Monday, December 31, 2018

कारण पुस्तकांना जीव असतो


पुस्तकांना जीव असतो आणि त्यांना सिक्स्थ सेन्स असतो यावर विश्वास ठेवणारे केवळ पुस्तक-प्रेमीच असतात. एवढी प्रस्तावना केली की तुमच्या ध्यानी आले असेलच की मी त्यातलाच आहे.

मला एखादा प्रश्न भेडसावतोय, आणि माझे मन उत्तर शोधतंय अशी वेळ असताना एक पुस्तक कोणी तरी मा‍झ्या हाती ठेवतो, किंवा माझाच हात बुक-शेल्फवरल्या एखाद्या पुस्तकावर पडतो ज्यात त्या प्रश्नांचे उत्तर सापडतं - असं केवळ माझ्याच अनुभवात आहे असे नाही तर अनेक जण असं अनुभवल्याची खात्री देतील.

कधी कधी एकाच प्रकारची पुस्तके आपल्या पुढे येत राहतात. एकाच विषयाची. नुकतेच माझे वास्तव्य तीन महिने लंडनमध्ये होते. तिथली लायब्ररी मरटन कौन्सिलची, पण नवी पुस्तके तिथे वाचायला मिळतात. म्युनसीपालटीच्या लायब्ररीत नवी पुस्तके मिळायला भाग्याच हवे असा माझा समज तिथे खोटा ठरला. एक पुस्तक शेल्फवर असे ठेवले होते की जणू ते माझी वाटच बघत होते. ‘Why I Am Not Talking to White People About Race.’ रेनी एडो-लॉजने लिहिलेलं हे पुस्तक २०१७ सालचं. विषय वर्णद्वेषाचा. गुलामांना आफ्रिकेतून नेणाऱ्या शेवटच्या बोटीपासून सुरवात. ज्या स्त्री-लेखिकांच्या दहा पुस्तकांनी जग बदलले अश्या पुस्तकांत त्याची गणना होते. अर्थात ही यादी पाश्चिमात्य लोकांची. अतिशय ओघवती भाषा, भरपूर संशोधन – त्यामुळे पुढे आणलेल्या घटना आणि विचारांची मांडणी हे ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

ते पुस्तक परत केले तेव्हां दुसरे अमुक एक वाचायचे असे काही ठरवले नव्हते. पण लायब्ररीत अजून एक नवे पुस्तक असेच समोर आले. नुकत्याच खरेदी केलेल्या पुस्तकांना एका शेल्फवर ठेवले होते. ‘बराकून. त्याचे उपशीर्षक ‘The Story of The Last Black Cargo.’ आता आलो का पुन्हा गुलामांना आफ्रिकेतून नेणाऱ्या शेवटच्या बोटीपर्यंत? ब्लॅक कार्गो म्हणजे आफ्रिकेतील पकडून आणलेले गुलाम जे बोटीवरून नेऊन इतर देशांना विकत होते. मी वेस्ट इंडीज बेटांना कामानिमित्त अनेकदा भेट दिली आहे. नायपॉल माझा आवडता लेखक. त्याचे ‘द मिडल पॅसेज’ हातात घेतले तेव्हा ‘मिडल पॅसेज’ म्हणजे काय ते कळायलाच वेळ लागला होता. जाऊ दे! पुन्हा बराकूनकडे वळतो. शेवटच्या बोटीवरून आलेल्या एका गुलामाची ही सत्यकथा आहे. कोसोला त्याचे नाव, १८४१ मध्ये जन्मलेल्या आफ्रिकेतल्या कोसोलाची, ज्याला गुलाम म्हणून अमेरिकेत विकले गेले. त्याच्या आणि लेखिकेच्या अनेक संवादांनी हे पुस्तक तयार झाले आहे. मी सध्या तेच वाचतोय. विशेष म्हणजे लेखिकेने हे पुस्तक कोसोलाच्या बोली भाषेतच [dialect] प्रकाशित करायचा हट्ट धरला. त्यामुळे प्रकाशन लांबलेले हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.

ही सर्व सुन्न करणारी पुस्तके आहेत. ती जरा बाजूला ठेवून मी अमेझॉन प्राईमवर डॉक्युमेंटरी पाहायचे ठरवले. Brazil: An Inconvenient History सुरु केली. अक्षरशः पहावेना. पुन्हा मी गुलामांपर्यंत येऊन पोहोचलो होतो. जरी मी ती अर्ध्यावरच सोडली होती तरी आता मी ती पूर्ण पाहणार आहे.

हे असे का होते? आपण असे गुळावरच्या माशीसारखे पुन्हा पुन्हा एकाच जागी घोंघावणारे का होतो? त्याला काही मानसशास्त्रीय स्पष्टीकरण असेलही. पण मला वाटते की कोणी तरी आपल्याला एकच विषयाकडे सतत ढकलते आहे. का ढकलते आहे ते माहित नाही. पण पुस्तकांना जीव असतो हे मी ठरवलेले सोपे उत्तर. पुस्तकेच आपल्याकडे येत राहतात असे वाटते. ते खरे नाही हे मलाही माहित आहे. तरीही त्या [गैर]समजामुळे माझे आणि पुस्तकांचे नाते घट्ट होतंय हे तर खरे आहे!

विवेक पटवर्धन

1 comment: