आदिवासी
समूह मुळातच कमी बोलणारा पण आताच्या सतत स्वतःला सिद्ध करावं लागण्याच्या काळात
आयुष्य समानतापूर्वक,
आदरयुक्त हवे असेल तर तुम्हांला बोलावेच लागेल तरच विविध प्रकारचे नेतृत्व
करण्याची संधी मिळेल नाहीतर सतत विविध प्रकारच्या हिंसाचाराला, अन्यायाला
सामोरे जावे लागेल असा सूर जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी ‘आरोहन’ने आयोजित
केलेल्या सहा महिला आणि युवा सोबतच्या मेळाव्यात निघाला.
आरोहन
ही नोंदणीकृत सामाजिक संस्था गेली १३ वर्षे पालघर मधील मोखाडा, जव्हार, डहाणू आणि
पालघर या तालुक्यांमध्ये ‘कुपोषण समूळ नष्ट व्हावे’ यासाठी आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती, पाणी आणि
सुप्रशासन हे विषय मध्यवर्ती ठेवून काम करीत आहे. मोखाड्या तालुक्यातील सुर्यमाल-
केवनाळे, कुर्लोद,
पाथर्डी- बोटोशी, आणि आसे ग्राम पंचायत तर जव्हार मधील कडाची मेट गांव आणि आयटीआय
जव्हार या ठिकाणी विशेष लक्ष देवून सध्या महिला, मुल आणि युवा वर्गा बरोबर काम
सुरु आहे.
‘बॅलन्स
फॉर बेटर अर्थात - समानता असणारा, आनंदी समाज निर्माण होण्यासाठी जात,धर्म,लिंग इ. सर्व
प्रकारचे संतुलन आवश्यक आहे’ ह्या संकल्पनेवर आधारित यावर्षीचा ‘जागतिक महिला दिन’
सहा ठिकाणी साजरा करण्यात आला. बोटोशी येथील भोसपाडा, आसे येथील ब्राह्मण गांव, कुर्लोद, सूर्यमाळ,
कडाची मेट आणि आयटीआय जव्हार येथे मोठ्या जल्लोषात महिला दिन साजरा करण्यात
आलेल्या ह्या मेळाव्यात जव्हार आगारच्या व्यवस्थापिका सरिता बागल, माधुरी मुकणे, सरिता चौधरी, प्रतिभा भोये, अॅड कल्याणी
मुकणे, मीनाक्षी खिरारी आणि लीला दळवी यांनी आजची स्त्रियांची सामाजिक-आर्थिक आणि
राजकीय स्थिती मांडली आणि आपापल्या क्षेत्रात आदरपूर्वक स्वतःचे स्थान
मिळवण्यासाठी प्रत्यक्ष त्या स्त्रीच्या तसेच समाजातील इतर घटकांच्याही मानसिकतेत
बदल व्हायला हवा, हे
बदल कसे घडवावेत हे दाखवण्यासाठी स्वतःच्या अनुभवांची मांडणी ह्या मेळाव्यातून
करण्यात्त आली. सूर्यमाळ येथे ग्राम पंचायत आणि डॉन बॉस्को संस्थेबरोबर तर
ब्राम्हण गांव येथे ‘साथी’ संस्थेबरोबर या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.
यासर्व
मेळाव्यामध्ये त्या त्या गावातील स्त्रिया, युवती, युवा मोठ्या प्रमाणात सहभागी झाले
होते. कडाची मेट येथील मेळाव्यात गावातील स्त्रियांनी रान भाज्यांपासून विविध
प्रदार्थ बनवून प्रदर्शन केले. मासिक पाळी आणि त्यासंदर्भात असलेले गैरसमज समजावून
घेण्यासाठी ‘पॅड मॅन’ सिनेमा एकत्रित बघितला. महिला दिन हा सर्वांच्या आनंदाचा
दिवस असायला हवा आणि महिला सक्षमीकरणावर फक्त भाष्य न करता आपल्या कृतीत तो विचार
उतरला पाहिजे अशी भूमिका सर्व वक्त्यांनी मांडली आणि शेवटी सर्व आदिवासी महिलांनी
आणि युवानी आपला पारंपारिक ‘तारपा नृत्य’ सदर केले.
अनिता पगारे
No comments:
Post a Comment