Sunday, March 10, 2019

एका लग्नाच्या वाढदिवसाची गोष्ट


“एवढा कसला विचार करता आहात?” प्रश्न होता लुलूचा, माझ्या पोपटाचा. मी बागेत मॉर्निंग वॉक घेत होतो तेव्हा हा प्रश्न आला. “जेव्हां तुम्ही चालता तेव्हां तुमचे डोके चालते. जसे काही कोणीतरी डोक्यातले स्विच ऑन केले असे वाटावे.”

“अगदी खरंय.” मी म्हटले. मी एका पिवळ्या फुलांनी भरलेल्या झाडाखाली थांबलो. लुलू, माझा पोपट, त्या झाडाच्या एका फांदीवर बसला होता, तिथून झेप घेऊन तो माझ्या खांद्यावर अलगद उतरला. “माझ्या बाबतीत तरी ते अगदी खरे आहे.”

“सांग ना, कसला गंभीर विचार करतो आहेस?

“गंभीर वगैरे काही नाही. लग्नाचा बेचाळीसाव्वा वाढदिवस येतोय, तिच्यासाठी प्रेझेंट कोणते घ्यावे हा विचार चालला होता.”

“खरंच की काय? व्वा! लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला कोणतं प्रेझेंट घेतलं होतं?

“सोन्याच्या इयर रिंग. आमच्या बजेटमध्ये तेवढंच जेमतेम बसलं.”

“आणि बत्तिसाव्या वाढदिवसाला?

“अं………… छ्या:, नाही आठवत”

“ठीक आहे, बरं, एकोणतिसाव्या वाढदिवसाला? तीन वर्षापूर्वी?

“अं…. काय बरं, अं……. नाही आठवत!”

“गंमत आहे ना? बेचाळीस वर्षापूर्वी दिलेली भेटवस्तू आठवते, पण तीन वर्षांपूर्वीची नाही आठवत!”

“हे खरं तर आहे, पण अवघडून टाकणारं आहे. हे असं का असेल?

“कदाचित एखाद्या घटनेबरोबर जोडल्या गेलेल्या उत्कट भावनांमुळे असेल. अशी घटना नेहमीच येत राहिली की तोच-तोचपणा येतो आणि त्यातली उत्कटता संपवतो – असेही असू शकते. बेच्याळीसाव्या वर्षापर्यंत लग्नाचे १५,३३० दिवस, किंवा ३,६७,९२० तास, म्हणजेच २,२०,७५,२२० मिनिटे, अर्थात १३२.४ कोटी सेकंद तुम्ही दोघे एकत्र असता, म्हणजे असे होणारच.”

“हा, हा, हा! कदाचित तसे होतही असेल.”

“मग, साहेबजी, ह्या वर्षी कोणतं प्रेझेंट घेणार?

“मला सांग, प्रेझेंट देऊनच प्रेम व्यक्त करायचं असं काहीं आहे का? मी इंटरनेटवर बघितलं, लग्नाच्या बेचाळीसाव्या वाढदिवसासाठी विशिष्ट असं काहीच प्रेझेंट नाहीये. मला वाटतं की सर्वांनाच कळून चुकलं आहे की – तू म्हणालास तसं - घटना नेहमीच येत राहिली की तोच-तोचपणा येतो आणि त्यातली उत्कटता संपवतो.”

“पण आपणच प्रत्येक घटनेत उत्कटता आणली पाहिजे असं नाही का तुला वाटत?” लुलू अत्यंत तुच्छतेने माझ्याकडे पहात बोलला. “आयुष्य असं जगायला हवं. नाहीतर कोणत्याही दोन दिवसात काहीच फरक असणार नाही.”

लुलुने पंख फडफडवले, आणि तो त्या पिवळ्या फुलांच्या झाडावर जाऊन बसला. तेव्हां काही फुले माझ्या डोक्यावर पडली. आणि काही चावा घेणाऱ्या लाल मुंग्यादेखील!

विवेक पटवर्धन

2 comments:

  1. Wow, Good Monolog Sir. Need to talk with overself.

    ReplyDelete
  2. Congratulations on the upcoming 42nd Anniversary to both!:)
    Hope you think of a nice gift...and I am sure the intensity of the moment is still the same as 42 years ago despite Lulu's 'wise'-crack!

    ReplyDelete