Thursday, May 3, 2018

माणसांना माणुसकीने वागवायचं ‘कंत्राट’ घेणारे गोविन्द्काका ढोलकिया


कधीकधी आशेचा एक किरण अचानक दिसतो. त्यावेळी असं वाटतं की इतके दिवस आपण भलतीकडेच शोध घेत होतो. थोडक्यात सांगायचे तर कंत्राटी कामगारांच्या हाल-अपेष्टा पाहून मी इतका निराश झालो होतो की त्यांना सन्मानाने वागवणारा ‘मालक’ सापडायची मी आशाच गमावून बसलो होतो. हिमांशु भट म्हणाले की श्रीरामकृष्ण एक्स्पोर्ट [SRK] कंपनी जगावेगळी आहे आणि तिथे सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाते. हिमान्शुभाइंनी माझी गाठ घालून दिली ती त्या कंपनीच्या एच आर प्रमुख डॉ. नीरवबरोबर. मला SRK कंपनीच्या कारखान्याला आणि कार्यालयाला भेट देण्याचं आमंत्रण मिळालं, पण अधिक आकर्षण होतं ते म्हणजे कंपनीचे मालक गोविन्द्काका ढोलकिया यांना भेटण्याचं. केवळ सातवी पास असलेल्या गोविन्द्काकांनी सात हजार कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी उभी केली आहे.
‘तुम्ही कुणालाही भेटू शकता, कुणाचीही मुलाखत घेऊ शकता, कोणताही निर्बंध नाही, कारखान्यात कुठेही जा’ डॉ नीरव म्हणाले. मला कामगारांची मुलाखत तर घ्यायची होतीच, आणि खुद्द गोविन्द्काकांचीही मुलाखत हवी होती. मला तर संपूर्ण मोकळीक मिळाली होती. हे असं सहसा घडत नाही. हिऱ्यांना पैलू पडण्याचा, पॉलिश करण्याचा व्यवसाय सगळा गूढच असतो. तिथे सगळेच गुप्ततेत, मोकळेपणाचा संपूर्ण अभावच. SRK वेगळे असल्याचा पहिला प्रत्यय आला तो असा.

मी तीन कामगारांची मुलाखत घेतली. आज SRK मध्ये ४५०० कामगार काम करतात. ते अद्ययावत यंत्रे चालवतात, कित्येक तर संगणकाच्या आदेशाने चालवतात.
‘कुठे शिकलात हे तंत्र?’
SRKमध्ये’.
ही कंपनी अकुशल कामगारांना तांत्रिक कौशल्य शिकविते, आणि जर तुम्ही ते आत्मसात केलंत तर कामावर ठेवते.
‘पगार किती मिळतो?’
‘तीस-पस्तीस हजारापासून ते एक लाख रुपयांपर्यंत, इन्सेनटीव धरून’
‘महिन्याचा सांगताय की वर्षाचा?’
‘महिन्याचा!’
‘एक लाखापर्यंत?’
‘होय!’
कामगारांना कामावर ठेवण्याचा एकाच निकष – तुम्हाला कामाचे तंत्र अवगत असले पाहिजे – त्यासाठी शैक्षणिक पात्रतेची अट नाही.
मी त्या तीन कामगारांची बराच वेळ मुलाखत घेतली. दहा वर्षांपूर्वी हिरे उद्योगास मंदीचा झटका बसला होता. पण गोविन्द्काकांनी एकालाही नोकरीवरून काढले नाही. अनेक कामगार कामाशिवाय बसून होते, पण पगार मिळत होता, नोकरी शाबूत होती. शंभर-सव्वाशे कामगारांनी गोविन्द्काकांचे आभार मानले, कृतज्ञता व्यक्त केली. जितका संवेदनशील मालक, तितकेच संवेदनशील कामगार! कामगारांच्या पत्राचा सूर असा ‘तुमचा हा माणुसकीचा निर्णय आम्ही विसरणार नाही. आम्हीही वेळ येताच या ना त्या मार्गाने हे ऋण फेडू.’ मी चटकन खिशातून फोन काढला आणि फोटो घेतला त्या पत्रांचा.

इथे चक्रावणारी गोष्ट म्हणजे इथे फक्त शंभर कामगार कायम स्वरूपी कामावर आहेत. बाकी सर्व कंत्राटी. पण विलक्षण बाब अशी की त्यांचा पगार सारखाच – त्यात काही तफावत नाही – इतर उद्योगात कायम स्वरूपी कामगारांना कंत्राटी कामगारांपेक्षा दुप्पट ते पाचपट अधिक पगार मिळतो – पण इथे मात्र समानता! जे पगाराचे तेच इतर लाभांचे. जे कामगार विमा योजनेखाली येत नाहीत त्यांना मेडिक्लेम पॉलिसी – ती देखिल एक ते पाच लाखापर्यंत. आणि सर्व भत्ते, इंसेनटीव सर्व अगदी एकसारखेच.
मग असे कंत्राटी पद्धतीवर का बरे कामगार ठेवलेत? मला वाटतं की हा प्रश्न निव्वळ कुतूहलाचा आहे. अप्रस्तुत आहे. कठीण परिस्थितीतही गोविन्द्काका त्यांना कामावरून काढत नाहीत. पगार सोयी-सुविधा सर्व सारख्या, एक लाखापर्यंत पगार मिळतो, म्हणजे भेदभाव कुठेही नाहीये.

हे कसं शक्य आहे? खात्री नसेल तर सुरतेला जा आणि बघा की, शहानिशा करून घ्या!
एक मालक – गोविन्द्काका ढोलकिया – केवळ सातवी शिकलेला, त्याने माणसांना माणुसकीने वागवायचं कंत्राट घेतलंय आणि एक अजब दुनिया उभी केली आहे! प्रणाम गोविन्द्काका!!
विवेक पटवर्धन

No comments:

Post a Comment