Wednesday, April 1, 2020

व्हर्जर

(प्रख्यात लेखक सॉमरसेट मॉम यांच्या अनेक कथांतून दहा अप्रतिम कथा निवडायच्या झाल्या तर त्यात ‘व्हर्जर’चा समावेश करावाच लागेल. व्हर्जर म्हणजे बिशपचा वेत्रधारी. तो चर्चची, मुख्यत: आतल्या भागाची देखभाल करतो, चर्चमधल्या ‘सर्व्हिस’साठी अनेक कामे करतो. व्हर्जर कथेचा हा मी केलेला स्वैर अनुवाद. – विवेक पटवर्धन)

नेव्हिल स्क्वेअरमधल्या सेंट पीटर्स चर्चमध्ये नामकरण विधी दुपारीच उरकला होता, तरीही अल्बर्ट एडवर्ड फोरमनने त्याचा व्हर्जरचा पायघोळ अंगरखा उतरवला नव्हता. त्याने त्याचा नवा अंगरखा असा घट्ट घडी करून ठेवला होता की जणू काही तो अल्पाकाच्या उंची लोकरीचा नसून ब्राँझचा आहे असे वाटावे. तो त्याने मोठे विवाह समारंभ व दफन विधींसाठी राखून ठेवला होता. (नेव्हिल स्क्वेअरमधल्या सेंट पीटर्स चर्चमध्ये असे विधी करायची फॅशनच होती.) आज त्याने तसाच दुसरा पायघोळ अंगरखा परिधान केला होता. तो पायघोळ अंगरखा म्हणजे त्याच्या चर्चमधल्या पदाचे चिन्ह होतं. आणि अल्बर्ट तो अभिमानाने मिरवत असे – इतकं की घरी जाताना तो अंगरखा काढून ठेवल्यावर जणू अपुऱ्या कपड्यात असल्याचं त्याला वाटे. अंगरख्याला तो स्वत:च इस्त्री करीत असे. चर्चेमध्ये गेली सोळा वर्षे तो ‘व्हर्जर’ होता, परंतु त्याने त्याचे जुने व जीर्ण अंगरखे कधीही टाकून दिले नाहीत तर ब्राऊन पेपरच्या पिशवीत ते व्यवस्थित घडी करून, त्याच्या कपड्यांच्या कपाटातील तळाच्या खणात नीट ठेवून दिले होते.

अल्बर्टने भराभर कामे उरकली. संगमरवरी फरशीवरल्या कोरीव कामावर लाकडी कव्हर ठेवले, कोणा अपंग स्त्री साठी खुर्ची पुढे आणली होती ती जागेवर ठेवली. वेस्ट्री म्हणजे चर्चमधील अंगरखे ठेवण्याची खोली, ती लहान-सहान कामासाठीही वापरण्यात येते, तिथुन व्हायकार (धर्मगुरू) बाहेर पडला की वेस्ट्रीतली आवरा-आवर करून त्याला घरी जायचे होते.

चर्चच्या मध्यभागी असलेल्या कठड्याजवळ धर्मगुरू गेला, त्याने मधल्या वेदीकडे जाऊन गुढघ्यात झुकून अभिवादन केले, तरीही तो त्याच्या काळा पायघोळ अंगरखा म्हणजे कॅसॉक न काढताच खाली आला होता.

‘ह्याला आता काय हवंय,’ अल्बर्ट मनातच चडफडला. ‘ह्याला समजत नाही का की चहाची वेळ झालीय, आणि आता मला चहा हवा आहे?

धर्मगुरूची नेमणूक नुकतीच झाली होती. चाळीशीतला उत्साही माणूस होता तो. पण अल्बर्टला आधीचा धर्मगुरू तिथे नसल्याची खंत वाटत होती. तो त्याच्या सुरेल आवाजात सर्मन देत असे. चर्चमध्ये येणाऱ्या उच्चपदस्थांसमवेत त्याची उठबस असे. आणि त्याच्या कधीच तक्रारी नव्हत्या. तो प्रत्येक गोष्टींमध्ये नाक खुपसणाऱ्या नव्या धर्मगुरूसारखा नव्हता. तसा अल्बर्ट एडवर्ड सोशिक होता. सेंट पीटर्सच्या परिसरात उच्चभ्रू लोकांची वस्ती होती. आणि नवा धर्मगुरु पूर्वेकडच्या भागातून आला होता, त्यामुळे इथल्या फॅशनेबल लोकांच्या चालीरीतींशी तो सहज जुळवून घेईल अशी अपेक्षा करणेही रास्त नव्हतं.

‘हे सर्व जमेल,’ अल्बर्ट एडवर्ड स्वत:शीच बोलला, ‘जमेल त्याला. थोडा वेळ द्यायला हवा.’

चर्चमधल्या बाकांमधल्या वाटेतून चालत धर्मगुरू अल्बर्टच्या इतक्या जवळ आला की आवाज न चढवतांही, आणि प्रार्थना स्थळात अयोग्य दिसणार नाही अश्या बेताने त्याला अल्बर्टशी त्याला बोलतां येईल.

“फोरमन, वेस्ट्रीमध्ये एक मिनिट याल कां? मला तुमच्याशी कांही बोलायचं आहे.”

“होय, सर”

धर्मगुरू व अल्बर्ट चालू लागले. “नामकरण विधी फार छान झाला, सर. आणि तुम्ही बाळाला उचलून घेताक्षणीच तो रडायचं थांबला. – गंमत वाटली मला.’

“मी बघितलंय की मी उचलून घेतल्यावर अनेकदां बालकं रडणं थांबवतात.” धर्मगुरु हसून म्हणाला. “मी तसं अनेकदां केलंय.”

किरकिरणारी बाळं धर्मगुरू अश्या रीतीने हाती उचलून घ्यायचा की ती रडायची थांबत. हे त्याचा अभिमान बळावणारंच होतं. बाळांच्या माता आणि हॉस्पिटलच्या नर्सेसना धर्मगुरूच्या सफाईचं कौतुक वाटे, आणि त्याला त्याची जाणीव होती. अल्बर्टला पक्कं ठावूक होतं की धर्मगुरूला असं केलेलं कौतुक सुखावून जात असे.

अल्बर्ट धर्मगुरूच्या मागोमाग वेस्ट्रीत शिरला. तिथे दोन चर्चवार्डन होते, त्यांना तिथे बघून अल्बर्टला आश्चर्यच वाटलं; त्यांना आत येताना अल्बर्टने पाहिलं नव्हतं. चर्चवार्डननी मान डोलावूनच अल्बर्टची दखल घेतली.  

“गुड आफ्टरनून, माय लॉर्ड, गुड आफ्टरनून, सर,” त्याने त्या दोघांना अभिवादन केलं.

ते दोघे वयस्कर गृहस्थ होते. जितकी वर्ष अल्बर्ट व्हर्जर म्हणून काम करीत होता, तितकी वर्षे ते ही चर्चवार्डन होते. अनेक वर्षांपूर्वी जुन्या धर्मगुरूने इटलीहून जेवणाचे एक सुंदर टेबल मागविले होते, त्या टेबलाजवळ ते बसले होते. धर्मगुरूने त्या दोघांमधली खुर्ची घेतली. टेबलाच्या एका बाजूस ते पण त्यांच्या समोर अल्बर्ट, दुसर्‍या बाजूस होता. पुढे काय वाढून ठेवलं आहे असा विचार करीत अल्बर्ट  अस्वस्थ झाला होता. मागे एकदा ऑर्गन वाजवणारा गोत्यात आला होता तेव्हां त्यांना त्या प्रकरणावर पडदा टाकताना किती त्रास झाला होता ते अल्बर्टच्या अजूनही स्मरणात होतं. नेव्हिल स्क्वेअरच्या सेंट पीटर्स चर्चेमध्ये एखादी भानगड उपटणं त्यांना परवडणारे नव्हतं. धर्मगुरूच्या लालसर चेहऱ्यावर सौम्य व तरीही कांही निश्चय केल्याचे भाव होते, तर ते दोघे चर्चवार्डन त्रासलेलेच दिसत होते.

‘तो ह्या दोघांच्या मागेच लागला असणार,’ अल्बर्टने विचार केला. ‘त्याने ह्या दोघांना काहीतरी करायला भाग पाडलंय, आणि त्यांना ते जराही आवडत नाही, असं दिसतंय – हे तर नक्कीच.’

पण त्या भावना अल्बर्टच्या चेहऱ्यावर उमटल्या नाहीत. तो त्यांचा मान ठेवून उभा होता, पण त्याच्या देहबोलीत अगतिकता नव्हती. चर्चमध्ये नोकरी मिळण्यापूर्वीही त्याने कामे केली होती पण ती फक्त चांगल्या ठिकाणीच; आणि त्याची वर्तणूक कधीच आक्षेपार्ह नव्हती. साध्या कामावर सुरवात करून त्याने भराभर प्रगती केली; तो एका सरदार घराण्यातील विधवेकडे बटलर होता. नंतर एका निवृत्त राजदूताच्या घरी त्याने बटलरचे काम केले तेव्हां त्याच्या हाताखाली दोघे कामाला होते. हे सर्व सेंट पीटर्समध्ये व्हर्जरचे पद रिक्त होण्यापूर्वी. अल्बर्ट उंचापुरा होता. तो विचारशील होता आणि स्वत:चा आब राखून असे. तो राजबिंडा दिसत नसेलही, पण राजघराण्यातील व्यक्तींची भूमिका करणाऱ्या एखाद्या कसलेल्या नटासारखा दिसत असे हे नक्कीच. तो चतुर आणि निश्चयी होता आणि त्याच्याजवळ आत्मविश्वास होता. त्याच्या चारित्र्याबद्दल तर संशयालाही जागा नव्हती.

धर्मगुरूने लगेच सुरवात केली, म्हणाला, ‘फोरमन, आम्ही जे तुमच्याशी बोलणार आहोत ते कटू आहे. तुम्ही इथे अनेक वर्षं काम करीत आहात. आणि तुम्ही नेमून तुमचं काम इमाने इतबारे व सर्वांची मर्जी राखून केलंय यात शंकाच नाही. इथे बसलेले लॉर्ड व जनरलसाहेब यांचही असंच मत आहे.’

दोन्ही चर्चवार्डननी सहमती दाखवली.

“पण एक विलक्षण गोष्ट मला नुकतीच कळली, आणि ती दोन्ही चर्चवार्डनच्या नजरेस आणून देणं माझं कर्तव्य होतं. मला हे समजल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला की तुम्हाला लिहिता वाचता येत नाही!”

अल्बर्टच्या चेहऱ्यावर जराही अवघडलेपणा दिसला नाही.

“आपल्या आधी असलेल्या धर्मगुरुंना हे ठाऊक होतं, सर,” अल्बर्ट म्हणाला. “ते म्हणाले होते की त्याने कांहीच फरक पडत नाही. ते नेहमीच म्हणत की जगात शिक्षणाचा फारच बाऊ केला जातोय.

“मी तर हे कांहीतरी विलक्षणच ऐकतोय!” जनरल म्हणाले. “म्हणजे सोळा वर्षे इथे व्हर्जरचे काम करीत आहात, पण लिहा-वाचायला शिकलाच नाही?

“मी बाराव्या वर्षापासून कामाला लागलो. इथे आल्यावर इथल्या कुकने प्रथम मला धडे दिले, पण मला कांही ते जमलेच नाही, आणि मग ते राहूनच गेले ते राहिलेच. मलाही त्याची उणीव भासली नाही. मला वाटतं की हल्लीची बरीचशी तरुण मंडळी वाचन करण्यात वेळेचा अपव्यय करतात त्यापेक्षा कांहीतरी उपयुक्ततेचं काम त्यांनी करायला हवे.”

“पण कधी तुम्हाला बातम्या वाचाव्याश्या वाटल्या नाहीत?” दुसरा चर्चवार्डनने विचारले. “कधी पत्र लिहावेसे वाटले नाही?

“नाही, माय लॉर्ड. माझं त्याशिवायही चांगलं निभावलं. आणि पेपरात येणाऱ्या फोटोवरून काय चाललंय ते बऱ्यापैकी समजतं. माझी पत्नी सुशिक्षित आहे, त्यामुळे मला पत्र लिहायचं असलं तर ती माझ्यासाठी लिहिते.”

दोन्ही चर्चवार्डननी धर्मगुरूकडे चिंतीत नजरेने पाहिलं व खाली मान घालून ते बसले.

“असं पहा, फोरमन, मी ह्या दोघांशी बोललो आहे, आणि ही परिस्थिती अवघडच आहे असं त्यांचंही माझ्यासारखंच मत आहे. नेव्हिल स्क्वेअरमधल्या सेंट पीटर्स चर्चसारख्या जागी ज्याला लिहिता-वाचतां येत नाही असा व्हर्जर आम्ही ठेवूंच शकत नाही.”

अल्बर्ट एडवर्ड लालबुंद झाला, त्याची चलबिचल झाली, पण त्याने उत्तर दिले नाही.

“समजून घ्या फोरमन, मला तुमच्याबद्दल कोणतीही तक्रार नाहीये. तुम्ही चांगलं काम करताय आणि मला तुमच्या चारित्र्याबद्दल पूर्ण खात्री आहे. परंतु तुमच्या अज्ञानामुळे न जाणो एखादी दुर्घटना होऊन देणे आमच्यासाठी रास्त होणार नाही. हा केवळ खबरदारीचाच प्रश्न आहे असं नाही, तो तत्वाचाही प्रश्न आहे.”

“पण, तुम्ही शिकू शकणार नाही कां?” जनरलने विचारले.

“नाही सर. आता ते जमण्यासारखं नाही. मी आता पूर्वीसारखा तरुण राहिलो नाही, आणि तेंव्हा मी उत्साही असताना मला ते जमलं नाही, तर आत्ता जमेलसं वाटत नाही.”

“तुमच्याशी कठोरपणे वागायचा इरादा नाहीये, फोरमन,” धर्मगुरू म्हणाले, “पण चर्चवार्डन आणि मी, आम्ही याबाबत ठाम निर्णय घेतला आहे. आम्ही तुम्हाला तीन महिन्यांची मुदत देतो – तीन महिन्याअखेर जर तुम्ही लिहू-वाचूं शकला नाहीत तर आमचा नाईलाज होईल, पण तुम्हांला नोकरीवरून जावे लागेल.”

अल्बर्टला नवा धर्मगुरू कधीच आवडला नव्हता. त्याला सेंट पीटर्सला आणण्यात चूक झाली आहे असेच तो म्हणत असे. अल्बर्ट ताठरला. त्याला स्वत:च्या क्षमतांची जाणीव होती, व किंमतही; तो त्यांना स्वत:वर कुरघोडी करून द्यायला तयार नव्हता.

“माफ करा सर, हे जमण्यासारखं नाहीये. मी नवं कांही शिकेन असं माझं वय आता राहिलं नाही. मी इतकी वर्षे लिहिता-वाचतां न येतांही – मला ना स्वत:ची तारीफ करायची ना शिफारस – मला दैवाने ज्या परिस्थितीत ठेवले त्यातही मी माझे कर्तव्य व्यवस्थित पार पाडले आहे. आता माझी शिकायची तयारी नाही.”

“असं असेल तर, फोरमन, तुम्हाला जावं लागेल.”

“होय सर, ते समजलंय मला. तुम्ही माझ्या जागेसाठी दुसरा कोणी निवडलात की मी राजीनामा देऊन निघून जाईन.”

अल्बर्टने धर्मगुरू व चर्चवार्डन बसले होते तिथला चर्चचा दरवाजा त्याच्या संवयीच्या विनम्रतेने लावून घेतला, आणि मग त्याला संयम राखता आला नाही. आतापर्यंत त्याने धीराने वार झेलला होता. पण आता तो पवित्रा राहिला नाही. त्याचे ओठ कांपू लागले, तो वेस्ट्रीकडे पुन्हा गेला, आणि नेमलेल्या खुंटीवर त्याने त्याचा अंगरखा टांगला. त्याला दिमाखाने झालेले लग्नसमारंभ आठवले, तश्याच मोठ्या अन्त्ययात्राही. त्याने एक उसासा टाकला, आवरा-आवर केली आणि चर्चचा दरवाजा बंद केला. तो चालत चौकात आला. त्याच्या दु:खात आणि विचारात तो गढून गेला होता. आणि चौकात आल्यावर घरी जाण्यासाठी (घरी गरमागरम कडक चहा त्याची वाट पाहत होता) जिथे वळायला हवे होते तिथे तो वळला नाही, त्याने चुकीचे वळण घेतले. तो शांतपणे चालत होता, त्याला भरून आले होते. आता काय करायचे हा प्रश्नच होता, कांहीच कल्पना नव्हती. इतकी वर्षे त्याने स्वतंत्रपणे काम केले होते, आता पुन्हा लोकांच्या घरी कामासाठी जाण्याचा त्याचा इरादा नव्हता. धर्मगुरू व चर्चवार्डन कांहीही म्हणोत, परंतु त्याने चर्चचा कारभार व्यवस्थितपणे चालवला होता आणि आता मानहानीकारक परिस्थितीला शरण जाणं त्याला मंजूर नव्हतं. त्याने बऱ्यापैकी पैसा गांठीस बांधला होता, तरीही केवळ तेवढ्यावर कांही न करतां उर्वरित आयुष्य काढणं शक्यच नव्हतं, आणि खर्चही वर्षागणिक वाढत होता. असे जगण्याचे प्रश्न आत्तापर्यंत त्याच्या मनाला कधी शिवलेही नव्हते. सेंट पीटर्सचा व्हर्जर, रोममधल्या पोपप्रमाणेच, जिवात जीव असेपर्यंत, चर्चचेच होते. अल्बर्ट एक दिवास्वप्न पाहत असे: तो जग सोडून गेल्यावर रविवारच्या सायंप्रार्थनेत धर्मगुरू अल्बर्ट एडवर्ड फोरमनच्या इमानदारीने केलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल तसेच त्याच्या आदर्शवत् चारित्र्याबद्दल बोलतोय. त्याने उसासा टाकला. अल्बर्ट दारू पीत नसे, आणि धूम्रपानही करीत नसे – पण त्याला छोटे अपवाद होते. रात्रीच्या जेवणाबरोबर त्याला एक बियरचा ग्लास घ्यायला आवडत असे, आणि कधी थकून-भागून आल्यावर एखादी सिगारेटही. पण आज त्याच्या खिशात आज सिगारेट नव्हती. सिगारेट जरा ताण हलका करेल असं वाटून गोल्ड फ्लेकचं पाकीट घेण्यासाठी तो दुकान शोधत राहिला. त्याला एकही दुकान दिसलं नाही. तो थोडं अंतर पुढं गेला. तसा तो रस्ता बराच मोठा होता, - तिथे अनेक प्रकारची दुकाने होती, पण एकही दुकान असे नव्हते जिथे सिगारेट मिळावी.

“गंमतच आहे” अल्बर्टला वाटलं.

खात्री करून घेण्यासाठी त्याने पुन्हा एकदा रस्ता वर-खाली धुंडाळला. एकही सिगारेटचे दुकान त्या रस्त्यावर नव्हते यात शंकाच उरली नाही. तो थांबला आणि विचार करू लागला.

“या रस्त्यावर चालताना सिगारेट ओढावीशी वाटणारा कांही मी एकटाच असुं शकत नाही.” तो विचार करीत होता. “इथे छोटेसे सिगारेट-चॉकलेटचे दुकान कसे चालेल …. चांगलेच चालेल बहुधा.”

आणि तो निघाला. “मस्त कल्पना आहे,” तो स्वत:शीच पुटपुटला. “किती अनपेक्षितपणे कल्पना सुचतात – आश्चर्यच म्हणायचे.”

तो घराकडे वळला. तिथे त्याच्यासाठी चहा तयार होता.

“आज तुम्ही अगदी गप्प कसे?” त्याची पत्नी म्हणाली.

“मी विचार करतोय”

त्याने त्या कल्पनेचा सर्वंकष विचार केला. दुसर्‍या दिवशी तो पुन्हा त्या रस्त्यावर गेला, आणि त्याचं नशीब असं की त्याला जसं हवं होतं तसंच एक छोटं दुकान भाड्याने देणं होतं. दुसर्‍या दिवसाअखेर ते घेतलंही. नेव्हिल स्क्वेअरमधल्या सेंट पीटर्सला रामराम ठोकल्यापासून महिन्याभरातच अल्बर्ट एडवर्डने सिगारेट, चॉकलेट-टॉफी व वर्तमानपत्रे-मासिके विकायचा व्यवसाय उभा केला. त्याची पत्नी म्हणाली की चर्चेच्या व्हर्जर पदानंतर असा व्यवसाय करणं म्हणजे अगदी खालच्या पातळीवर घसरणं आहे; पण अल्बर्ट उत्तरला की चर्च आता पूर्वीसारखं राहिलं नाही.

अल्बर्टला व्यवसायात चांगलंच यश मिळालं. वर्षभरात त्याचा व्यवसाय इतका फळफळला की दुसरं दुकान घेऊन त्यात मॅनेजर नेमावा असं त्याला वाटू लागलं. मग त्याने अजून एक रस्ता शोधला ज्याच्यावर सिगारेट-चॉकलेटचं दुकान नव्हतं. तिथेही त्याने एक दुकान भाड्याने मिळवलं. हे दुसरं दुकानही चांगलं चालू लागलं. त्याच्या ध्यानी आलं की जर तो दोन दुकानं चांगली चालवू शकतो, तर त्याला अर्धा डझन दुकानेही अशीच चालवता येतील. मग त्याने लंडनमधले असे रस्ते शोधले जिथे दूरवर सिगारेट-चॉकलेटचं दुकान नव्हतं. तिथे त्याने दुकाने भाड्याने घेतली आणि चांगलाच जम बसवला. बघता बघता दहा वर्षात त्याची दहा दुकाने झाली. तो दर सोमवारी प्रत्येक दुकानात जाई व मागील आठवड्याची कमाई बॅंकेत भरत असे.

एके दिवशी नोटांचा जुडगा आणि नाण्यांची जड थैली घेऊन तो बॅंकेत भरायला गेला तेव्हां कॅशियरने सांगितले की मॅनेजर त्याला भेटू इच्छितात. मॅनेजरच्या ऑफिसमध्ये त्याला कोणीतरी नेलं आणि मॅनेजरने त्याचे स्वागत केले.

“मिस्टर फोरमन, आमच्या बॅंकेत तुमची जी जमा आहे त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला कल्पना आहे काय की किती रक्कम तुमच्या अकौंटमध्ये आहे?”

“अगदी अचूक नाही सांगू शकणार पण दोन चार पौंडांच्या फरकाने मी सांगू शकतो. मला स्पष्ट कल्पना आहे की बॅंकेत माझे किती पैसे जमा आहेत.”

“आज तुम्ही ठेवलेली रक्कम वगळता, तीस हजार पौंडाहूनही थोडे अधिकच आहेत. ही घसघशीत मोठी रक्कम आहे. मला वाटतं तुम्ही नीट गुंतवणूक करावीत.”

“मला कुठचाही धोका पत्करायचा नाहीये. आणि मला ठाऊक आहे की माझे पैसे तुमच्या बॅंकेत सुरक्षित आहेत.”

“त्याबद्दल अजिबात काळजी नको. आम्ही तुम्हाला सर्वोत्तम सिक्युरिटीजची यादी देऊ. त्यात गुंतवणूक केली म्हणजे तुम्हाला उत्तम दराने व्याज मिळेल.”

अल्बर्ट एडवर्ड फोरमनच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. “मी स्टॉक्स व शेअर्सपासून कटाक्षाने दूर राहिलो आहे. मला ते सर्व तुमच्यावर सोपवावं लागेल.”

“आम्ही सर्वकांही करुं. पुढच्या वेळी तुम्ही इथे याल तेव्हां फक्त एकच करायचं – ते म्हणजे गुंतवणुकीसाठी पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी सह्या.”

“मी ते करीनही” अल्बर्ट चाचरत बोलला. “पण मी कशावर सह्या करतोय ते मला कसं समजणार?

“तुम्हाला वाचतां तर येतंय ना?” मॅनेजर जरा तिखटपणेच बोलला.

फोरमन त्याच्याकडे बघून हसला. “सर, तीच तर गोम आहे. मला नाही वाचतां येत, हे विचित्र वाटेल तुम्हाला, पण वस्तुस्थिती आहे. मी लिहू-वाचूं शकत नाही. फक्त माझं नांव लिहू शकतो आणि ते देखील मी या व्यवसायात आल्यापासून.”

मॅनेजर तर उडालाच, तो उठून उभा राहिला.

"अत्यंत विलक्षण! याहून अधिक विलक्षण मी कधीच कांही ऐकलं नाहीये."

"ते असं आहे सर, मला शिकायची संधी मिळाली तेव्हां फार उशीर झाला होता, आणि त्यानंतर मी शिकायला नकार दिला - मी त्याबाबत कांहीसा आडमुठेपणा केला म्हणाना."

“आणि तुम्ही मला सांगताय की तुम्ही हा मोठ्ठा व्यवसाय उभा केलात, तीस हजार पौंडांची माया जमवलीत ती एक अक्षरही न लिहिता-वाचतां? अरे देवा! अहो, तुम्हाला लिहिता-वाचतां येत असतं तर आज तुम्ही कोण असतांत?”

“हां, ते मी तुम्हाला सांगू शकतो, सर” फोरमनच्या अमिरी चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. “मी नेव्हिल स्क्वेअरच्या सेंट पीटर्स चर्चचा व्हर्जर असतो!”

                        *     *     *     *

विवेक पटवर्धन