Tuesday, March 25, 2014

कंत्राटी न्याय

संध्याकाळ झाली होती, आम्ही तिघेजण एका कंपनीच्या सुसज्ज गेस्ट-हाउसमध्ये दाखल झालो. थोड्या वेळाने जेवायला मेसमध्ये गेलो तेव्हा गप्पा चालू झाल्या. आम्हा तिघांनाही जाणवलं की पंधरा- वीस वर्षे रोज लोकलने अप-डाऊन करणारे आम्ही तिघे, पण गेली कित्येक वर्षे आम्ही लोकलने प्रवास केलाच नव्हता. समाजाच्या एका घटकाचा आम्ही अविभाज्य भाग होतो कित्येक वर्षे, पण आता दूर गेलो होतो, त्यांच्या सुखदु:खाची, वास्तवाची जाणीव आपल्याला नाहीये याची खंत वाटली.

दुसऱ्या दिवशी पंचवीस व्यवस्थापकाचे ट्रेनिंग करायचे होते. प्रशिक्षणाचा विषय होता ‘कंत्राटी कामगार.’ आम्ही कंत्राटी कामगार कायद्यावर केलेल्या पंचवीस-तीस स्लाईडस घेऊन आलो होतो, पण ऐनवेळी मी त्या बाजूला ठेवल्या. मी त्या व्यवस्थापकाना काही प्रश्न विचारायचे ठरवले.

“थोडा वेळ समजून चाला की तुम्ही सर्व कंत्राटी कामगार आहात, आणि मी कांही प्रश्न विचारतो त्यांची उत्तरं द्या. माझा पहिला प्रश्न – ‘तुम्ही कंत्राटी कामगार का झालात?’”

कांही क्षणांची स्तब्धता. मग एक बोलला, “कारण आमच्याकडे शिक्षण नाही, कौशल्य नाही.” “कायम स्वरूपी नोकरी कोणी देतच नाही, मग कौशल्य असले तरी तडजोड करावी लागते.” “कायम स्वरूपी नोकरी होती पण व्हीआरेस घ्यावी लागली. म्हातारपणासाठी चार पैसे ठेवून द्यायचे असले तर मिळेल ती नोकरी करणं भाग पडलं.”

आता ट्रेनिंग रूम मधला मूड बदलला होता. मी विचारलं, “तुम्ही काम करता त्या कारखान्यातल्या कायम स्वरूपी कामगारांच्या युनियनबद्दल तुम्हाला काय वाटतं?”

“आप्पलपोटे आहेत सगळे! स्वत:पुरते बघतात, त्यांचे पगार वाढतात – आम्हाला सदैव किमान वेतन.” “त्यातले कित्येक आराम करतात – त्यांची कामं आम्हीच करतो, पण पगार ते घेतात. या सर्वात युनियनचे पदाधिकारीच पुढे असतात.”

“आता तिसरा प्रश्न, कंपनीच्या मेनेजमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं?”
बराच वेळ स्तब्धता. मग एक जण बोलला, “त्यांच्या तर आम्ही खिजगणतीतही नसतो. किती माणसं आमच्या कंत्राटदाराने आणली एवढाच त्यांचा प्रश्न.”

“म्हणजे तुम्ही असून नसल्यासारखेच?”
“तसंच”
“तुम्ही कामावर येता तेव्हां गेटावर कशी वागणूक मिळते?” माझा पुढचा प्रश्न.
“कांही ठिकाणी वेगळं गेट असतं आम्हा कंत्राटी कामगारांना. नाही तर सर्वप्रथम कायमस्वरूपी कामगार प्रथम कामावर जातात. मग आमची वर्णी.”
“झडती होते – कसून झडती होते परत जाताना. कित्येक वेळेला बायकांची पंचाईत – चांगली वागणूक मिळाली नाही तरी बोलतां येत नाही.”
“आणि केन्टीनमध्ये? तिथे काय होतं?”
“अनेकदा कंत्राटी कामगारांची केन्टीन वेगळी असतात. तिथे जे काही असतं त्याला सुविधा म्हणणं कठीण आहे.”
“कंत्राटी कामगारांची जेवायची वेळही वेगळी असते. कंपनीच्या कामगारांच्या नंतर ते जेवतात.”
“हे फार वाईट आहे कारण परमनंट कामागारांपेक्षा अधिक जोखमीच काम तेच करतात. कित्येक कारखान्यात पहिल्या पाळीत परमनंट कामगार तर दुसऱ्या पाळीत - त्याला सोडवणारा – कंत्राटी कामगार असतो. अशा ठिकाणी मुख्य भेदभाव पगारातच असतो.”
“मी तिकडेच वळणार होतो” मी म्हणालो. “एकाच प्रकारच्या कामाला कायम स्वरूपी कामगार तसेच कंत्राटी कामगार लावतात. काय म्हणायचंय तुम्हाला?”
“हे काय दिसत नाही का इथल्या व्यवस्थापकांना? कोणीच कसं कांही करीत नाही?”

पुन्हा एकदा अस्वस्थ स्तब्धता.
“ही चर्चा भलतीच अस्वस्थ करणारी झाली नाही का? चला, आपण हे विचार जरा ‘पार्क’ करुंया मला असं विचारायचं आहे की तुम्ही कल्पना करा – एक गरीब अकुशल कामगार आहे. त्याला पत्नी आहे. दोन शाळेत जाणारी मुलं आहेत. ती मुनिसिपाल्तीच्या शाळेत जातात.त्याला मानाने जगण्यासाठी – म्हणजे दोन खोल्यांचे घर, दोन वेळ जेवण, मुलांना पुरेसे कपडे – चपला, तसंच पत्नीलाही, पुस्तकांचा शिक्षणाचा खर्च – असं जगण्यासाठी त्याची मासिक आमदनी किती असली पाहिजे?”
“बारा हजार”, “दहा हजार”, “पंधरा हजार”
“युनियनवाले किमान वेतन दहा हजार तरी असलंच पाहिजे म्हणतात – आज समजलं तसं का म्हणतात ते.”
“खरं तर मी कधी असा विचारच केला नव्हता. कायद्यानुसार किमान वेतन साडे-सहा हजार आहे ते दिले पाहिजे यापलीकडे मी कधी गेलोच नव्हतो.”

“आता शेवटचा प्रश्न: मी वाक्य सांगतो – अर्ध वाक्य – तुम्ही उरलेलं अर्ध पूर्ण करायचं. रेडी?”
“रेडी!”
“कंत्राटी कामगार असणं म्हणजे ..........”
“गुलामगिरी – स्लेव्हरी!!!”

हा प्रयोग मी आत्तापर्यंत दहा वेळा केलाय.  आणि हे शपथेवर सांगतो – प्रत्येक वेळी हे अस्संच घडतं.
कारण? कारण ते तस्संच आहे!!!

------- विवेक  

1 comment:

  1. This is incisive ,cuts all the justification and brings out the stark exploitation ! Saheb you are using the lab so well to build the sensitivity on the issue !

    ReplyDelete