Wednesday, August 12, 2020

एक फोटोग्राफर आणि चाळीस वर्षांची कहाणी

 


दुपारची वेळ. मी टीव्हीच्या न्यूज चॅनेलना कंटाळलो होतो. स्पोर्ट्स चॅनेल त्याच त्याच मॅचेस पुन्हा दाखवत होती. मग मी नेटफ्लिक्सकडे वळलो. नेहमीप्रमाणे त्यांनी सहा-आठ कार्यक्रम स्क्रीनवर माझ्यापुढे टाकले. त्यात एक होता ‘क्युबा अँड द कॅमेरामन’.

मी नुकताच अभिजित भाटलेकर यांचा फोटोग्राफीचा एक कोर्स शिकलो होतो. ‘क्युबा अँड द कॅमेरामन’ मध्ये क्युबाचे फोटो बघू असे मनाशी बोलत मी त्यावर क्लिक केले. आणि एक अप्रतिम फिल्म बघितली. जे हाती लागलं ते फोटो नव्हते तर चक्क एका विलक्षण कॅमेरामनने त्याच्या व्हिडिओ कॅमेऱ्यात पकडलेला क्युबाचा चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा इतिहास – आणि तो देखील लोकांच्या आयुष्यातील क्षण पकडून विणलेला.

जॉन अल्पर्ट हा कॅमेरामन. त्याने केलेल्या फिल्मनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत. पण ती नंतरची गोष्ट. जॉन विशीतला तरुण होता तेव्हां त्याला एक अफलातून कल्पना सुचली – क्युबामध्ये जाऊन लोकांच्या जीवनाचं चित्रीकरण करायची. असं चित्रीकरण त्याने तब्बल चाळीस वर्षं केलं. सत्तरीच्या दशकापासून ते फिडेल कॅस्ट्रोच्या निधनापर्यंत जॉन अल्पर्टने क्युबाच्या अनेक फेऱ्या केल्या.

जॉन हा अमेरिकन वार्ताहर आहे, त्यामुळे त्याच्याकडे अद्ययावत उपकरणे उपलब्ध होती. पण त्यावेळी, म्हणजे सत्तरीच्या दशकात व्हिडिओ रेकोर्डिंग प्रगत नव्हते. त्याची उपकरणे इतकी बोजड होती की त्याला ती एका ‘बाबागाडीत’ ठेवावी लागली. तो विचित्र प्रकार बघून फिडेल कॅस्ट्रोचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले, आणि त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली.

पण ‘क्युबा अँड द कॅमेरामन’ ही कांही फिडेल कॅस्ट्रोवर केलेली फिल्म नाही. क्रांतीनंतर बऱ्यापैकी सुबत्ता असलेल्या देशात फिडेलने मोफत शिक्षण जाहीर केलं. (ज्या देशात शिक्षणाचा गंधही नसलेले बरेच लोक होते, तो देश १९६१ सालापर्यंत संपूर्ण साक्षर झाला). त्याच्या धोरणांना समाजवादी म्हणा किंवा कम्युनिस्ट – स्वत: फिडेल त्याच्या धोरणांना अशी लेबलं लावीत नव्हता – पण त्यांचे अनेक बरे वाईट परिणाम क्युबन समाजावर झाले.


जॉन अल्पर्ट मात्र कांही लोकांना त्याच्या प्रत्येक क्युबावारीत न चुकता भेटत राहिला. तीन भाऊ आणि त्यांची एक बहिण यांच्या आयुष्यातले चाळीस वर्षांतले बदल, म्हणजे चढउतार त्याने व्हिडिओ कॅमेऱ्यात पकडले. उत्तम शेती करणारे हे तीन भाऊ सुस्थितीतून हलाखीच्या अवस्थेत आले. सोविएत रशिया फुटल्यानंतर क्युबामध्ये एक वेळ अशी आली की दुकानात शेल्फ रिकामी दिसत, अन्नपदार्थ अजिबात नव्हते. त्या तीन भावांकडे असलेली गुरे लोकांनी चोरली. कशासाठी? तर त्यांना मारून खाण्यासाठी, आणि त्यांत त्यांचा एक घोडाही चोरांनी खाण्यासाठी नेला! स्वास्थ्यसेवा मोफत दिली गेली पण डॉक्टरकडे असणारी उपकरणं मात्र बरीच जुनी व जुन्या तंत्रज्ञानाची दिसली. त्याचा पगार? दरमहा पंचवीस डॉलर्स!

खुद्द फिडेल बरोबर जॉन न्यूयॉर्कला त्याच्याच विमानातून गेला व त्याची मुलाखतही घेतली आहे. क्युबातील माणसांच्या जीवनातील चाळीस वर्षे जॉनने अशी पकडली की त्या समाजाबद्दल आपल्याला बरेच कांही समजते. त्यांचे प्रश्न, त्यांची जगण्याची रीत हा एक कॅलेडिओस्कोपच आपल्यासाठी तयार होतो. लुईस नांवाच्या माणसाला दर क्युबावारीत जॉन भेटत राहिला. दर वेळेस त्याच्या घरी गेला. तसाच एक मुलगी दहा वर्षांची असल्यापासून तिला मुलं होणे, ती मुलं मोठी होणे, तिचं अमेरिकेला स्थलांतर होणे हे सर्व त्याने बघितले आणि कॅमेऱ्यात टिपले. जॉनने क्युबामधील मानवाधिकार उल्लंघनाबद्दल काहीही भाष्य न केल्याची टीका झाली, तरीही ‘क्युबा अँड द कॅमेरामन’ आपल्याला बरेच कांही सांगून जातो.

समाजवाद लोकांना शेवटी इथे आणून पोचवतो असे दिसलं तरी भांडवलशाही देखील फार मागे नाही ह्याची जाणीव आता सर्वांना झाली आहे. राज्यकर्ते, त्यांच्या आकांक्षा, त्यांची धोरणे आणि त्यांचा समाजावरील दूरगामी परिणाम हा आपल्याकडेही चर्चेचा विषय आहे. त्यामुळे क्युबाकडे बघताना आपणही ‘कुछ समझे?’ विचारत राहतो.

विवेक पटवर्धन