करायचं असं काहीं आहे का? मी इंटरनेटवर बघितलं, लग्नाच्या बेचाळीसाव्या वाढदिवसासाठी विशिष्ट असं काहीच प्रेझेंट नाहीये. मला वाटतं की सर्वांनाच कळून चुकलं आहे की – तू म्हणालास तसं - घटना नेहमीच येत राहिली की तोच-तोचपणा येतो आणि त्यातली उत्कटता संपवतो.”

“पण आपणच प्रत्येक घटनेत उत्कटता आणली पाहिजे असं नाही का तुला वाटत?” लुलू अत्यंत तुच्छतेने माझ्याकडे पहात बोलला. “आयुष्य असं जगायला हवं. नाहीतर कोणत्याही दोन दिवसात काहीच फरक असणार नाही.”

लुलुने पंख फडफडवले, आणि तो त्या पिवळ्या फुलांच्या झाडावर जाऊन बसला. तेव्हां काही फुले माझ्या डोक्यावर पडली. आणि काही चावा घेणाऱ्या लाल मुंग्यादेखील!

विवेक पटवर्धन

Monday, December 31, 2018

कारण पुस्तकांना जीव असतो


पुस्तकांना जीव असतो आणि त्यांना सिक्स्थ सेन्स असतो यावर विश्वास ठेवणारे केवळ पुस्तक-प्रेमीच असतात. एवढी प्रस्तावना केली की तुमच्या ध्यानी आले असेलच की मी त्यातलाच आहे.

मला एखादा प्रश्न भेडसावतोय, आणि माझे मन उत्तर शोधतंय अशी वेळ असताना एक पुस्तक कोणी तरी मा‍झ्या हाती ठेवतो, किंवा माझाच हात बुक-शेल्फवरल्या एखाद्या पुस्तकावर पडतो ज्यात त्या प्रश्नांचे उत्तर सापडतं - असं केवळ माझ्याच अनुभवात आहे असे नाही तर अनेक जण असं अनुभवल्याची खात्री देतील.

कधी कधी एकाच प्रकारची पुस्तके आपल्या पुढे येत राहतात. एकाच विषयाची. नुकतेच माझे वास्तव्य तीन महिने लंडनमध्ये होते. तिथली लायब्ररी मरटन कौन्सिलची, पण नवी पुस्तके तिथे वाचायला मिळतात. म्युनसीपालटीच्या लायब्ररीत नवी पुस्तके मिळायला भाग्याच हवे असा माझा समज तिथे खोटा ठरला. एक पुस्तक शेल्फवर असे ठेवले होते की जणू ते माझी वाटच बघत होते. ‘Why I Am Not Talking to White People About Race.’ रेनी एडो-लॉजने लिहिलेलं हे पुस्तक २०१७ सालचं. विषय वर्णद्वेषाचा. गुलामांना आफ्रिकेतून नेणाऱ्या शेवटच्या बोटीपासून सुरवात. ज्या स्त्री-लेखिकांच्या दहा पुस्तकांनी जग बदलले अश्या पुस्तकांत त्याची गणना होते. अर्थात ही यादी पाश्चिमात्य लोकांची. अतिशय ओघवती भाषा, भरपूर संशोधन – त्यामुळे पुढे आणलेल्या घटना आणि विचारांची मांडणी हे ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

ते पुस्तक परत केले तेव्हां दुसरे अमुक एक वाचायचे असे काही ठरवले नव्हते. पण लायब्ररीत अजून एक नवे पुस्तक असेच समोर आले. नुकत्याच खरेदी केलेल्या पुस्तकांना एका शेल्फवर ठेवले होते. ‘बराकून’. त्याचे उपशीर्षक ‘The Story of The Last Black Cargo.’ आता आलो का पुन्हा गुलामांना आफ्रिकेतून नेणाऱ्या शेवटच्या बोटीपर्यंत? ब्लॅक कार्गो म्हणजे आफ्रिकेतील पकडून आणलेले गुलाम जे बोटीवरून नेऊन इतर देशांना विकत होते. मी वेस्ट इंडीज बेटांना कामानिमित्त अनेकदा भेट दिली आहे. नायपॉल माझा आवडता लेखक. त्याचे ‘द मिडल पॅसेज’ हातात घेतले तेव्हा ‘मिडल पॅसेज’ म्हणजे काय ते कळायलाच वेळ लागला होता. जाऊ दे! पुन्हा बराकूनकडे वळतो. शेवटच्या बोटीवरून आलेल्या एका गुलामाची ही सत्यकथा आहे. कोसोला त्याचे नाव, १८४१ मध्ये जन्मलेल्या आफ्रिकेतल्या कोसोलाची, ज्याला गुलाम म्हणून अमेरिकेत विकले गेले. त्याच्या आणि लेखिकेच्या अनेक संवादांनी हे पुस्तक तयार झाले आहे. मी सध्या तेच वाचतोय. विशेष म्हणजे लेखिकेने हे पुस्तक कोसोलाच्या बोली भाषेतच [dialect] प्रकाशित करायचा हट्ट धरला. त्यामुळे प्रकाशन लांबलेले हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.

ही सर्व सुन्न करणारी पुस्तके आहेत. ती जरा बाजूला ठेवून मी अमेझॉन प्राईमवर डॉक्युमेंटरी पाहायचे ठरवले. Brazil: An Inconvenient History सुरु केली. अक्षरशः पहावेना. पुन्हा मी गुलामांपर्यंत येऊन पोहोचलो होतो. जरी मी ती अर्ध्यावरच सोडली होती तरी आता मी ती पूर्ण पाहणार आहे.

हे असे का होते? आपण असे गुळावरच्या माशीसारखे पुन्हा पुन्हा एकाच जागी घोंघावणारे का होतो? त्याला काही मानसशास्त्रीय स्पष्टीकरण असेलही. पण मला वाटते की कोणी तरी आपल्याला एकच विषयाकडे सतत ढकलते आहे. का ढकलते आहे ते माहित नाही. पण पुस्तकांना जीव असतो हे मी ठरवलेले सोपे उत्तर. पुस्तकेच आपल्याकडे येत राहतात असे वाटते. ते खरे नाही हे मलाही माहित आहे. तरीही त्या [गैर]समजामुळे माझे आणि पुस्तकांचे नाते घट्ट होतंय हे तर खरे आहे!

विवेक पटवर्धन

Friday, December 14, 2018

सांगा, त्यांनी कसं जगायचं?

“मी १६ वर्षे टेंपररी कामगार म्हणून काम केलंय,” बॉश कंपनीचा युनियन लीडर मला सांगत होता. “चाळीशी आल्यावर पर्मनंट झालो, पण आयुष्याची उमेदीची वर्ष ताणतणावात गेली. ब्रेक मिळायचा सहा-सात महिने काम केल्यावर. त्यावेळी डोक्यावर टेन्शन घेऊन फिरायचो, पुन्हा कंपनीने बोलावले नाही तर काय करायचे हा प्रश्न भेडसावत असे. त्या टेंपररी नोकरीतच माझे लग्न झाले, मुलं झाली, वाढली, आणि शाळेत शिकली. मला ब्रेक मिळाला की माझ्या पत्नीला अतिशय चिंता वाटायची. नोकरी नसली की नातेवाईकांसमोर जायची लाज वाटायची. तुम्हाला नोकरी नसली की तुम्हाला कोणी विचारत नाही.”
मी त्याला भेटलो सहा महिन्यापूर्वी, पण उद्योगात कामगार अनेक वर्षे टेंपररी नोकरीत असतात हे मला नवे नव्हते. माझ्या नोकरीची सुरुवात टाटा पॉवरमध्ये झाली, तिथेही अनेक कामगार असेच अनेक वर्षे टेंपररी नोकरीत असलेले बघितले होते. पण त्यावेळी मी विशीत नुकतेच पदार्पण केले होते त्यामुळे वर्षानुवर्षे टेम्पररी राहण्याचा अर्थ मला पुरेसा उमगला नव्हता.
तरीही या युनियन लीडरचे बोलणे लक्षात राहिले, मनात घुमत राहिले. अरविंद श्रोत्री हा माझा मित्र. चिंचवड-पुण्यातल्या अनेक कामगार संघटनांचा तो सल्लागार. मी अरविंद श्रोत्रीशी या विषयावर बोलल्यावर तो म्हणाला, “हा प्रश्न खूप मोठा आहे. मी तुझी काही टेंपररी कामगारांबरोबर मीटिंग ठेवतो.” मग लगेच तारीख ठरली. रविवारी भेटायचे ठरले कारण रविवारी सुट्टी असते, म्हणजे कामगारांना बिनपगारी सुट्टी घ्यायला नको.
         *          *          *
ठरल्या वेळेस सर्वजण हजर झाले. मी सर्वाना सांगितले की मी कुणाचेही खरे नांव लिहिणार नाही. सर्वाना हायसे वाटले. आपली ओळख पटली तर नोकरी जाईल असे प्रत्येकास वाटत होते, माझ्या बोलण्याने दिलासा मिळाला. पंधरा-वीस कामगार आले होते ते विविध कंपन्यांतून - त्यामध्ये ऑटोमोटिव्ह स्टॅपिंग व असेंब्लीज लिमिटेड, बॉश, हुन्डाई, बजाज ऑटो, सुल्झर, मास फ्लांज अशा अनेक कंपन्यांचे कामगार होते. जशी आमची चर्चा सुरु झाली तसे सर्व मोकळेपणे बोलू लागले.
“मी हेल्पर म्हणून काम धरले xxx कंपनीत. प्रथम मी कॉन्ट्रॅक्टरकडे कामाला होतो, पण नंतर दोन वर्षांनी, मला कंपनीने टेंपररी कामगार म्हणून कामावर ठेवले. कॉन्ट्रॅक्टरला डच्चू का मिळाला ते माहीत नाही पण त्याने आमचे पैसे बुडवले. आमचा प्रॉव्हिडंट फंड कापला, पण ते पैसे आमच्या खात्यावर जमा केले नाहीत - थोडक्यात काय की त्यानेच ते खाल्ले.”
“होय, असंच झालं आमचं,” त्याचा साथीदार म्हणाला.
“साहेब, सात महिने कंपनीत काम केले, त्यावेळी रु.७,५००/- पगार मिळत होता. म्हणजे २०१० साली. पण सात महिने संपल्यावर कंपनीने ट्रेनी म्हणून दोन वर्षे नोकरीवर ठेवले.”
“टेंपररी कामानंतर ट्रेनी म्हणून? सात महिने संपताच?” परमनंट करण्याची मागणी करता येऊ नये म्हणून अनेक कारखान्यात सात महिने कामावर ठेवतात, त्याला ते पिरीयड म्हणतात. मग ब्रेक देऊन अनेकदा पुन्हा कामावर घेतात, पण तसे पुन्हा कामावर घेतीलच अशी खात्री कोणालाच नसते.
“होय तसंच. आणि पगार दिला रु.६,५००/-. आणि त्यावर भविष्य निर्वाह निधीची कपात नाहीत.”
“अरे! असं कां? तुम्ही विचारलं नाही?”
“कुणाला विचारणार? विचारणाऱ्याची नोकरी जाते ते आम्ही बघत होतो. इतर कुठे कामही मिळत नाही. ट्रेनिंग संपल्यावर आम्हाला टेंपररी म्हणून कामावर ठेवले. तेव्हापासून आम्ही टेंपररीच आहोत.”
“म्हणजे २००७ पासून प्रथम कॉन्ट्रॅक्टरकडे काम, मग कंपनीत, त्यानंतर ट्रेनी, आणि पुन्हा कंपनीतच टेंपररी कामावर?”
“होय, सात महिन्याचं काम असतं . मग ब्रेक मिळतो. तो कधी दोन-चार दिवसांचा असतो, तर कधी दोन महिन्यांचा.”
“म्हणजे कंपनीत किती काम आहे त्यावर ठरतं.”
“ब्रेकमध्ये काय करतां?”
“रोजन्दारीची कामं. मी मजूरीसाठी पेंटिंग करणाऱ्या मजुरांबरोबर नाक्यावर उभा राहतो. कधी मिळतं काम, कधी नाही. मग घरी परत येतो. माझ्या बायकोला ते आवडत नाही. भांडणं होतात, मी देखील कावलेला असतो. नंतर वाईट वाटतं. सुपरवायझरच्या फोनची वाट बघतो.”
“अजूनही हेल्परचंच काम करतां?”
“नाही. मी वर्षभरात वेल्डिंग शिकलो. पण तुम्ही वेल्डर असा की हेल्पर - पगारात काही फरक नाही, सर्वांना सारखाच. नवीन घेतलेल्या कामगारांनाही माझ्याएवढाच पगार. मग सर्व्हिसचा काय फायदा?”
ही माहिती अगदीच नवी होती असं नाही, पण तरीही मला ती पचवणं जड जात होतं.
“ऍक्सिडेंट झाला तर? तुम्ही वेल्डिंगचे काम करता म्हणून विचारतो.”
“साहेब, कुठचीही कंपनी घ्या, ऍक्सिडेंटच्या दिवसाचा पगार मिळतो, पण त्यापुढे गैरहजर राहिला तर बिनपगारी! हां पण वेल्डरला एप्रन, शील्ड वगैरे सर्व देतात. तरीही अपघात होऊं शकतो.”
बाजूला बसलेल्या एका कामगाराने माझ्या हातावर हात ठेवून माझं लक्ष वेचून घेतलं.

“साहेब, आमच्या कारखान्यात काम करताना एकाचं बोट साफ कापलं गेलं. दोन तुकडे! पण पहिल्या दिवसाच्या पगाराखेरीज कांही दिलं नाही.”
“असं कसं? तुम्ही दाखवताय त्याप्रमाणे तर्जनीचं पुढचं पेर छाटलं गेलं त्याची नुकसान भरपाई कायद्याने बरीच आहे, ती द्यायला लागते.”
“काहीं मिळालं नाही.” दुसऱ्या एका कामगाराने त्याला दुजोरा दिला.
एकविसाव्या शतकात असं घडू शकतं असं मला वाटलं नव्हतं.
“लग्न झालंय?” मी पहिल्याला प्रश्न केला.
“हो साहेब, पाच वर्षापूर्वी. तेव्हां साडेसात हजार रुपये पगार होता. आता मला चार वर्षांचा मुलगा आहे. प्रॉव्हिडंट फंड, इ.एस.आय वगैरे वजा जात, हाती आठ हजार आठशे रुपये येतात.”
“कसं भागतं?”
“ते विचारू नका. घरभाडंच अडीच हजार रुपये आहे. म्हणजे सहा हजारात तिघांनी महिनाभर कसं भागवायचं?”
“साहेब, त्याच्या कंपनीची बस आहे. कॅन्टीन आहे म्हणून जरा बरं आहे. इतरांची अवस्था त्याहून बिकट आहे.”
“खोलीचं भाडं दरवर्षी वाढतं, कारण अकरा महिन्यांनी मालक खोली सोडायला लावतो. पण मुलाच्या शाळेजवळच खोली घ्यायला लागते, नाहीतर खर्च अजून वाढतो.”
“अडीच हजार रुपयात मिळते ती खोली पुरेशी देखील नाही. दहा बाय दहाच्या खोलीत आंम्ही तिघे राहतो. स्वैपाक तिथेच, झोपायचंही तिथेच.”
“मुलगा मोठा होईल लवकरच. अशा पगारात कुठे जायचं?”
“तुमच्या मिसेस नोकरी करतात का?”
“कशी करणार साहेब? चार वर्षाच्या मुलाला शाळेत नेण्यात-आणण्यात दिवस जातो तिचा.”
“कांही जणी करतातही नोकरी. त्यांना पाच-सहा हजार रुपये मिळतात.”
“आमच्या घरी या. आम्ही कसे जगतो ते एकदा पहा.”
मी हे आमंत्रण लगेच स्वीकारले. गप्पा संपल्या की एकाच्या घरी जाण्याचे कबुल केले.
“नुकतीच  दिवाळी झाली. बोनस मिळाला असेल.”
“अनेक ठिकाणी एक महिन्याचा पगार मिळतो.”
“आम्हाला कांही मिळत नाही. दिवाळी बोनस शून्य!”
“असं कसं होईल? तुम्ही तीस दिवस कंपनीमध्ये काम केलंत, टेंपररी म्हणूनही केलंत, तर तुम्हाला बोनस मिळणार - कायद्याने मिळणार.”
“पण मिळत नाही त्यांना,” दुसरा म्हणाला.
“तुमची युनियन काय करते?” मी विचारले . “ते तुमचे प्रश्न घेत नाहीत?”
“त्यांना ते जमत नाही. त्यांनी प्रश्न विचारला तर आमचा पिरियड (सात महिने) संपल्यावर आम्हाला कामावर पुन्हा बोलवत नाहीत. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हो?”
कायद्याप्रमाणे किमान बोनस म्हणजे एक महिन्याचा पगार. तो साडे दहा हजार होतो. काही मालकांना तो भरमसाठ वाटतो, मग ते बोनस देताच नाहीत, किंवा काही रक्कम देतात.
आताशा कारखान्यात शंभरपेक्षा कमी परमनंट कामगार ठेवले जातात. कारण मग मालकांना कारखाना बंद करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत नाही.
“साहेब तुम्ही त्याला लग्न झालंय का म्हणून विचारलं पण आज अशी परिस्थिती आहे की आमच्या कारखान्यात चार-पाच कामगार असे आहेत की त्यांची लग्न जमत नाहीत. म्हणजे त्यांना कोणी मुलगीच देत नाही. मुलाला व्यवस्थित नोकरी असेल तरच मुलगी लग्न करते. आताशा त्यादेखील दहावी-बारावी शिकतात. नोकरी नीट नसेल पण बऱ्यापैकी शेतीवाडी असली तर काहीं जणांचं लग्न जमतं-नाहीतर बॅचलर!”
“खरंच की काय?” माझ्यासाठी हे अगदी नवं होतं. पण हे विदारक होतं.
“मी एका कंपनीत कंत्राटी कामगारांचा करार केला. त्यांचा पगार साडेपाच हजाराने वाढला - म्हणजे काय की कंपनीनेच कंत्राटदाराला पगार वाढवून द्यायला सांगितलं. त्यानंतर मला डझनभर लग्नाच्या आमंत्रण पत्रिका आल्या.” अरविंद श्रोत्री म्हणाले. सगळे हसले.
मी शांत बसून राहिलो. हे सर्व पचवायला जड जात होतं. मनातल्या मनात जे ऐकलं त्याची उजळणी केली आणि विचारलं, “म्हणजे तुम्हाला साधारण दहा हजार पाचशे रुपये पगार मिळतो. आणि त्यातून कपाती वजा करतां तुमच्या हाती आठ हजार आठशे येतात. बरोबर? पण कायम स्वरूपी कामगारांना किती पगार मिळतो?”
“मी समजावतो” त्यातील एक म्हणाला. “आमच्या बॉशच्या कारखान्यात परमनंट १८९ कामगार, ऑफिस स्टाफ ३५०, कंपनीचे ट्रेनी ८००, नीमचे ७५०, कंत्राटदाराचे ४०, यशस्वी इन्स्टिट्यूटचे ४०, यशस्वी स्किल डेव्हलपमेंटचे ४०, रिलाएबलचे ६०, हाऊसकिपिंगचे ४५, बागकामाचे १०, कॅन्टीन वाले ३५, सिक्युरिटीचे ६० आणि फिक्स्ड टाईम कॉन्ट्रॅक्टचे ४० काम करतात. म्हणजे ऑफिस स्टाफ वगळतां २१०९ कामगार आहेत. त्यातल्या अकुशल कामगारांना ७५०० रुपये दरमहा मिळतात, तर इतरांना रु.१०,५००. परमनंट कामगारांना पगार मिळतो तो र.५०,०००/-सीटीसीच्या आधारे - तसा 'ग्रॉस' त्यांना रु.४३,०००/- मिळतो. आता तुम्ही गणित मांडलं तर तुम्हाला दिसेल की सरासरी दरडोई पगार फक्त रु.१३१४२ /- आहे. इथे मी 'इतर' कामगारांचा पगार रु.१०,५००/- धरला आहे, तो कांही कामगारांना रु.७,५००/- मिळतो, म्हणजे सरासरी साडे तेरा हजाराहूनही कमीच आहे!”
“आता जर्मन कंपन्यांचं असं, तर इतरांचं काय?”
लेबर कॉस्ट वाचवतात ती अशी. म्हणजे कमीत कमी परमनंट कामगार ठेवून अधिकाधिक नीम, ट्रेनी असे नेमायचे. अशा धोरणाने ज्या अनिश्चिततेच्या नोकरया दिल्या जातात तिथे कामगारांचे शोषण अपरिहार्य ठरते. असे धोरण उद्योगात इतके प्रचंड प्रमाणात राबवले गेले आहे की केवळ बॉश कंपनीचे नाव घेउन त्यांना वेगळे दाखवणे रास्त नाही, हजारो उद्योगात आज हे शोषणाचे धोरण चालत आहे.
ह्या धोरणाचा एक भयंकर परिणाम होतो आहे. असे बघा की मालक अशा कामगारांना नेहमीच किमान वेतन देत आले आहेत. किमान वेतन वर्षानुवर्षे दिल्याचा काय परिणाम होत आहे ते बघू.
आपण अगोदर एका कामगारबंधुने दिलेली माहिती घेऊया. त्याला २०१० साली ७५०० रु दरमहा मिळत होते. आज त्याला ८८०० रु दरमहा मिळतात - ते हातात येतात, म्हणजे त्याला १०५०० रु महिन्याचे मिळतात असे समजू. ह्या काळात कन्झुमर प्राईस इंडेक्स १७६ वरून ३२० ला पोचला. म्हणजेच इंडेक्स ८२% वाढला. पण त्याचा पगार फक्त ४०% वाढला. [((१०५००-७५००)*१००/७५००)]. जर त्याला वाढीव महागाई पूर्ण प्रमाणात दिली गेली [त्याला १००% neutralisation म्हणतात, आणि तसे कोर्टाचे निर्णय आहेत,] तर त्याचा पगार रु १३६५० असता. [७५००*१.८२= १३६५०]. म्हणजेच कामगारांचे निव्वळ वेतन [रियल वेजेस] २०१० सालापासून ५१% घटले आहे. त्यांची क्रयशक्ती तशी कमी झाली आहे.
“फॉरीन कंपन्यांचं काय घेऊन बसलात? हा बघा XXX कंपनीत काम करतो. त्याच्या कामाची बोलीच बारा तासाची आहे. म्हणजे बारा तास काम केलं की त्याला पंधरा हजार रुपये मिळतात. कधी कधी ओव्हरटाईम म्हणजे चार तास अधिक, सोळा तास काम केल्यावर त्याला चार पाच हजार रुपये वरचे मिळतात. बरं, आठवड्याची सुट्टी नाही, त्यादिवशी इतर कुठे कामाला बोलवतात. पगाराची स्लिपदेखील मिळत नाही.”
“तुम्ही त्याबद्दल कॉन्ट्रॅक्टरकडे बोलला नाही?”
“पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. त्याचं कनेक्शन पार वरपर्यंत म्हणजे अजितदादा पवारांपर्यंत आहे. कोण जाईल त्यांच्या वाटेला?”
“पण मला पुन्हा तोच प्रश्न विचारायचा आहे - तुमच्या कारखान्यातल्या युनियन करतात तरी काय?”
“उपयोग नाही, साहेब.” अजून एक कामगार समजावू लागला. “आमच्या कारखान्यात करार झाला, त्यात कांही कामगारांना परमनंट नोकरीवर ठेवल्याचं ठरलं. सगळ्यांना घेतलं पण चार कामगारांना परमनंट नोकरीत घेतलं नाही.”
“कां असं?”
“मॅनेजमेंट म्हणते की दोन स्टाफचे कर्मचारी युनियनमध्ये आहेत, ते चालणार नाही, त्यांना अगोदर युनियनबाहेर करा, मग बोला.”
“आणि युनियनचे कांही चालत नाही, करार असला तरीही?”
“होय”
“म्हणजे युनियन असून नसल्यासारख्याच”
“काय करणार साहेब, आहे हे असं आहे!” 

बरीच शांतता! मग एक बोलला.
“माझी बायको बारावी शिकली आहे. आम्ही दहा बाय दहाच्या खोलीत राहतो. दोन शाळेत जाणारी मुले आहेत. ती दर संध्याकाळी कावते. मग खडाजंगी होते. आता सहन होत नाहीये.”
“ही तर घर घर की कहाणी आहे.”
बॉश कंपनीच्या कमिटीमेंबरला सोळा वर्षांनी का होईना, कायम स्वरूपी नोकरी मिळाली होती. आता तो भाग्यवान वाटू लागला होता.
   *          *          *
माझी त्या पंधरा-वीस कामगारांबरोबर झालेली चर्चा संपली तेव्हां डोकं भणभणत होतं. मला तो कामगार एका कोपऱ्यात दिसला - त्याच्या घरी मी जायचं कबूल केलं होतं . मी त्याला खुणावलं व आम्ही दोघ बाहेर निघून गाडीत बसलो. तो रस्ता दाखवायला पुढे बसला. एका ठिकाणी त्याने थांबण्याची खुण केली. रस्ता क्रॉस करताना माझ्या वयाकडे बघून त्याने माझा हात धरला. रस्त्यावर ऑटो सुसाट जात होत्या, त्यातून वाट काढत आम्ही रस्ता क्रॉस केला. मुख्य रस्त्यावरून एक अरुंद रस्ता जातो. डावीकडे टपरी म्हणावी अशी छोटी दुकानं होती. एका बोळात वळलो. आणि धारावीसारखी झोपडपट्टी चहूंकडे होती. सर्व घरांपुढे पाण्यासाठी ठेवलेले निळे ड्रम दिसत होते. एक बाई आपल्या वर्षाहून लहान असलेल्या बाळाला घराबाहेर अंघोळ घालत होती. कांही इतरजणी तशाच दाराबाहेर कपडे धूत होत्या, भांडी घासत होत्या, भिंती सर्व रंग गेलेल्या, त्यांचा निळा रंग चढून कांही वर्ष झाली असावीत.
आम्ही त्याच्या घरासमोर आलो. घराचे दार म्हणावे तर एक माणूस वाकून आत जाऊं शकेल असे. बाहेर एक तीन-चार फुटी अर्धी भिंत - तिच्या आडोश्याने अंघोळ करत असावेत. मी क्षणभर बाहेरच घोटाळलो; त्याला आत जाऊन पत्नीला कल्पना देतां यावी की पाहुणा घरी आला आहे. ती खोली दहा बाय दहाची सुध्दा नव्हती. एका भिंतीला लागून किचन प्लॅटफॉर्म असावा असे एक लाकडी फळकुटांचे टेबल, आणि त्यावर एक गॅसची शेगडी. त्याच्या समोरच्या भिंतीत कपडे ठेवायची जागा, बाजूच्या भिंतीत ऍल्युमिनियमचे डबे. त्या खोलीतून आत जाण्यासाठी एक दरवाजा होता. म्हणजे, ती लहान खोली देखील आत जाण्याच्या वाटेमुळे दुभागली गेली होती. 
'साहेब, इथे चार जण एकत्र खाली बसूं शकत नाहीत' तो म्हणाला.
ते सांगायची गरजच नव्हती, तसं दिसतच होतं. त्याची पत्नी उभी होती, तिला बसण्यासाठी तो अवघडून बसला.
"कधीपासून राहताय इथे?'
"माझे वडील बहात्तर सालच्या दुष्काळात इथे आले. ते परत गावाला कधीच गेले नाहीत.”
मी अनेकदा झोपड्यात [झोपडपट्टी म्हणा हवे तर] गेलो आहे, तरीही हा अनुभव नवीन आणि अस्वस्थ करणारा होता. कसे राहत असतील इथे चौघे जण? पाय लांब करायला जेमतेम जागा होती. मुले शाळेत जाणारी असली तरीही 'प्रायव्हसी' मिळणे अशक्यच होते.
"तुम्ही भावाबरोबर राहता, होय ना? काय करतात ते?"
"मला ठाऊक नाही" तो म्हणाला. त्याच्या हावभावाने लक्षात आले की दोघांचे पटत नाहीये. जेव्हा माणसांना पुरेशी जागा नसते, तेव्हा कुरबुर आणि भांडणे वाढतात. म्हणजे त्याची फक्त एकच खोली होती.
त्याची पत्नीनेही मन डोलावली. 'ते कधीही येतात आणि जातात.' ती त्याच्या भावाबद्दल बोलत होती. जागा कमी त्यात अशी समस्या. ती हसली.
हा माणूस गंभीर प्रकृतीचा होता पण त्याच्या पत्नीकडे एक सुंदर स्मितहास्य होते. कोणताही माणूस आणि त्याची पत्नी हे अगदी भिन्न प्रकृतीचेच असतात, तश्याच जोड्या 'तो' जमवतो. समान बाजू इतकीच की दोघेही अंगाने सडसडीत होते.
"मी बारावी शिकले आहे. जवळच्याच ऑफिसमध्ये मी काही काम करते, त्याचे सहा हजारापर्यंत मिळतात."
"ती जमाखर्च काटेकोरपणे पळते." तो म्हणाला.
"ते पगार आणतात तो पर्यंत माझी यादी तयार असते. कुणाला किती द्यायचे आहेत त्याची."
'पंधरा वर्षं सर्व्हिस झाली, माझ्या बरोबर काम करणार्याला कायम स्वरूपी नोकरी दिली, पण मी तसाच आहे, मी अजूनही टेम्पररी. आताशा कोणीच पर्मनंट करत नाहीत. काहीच आशा नाही."
“ब्रेकमध्ये काय करता?”
"नाक्यावर जाऊन उभा राहतो. नशिबात असलं तर पेंटिंगचे काम मिळते. नाही मिळालं तर घरी परत येतो.”
मला काय बोलायचं तेच कळत नव्हतं. तेवढ्यात ऍल्युमिनियमच्या डब्यांजवळून खुडखूड आवाज आला.
'घरात गणपती आहे मग उंदीर येणारच' त्याने भिंतीवरच्या गणपतीकडे बोट दाखवले. तो त्याचा टेन्शन मिटवायचा प्रयत्न होता, आम्ही तिघेही हसलो.
“राहणीमान सुधारलंच नाही, उलट अवघड होऊन बसलंय. मुलं मोठी होत आहेत. मोठा सातवीत तर धाकटा चौथीत आहे. मोठ्याची फी साडे तीन हजार आहे, इतर खर्च वेगळाच.'
“कसे राहतो आम्ही या जागेत ते आमचं आम्हालाच माहीत.”
“महिना संपत आला की आमच्या दोघांची भांडणं सुरु होतात, काय करणार? गांजून गेलोय.”
“काल प्रोजेक्ट का कशाला पैसे हवे म्हणाला हा मुलगा. कुठून आणायचे?” तो बोलू लागला. मी उठतच होतो तेवढ्यात ती दोन्ही मुले आत आली. मी काहीतरी विचारायचे म्हणून बोललो, “कायरे, मोठा झाल्यावर कोण व्हायचंय?”
'मला आर्मीत जायचंय' एक म्हणाला, 'मी इंजिनीयर' दुसरा म्हणाला.
मी आणि तो चालत माझ्या गाडीकडे निघालो. दोघेही निःशब्द. गाडीपाशी पोहोचताच तो म्हणाला, 'साहेब मला माझ्या मुलांना इथल्या मुलांची संगत लागायला नको आहे. पण ते कसे टाळायचे ते मला माहित नाही. त्यांना क्लासला घालायचे आहे. कसं काय जमवायचं कळत नाही.”
आम्ही रस्ता ओलांडून माझ्या गाडीजवळ आलो होतो, आमच्या भेटीने त्याला भरून आले होते. आणि मलाही.
“त्यांची स्वप्नं आहेत. पण मी नोकरीत पन्धरा वर्ष काढली आहेत. अजून किती वर्षं काम करायला जमेल ते ठाऊक नाही. त्याला शाळा संपताच काम धरायला लागेल.”
आम्ही रस्ता ओलांडून माझ्या गाडीजवळ आलो होतो, "धीर धर, सगळं ठीक होईल." मी त्याचा हात धरून म्हणालो.
जे मलाच अजिबात पटलेलं नाही असं काही मी आयुष्यात प्रथमच बोलून गेलो होतो.
         *          *          *
अतीव अनिश्चितता आणि असुरक्षितता ह्या त्यांच्या पाचवीलाच पुजल्या आहेत. ट्रेड यूनियननी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळवलेले हक्क त्यांना दिले जात नाहीयेत. जागतिकीकरणाचा मलिदा इतर कोणी घेऊन गेले आहेत. इथे एक खदखदणारा अंगार आहे, त्या बरोबर हतबलताही आहे.
काळच सांगेल आपल्याला की त्यात क्रांतीची बीजे आहेत की नाहीत.
विवेक पटवर्धन