तो चौकात पानवाल्याच्या दुकानाजवळ उभा होता. सकाळची वेळ. रोजन्दारीवरचे कामगार तिथे उभे असतात, काम मिळण्यासाठी. बहुतेकांना नाहीच मिळत काम. मंदीचे दिवस आहेत. अनेक कारखान्यातल्या कामगारांना कामावरून कमी करण्यात आलंय. माझी आणि त्याची ओळख एका युनियनच्या कार्यकर्त्यामुळे झाली होती. ओळख तशी जुजबीच, पण युनियनमुळे झाली असल्याने, त्यात फारसा औपचारिकपणा नव्हता. मी त्याला ओळखलंय हे त्याच्या ध्यानात आल्यावर तो पुढे आला. वेल्डिंगचं काम करून त्याचे हात काळे आणि राकट झाले असावेत. तो सडसडित बांध्याचा आणि उंच होता. केस अजूनही काळेच होते, पण चाळीशीचं वय चेहऱ्यावर दिसत होतं. त्याच्या उंचीमुळे तो सहज उठून दिसत होता.
“घरी चला ना” माझ्याकडे भरपूर वेळ होता, मी उगाच आढेवेढे घेतले नाही. आम्ही दोघे निघालो. त्याला आज काम मिळाले नाही हे तर स्पष्टच होतं. त्याबद्दल कशाला बोला असा मी विचार करतोय तो तोच म्हणाला, “आज नाही काही जमलं.” मी त्याच्याकडे बघायचं टाळलं.
तो रेल्वेजवळच्या झोपडपट्टीत रहात होता. घरं अतिशय जवळजवळ बांधलेली. काही बायका घराबाहेरच कपडे-भांडी धूत होत्या. घरांची उंची आठ फूट, कदाचित दहा फूट. काहींनी त्यावर एक मजलाही चढवलेला. त्या चाळींच्या रांगांमधून वात काढत आम्ही दोघे निघालो. त्याचे घर इतरांपेक्षा वेगळे नव्हते. दाराला निळा फुलाफुलांचा पडदा लावलेला. तो आत गेला, मी बाहेरच थांबलो. “या ना घरात. या की.”
मी आत गेलो. “साहेब आलेत.” तो म्हणाला.
ती हसली, “बसा ना.” बसायला तर खुर्ची नव्हती, तसा प्रश्नच नव्हता. खोली दहा बाय दहाची असेल. एकाच खोलीत संसार होता. एका भिंतीला लागून छोटसं टेबल होतं. तोच ओटा म्हणायचा. त्यावर गॅसची शेगडी होती. त्यामागची भिंत काळवंडली होती.
“चहा करू?” तिने त्याला विचारलं, आणि बाहेरून काही घेऊन येण्यासाठी खुणावलं. कदाचित बिस्कीट पुडा आणायला सांगायचं असेल, मला उगाचच दूध नसावं असं वाटलं. “नको चहा, मी तर ब्लॅक टी घेतो. दूध नको.” तिनेही चहाचा फार आग्रह केला नाही. त्याच्या चेहऱ्यावर भाव सहज दिसत नव्हते, पण तिचा चेहरा बोलका होता. लगबगीनं तिने ओट्यावरची भांडी आवरली.
फारशी ओळख नसलेल्यांकडे मी जातो तेव्हां मला फारच अवघडल्यासारखं होतं. त्यातही इथे माझी ओळख ‘साहेब’ अशी! मी काही लिहायच्या निमित्ताने त्याला भेटलो होतो. आपल्यापेक्षा अधिक शिकलेला, चार पैसे जास्त असलेला म्हणजे साहेब असं अनेक समजतात, किंवा तसे म्हणतात.
“कितवीत आहे?” मी भिंतीवरल्या फोटोकडे बघून बोललो. आठ-दहा वर्षांचा मुलगा शाळेच्या युनिफॉर्ममध्ये अध्यक्षांकडून कप स्वीकारतो आहे असा फोटो टांगला होता. “चौथीत असतानाचा फोटो आहे. आता सातवीत आहे.” तो म्हणाला. त्याचे डोळे चमकले. तिने मागे वळून बघितले, आणि तीही हसली. “विक्रांत. आमचा मुलगा. धावण्याच्या शर्यतीत पहिला आला होता.”
“हुशार दिसतोय”
“वरचा नंबर असतो वर्गात.” तिने कुणाला तरी हाक मारली आणि बाहेर जाऊन ती लगेच आत आलीही.
“कशाला त्याला बोलावता? खेळू दे की त्याला”
“साहेब, मला इथल्या मुलांची संगत त्याला लागू नये असं वाटतं. पण ते कसं टाळणार? इथली मुलं शिकत नाहीत. आणि आता शिक्षण नसलं तर पुढे काय होणार?”
माझं मन थोडं मागे गेलं. लंडनमध्ये असताना मला एक युरोपिअन भेटला होता. भारतीयांना थोडा कमी पगार दिला तरी चालतो, पण त्यांची मुले जर चांगल्या शाळेत जाऊ शकली तर ते खुश असतात, तो म्हणाला होता.
“इथेच म्युनसिपालटीच्या शाळेत जातो.”
“पगार फारच कमी पडतो, साहेब. आता तर ह्यांना ब्रेक मिळालाय. कंपनीवाले कधी पुन्हा बोलावतात ते माहित नाही.”
मला वाटलं होतं की ‘बोलावतील ग. सगळं ठीक होईल’ असं काही तो म्हणेल. पण तो काहीच बोलला नाही.
“मी घर सांभाळून नोकरी करते. मागच्या बाजूला कारखाने आहेत. तिथे जाते. पण ह्यांना नाही आवडत.”
“ती बारावी पर्यंत शिकली आहे. तिने झाडू मारण्याचं, हौसकीपिंगचं काम कशाला करावं?” तो माझ्याकडे बघत बोलला. मी मान डोलावली.
“दुसरं काही काम मिळत नाही. काय करायचं? इथे शिकवण्या कराव्यात तर इथली मुलं शिकत नाहीत. आणि पैसे द्यायची ऐपत कुणाला आहे?”
“मी तिला म्हणतो की तू आपल्या मुलाकडे बघ. पण टेम्पररी नोकरी असल्यावर काय करायचं?” तो खाली मान घालून बसला. “माझा मुलगा मोठा होईल, नाव काढेल तरच यातून आम्ही सुटू.”
तिने त्याच्याकडे एक नजर टाकली. तिला त्याचं म्हणणं पटलं असं दिसलं नाही. थंड सुरात ती म्हणाली, “मी सांगते तुम्हाला, जग बदललंय. आता मुलं मोठी झाली, लग्न झाल्यावर वेगळी होतात. त्यांचं जग वेगळं असतं. आपल्याला सांभाळतील असं काही नाही. आजूबाजूला काय घडतंय ते बघा की.”
“तो नाही तसा. मला ठाऊक आहे. हुशार आहे. पुढे येईल नक्की.”
तिच्या चेहऱ्यावर ‘आत्ता ह्यांना काय म्हणू’ असे भाव आले. “तुम्ही इतके हळवे आहात, मला तर काळजीच वाटते.” मग माझ्याकडे बघून म्हणाली, “कधीतरी आपल्याच पायावर धोंडा मारून घेतात. मी मरमर मरून सहा हजार रुपये जमवले तर ते ह्यांनी मला न विचारता काकीला दिले.”
“ती आजारी होती.”
तिने साफ दुर्लक्ष केलं. “आता तो पुढच्या वर्षी आठवीत जाईल. त्याला क्लास लावायचा तर पैसे पाहिजेत ना? ह्यांनी तर काकीला देऊन टाकले.”
“अग, मी लहान असताना तिनेच मला वाढवलं मग तिच्या आजारपणात मी मदत करायला नको का?”
पण ती ऐकण्याच्या मन:स्थितीत अजिबात नव्हती. “मी इतकी चिडले. दहा दिवस ह्यांच्याशी बोलतच नव्हते. काकीची मुलं तिच्याकडे बघत नाहीत. तुम्ही कशाला पैसे खर्च करायला हवेत?” तिने आमच्याकडे पाठ फिरवली आणि पदराने डोळे पुसले. “माझं नशीब इतकंच की हे पीत नाहीत. नाहीतर जिणं नकोसं झालं असतं.”
“लग्नापूर्वी कधीतरी घेत होतो. पण ही आल्यापासून एकदम बंद” त्याने तिला खुलवायचा प्रयत्न केला. “मुलगा झाला आणि वाटलं की दोन जीव आपल्या भरोश्यावर आहेत. जबाबदारी वाटली.”
तिने काहीच उत्तर दिलं नाही. पडदा बाजूला करून तिने बाहेर डोकावून बघितलं. कोणीतरी तिच्या हातात बिस्किटाचा पुडा दिला. तिने चार बिस्किटे आमच्यासाठी बशीत ठेवली.
“घ्या की. आमचा पाहुणचार. गोड मानून घ्या.”
“गाव कुठलं?”
“चाळीस वर्षांपूर्वी वडील इथे आले सोलापूरहून. दुष्काळी भाग आमचा. त्यांनी मोलमजुरी करून दिवस काढले. मी वेल्डर झालो तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. तुला आज न उद्या चांगली नोकरी भेटेल, बरे दिवस येतील म्हणत. मुलगा झाला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. हा मोठा होईल तेव्हा नाव काढील म्हणायचे. त्यांचे मित्र म्हणायचे की म्हाताऱ्याचे बोल खरे होतात. एक दोघांना तसा अनुभव आला म्हणतात.”
“त्याच्या बाबतीत तरी खरे होऊ देत त्यांचे बोल. तुमच्या बाबतीत कुठे काय झालं?
तिच्या फणकारण्याने तो चिडलाच. त्याला ते चांगलंच झोंबलं असावं. तो काहीच बोलला नाही. बिस्किटाचा एक तुकडा त्याने तोंडात टाकला आणि तो खाली मान घालून सतरंजीवरच्या चुण्या निस्तरत राहिला.
“आता तर तुमच्या कंपनीतल्या अनेकांच्या नोकर्या गेल्यात. मला तर कित्येक दिवस झाले, झोप येत नाही. थकून जातो जीव विचार करीत करीत.”
मलाही काय बोलायचं ते कळेना. “होईल. सर्व काही चांगलं होईल.” पण माझ्या बोलण्याने त्यांना दिलासा मिळेल असं मला अजिबात वाटलं नाही.
तो माझ्याकडे बघून हसला. “कारखान्यात शंभर कामगार पर्मनंट आहेत. बाराशे कंत्राटी. काय करणार?”
पुन्हा शांतता. “त्याला शाळा संपल्यावर काम करायलाच लागेल. दुसरा मार्गच नाही.”
“पैसे हातात आल्यावर शिक्षण संपतं.” ती म्हणाली. “मी अशी कित्येक बघितली आहेत.”
“काय करायचं? आशा ठेवून जगायचं की नाही? का कुढत मरायचं? तो आज चांगला शिकतोय. होईल मोठा आज ना उद्या. कमावेल चार पैसे.”
आम्ही उठलो. ती पुन्हा आमच्याकडे बघून हसली. “या परत.” तो निळा पडदा बाजूला करून आम्ही बाहेर पडलो. तो माझ्याबरोबर चालत होता. हमरस्त्यापर्यंत येतो म्हणाला.
“तिला फार काळजी वाटते. आमचा भरोसा मुलावर आहे. तेवढी एकच आशा आहे.”
रिक्षा स्टँडजवळ एका दुकानात मी चार चॉकलेट बार विकत घेतले. त्याच्या हातावर ठेवले. रिक्षात बसताना “हे तुमच्या मुलासाठी,” म्हणालो. “ओळख ठेवा” तो म्हणाला. मी त्याला विसरणे शक्यच नाही, पण ओळख ठेवून तरी माझ्या हातून काय होणार होते? व्यवस्थेचा विळखा अजगरासारखा त्याच्याभोवती पडला होता. मी तो सोडवू शकत नव्हतो, तो त्यातून सुटू शकत नव्हता.
विवेक पटवर्धन
No comments:
Post a Comment