Thursday, October 8, 2020

लॉकडाउनमधली पुस्तके: रानबखर

 लॉकडाउनमध्ये बऱ्याच दिवसांपासून राहून गेलेली कामे काढली. कपाटात पुस्तके लावायचे काम माझ्या ‘टू-डू’ लिस्टमध्ये अनेक दिवस होते. मग तेच करायला बसलो. त्यातच अनेक दिवस सापडत नसलेली दोन पुस्तके हाती आली. अचानक लक्षात आले की मी इंग्रजी पुस्तके वाचतोय पण कित्येक दिवसात, कित्येक महिन्यात म्हणा हवे तर, मराठी पुस्तके वाचली नाहीयेत. साधारणपणे काही चांगल्या पुस्तकांचे किंवा मला हव्या असलेल्या विषयांवरच्या पुस्तकांचे संदर्भ मी ‘रिमाइंडर’ अॅपमध्ये नोंदवतो. फोन काढला आणि तीन पुस्तके ऑर्डर केली. ‘रानबखर’ त्यातलंच एक, इतर दोन पुस्तकांबद्दल नंतर बोलू.

‘आरोहन’च्या कार्यकर्त्यांबरोबर जव्हार मोखाडा भागातल्या पाड्यात फिरताना मी कित्येक गावकऱ्यांना आणि आदिवासींनाही भेटलो होतो. आदिवासींबाबत, त्यांच्या प्रश्नांबाबत अधिक जाणून घ्यावं असं वाटले. ‘रानबखर’चा संदर्भ कसा आला ते आठवत नाही, पण ‘रिमाइंडर’ मध्ये मी नोंद केली होती. 

माझा असा अनुभव आहे की तुम्ही ज्यावेळी एखाद्या विषयावरचे पुस्तक वाचता, तेव्हां इतर तशीच पुस्तके तुमच्या पुढ्यात आणली जातात. मी रानबखर मागवले आणि थोड्याच दिवसात कुणाच्या तरी सांगण्यावरून गाय स्टँडिंगचे ‘प्लंडर ऑफ द कॉमन्स’ हे देखील घेतले.प्लंडरचा विषय वेगळा पण कांही ठिकाणी रानबखरच्या विषयाशी समांतर जाणारा. पण त्याविषयी पुन्हा कधीतरी.



पत्रकारिता करताना थत्तेंचा संबंध झारखंडमध्ये आदिवासी गावांमध्ये अनौपचारिक शिक्षणाचे काम करणाऱ्या कांही लोकांशी आला आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, आसाम अश्या अनेक ठिकाणी आदिवासी खेड्यात रहात, त्यांना समजून घेत प्रवास केला. आदिवासींची आयुष्याकडे, शेत-रानाकडे, त्यांच्या गायीगुरांकडे  बघायची दृष्टी वेगळी आहे. शहरातल्या माणसांना ती अप्रगत वाटेल. पण जग आता  त्यांच्याप्रमाणेच विचार करू लागले आहे हे पर्यावरणावरील अनेक लेख आणि पुस्तके दाखवून देत आहेत. “साधेपणा आणि भोळेपणा, अल्पसंतोष आणि आळशीपणा, निवांतपणा आणि मंदपणा, उत्स्फूर्तता आणि नियोजनशून्यता हे गुणावगुण एकाच नाण्याचे छापा-काटा आहेत” असे थत्ते लिहितात तेव्हां आपण नाण्याची कुठची बाजू बघतोय त्याचा वाचकाला विचार करायला ते भाग पाडतात.

आदिवासींचे शोषण कसे आणि किती केले जाते हे तर सर्वज्ञात आहे, निदान तसे असावे. (थत्ते स्वत: ‘वयम्’ ही स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था जव्हारला चालवतात.) ते आदिवासींच्या बाबतीत शोषण किती खोल आणि नीच थराला जाऊ शकतं त्याची कल्पना तटस्थपणे तरीही कळकळीने मांडतात तेव्हां वाचताना आपलीच मान शरमेने खाली जाते. त्यांच्या प्रश्नावर ठोस उत्तर थत्ते सांगत नाहीत, कारण जटील प्रश्नांना सोपी उत्तरे नसतातच. पण ते उत्तरे शोधायची विचारधारा मात्र दाखवतात. “एका ठिकाणी उत्तर सापडलं म्हणून त्याच्या भराभर यांत्रिक कॉप्याकाढून ते उत्तर इतर ठिकाणी लागू पडेलच असं नाही.” म्हणजेच प्रत्येक ठिकाणी नवी उत्तरे शोधावी लागणार आहेत. त्यासाठी लोकसहभाग असणे आवश्यक आहे. म्हणून “लोक आणि विज्ञान एकत्र आले तर आदिवासींचा प्रश्न आवाक्यात आणता येईल” हा थत्तेंचा विचार सुयोग्य आहे. ते बारीपाड्याबद्दल लिहितात. बारीपाड्याच्या सर्व शंभर कुटुंबांनी श्रमदानाने दीडशे बंधारे बांधले, पाच पाझर तलाव केले. नैसर्गिकरीत्या उगवणारी झाडे वाढवली. कल्पकतेने अनेक विकासाची कामे हाती घेतली. बारीपाड्याच्या उदाहरणाचा धडा म्हणजे लोक आणि विज्ञान एकत्र आले तर आदिवासींचा प्रश्न आवाक्यात आणता येईल हाच आहे.

कित्येक स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था आदिवासींसाठी काम करीत आहेत ही अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. तर स्वातंत्र्याची सात दशके उलटली आणि अनेक विचारांच्या राजकीय नेत्यांची सरकारे आली-गेली तरीही आदिवासींची परिस्थिती फारशी सुधारली नाही हा दुर्दैवी भाग आहे.

रानबखर हे मिलिंद थत्ते यांचं केवळ पंच्याण्णव पानांचे पुस्तक. कुठच्याही विचारधारेचं जोखड न घेतां लिहिलेलं. मी ह्या वर्षी वाचलेल्या अप्रतिम पुस्तकांपैकी एक!

विवेक पटवर्धन

(रानबखर – आदिवासींच्या जीवनसंघर्षांचे पदर, मिलिंद थत्ते, समकालीन प्रकाशन, रु. १००/-)

No comments:

Post a Comment