Friday, May 13, 2022

बालपणातील १0 चवी

 डॅनी ग्रेगरी मला नियमित ई-मेल पाठवतो. म्हणजे त्याचे काय की मी त्याचे ‘आर्ट बिफोर ब्रेकफास्ट’ वाचले आणि त्याच्या वेबसाईटवर जाऊन त्याची नियमित ई-मेल येण्यासाठी जिथे कुठे टिचक्या मारायच्या होत्या तिथे टिचकावून आलो. त्याची प्रत्येक ई-मेल नवीन काहीतरी सुचवून जाते. डॅनी ग्रेगरी भन्नाट माणूस आहे.

आता हेच बघाना – त्याच्या नुकत्याच आलेल्या ई-मेलचा विषय आहे – ‘बालपणातील १२ गंध’. मग त्याने एक यादीच दिली आहे. त्यातले कित्येक गंध आपल्याला ठाऊक नाहीत कारण तो वेगळ्या जगात वाढला.

मला वाटलं माझ्या ‘बालपणातील १0 चवींची यादी’ करावी. ती इथे देतो. तुम्हीही लिहा.

१. तूप-साखर-पोळी - माझ्या शाळेच्या डब्यात हा पदार्थ नेहमीचा.

२. करवंद – किती करवंद जाळीतून तोडून फस्त केली ते अगणित आहे, पण त्या जाळीत साप असेल कां ही भीती सदैव मनात होती. करवंदाच्या जाळीजवळ कुठे खुट्ट वाजले की मी पळून जात असे. 

३. तोरणं – हे पिठूळ पण गोड चवीचे पांढरे छोटे फळ आता कुठेही दिसत नाही. वयाची पहिली आठ वर्षे मी खोपोलीवरून जुन्या घाटातून खंडाळ्याला जाताना टाटा कॉलनी लागते तिथे काढली. आसपास जंगलच होते.

४. फुलातले मध – कांही फुले तोडून त्यातला मध चोखून घेता येतो (हा उपद्व्याप करण्यासाठी आजूबाजूला बरीच फुले असावी लागतात! त्यावेळी त्यांची कमतरता नव्हती)


५. घाणेरीची पिकलेली फळे – ती काळी असतात. गोड लागतात. हिरवी फळे विषारी असतात असं कोणीतरी म्हणाले होते त्यामुळे त्यांच्या वाटेला कधी गेलो नाही.

६. दूध – हा मला अजिबात न आवडणारा पदार्थ. पण पेलाभर पिण्याशिवाय गत्यंतर नव्हते. (‘जगात माणूस असा एकच प्राणी आहे जो दुसऱ्या प्राण्याचे दूध पितो’ असं कोणीतरी बोलल्यापासून तर मी ते बादच करून टाकले.)

७. कॉडलिव्हर ऑईल – शाळा सुटली की एक ग्लास दूध पिणे सक्तीचे होते (टाटा कॉलनीत राहत असल्याचे परिणाम) आणि ग्लास रिकामा झाल्यावर एक चमचाभर कॉडलिव्हर ऑईल प्यावे लागे. मला त्याबद्दल कधीच तक्रार नव्हती. एखादी चव आपल्याला आवडते त्याचे कारण त्या जोडीच्या दुसऱ्या पदार्थाची चव आवडत नाही हे त्या वेळेलाच कळले. 

८. विलायती चिंचा – त्या झाडावरून खाण्यात जी मजा आहे ती विकत घेऊन खाण्यात नाही. मी पंचवीस वर्षे कल्याणला राहिलो. तिथल्या लक्ष्मी मार्केटमध्ये एक असे दुकान आहे की तिथे फक्त बोरं, विलायती चिंचा, आवळे वगैरे मुलांना आवडणारे पदार्थच मिळतात. मीही कित्येकदा तिथे चिंचा घेतल्या आहेत. पण झाडावरून मिळवलेल्या चिंचा एकदम ‘फार्म फ्रेश.’ त्यांची सर कशाला नाही.

९. दूध-गुळ-पोहे – आता हा पदार्थ बाद झाला आहे. कोणीही करत नसावे, दिसत तर नाहीच, पण कुणाला त्याची आठवणही येत नसावी. जरी त्यात दूध असले तरीही त्या पदार्थाबरोबर काही आठवणी आहेत. गूळ खाणेच कमी झाले आहे, असे नाही कां? गुळाइतका दुसरा मधुर पदार्थच नाही असे माझे मत. कांही पदार्थ आठवणींनी गोड लागतात. मी चहात पोळी बिस्कीटासारखी बुडवून खात असे. त्या काळी अनेक तसे खात असत. त्याचीही चव अजून लक्षात आहे.

१०. विम्टो – आम्ही मुंबईला आलो तेंव्हाचे लोकप्रिय पेय. मला वाटतं ड्युक्स कंपनी ते बनवायची. एक ट्रक घरी क्रेट देऊन जायचा. खोपोली सोडून मुंबई शहरात आल्याची ती माझ्यासाठी खूण. आता तीही दिसत नाही.

कित्येक पदार्थांवर आठवणी लिहिल्या जातात. डॅनी ग्रेगरीमुळे पुन्हा जागृत झाल्या. 

विवेक पटवर्धन