Monday, October 12, 2020

सुसाट जॉर्ज

चरित्र आणि प्रोफाईल (शब्दचित्र) यात फरक आहे हे ‘सुसाट जॉर्जचे सिद्धहस्त लेखक निळू दामले पुस्तकाच्या सुरवातीसच स्पष्ट करतात - ‘प्रोफाईल हे व्यक्तीचं स्केच असतं. प्रोफाईलमधे व्यक्तीचे महत्वाचे ठळक पैलू येतात. ते ही मोजक्या रेषांचे फटकारे मारून तयार केलेल्या स्केच सारखे.’

शब्दचित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे माणसाच्या आयुष्यातले चढ-उतार, सन्मानाचे-संघर्षाचे क्षण त्यात टिपले असतात, त्यामुळे आपल्याला त्याचे व्यक्तिमत्व आणि जीवनपट संक्षिप्तपणे दिसतो.

निळू दामले यांनी जॉर्ज फर्नांडिसांचे शब्दचित्र लिहिण्याचे एक कारण म्हणजे त्यांनी कांही काळ जॉर्जबरोबर काम केलं होतं, जॉर्जना जवळून बघितलं होतं. दुसरं कारण (आणि हा माझा कयास आहे) म्हणजे मराठी वाचकांना असलेला जॉर्जचा परिचय. जॉर्जच्या कामाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे प्रभावित झालेल्यांची (झळ लागलेल्यांची म्हणा हवे तर) एक आख्खी पिढी इथे मुंबईत आहे. मुंबई बंद करणारे जॉर्ज, टॅक्सीचालकांची युनियन करणारे जॉर्ज, बेस्ट कामगारांचा संप करणारे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे, अशा अनेक भूमिकांतून जॉर्ज मुंबईकरांच्या जीवनात आले. आणि ज्यांना हरवणे अशक्य समजले जायचे त्या स.का. पाटलांना निवडणुकीत सपशेल हरवणाऱ्या जॉर्जबद्दल तर मुंबईकरांना नेहमीच कुतूहल राहिले आहे.



जॉर्ज यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व ‘सुसाट जॉर्जमध्ये अचूक पकडले आहे. कोणत्याही विषयाचा ध्यास व अभ्यास करणं आणि धडाडी असणं हे गुण साधारणपणे हातात हात घालून जात नाहीत. पण जॉर्ज ह्याला अपवाद होते. म्हणुनच जॉर्ज सारख्या दुर्मिळ व्यक्तिमत्वाभोवती एक वलय सहज तयार होत असावे. यलोगेट पोलिसांविरुद्ध मोर्चा काढून गोदी कामगारांवर होणारा अत्याचार रोखण्यात, रेल्वे कामगारांचा मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारण्यात, दिवसा दिल्लीत काम करून रात्री मुंबईत कामगारांची मीटिंग घेणाऱ्या जॉर्ज यांची धडाडी वाखाणायलाच हवी.

डॉक्टरी सल्ला न जुमानता कारगिलच्या सैनिकांची भेट घेण्यातला झपाटलेपणा, आणि आपल्यावरच डायनामायिट खटला काढून घेऊ नये असं जनता पार्टीला सांगणारे जॉर्ज यांचा प्रामाणिकपणा अशी त्यांची स्वभाव-वैशिष्ट्ये लेखकाने अचूक पकडली आहेत.

कोणत्याही नेतृत्वापुढे नेहमी असा पेच असतो की एका बाजूस वैयक्तिक आकांक्षेचा रेटा असतो तर दुसऱ्या बाजूस अंगीकारलेले कार्य करताना सचोटी व आशावाद ज्वलंत ठेवण्याची कसरत असते. जॉर्जने वैयक्तिक आकांक्षेकडे दुर्लक्षच केले. त्यामुळेच कामगारांचा आणि कार्यकर्त्यांचा भरघोस पाठिंबा व प्रेम मिळाले.

ओघवत्या भाषेत निळू दामले यांनी जॉर्ज फर्नांडिसांचे शब्दचित्र रंगवले आहे. त्यात तटस्थता असली तरीही कौतुकाचीही झालर आहेच. मुंबई बंद करण्यासाठी जो ओळखला गेला त्याच्यावरील पुस्तक लॉकडाऊनमध्ये सबकुछ बंद असताना प्रकाशित व्हावे हा एक चमत्कारिक योगायोग नव्हे का?

(‘सुसाट जॉर्ज’, लेखक: निळू दामले, राजहंस प्रकाशन, रु २५०)

विवेक पटवर्धन

No comments:

Post a Comment