Tuesday, May 28, 2019

कसं जमतं हे त्यांना?


मी तसा ‘आरोहन’ संस्थेसाठी नवाच. [शुद्धलेखनाचा आग्रह धरणाऱ्यांनी कृपया ध्यानात घ्यावे की आम्ही ‘ण’ आणि ‘न’ चा घोटाळा केला नाहीये. आरोहन हे नांव मूळ इंग्रजी नांवाची आद्याक्षरे घेऊन केलेले संक्षिप्त रूप आहे.] त्यामुळे आरोहनच्या विविध प्रकल्पांची ओळख करून घ्यायचे ठरविले, आणि अनिताला विनंती केली. अनिता प्रोजेक्ट मॅनेजर आहे, मी तिच्या जव्हारच्या कार्यालयात तिला भेटलो. चहापाण्यानंतर आम्ही, म्हणजे माधुरी, अनिता आणि मी निघालो. एक गाडी आम्हाला न्यायला तयार ठेवली होतीच.

“आपण करोळी गावाला जाऊया” अनिता म्हणाली. माझ्या ठाण्याच्या घरापासून जव्हारकडे जाताना  मनोरपर्यंत रस्ता, म्हणजे अहमदाबाद हायवे, प्रवास गडकरींना धन्यवाद देत केला. पण मनोर ते विक्रमगड रस्ता पार करताना आपल्याला गेल्या जन्मी केलेल्या पापांची कठोर शिक्षा मिळते आहे याची स्पष्ट जाणीव झाली. सीट बेल्टने मला सीटवर जखडून ठेवले नसते तर समोरच्या डॅशबोर्डावर किंवा बाजूच्या खिडकीवर माझा दहादा तरी कपाळमोक्ष झाला असता. जव्हारकडून मोखाड्याकडे जाणारा रस्ता चांगला आहे हा एक सुखद धक्काच होता.


“आपला हिम्बतपाड्याचा चेक डॅम” कोणीतरी म्हणाले. “बांधून दीड वर्ष झालं”. डाव्या बाजूला एक खोल दरी दिसली. तिथे एक मोठा चेक डॅम दिसला. मी गाडी थांबवली. चार फोटो काढले. डॅममध्ये पाणी नव्हते, मी महिन्यात सर्व ठिकाणी पाण्याचा दुष्काळ वाचत होतो. आता प्रत्यक्ष पुरावा समोर होता. पुन्हा गाडीत बसलो. तोपर्यंत अनिताला करवंद तोडायचा मोह आवरता आला नव्हता. पुन्हा प्रवास जारी.

“स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक मोखाड्याला वास्तव्य करुन होत्या. त्यांचा वाडा आता पडीक आहे.” अनिताने माहिती पुरवली. इतिहासाच्या संदर्भात नेहमीच्या जागाही वेगळ्याच दिसायला लागतात.

करोली गांवापर्यंत पोहोचायला दीड तास तरी लागणार होता. प्रदेश तसा रुक्ष होता. उन्हाळ्याने हिरवळ करपून टाकली होती. आरोहनच्या कार्यकर्त्यांना इथे गांवागावात बरेच फिरावे लागते. त्यांच्या ओळखी गांवकऱ्यांशी आहेत आणि ठिकठिकाणच्या झाडाझाडांवर आठवणी आहेत. आमच्या गाडीत आता तीन-चार जणी दाखल झाल्या होत्या. “हे बघा आरोहनचे आंब्याचे झाड”, माधुरी म्हणाली. रस्त्याच्या एका वळणावर आणि बाजूला एक सुंदर डेरेदार आम्रवृक्ष होता. “हे झाड आरोहनचे कसे?” “म्हणजे आम्ही काम केल्यावर अनेकदा ह्याच झाडाखाली बसून जेवतो.” 

गावात राहाणाऱ्यांचे हे एक वैशिष्ट्य म्हणायला हवे. माझ्या खोपोलीच्या घराभोवती अनेक मोठे वृक्ष होते. मी त्यांच्याशी बोलतही असे. मी कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्राचा अभ्यास केला होता. आमची अभ्यास सहल [excursion] निघत असे, आणि आम्ही वाटेवरच्या झाडांचा पानाफुलांचा, झाडाझुडपांचा अभ्यास करीत काही मैल चालत असू. इथे मला वनस्पतींची पारंपारिक नांवे तर कळलीच, पण कित्येक वनस्पतींचे अनेक उपयोग देखील. मोहाची दारू बनते हे मला माहित होतं, पण त्याच झाडाचे साल जखमेवर लावून त्याचा औषधी उपयोग करता येतो हे माहित नव्हतं. बहावा बहरला की पंचेचाळीस दिवसांनी पाऊस लागतो हे अनुभवाचे बोल त्यांच्यामुळेच समजले.


तसं ज्ञान हे दोन प्रकारचे असते. एक अनुभवातून आलेले, दुसरे अनुमानातून म्हणजे प्रयोगातून आलेले. निसर्गात एखादी घटना होते ती इतर घटनेची सूचक असते हे गावकरी जाणतात. पण केवळ पाश्चात्य आणि पुस्तकी माहितीवर विसंबून असणारे असे अनुभवाचे बोल ऐकताच नाहीत.

हेमंती आमच्या गाडीत होती आणि तिला विविध वनस्पतींची बरीच माहिती आहे हे लक्षात आलं. “आता त्याच विषयावर आपण एक पुस्तिकाच काढूया” अनिता म्हणाली. ते ज्ञान जतन करून ठेवायलाच हवे.”

आमची गाडी बरेच अंतर काटून पुढे गेली होती. प्रदेश रुक्ष होता. बाहेर रणरणते ऊन होते. उजव्या बाजूला एका रांगेत अनेक खड्डे खणलेले दिसले. अनिताने गाडी थांबवली. “सर, हे बघा सरकारने खणलेले खड्डे. इथे आदिवासी गेली सात पिढ्या शेती करतात. त्यांनी कुठे जायचे?” 


आम्ही करोळी गावांत पोचलो. एका मोठ्या घराजवळ ड्रायव्हरने गाडी उभी केली. चार जणी बाहेरच ओटीवर बसल्या होत्या. त्यातल्या एक नुकतीच लग्न होऊन सासरी आली होती. त्या मुलीच्या लग्नाची गोष्ट अनिताने सांगितली. मुलगी त्या खेड्यातली नव्हती, मोठ्या गावातली होती. पण आता लग्न होऊन दूरच्या खेड्यात आली होती. खेड म्हणणेदेखील योग्य नाही, हा तर एक पाडा होता, आठ-दहा घरांचा. कसं वाटत असेल अश्या नवऱ्या मुलीला पाड्यात लग्न होऊन येताना? “सर, त्यांच्या पाच-मुळं अशी प्रथा आहे. म्हणजे, लग्न होऊन येताना एक नवरीपेक्षा मोठी बाई आणि करवली [नवरीच्या वयोगटातली] अश्या दोघी तिच्याबरोबर येतात. मग नवरी पाच वेळा थोडे दिवस सासरी आणि काही दिवस माहेरी राहते असे पाच वेळा होते. त्यामुळे नव्या नवरीला तिच्या सासरी रुळायला मदत होते. तिच्याबरोबरच्या दोघी तिच्याशी बोलतात, त्यांचीही तिला मदत होते.” ही प्रथा मला वाटतं सर्वच ठिकाणी असावी जरी शहरात ती मागे पडली असेलही.

माझ्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्या मुलींनी कुडवा गावात जायचे ठरविले. आता रस्ता खराब होता. ऊन तर रणरणते होते. उजाड माळरान आणि कोरडी नद्यांची पात्रं बघवत नव्हती. माझ्यासाठी हे वास्तव्य भयंकर होते. वाटेत काही नद्यानाले पार केले, आणि ते सर्व रुक्ष कोरडे होते. एका बंधाऱ्याजवळ एक वासरू पाण्यासाठी फिरताना बघितले. आणि त्याच बंधार्‍यापासून पाचशे फुटावर एक विहीरही पाहिली जिला बाराही महिने पाणी असते. तिथून सोलार विजेने पंप चालवून टॅंकरने अनेक गावांना पाणी मिळण्याची सोय एका स्वयंसेवी संस्थेने केली आहे. 

आम्ही कुडवा गावात पोहोचलो. नारायणदादांचे घर सुंदर आहे. इथे दोनच ‘घराणी राहतात. मोवळे आणि कामाडी. कुडवा गावाचा चारी बाजूला डोंगर आहेत, म्हणजे गांवकऱ्यांनी डोंगर पार केल्याशिवाय त्यांना तालुक्याच्या किंवा कुठेही जाता येत नाही. अजूनही ‘लाल डबा’ म्हणजे एसटी इथे येत नाही. रस्ते आत्ता कुठे झाले आहेत, खडबडीत का होईना. मोखाडा इथून चोवीस किलोमीटर दूर. माध्यमिक शाळा अजूनही दूरच आहेत, जरी पूर्वीपेक्षा आता जरा जवळ आहेत म्हणायला हवे. त्यांच्या व्यवस्थेबद्दल न बोललेलेच बरे. आजारी माणसाला झोळीत घालून नेत असत. कित्येक पोहोचेपर्यंत दगावत असत. रस्ते झाल्यामुळे सोय झाली आहे. अजूनही इथे वीज नाही. एसटी नाही. एका स्वयंसेवी संस्थेने अनेक झोपड्यांना सोलार पॅनेल बसवून वीज दिली आहे.


नारायणदादांच्या घरी गेलो. [फोटो] मला मुलींनी माजघरात बोलावले. नारायणदादांच्या पत्नी स्वैंपाक चुलीवर करीत होत्या हे स्पष्ट होते. [इथे गॅस पोचला नव्हता. मूलभूत गरजा भागवण्याची मारामारी, तिथे गॅसची बात कशाला?]

चुलीवर छताला काही मक्याची कणसं बांधून ठेवली होती. चुलीच्या धुराची पुटं त्यावर बसली होती. “अशी कणसं ठेवली की त्यांना अजिबात कीड लागत नाही. कणसं बाहेरून धुराने माखलेली दिसली तरी आतले दाणे चांगले राहतात. मग त्यांचा उपयोग आम्ही शेतीसाठी करू शकतो.” नारायणदादा म्हणाले. नारायण दादा ही एक अजब व्यक्ती आहे. इथे पाच पिढ्या तरी त्यांचे घर आहे, पण तक्रार नाही. हसतमुख आहेत, शीघ्रकवीही आहेत!

मी स्वत:शीच हसलो. इथल्या गांवकऱ्यांची स्थिती त्या चुलीवर टांगलेल्या कणसांसारखीच आहे. प्रतिकूल परिस्थितीचे चटके बसताहेत, सोयी तर दूरच. तरीही माणूस आशावादी आहे, जसा बंदा रुपया आहे! कसं जमतं हे त्यांना?  

विवेक पटवर्धन

No comments:

Post a Comment