Monday, March 17, 2014

काय सांगायचं आपल्या मुलांना?

कांही वर्षापूर्वी म्हणजे ऐंशीच्या दशकात मी कल्याणमध्ये रहात होतो तेव्हांची गोष्ट. एक तरुण मुलगा कर्करोगाने आजारी होता. त्याने नुकतीच अकरावीची परीक्षा दिली होती. तोपर्यंत रोगाने त्याचा एक पायही खाऊन टाकला होता, तो कापून काढावा लागला होता. आता तो शेवटची घटका मोजत होता. त्याच्या आळीतल्या  मित्रांनी त्यावेळी उपास केले तो बरा व्हावा म्हणून, पण त्यांच्या प्रयत्नांना यश नाही आले. शेवटी व्हायचे तेच झाले, तो गेला. मी त्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलो तेंव्हा त्या सर्वांचे दु:ख तिथली शांतता ओरडून सांगत होती. त्या आळीतल्या एकाही जागी पुढचा सण साजरा झाला नाही.काल आमच्या घरासमोर असलेल्या एका बिल्डिंगमध्ये बाराव्या मजल्यावर आग लागली. एक वृद्ध जोडपे आगीच्या लोळात संपले. त्यांची मुलगी आणि तिचा मुलगा वाचले. हे सर्व आम्ही पहात होतो. तीन तास फायर ब्रिगेड झगडली आणि आग आटोक्यात आणली. रस्त्यावर भरपूर बघे-मंडली जमली होती. आमदारपुत्र हजर झाले त्यांना लोकांनी हुसकावले असे म्हणतात. बातमी नेटवर तसेच वृत्तपत्रात आली.

आज सर्वत्र लाउडस्पीकर किंचाळत आहेत. कालची घटना विसरून गेलेत. होळी खेळत आहेत. वर डोके करून बघितले तर बाराव्या मजल्यावरचा काळोख आणि राख अजूनही दिसते आहे. मला काही प्रश्न पडलेत. ते असे:

मोठया माणसांपेक्षा लहान मुले अधिक संवेदनाशील असतात काय?

समाज एकजिनसी [होमोजीनियस] असला तर [जसा त्यावेळी कल्याणला होता] तो कास्मोपोलिटन समाजापेक्षा [जसा आज ठाण्यात आहे] अधिक संवेदनाशील असतो काय?

आपण आपली संवेदनाशीलता आपल्या हौसिंग सोसायटीपुरती मर्यादित ठेवावी काय?

काय म्हणता तुम्ही?
विवेक पटवर्धन

1 comment:

  1. Individualism wins here badly. Socialism loses hands down.

    ReplyDelete