ब्लाइंड डेट म्हटलं की लोकं डोळे मोठ्ठे करून बघतात. कारण ब्लाइंड डेट म्हणजे
दोन अनोळख्या व्यक्तींची रोमॅंटिक भेट. पण माझी भेट रोमॅंटिक वगैरे अजिबात नव्हती.
मला अनुभूतीचा फोन आला. मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये अनेक वर्षे
एक कोर्स शिकवत होतो. अनुभूती जरी माझी विद्यार्थिनी नव्हती तरीही ती अनेकदा
अभ्यासातील मदतीसाठी माझ्याशी बोलत असे, भेटत असे.
“सर एक महत्वाचे काम आहे’ अनुभूती म्हणाली. ‘प्लेसमेंट चालू झाल्या आहेत. अजून
गोमाला जॉब मिळाला नाहीये. ती अतिशय तणावाखाली आहे. तिला जॉब मिळावा अशी आमच्या सगळ्या
वर्गाची इच्छा आहे, पण
तिच्याकडे अनेक रिक्रूटर बघायलाही तयार नाहीत. जे तिचा इंटरव्ह्यू घेतात ते तिला
सिलेक्ट करीत नाहीत.”
काही कारणाने मी अनुभूतीच्या बॅचला शिकवत नव्हतो. त्या बॅचमध्ये गोमा रायदेखील
होती. जरी मी त्या बॅचला शिकवत नव्हतो तरीही गोमा रायला मी ओळखत होतो, पण पाहूनच,
कधी बोललो नव्हतो. नेपाळमधून आलेली गोमा एक अंध विद्यार्थिनी होती.
“मग मी काय करावं म्हणतेस? काय काम
आहे?”
“सर तुम्ही तिच्याशी बोला. तिचा आत्मविश्वास डळमळू लागलाय. मला आणि माझ्या वर्गातल्या
अनेकजणांना वाटतंय की तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवाल. तिलादेखील वाटतंय तुम्हाला भेटावं.
नाही म्हणू नका.”
मी नाखुषीनेच भेटायला तयार झालो. काही विद्यार्थ्यांनी माझ्यावर भिस्त टाकली
आहे हे जाणवलं, पण माझ्याकडे त्यांच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं. असा माझा अनेकदा
गाईडमधला देवानंद होतो. तुरुंगातून सुटून आलेला देवानंद एका देवळाच्या पायरीवर
झोपतो, पहाटे एक साधू त्याच्या अंगावर आपली ‘श्रीराम जयराम’ लिहिलेली शाल घालून
निघून जातो, आणि गावकऱ्याना वाटतं की
तो देखील एक साधुच आहे. त्यांचे प्रश्न तो सोडवील असे त्यांना वाटते. लोक असेच
त्यांच्या अपेक्षा माझ्यावर लादतात आणि मी त्यांच्या अपेक्षा पुऱ्या करायला मुकाटपणे
झटतो असं अनेकदा झालंय. भिडस्तपणाने ‘नाही’ न म्हणता आल्यामुळे मी अनेकदा नको ती
कामे अंगावर घेतली आहेत. हे त्यातलेच एक. त्यातही भर म्हणजे मी गोमाला भेटायला इन्स्टिट्यूटमध्ये
जायला निघालो तेव्हा पत्नी म्हणाली, ‘तुम्ही काहीतरी कराच तिच्यासाठी’.
गोमा आली तेव्हा पोटात गोळाच आला. आम्ही दोघे एका प्रोफेसरच्या केबिनमधे बसलो.
गोमा बोलायला लागली. जॉब मिळणे कठीण आहे हे तिनेही जाणलं होतं. पण तिचा इंटरव्ह्यूचा
अनुभव चांगला नव्हता. तिचा इंटरव्ह्यू घेणारे एक औपचारिकपणा करतात, त्यांना तिला
जॉब द्यायचा नसतो, हे तिच्या ध्यानात आलं होतं. काही कंपन्यात विशेषत: पब्लिक
सेक्टरमधल्या कंपन्यात डिसेबल्ड व्यक्तींना नोकरी देण्याचे धोरण असते, तिथल्या एच आर मॅनेजरना
तशा व्यक्तींचे इंटरव्ह्यू घेणे भागच असते. पण त्यांना निवडण्याचे स्वातंत्र्य
असावे.
काही इंटरव्ह्यूमध्ये तर ती दुखावली गेली होती. ते सर्व सांगताना गोमा अचानक
रडायला लागली. तिला रडताना पाहून मला काय करायचे ते सुचेना. मी आयुष्यात कधीही
इतका हतबल झालो नव्हतो. एकच बरं होतं की मी तिच्या डोळ्यातील अश्रू बघू शकत होतो, पण तिला मात्र माझे अश्रू
दिसत नव्हते.
थोड्या वेळाने दोघेही सावरलो. “सॉरी सर,” गोमा म्हणाली, “फार इमोशनल झाले. एका भिंतीवर
डोकं आपटावं असा अनुभव आहे हा.”
मी इतर काही बोलत वेळ काढला, कॉफी मागवली आणि अवांतर गप्पा मारत दोघेही कॉफी प्यायलो.
गोमाचा प्रश्न सोडवायला नेहमीची विचारसरणी नाही कामाची हे कळून चुकलं होतं. एक
दीर्घ श्वास घेतला. इमोशनल मनाला पुन्हा रॅशनल बनवायचे असेल तर दीर्घ श्वास घ्या
आणि काही वेळ धरून ठेवा, असं
कोणीतरी सांगितलं होतं.
“इंटरव्ह्यू सुरु कसा होतो?” मी
विचारलं. “सर, ते माझ्या कुटुंबाबद्दल, शिक्षणाबद्दल वगैरे माहिती
विचारतात. पण ज्या रीतीने हे होतं त्यामुळे त्यांना माझ्या इंटरव्ह्यूमध्ये
इंटरेस्ट नाही हे तेव्हाच कळतं.” गोमा म्हणाली.
माझ्या करियरमध्ये मी शेकडो इंटरव्ह्यू घेतले आहेत, त्यामुळे इंटरव्ह्यू घेणार्याला
काय वाटत असावे ते मी ताडले.
“गोमा नीट ध्यानात घे – इंटरव्ह्यू घेणार्याला वाटत असावं की ही डोळस
माणसांसारखी काम करू शकेल काय? तू ट्रेनी मॅनेजर
म्हणून नोकरी बघतेस हे ध्यानात घे.”
“सर मी एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट सर्व सोफ्टवेयर सहज वापरू शकते. जॉज नावाचे सोफ्टवेयर
आहे, कानाला हेडफोन लावला की स्क्रीनवरचे
सर्व ऐकायला येतं – दिसलं नाही तरीही.”
“तू डेमो देऊ शकशील?”
“त्यात काय, मी तर लॅपटॉपवर कितीतरी
काम करते. सहज दाखवीन.”
“इंटरव्ह्यू घेणार्याला वाटत असावं की ही मुलगी एकटी कशी ऑफिसला येईल? मग काय म्हणायचं?”
“सर, अहो मी फील्डवर्कला माझी मीच, एकटीच, जाते सगळीकडे.”
मग थोडा वेळ आम्ही दोघेही स्तब्ध होतो. मी तिला म्हटले, “मी सांगतो
त्याप्रमाणे करशील?”
“नक्की”
“जशी तू इंटरव्ह्यू घेणार्याला भेटशील आणि इंटरव्ह्यूला सुरवात होईल तशी तू इंटरव्ह्यू
घेणार्याला थांबव. त्याला सांग – तुम्ही इंटरव्ह्यू सुरवात करण्यापूर्वी मला
तुम्हाला काही सांगायचंय. त्याला सांग की मला तीन गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली
म्हणजे मी जॉज सोफ्टवेयरमुळे एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट सर्व सोफ्टवेयर सहज वापरू
शकते. असं म्हणून तू एक छोटा डेमो दे. दुसरं म्हणजे मी कुठेही एकटी जाऊ शकते, मी फील्डवर्कला एकटीच
गेले, पाहिजे तर आमच्या प्रोफेसरांना विचार. मी ऑफिसलाही एकटीच येईन कुणावरही मी
अवलंबून असणार नाही. आणि तिसरे म्हणजे मी एकटी राहूही शकते. खरी परिस्थिती अशी आहे
की लोकं आमची काळजी घेतात,
तुमच्यापेक्षा आम्ही जास्त सुरक्षित असतो. एवढे ठणकावून बोल. जमेल?”
“जमेल.” मग पुन्हा शांतता. “ह्यापेक्षा जास्त काही करणं आत्ता तरी सुचत
नाहीये.”
गोमा आणि मी बाहेर आलो तेव्हा अनुभूती भेटली. “गोमाच्या इंटरव्ह्यूमध्ये तुला
एक ऑबझरवर म्हणून बसता आलं तर बघ, आपल्याला माहिती मिळेल.” मी म्हणालो.
दोन दिवसांनी अनुभूतीचा फोन आला. “सर गोमाने तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं,
ती इतकी आत्मविश्वासाने बोलली! मी हजर होते. मला तिथे बसायची परवानगी दिली होती इंटरव्ह्यू
घेणार्याने.”
गोमाला कॅम्पस इंटरव्ह्यूमुळे नोकरी मिळाली. पण तिचा प्रश्न सोडवायचे मला कसे
जमले त्याचे उत्तर मी शोधतो आहे. गोमाचा प्रश्न सोपा नव्हता. त्याचे उत्तर सुचले
ते मला वाटलेल्या तिच्याबद्दलच्या कळकळीमुळे, की विद्यार्थ्यांनी माझ्यावर
टाकलेल्या विश्वासामुळे? का इतर काही? काही गोष्टींचा
शोध घ्यावासा वाटतो पण तो लागत नाही. पण ते तसेच राहू दे.
माझी ब्लाइंड डेट तर एका अवघड परिस्थितीशी होती. मागे वळून पाहताना ती रोमॅंटिक
वाटते!
विवेक पटवर्धन
[ही एक सत्य घटना
आहे.]
Great narration, Ani amazing intervention
ReplyDelete